Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सैराट : जातीव्यवस्थेवरील भाष्याची गल्लाभरू हाकाटी


तारुण्यसुलभ (?) स्वैराचार आणि नकळत किंवा अप्रत्यक्षपणे केलेला ‘लिव इन रिलेशनशिप’चा पुरस्कार  हा ज्या संघर्षाचा पाया असेल तो संघर्ष मनाचा ठाव घेत नाही.मग त्या संघर्षाला ‘जातीव्यवस्थेला दिलेला धक्का’ या गोंडस आणि बाजारात चलती असलेल्या वेष्टनात सादर केले तरी तो संघर्ष त्या काळाचा,त्या काळातील समाजाचा संघर्ष ठरत नाही, तर तो त्या व्यक्तिचा वैयक्तिक पातळीवरील संघर्ष ठरतो.असा संघर्ष चित्रपटाच्या रूपाने पडद्यावर येतो तेव्हा तो निव्वळ गल्लाभरू, करमणूक करणारा ठरतो. ‘सैराट’हा असा गल्लाभरू आणि दिग्दर्शकाच्या शब्दात सांगायचे तर ‘तरुणवर्गाची भाषा’ बोलणारा चित्रपट आहे.आणि नागराज पोपटराव मंजुळे सारखा दिग्दर्शक ‘तरुणवर्गाची भाषा’ बोलतो तेंव्हा तो धक्का असतो.कारण ‘पिस्तुल्या’ आणि ‘फँड्री’सारखा अस्सल गावच्या मातीतील चित्रपट देणा-या मंजुळेकडून ‘सैराट’ सारख्या निव्वळ प्रेक्षकप्रिय चित्रपटाची अपेक्षा नव्हती.विशेषत: मराठी प्रेक्षक सुजाण झालेला असताना.
हा चित्रपट पाहत असताना उमेश कुलकर्णी, संजय जाधव,रवी जाधव यांच्यासारख्या करमणुकीव्यतिरिक्त अन्य कोणताही अभिनिवेष न बाळगणा-या दिग्दर्शकांचा चित्रपट आपण पाहतोय कि काय असे सतत वाटत राहते.आणि हेच  नागराज पोपटराव मंजुळे असे नाव असणा-या  दिग्दर्शकाचे मोठे अपयश आहे.दोन तास पन्नास मिनिटे लांबीच्या या मधूनमधून कंटाळा आणणा-या चित्रपटातील पहिली सुमारे चाळीस-पंचेचाळीस मिनिटे उमेश कुलकर्णीच्या चित्रपटात शोभावीत अशी आहेत.त्यानंतरची तेवढीच मिनिटे ही जाधव परंपरेतील आहेत.तर चित्रपटाच्या  शेवटची विसेक मिनिटे  ‘क्राईम पॅट्रोल’ मालिकेत असावीत तशी आहेत.मग यामध्ये नागराज मंजुळे कोठे आहे,तर तो अनेक प्रसंगामध्ये त्यातील बारकावे दाखवताना दिसतो.परंतु ते बारकावे कथावस्तू कमकुवत पायावर उभी असल्याने निष्फळ ठरतात.
 आर्ची ही गावातील पैसेवाल्या राजकारणी घराण्यातील मुलगी.ती तिच्याच वर्गातील परशाच्या प्रेमात पडते. काहीसा लाजाळू असलेला परशा सुरुवातीला, आर्ची आपले  प्रेम स्वीकारेल का या शंकेने तिच्यापासून अंतर राखून असतो.इतपर्यंत सर्व काही सुरळीत चालू राहते.पण एक दिवस तो तिच्याकडे चुंबनाची मागणी करतो.आणि आर्चीहि त्याची ही मागणी पुरविण्यासाठी पाहुण्यांनी भरलेल्या घरातून सर्वांचा डोळा चुकवून बाहेर पडते.नेमके त्याचवेळी तिचे वडील या दोघांना नको त्या अवस्थेत पाहतात आणि मग तथाकथित जातीव्यवस्थेचा संघर्ष सुरु होतो.पण दिग्दर्शक एक विसरतो की, कोणत्या मुलीचा बाप, मग तो अगदी कनिष्ठ जातीतील का असेना, विवाहापूर्वीचे असले प्रकार सहन करेल? आर्चीचा बापही ते सहन करत नाही. आणि त्याची परिणीती आर्ची,परशाचे गाव सोडून पळून जाण्यात होते. पुढे हे दोघे हैदराबादला येतात तेव्हाही लग्न करण्याऐवजी ‘लिव इन रिलेशनशिप’मध्ये राहावे तसे राहतात.कालांतराने त्यांना आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही हे कळते आणि मग ते देवाच्या साक्षीने विवाह करतात. या सा-या घटनांमध्ये हा चित्रपट कोठेही जातीसंघर्ष,वर्गसंघर्ष,अशा एकाही गोष्टीला स्पर्श करत नाही.तो स्पर्श करतो ते त्या दोघातील अभिमानाला आणि स्वामित्वाच्या भावनेला.त्यामुळे या चित्रपटाविषयी जी ‘जातीव्यवस्थेवरील भाष्याची’ हाकाटी केली जातीये ती निव्वळ गल्लाभरू आहे.
या चित्रपटाने एक  गोष्ट सिद्ध केली आहे.ती म्हणजे नागराज मंजुळे व्यावसायिक चित्रपट उत्तमपणे साकारू शकतो आणि तो बाजारात ‘प्रेक्षकांची आवड’या लेबलखाली विकूही शकतो. थोडक्यात काय, तर अनेक उणीवा असूनही आणि नसलेल्या गोष्टीची जाहिरातबाजी करूनही हा चित्रपट एकदा पाहावा असा निश्चित आहे.कारण अजय–अतुलचे संगीत,गीतांचे उत्तम चित्रीकरण आणि करमाळ्यासारख्या गावाचे विलोभनीय दर्शन ही या चित्रपटाची बलस्थाने आहेत.मात्र हे सर्व पहायला जाताना आपण नागराज मंजूळेचा चित्रपट पहायला जातोय हा चष्मा घरी कढून जा.मग पैसा वसूल असा चित्रपट आहे.
00000






This post first appeared on माझी अभिव्यक्ती, please read the originial post: here

Share the post

सैराट : जातीव्यवस्थेवरील भाष्याची गल्लाभरू हाकाटी

×

Subscribe to माझी अभिव्यक्ती

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×