Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

आठवणीतल्या पाऊलखुणा

काहीच महिन्यांपूर्वी कोल्हापूर दौरा करून आलो होतो. फिरायला कोठे जायचं यावर बरीच आणि दीर्घ चर्चा झाल्यावर शेवटी कोल्हापूर हे ठिकाण निवडलं. सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या गावात मुक्त संचार करून येण्याचं आकर्षण होतं. तेथे जाऊन फक्त देवदर्शन करायचा विचार नव्हता; उलट तेथे असलेला निसर्ग आणि त्याचे अनुभव घ्यायचे होते. कोल्हापूरला पोचलो. अर्थात दौर्‍याची सुरुवात झाली ती देवीचे दर्शन घेऊन. मग चारी दिशा फिरायच्या होत्या. उपलब्ध वेळात जमेल तितके पण गडबड न करता सगळे स्पॉट बघायचे होते. मग कोल्हापूरचा रंकाळा, खासबाग मैदान, कोल्हापूर शहर, पन्हाळा, ज्योतिबा, कन्हेरी मठ, राजवाडा, नरसोबा वाडी वगैरे भटकंती झाली. शहरात इकडे-तिकडे फिरून झालं. शहराबाहेर जाताना अनेक झाडी, रस्ते, घरं, मंदिर वगैरे दिसत होते. काहींचे फोटो काढले तर काही स्मृतीमध्ये घट्टपणे कोरल्या गेल्या. अनेक स्थळे लक्षात राहिली आठवणीत राहिली.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे टीव्हीवर आणि पेपरमध्ये बातम्या बघितल्या-वाचल्या की कोल्हापूरमध्ये भरपूर पाऊस झाला आहे आणि सगळीकडे पाणी साचलं आहे. त्यात काही फोटोस अन विडियो दाखवत होते. ते बघितल्यावर त्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या. आपण एका क्ष ठिकाणी कधीतरी गेलेलो असतो, तेथे राहिलेलो असतो, त्या परिसराला बघितलेलं असतं, अनुभवलं असतं आणि त्याची बातमी जेंव्हा आपण वाचतो-बघतो तेंव्हा कान आणि डोळे स्थिर राहतात. भलेही आपली तेथे काही वस्तु-व्यक्ति नसली तरी त्या जागेवर आपलं लक्ष केन्द्रित होतं. अरे, तिथेच तर आपण थांबलो होतो, त्याचाच तर फोटो काढला होता, हेच की ते अशा प्रतिक्रिया देत असतो. त्या जागा पाण्यात गेल्या हे बघून-वाचून एक वेगळीच अनुभूती येत असते. आपल्या गावात राहत असताना आपण रोजचं एखाद सडकेवरून किंवा दुकानसमोरून जातच असतो, पण त्याबद्धल एखादी बातमी वाचली-ऐकली तर त्या जागेकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोण अन एक वेगळीच ओढ असते. ती जागा रोज तिथेच असते, आपण बर्‍याचदा तेथून जाताना दुर्लक्षही करतो पण बातमी वाचल्यावर एक अधीरता येते.

कोल्हापूरची ती दृश्ये बघूनही तसेच काहीतरी अनुभव आले. पन्हाळ्याकडे जातानाचा परिसर पुर्णपणे पाण्यात बघितला. जे मंदिर बघितलं होतं त्याचा फक्त कळस दिसत होता आणि बाकी पाण्यात होतं. संपूर्ण कोल्हापूर शहर पाण्याने वेढलं गेलेलं बघून तर आनंद वाटावा की हळहळ हेही समजलं नाही. तिथे असतो तर तेथून पटकन बाहेर पडायचा प्रयत्न असता आणि येथे बसून हे बघत आहे तर तेथे जाऊन सगळं बघायची ओढ लागली आहे. हे सगळं वेडवाकडं मनातील स्मृतीमुळे घडत असावं. आठ वर्ष एकाच जागी भंगार पडून असलेली शाळेतील सायकलकडे रोज लक्ष जातच नाही. ती तशीच उन्हा-पावसाची पडून असायची. धुतलेले ओले कपडे अंगावर घेऊन वाळवायची, कधी पक्षी बसायचे कधी मांजराचे पिल्लं पण तिच्याकडे लक्ष म्हणून जायचं नाही. उगाच आठवण म्हणून ठेवलेली वस्तु घराला जड झालेली असते. पण एका दिवशी अचानक तिला भंगारमध्ये काढायचा निर्णय होतो अन तिच्याकडे खास लक्ष जातं. मग कुठल्यातरी स्मृती जाग्या होतात. लक्ष जातं तेंव्हा कळतं की तिच्या टायरच्या तारा तर केंव्हाच तुटल्या आहेत, सीट फाटली आहे, गंज चढलाय, चालू असताना सारखी घसरून पडणारी चैन चार-चौघात लाज आणायची ती तर केंव्हाच धारातीर्थी पडली आहे… हे सगळं अनेक वर्षाने आठवतं. मन तयार होत नाही. पण निरोपाची वेळ आलेली असते. काळाचा काटा पुढे सरकलेला असतो. अखेर जड अंतःकरणाने तिला निरोप दिला जातो. तिच्या बदल्यात चार-दोन रुपये हातात पडतात ते मात्र जपून कुठेतरी लपून ठेवले जातात. ते पैसे बघितले की तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मग काळांनुसार तेही दुर्लक्षित होत जातात. वर्तुळ पूर्ण होत असतात.

कदाचित माणसांच्या बाबतीतही असच काहीतरी असतं. दिवसागणीन पांढरे होत चाललेले बायकोचे केस किंवा नकळत वाढत जाणारं बापाचं पोट किंवा अचानक एके दिवशी मुलीचं ‘मोठं होणं’ हे स्मृती जाग्या करत असतात. काळाचे काटे पुढे सरकत असताना लक्ष जात नाही पण ताशी काट्याचा टोल वाजल्यावर जसं लक्ष जातं त्यातला हा प्रकार आहे.

© 2016, Late Night Edition. All rights reserved.This post first appeared on Late Night Edition, please read the originial post: here

Share the post

आठवणीतल्या पाऊलखुणा

×

Subscribe to Late Night Edition

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×