Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

रणमर्द बाजीप्रभू देशपांडे

बाजीप्रभू देशपांडे

अनेक वेळा बाजीप्रभू कोण होते आणि त्यांचे कार्य काय असे अनेक प्रश्न 'इतिहासाचे पुनर्लेखन’ करणारी अनेक मंडळी करत असतात. अर्थात हे सर्व प्रश्न निराधार आहेत हे उपलब्ध पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेच परंतु ही समाजकंटक मंडळीं या पुर्याव्याना जुमानत नाहीत! असो काही का असेना परंतु बाजीप्रभू  हे नाव इतिहासात मात्र प्रचंड गाजले आणि एखाद्या नरव्याघ्र्याप्रमाणे या मावळ्याने पराक्रम करून आपला देह ठेवला! याच शूर सेनानीला नमन करण्यासाठी हा लेखप्रपंच!!

बाजीप्रभू देशपांडे या व्यक्तिमत्वाबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी ‘प्रभूरत्नमाला’ या ग्रंथात त्यांचा थोडाफार इतिहास दिला आहे तो असा, “बाजीप्रभूंचा जन्म हा भार्गव गोत्रात झाला. ते भोर पासून ३ मैलांवर असलेल्या सिंध गावी जन्मले. त्यांचे आडनाव प्रधान असे होते. तेराव्या शतकात मुसलमान लोकांनी मांडवगडचे हिंदू साम्राज्य खालसा केल्यामुळे जी काही प्रभू घराणी दक्षिणेत उतरली त्यात ‘रघुनाथ देवराव प्रधान’ हे होते. पुढे दक्षिणेतील राजांकडून व बहामनी राजांकडून जी वतने व अधिकार मिळाले त्या हुद्द्यावरून मिळालेली प्रधान, देशपांडे, चिटणवीस, गडकरी, कुलकर्णी अशी उपनावे प्रचारात आहेत.”
बाजीप्रभू यांचा पुतळा!! फोटो- आंतरजाल (अतिशय आवेशपूर्ण असलेला हा पुतळा पाहिला की उर अभिमानाने भरून येतो
“भोर तालुक्यातील रोहिडा किल्ल्यावर विजापूरचे सरदार असलेले कृष्णाजी बांदल देशमुख हे किल्लेदार होते. बाजीप्रभूंचे आजे ‘पिलाजी’ व वडील ‘कृष्णाजी’ हे बांदलांकडे दिवाण म्हणून काम करत असत.  बाजीप्रभूंच्या वडीलानी मोठा पराक्रम केल्याने त्यांना ५२ गावचा देशपांडेपणाचा व कुलकर्णीपणाचा हक्क मिळाला होता. अशा या थोर परंपरेत जन्मलेले बाजीप्रभू हे स्वतःच्या कर्तबगारीतून पुढे आलेले सेनानी होते.”

बांदलांचे दिवाण सोडून इतर कोणती कामे केली असा प्रश्न कुणी विचारला तर त्याला हे अस्सल पत्र दाखवा!! पत्रातील मजकूर असा,

 “मशहुरुल अनाम बाजप्रभू प्रति शिवाजी राजे. कासलोलगड हिरडस मावळमध्ये आहे. तो गड उस पडला. याचे नाव मोहनगड ठेवून किल्ला वासवावा ऐसा तह. तरी तुम्ही मोहनगड गडावरी अळंगा मजबूत करून, किला मजबूत करून मग तुम्ही किल्ल्याखाली उतरणे मोर्तबसुद”

पत्राचा साधारण अर्थ हिरडस मावळत एक ओस पडलेला किल्ला आहे. त्याचे नाव मोहनगड ठेवून, किल्ल्याची डागडुजी करून किल्ला उतरून खाली येणे असा हुकुम शिवाजी राजांनी बाजीप्रभू यांना दिलेला दिसून येतो.
बाजीप्रभूंचा पन्हाळा वेढ्यातील पराक्रम हा सर्व श्रुतच आहे. त्यामुळे त्याबद्दल काही सांगत नाही बसत. पावनखिंडीच्या पराक्रमाचे वर्णन बाबासाहेब पुरंदरे यथार्थ करतात. ते म्हणतात, 
”काय माणसे ही! ही माणसे महाराष्ट्राचा संसार थाटण्यासाठी जन्माला आली. स्वताच्या जीवाची  यांना पर्वा काय. यांच्या एका हातावर तुळशीपत्रे उमलत होती अन दुसऱ्या हातात निखारा फुलत होता आणि महाराजांना ती आपल्या निशःब्द प्रेमाने विचारत होती, ‘महाराज! सांगा यातले संसारावर, घरदारावर काय ठेवू!!? धन्य धन्य महाराष्ट्र! धन्य महाराष्ट्राची जातकुळी!!   
चिटणीस बखरीत स्वारीनंतरचा उल्लेख आढळून येतो तो असा, “बाजी देशपांडे स्वामीकार्याकरता खर्च झाले. शिपाईगिरीची शर्त झाली., त्यांचे लेक बाळाजी बाजी यांसी आणून नावाजून त्यांची ‘सरदारी’ त्यांस दिली. त्याचे सात भाऊ होते. त्यांस आणून पालख्या व तैनात करून दिल्या. मावळे लोकांची सबनिशी सांगितली. बक्षीस दिले”. बाजीप्रभू यांच्या मुलाचे नाव बाळाजी होते का बाबाजी होते याचा खुलासा नाही झाला कारण कुलकर्णी यांनी लिहिलेल्या बाजी प्रभू यांच्यावरील पुस्तकात ही सरदारी बाबाजी प्रभू यांना दिली आहे असा उल्लेख आढळतो. तसेच १६७८ मध्ये झालेल्या सावनूर येथील लढाईत हंबीरराव मोहिते यांच्यासोबत बाबाजी प्रभू हा सुद्धा होता असा उल्लेख आढळतो.
अनेकजणाच्या मते ही लढाई गजापुरच्या खिंडीत न होता विशालगडाच्या इथे झाली पण त्याने बाजीप्रभूंच्या पराक्रमावर काहीच कमीपणा येत नाही!! त्या लढाईत बाजीप्रभू यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले आणि अमर झाले हेच इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे वाटते.


यशवंतराव चव्हाण यांनी पावनखिंडीचा रणझुंझार- माधव दवारकानाथ कारखानीस या पुस्तकाला दिलेला अभिप्राय


संदर्भ पुस्तके-
१. प्रभूरत्नमाला
२. पावनखिंडीचा रणझुंझार- माधव दवारकानाथ कारखानीस  

© 2017, Shantanu Paranjape


This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

रणमर्द बाजीप्रभू देशपांडे

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×