Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सचिनच्या निवृत्तीचे अर्थकारण


     

       महेंद्रसिंग धोनी हा अतिशय हुशार माणूस आहे.आपल्याला हवे ते मिळविण्यात आणि नको ते बाजूला सारण्यात तो पटाईत आहे.  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बस्तान बसताच संघातील वरीष्ठ खेळाडू त्याच्या डोळ्यात खूपू लागले.आणि मग हळूहळू प्रसिध्दी माध्यमांमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या. या खेळाडूंचे वय झाले असून त्यांच्या कामगिरीत सातत्य राहीले नसल्याच्या चर्चांना दबक्या आवाजात सुरूवात झाली.आणि या चर्चांचा पहिला बळी ठरला तो सौरव गांगुली.त्यानंतर काही काळ वरकरणी तरी शांततेत गेला.परंतू आतमध्ये नक्कीच खलबते चालली असावीत.आणि मग या खलबतांचा दुसरा बळी ठरला राहूल द्रविड. त्यानंतर वरीष्ठ म्हणता येतील असे संघात उरले ते लक्ष्मण आणि सचिन तेंडूलकर.त्यामध्ये लक्ष्मणचा बळी मिळवणे फारसे कठीण नव्हते.परंतू मायदेशात होणारी न्यूझीलंडविरूध्दची कसोटी मालिका लक्षात घेऊन लक्ष्मणला शेवटची संधी देण्याचे ठरले असावे.मात्र लक्ष्मणच्या हे लक्षात आले,आणि अपमानीत होऊन संघातून बाहेर पडण्यापेक्षा संघात निवड झालेली असतानाच निवृत्ती जाहीर करण्याचा सूज्ञपणा त्याने दाखवला.एकप्रकारे  हा निर्णय घेऊन त्याने धोनीवर मातच केली आहे.लक्ष्मण म्हणतो त्याप्रमाणे,निवृत्तीचा निर्णय कळविण्यासाठी त्याने धोनीशी संपर्क साधण्याचा दिवसभर प्रयत्न केला,पण धोनी उपलब्ध होऊ शकला नाही.हे जर खरे असेल तर लक्ष्मणचा निवृत्तीचे "टायमिंग" त्याच्या मनगटी फटक्याएवढेच अचूक होते असे म्हणावे लागेल.
    धोनीला आता सलत असेल तो सचिन तेंडूलकर.परंतू गांगुली,द्रविड,लक्ष्मण हे तिघे एका बाजूला तर तेंडूलकर दुसऱ्या बाजूला,अशी स्थिती आहे.तेंडूलकर हा अजूनही क्रिकेटचाहत्यांच्या गळ्यातला ताईत आहे,अगदी या ताईतामधे प्रतिस्पर्ध्यावर चेटूक करण्याचे पूर्वीचे सामर्थ्य राहीले नसले तरी.आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसिध्दी माध्यमे आजही सचिनला "बाद" ठरवायला तयार नाहीत.माध्यमांतील काहीजण तर सचिनच्या पदरी नोकरीला असावेत एवढ्या इमानेइतबारे त्याची बाजू लावून धरताना दिसतात. अशा परिस्थितीत सचिनला निवृत्ती घेण्यास भाग पाडणे सोपे नाही.आणि एखाद्याच्या कारस्थानाला बळी पडण्याएवढा तो लेचापेचाही नाही.कारण निवृत्त होणं म्हणजे दरसाल मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांवर पाणी सोडणं.आणि असा वेडेपणा करण्याएवढा सचिन वेडा नाही.त्याच्या निवृत्तीचं अर्थकारण समजून घेतलं म्हणजे साऱ्या गोष्टी समजून येतील.
    क्रिकेटमध्ये जेवढा पैसा निर्माण होतो त्यापैकी सुमारे ७० टक्के पैसा हा भारतीय क्रिकेटमधून निर्माण होतो.त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना या बाजारात मोलाचे स्थान प्राप्त होणे अटळ आहे.अशा स्थितीत सचिन आणि धोनीसारख्या खेळाडूंचा भाव वाढणे स्वाभाविक असते.सचिन आणि धोनी, दोघे मिळून सुमारे ४० उत्पादनांच्या जाहीरातीमधे झळकताना दिसतात.त्यापैकी धोनी २३, तर सचिन १७ उत्पादनांची जाहीरात करताना दिसतो.काही वर्षापूर्वी हे चित्र नेमके उलटे होते.जाहीरात विश्वात सचिन हे अव्वल नाणं होतं. आणि आपलं हे नाणं बराच काळ खणखणीत राहील याची काळजी सचिनने घेतली.त्यासाठी त्याने आपले वेळापत्रक आखले.या वेळापत्रकामध्ये एक दिवसाचे सामने,कसोटी सामने आणि २०-२० सामन्यांना त्या-त्या वेळेच्या गरजेनुसार स्थान होते.आवश्यकतेनुसार तो विश्रांती घेऊ लागला.या विश्रांतीमागे आपली कारकिर्द लांबविणे,जेणेकरून आपण जास्तीत जास्त काळ क्रिकेटच्या मैदानाशी जोडले जाऊ याची दक्षता घेण्याची दूरदृष्टी होती.एक "व्यावसायिक" क्रिकेटपटू कसा असावा याचे सचिन उत्तम उदाहरण आहे, ते त्याच्या या धोरणीपणातून दिसते. सचिन आज प्रत्येक जाहीरातीमधून ५ कोटी रुपये कमावतो,तर धोनी सुमारे ६ कोटी."फोर्ब्ज"ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार धोनीचे वार्षिक उपन्न ४५० कोटी रूपये आहे,तर सचिनचे १२५ कोटी रूपये.पाच-सहा वर्षापूर्वी हे चित्र वेगळे होते.सचिन जगामध्ये सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू होता.आज ती जागा धोनीने घेतली आहे.असे म्हणतात की,विश्वचषक स्पर्धेमध्ये जाहीरात कंपन्यांनी सुमारे ७०० कोटी रूपये गुंतवले होते.आणि या स्पर्धेत जर भारतीय़ संघ अपयशी ठरला असता ,तर त्याचा सर्वाधिक मोठा फटका धोनी आणि सचिनला बसला असता.(निकाल निश्चिती का होते,किंवा काही सामन्यांचे निकाल आपल्या सारख्या सर्वसामान्यांना संशयास्पद का वाटतात ते समजून घेण्याच्या दृष्टीने हे आकडे पुरेसे बोलके आहेत.अर्थात आजतागायत तरी नामांकीत भारतीय क्रिकेटपटू अशा प्रकरणामध्ये गुंतलेले दिसत नाहीत.मात्र जेंव्हा धोनीसारखा कर्णधार मोठेपणाचा आव आणून सांगतो की,आम्हाला सचिनसाठी विश्वचषक जिंकायचा आहे,तेंव्हा त्याच्या या "भरत प्रेमाने" आपले डोळे भरून येतात!)
    भारतीय लोकांच्या क्रिकेटप्रेमावर ही सारी गणिते आधारीत आहेत.येथला सर्वसामान्य क्रिकेटवेडा एकवेळ पोटाला दोन घास कमी खाईल,पण क्रिकेटवर आपली पुंजी घालवेल. तो या खेळाकडे आणि खेळाडूंकडे भक्तीभावाने पाहतो.त्याचा फायदा नफेखोर कंपन्या आणि त्यांच्या हातात हात घालून खेळाडू उठवतात.सचिनने अलीकडे पुण्यातील अमित एंटरप्रायझेस बरोबर ९ कोटींचा करार केला आहे.त्यामुळेच आज तो घाऊक स्वरूपात जाहीर मुलाखती देताना दिसतो.कारण त्यानिमित्ताने त्याला या कंपन्यांची जाहीरात करता येते.थोडक्यात काय, तर हे असे गणित आहे.मग सचिनचे वय झाले आहे, म्हणून तो वारंवार त्रिफळाबाद होत असल्याचे सुनिल गावस्कर यांचे अनुभवी निरिक्षण कुचकामी ठरते.गांगुली,द्रविड आणि लक्ष्मण जाहीरातींच्या या दुनियेपासून कोसोमैल होते.त्यामुळे अपमानीत होण्यापूर्वी ते निवृत्त होण्याचा निर्णय घेऊ शकतात.पण सचिन असेल,किंवा काही काळाने धोनी असेल त्यांना असा झटकीपट निवृत्तीचा निर्णय घेताना शब्दांची कसरत करावी लागते."माझ्यामध्ये अद्याप बरेच क्रिकेट बाकी आहे", असे सांगावे लागते.आणि आपले हे म्हणणे लोकांच्या माथी मारण्यासाठी काही  बोरुबहाद्दरांना पदरी बाळगावे लागते.हे सारे लिहीण्यामागे सचिनला कमी लेखण्याचा प्रत्यत्न नाही,किंवा तसा विचारही नाही.येथे विचार आहे तो मोठ्या खेळाडूंच्या निवृत्तीचे अर्थकारण काहीसे स्पष्ट करण्याचा.अर्थात या अर्थकारणामुळे सचिनचे क्रिकेटपटू म्हणून असलेले महानपण तसूभरही कमी होत नाही.किंवा त्याच्या या क्षेत्रातील देवत्वाला थोडीही बाधा येत नाही.(असे सांगितले जाते की,आपण मद्याची किंवा तत्सम उत्पादनांची जाहीरात करणार नाही,असे वचन वडीलांना  दिल्यामुळे त्याने एक मद्याची जाहीरात नाकारून काही कोटी रुपयांवर पाणी सोडले होते.) सचिन महान क्रिकेटपटू आहे,आणि एक भारतीय म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे.पण शेवटी तोही एक माणूस आहे आणि पैसा हा आपल्यासारख्या सर्वसामान्यांप्रमाणे  त्यालाही महत्वाचा वाटू शकतो,हे विसरता येणार नाही. फरक आहे तो एवढाच की, आपली उडी काही हजारापर्यंत असेल, तर त्याची काही कोटीपर्यंत! त्यामूळे सचिनच्या निवृत्तीकडे भावनीक नजरेतून न पाहता व्यावसायिक नजरेतून पहायला हवे.


This post first appeared on माझी अभिव्यक्ती, please read the originial post: here

Share the post

सचिनच्या निवृत्तीचे अर्थकारण

×

Subscribe to माझी अभिव्यक्ती

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×