Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

लोकमान्य टिळक, कृष्णाजी खाजगीवाले आणि गणेशोत्सव


लेखाचे नाव वाचून तुम्ही म्हणाल की काय खेळ चालू आहे!! दोन-चार दिवसांपूर्वी एक लेख लिहिला लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव या नावाने आणि आता कृष्णाजी खाजगीवाले हे नाव कुठून आले मध्येच!! तर ती सुद्धा एक गंमतच आहे! आज महाराष्ट्रात किंवा पुण्यात म्हणले तर एका गोष्टीवरून वाद चालू आहे की सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कुणी सुरु केला. सर्वसामान्य माणसाला उत्तर विचारले तर याचे सरळ उत्तर म्हणजे ‘लोकमान्य टिळक’ असेच येईल त्याला कारण सुद्धा तसेच आहे की गावागावात हा उत्सव टिळकांनीच पोचवला! काही इंग्रजी समकालीन लेखक उदाहरणार्थ Valentine Chirol (ज्याने टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणले तो) हा लेखक आपल्या ‘The Indian Unrest’ या १९१० साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात असे म्हणतो की, “In order invest it more definitely religious sanction, TIlak Placed it under the special patronage of the most popular deity in India.” “Tilak could not have devised a more popular move than when he set himself to organize annual festival in honor of Ganesh, known as Ganpati Celebration” (The Indian Unrest, pg. 44).केवढे मोठे वाक्य आहे! वाक्याचा अर्थ कळला नसेल किंवा कळून न कळल्यासारखे असेल तर सोप्या मराठीमध्ये ‘लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला’. पण इथे मोठा मुद्दा असा येतो की पुरावा देऊन बोलले जाते आहे आणि त्यामुळे लिहिणारा इतरांच्या विरोधी आहे असे चित्र सहज उभे केले जाऊ शकते! जाता जाता एक गंमत म्हणून सांगतो त्या चिरोलच्या पुस्तकात अजून एक वाक्य आहे, At any rate, Tilak bought Shivaji to the forefront and set in motion a great " national "propaganda, which culminated in 1895 in the celebration at all the chief centers of Brahman activity in the Deccan of Shivaji's reputed birthday. (The Indian Unrest, pg. 45). पण हे मी नाही सांगत,  हे ‘टिळकांचा कट्टर शत्रू’ असणारा चिरोल सांगतो आहे!! इतरही अनेक इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात उल्लेख आहेत पण ते सगळे आत्ता देत बसत नाही!! थोडे शोधकाम तुम्ही सुद्धा करावे!!
The Indian Unrest या पुस्तकाचे मुखपृष्ठ (हे पुस्तक येथे मोफत PDF स्वरूपात उपलब्ध आहे)
बर! आता टिळक पुरण बंद करतो! दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ! नुकतेच काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दल असे मेसेज येऊ लागले की की हा उत्सव टिळकांनी नाही तर भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केला! अर्थात मंडळाची कार्यकर्ते म्हणत आहेत की अनेक वर्षांपासून ते भाऊसाहेब रंगारी यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्त्य आहे! आणि विशेष म्हणजे ते यासाठी काही पुस्तकांचे पुरावे देत आहेत. इतिहास हा पुराव्यांवरच चालतो अशाही आशयाचे काही मेसेज आले आणि बऱ्याच लोकांनी मुळापर्यंत न जाता मनुष्याचा स्वभावाप्रमाणे ते इकडून तिकडे दिले! (बर यात चिरोलचे ‘समकालीन’ लेखन नाही आहे ही मोठी गंमत आहे!) या पुराव्यात दोन पुरावे दिले आहेत ते म्हणजे ‘स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश’ जो ,महाराष्ट्र सरकारने  १९७९ च्या दरम्यान छापला आहे आणि त्याचे लेखन हे श्श्री. भ. ग. कुंटे यांनी केले आहे. म्हणजे फक्त प्रकाशन सरकारचे आहे आणि दुसरे म्हणजे श्री. करंदीकर यांनी लिहिलेले गणेशोत्सवाची ६० वर्षे हे पुस्तक. पण त्यातल्या काही मोजक्या किंवा सोयीच्या पानांचे संदर्भच फक्त समोर आले आहेत हे विशेष! तिसरा पुरावा म्हणजे केसरीमधील लेख. अर्थात तो लेख अजून माझ्यापर्यंत पोचला नसल्याने मी तो वाचलेला नाही त्यामुळे त्याच्यावर बोलणे हे योग्य होणार नाही!  

या तीन पुराव्यांवर आपण तात्पुरते बोलू! स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश हा सरकारने प्रसिद्ध केला आहे पण त्याचे लिखाण हे सरकारने केले नाही! तसेच टिळक गेल्यानंतर सुद्धा जवळपास ६० वर्षांनी तो प्रसिद्ध झाला असल्याने ‘ऐतिहासिक संदर्भात उत्तरकालीन म्हणता येईल’. बर मग तसे पाहायला गेले तर केतकर ज्ञानकोश हा श्री. केतकर यांनी प्रचंड अभ्यास करून लिहिलेला आहे आणि तो आंतरजालावर उपलब्ध सुद्धा आहे! श्री. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई प्रस्तुत असलेल्या या कोषात “हिंदु व मुसुलमान यांच्यामध्यें १८९३ मध्यें दंगे झाले त्यांचें कारण सरकारची फूट पाडण्याची कावेबाज युक्ति होय असें त्यांनीं प्रतिपादन केलें. लोकांनां राजकीय शिक्षण देण्यासाठीं १८९४ सालीं गणेशोत्सव सुरू केला; या नंतरचा शिवाजीउत्सव हाहि महाराष्ट्रांत लवकरच फैलावला. १८९५ सालीं रायगडच्या शिवाजीमहाराजांच्या समाधीच्या अनवस्थेवर त्यांनीं झणझणीत टीका केली.” असे वाक्य आहे!  



दुसरा महत्वाचा पुरावा म्हणजे करंदीकर यांचे पुस्तक! यासाठी मी भाऊसाहेब रंगारी मंडळाचे आभार मानेन की त्याने हे पुस्तक पुरावे म्हणून वापरले! आता त्या पुस्तकातले जे फोटो फिरत आहेत ते मी सांगत बसत नाही ते तुमच्याकडे असतीलच!! याच पुस्तकात असाही उल्लेख आहे जो भाऊसाहेब रंगारी यांच्या मंडळाने प्रसिद्ध केला नाही आहे! तो येथे देत मुद्द्यांच्या स्वरूपात देत आहे!!



1.     श्रीमंत सवाई माधवराव यांच्या आमदनीत गणपतीचा उत्सव शनिवारवाड्यात गणेश महालात फारच भव्य स्वरूपात होऊ लागला होता! त्यावेळी हा उत्सव हा सहा दिवस चालत असे. त्याचे विसर्जन सुद्धा मोठ्या थाटात नदीच्या घाटावर होत असे. (पृष्ठ. क्रमांक ८)
2.     श्रीमंतांच्या वाड्यात जसा हा उत्सव होत असे तसाच तो सरदार पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार वगैरे सरदारांच्या घराण्यात होत असे. या उत्सवात कीर्तने, प्रवचने, गायन इत्यादी कार्यक्रम होत असत. { हे असे कार्यक्रम आजही केसरीवाड्यात होत असतात}. (पृष्ठ. क्रमांक. ८)
3.     पुण्यात खाजगी रीतीने चालू असलेल्या उत्सवास कै. सरदार कृष्णाजी काशिनाथ खाजगीवाले यांनी सार्वजनिक स्वरूप दिले. सन १८९२ मध्ये ते ग्वाल्हेरला असताना त्यानी तिथे गणपती सार्वजनिक स्वरूपात दरबारी थाटाने होत असलेला पाहिला. त्यावरून पुण्यातही असा उत्सव करावा अशी कल्पना दृढ झाली.  १८९३ साली श्री. खाजगीवाले, श्री. घोटवडेकर आणि श्री रंगारी असे तीन गणपती बसले.
4.     असे सांगतात की या मिरवणुकीत श्री. खाजगीवाले यांचा गणपती पहिला होता. पुढे १८९४ मध्ये कुणाचा गणपती पहिला असावा याबद्दल वाद सुरु झाले असताना टिळकांनी मध्यस्ती करून कसबा आणि तांबडी जोगेश्वरी हे गणपती पुढे असावेत असा तोडगा काढला” (पृष्ठ क्रमांक ९)
5.     गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणत ज्ञानसत्त्राचे स्वरूप देण्याचा मं हा टिळकांनाच आहे. (पृष्ठ. क्रमांक ९)
6.     ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचालोकमान्यांचा हेतू असा होता की यामुळे हिंदू समाज संघटीत होईल. (पृष्ठ. क्रमांक ९)
7.     लोकमान्यांच्या पुरस्कारामुळे या उत्सवाचा त्वरीत सर्वत्र प्रसार झाला आणि त्यांच्या हयातीत हा उत्सव हे एक चळवळीचे साधन ठरले. (पृष्ठ क्रमांक १०)

पुढे एक गमतीशीर उल्लेख आढळतो तो असा की करंदीकर लिहितात “उत्सवाच्या सर्व ठिकाणच्या चालकांनी आपापल्या ठिकाणांची माहिती लिहून पाठवावी अशी प्रकट विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देऊन ज्यांनी आपला वृतांत पाठवला त्यांचे आम्ही ऋणी आहोत” (पृष्ठ क्रमांक ११)

या लेखाचा निष्कर्ष मी अजिबात काढणार नाही आहे आणि तो सर्वस्वी तुमच्यावर म्हणजेच मायबाप वाचकांवर सोडत आहे! पण एक मात्र सांगावेसे वाटते की आपल्याकडे जी माहिती इकडून तिकडून येते त्याची किमान शहानिशा करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव हा श्रेयवादाचा विषय असेल तर वरील उल्लेखांनुसार त्याचे श्रेय हे खरे तर श्री. खाजगीवाले यांना जायला हवे आणि त्यापेक्षा जास्त हे ग्वाल्हेर मधील कोण्या अनामिक उत्सवकर्त्याला जायला हवे. जर का विषय श्रेयवादाचा नसेल आणि कर्तुत्वाचा किंवा उद्देशाचा असेल तर निर्विवादपणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेच या उत्सवाचे प्रणेते ठरतात.






संदर्भ ग्रंथ-
  •          The Indian Unrest by Valentine Chirole
  •          स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश- श्री. कुंटे
  •          महाराष्ट्रीय ज्ञानकोष (केतकर ज्ञानकोष)- श्री. श्रीधर केतकर
  •          गणेशोत्सवाची साठ वर्षे- श्री. करंदीकर



This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

लोकमान्य टिळक, कृष्णाजी खाजगीवाले आणि गणेशोत्सव

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×