Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सुदृढ आणि बुद्धिमान बाळाला जन्म देण्यासाठी हे नक्की करा...

आई होण्याचा आनंद निराळाच! जन्माला येणारे बाळ हे आई-वडिलांचे गुणसूत्र घेऊनच जन्माला येते हे खरे असले तरी सध्याची जीवनशैली पाहता आपल्या खाण्या-पिण्याचा आणि धकाधकीच्या जीवनाचाही गर्भावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. मात्र आई होण्याची ही प्रक्रिया सुरू असतानाच म्हणजे गर्भारपणातच काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर एक सुदृढ आणि बुद्धिमान बाळ जन्माला घालता येते, हे अनेक प्रयोगातून सिद्ध झाले आहे. गर्भावस्थेत असताना आई जे खाते ते पोषण थेट बाळापर्यंत पोहोचत असते. शिवाय एका विशिष्ट काळानंतर ती ज्या गोष्टी करते... गाणे ऐकते, वाचते ते सारे काही बाळापर्यंत पोहोचत असते. म्हणूनच त्या ९ महिन्यांच्या काळात खाण्यातून तसेच आईच्या सकारात्मक वागण्यातून गर्भावर योग्य संस्कार झाल्यास बाळाची बुद्धीही तल्लख होते. तुम्ही आई होणार आहात?
तर एका सुदृढ आणि बुद्धिमान बाळाला जन्म द्यायचा असल्यास त्या दिवसांत नेमके काय करायचे ते पहा / वाचा...

1.      वाचनाची सवय लावा...

शिकण्याची प्रक्रिया नेमकी सुरू कधी होते? मानसशास्त्रज्ञ आणि पालकतज्ञांच्या मते, भाषेचा पाया गर्भातच रचला जातो. तिसऱ्या तिमाहित म्हणजे साधारण चौथ्या महिन्यानंतर गर्भ आवाज ओळखू आणि स्मरणात ठेवू शकतो. त्यामुळे या दरम्यान आईने चांगले वाचन करणे हे बाळाच्या स्मरणशक्तीसाठी योग्य.

2.      टेस्टीपेक्षा 'हेल्दी' खा...

ओमेगा ३ फॅटी अॅसिड हे बाळाच्या मेंदूच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे. मासे, सोयाबीन, पालक हे पदार्थ ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा उत्तम स्त्रोत आहेत. पालकामध्ये तर लोहाचेही प्रमाण असते. ते बाळाच्या मेंदूच्या पेशींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे करण्यास मदत करते. गर्भावस्थेतच बदाम, अक्रोड खाल्ल्याने त्यातून नियासीन, प्रोटीन आणि ऊर्जा मिळते ज्याने बाळाच्या मेंदूची उत्तम वाढ होते. साधारण १२ आठवड्यानंतर आई जे खाते त्याची चव बाळालाही कळू लागते. त्यामुळे बाळाला पोषण देणारा असा योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

3.      तंदुरुस्त आणि सक्रिय राहा...

गरोदरपणात तंदुरुस्त आणि सक्रिय राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बाळाला स्मार्ट आणि हुशार बनवायचे असेल तर व्यायामाला सुरूवात करा. व्यायामा दरम्यान उत्सर्जित होणारे हार्मोन्स गर्भापर्यंत पोहोचत असतात. तसेच व्यायामुळे संपूर्ण शरीरात आणि बाळापर्यंतही रक्तप्रवाह सुरळीत होतो. बाळाच्या वाढीसाठी हे महत्त्वाचे ठरते. गरोदर असण्यापूर्वीपासून जर व्यायामाची सवय नसेल, तर तज्ञांच्या सल्ल्यानुसार हलके व्यायाम करा. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार, गर्भधारणेदरम्यान व्यायाम केल्यास बाळाच्या मज्जासंस्थेतील न्युरॉन्स (चेतापेशी) मध्ये वाढ होऊन शिकण्याची आणि स्मरणात ठेवण्याची त्याच्या मेंदूची क्षमता ४० टक्क्यांपर्यंत गर्भातच तयार होते.

4.      चांगले संगीत ऐका...

आईने ऐकलेले, गायलेले गाणे बाळापर्यंत पोहोचत असते. बाळ ते ऐकू शकत असते आणि गर्भात प्रतिसादही देत असते. बाळाला संगीत समजत नसले तरी तो ध्वनी त्याच्या मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त असतो. जेव्हा गर्भात हालचाली जाणवू लागतात, तेव्हा तुमच्या जोडीदारालाही तुमच्या पोटाला स्पर्श करून बोलायला सांगितल्यास बाळही प्रतिसाद देते. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा शांत संगीत किंवा बालगीतेही ऐकू शकता. बाळामध्ये संगीताची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीनेदेखील चांगले संगीत ऐकणे योग्य. गाणे ऐकताना शरीरात सेरोटोनिन नावाचे आनंदी रसायन निर्माण होत असते. बाळाला शांत राहण्यास आणि त्याची एकाग्रता वाढविण्यास ते मदत करते.

5.      थायरॉइडकडे लक्ष द्या...

शरीरात थायरॉइडची योग्य पातळी आवश्यक आहे. प्रेग्नन्सी दरम्यान जर थायरॉइडची पातळी अस्थिर होत असेल तर त्याचा बाळाच्या वाढीवरही परिणाम होत असतो. गर्भावस्थेत आईमधील थायरॉइडची कमतरता बाळाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करत असते. त्यामुळेच संतुलित आणि सोडियमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. यात आयोडाइज्ड मीठ, दही यांचा आहारात समावेश हवा.

6.      आहाराबरोबरच सप्लिमेण्ट्सचीही आवश्यकता...

गरोदरपणात शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता भासते. बाळाच्या उत्तम वाढीसाठी तसेच सुरळीत प्रसुतीकरिता आहारातून मिळणाऱ्या पोषणाबरोबरच अतिरिक्त अशा सप्लिमेण्ट्समधूनही पोषण मिळविण्याची गरज असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स, फॉलिक अॅसिडची मात्रा असलेल्या सप्लिमेण्ट्स घेणं योग्य.

7.      थोडे कोवळे ऊनही घ्या...

'व्हिटॅमिन डी'चे महत्त्व माहीत असूनही यापूर्वी कधी कोवळे ऊन घेतले नसेल. पण आता स्वतःसाठी नव्हे तर होणाऱ्या बाळासाठी तरी ते नक्की घ्या. सकाळचे कोवळे ऊन साधारण २० मिनिटे तरी घ्या. गरोदरपणात अनेक स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. याचे मुख्य कारण सूर्यप्रकाशापासून वंचित असणे आणि आहारातून योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी न मिळणे हेच आहे. हाडे आणि हृदय मजबूत होण्यासाठी हे जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक असून सूर्यापासून तर ते मिळतेच शिवाय अंड, मासे या पदार्थातूनही ते मिळते. गरोदरपणातील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे ऑटिझम सारखा आजार बाळाला होतो का, याविषयावर सध्या संशोधनही सुरू आहे.

8.      पोटाला हलक्या हाताने मालिश करा...


हलक्या हाताने पोटाला मालिश करणे हे देखील बाळाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे दिसून आले आहे. गर्भात असलेले बाळ हा स्पर्श अनुभवू शकते. साधारण २० आठवड्यांनंतर पोटाला हलक्या हाताने दिलेल्या मसाज बाळाच्या मज्जासंस्थांपर्यंत पोहोचत असतो. एका संशोधनानुसार, गर्भातील बाळ आईचा स्पर्श आणि वडिलांचा स्पर्श यातील फरक ओळखू शकते. पोटाला बदामाच्या तेलाने हलके मसाज करावा. गर्भातील बाळ सुगंधही अनुभवू शकते. त्यामुळे प्रेग्नन्सी दरम्यान ताजी सुगंधी फुलं, फळं आणि मोहक सुवासाचा आनंद घ्या. या सर्व भावना बाळाच्या मेंदूपर्यंत पोहोचत असल्याने ज्या सुखदतेचा अनुभव तुम्ही घ्याल तोच आनंद बाळालाही मिळेल... त्यामुळे सुदृढ आणि आनंदी राहा!

Disclaimer: This article is in Marathi Language.
Ref: http://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/lifestyle/simple-things-you-can-do-in-preganancy-to-have-an-intelligent-healthy-baby/photoshow/57854697.cms


This post first appeared on Healthy Mantra, please read the originial post: here

Share the post

सुदृढ आणि बुद्धिमान बाळाला जन्म देण्यासाठी हे नक्की करा...

×

Subscribe to Healthy Mantra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×