Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

किशोरकुमार-अवीट आणि अविस्मरणीय




     किशोरकुमारला सूरलोकी जाऊन पंचवीस वर्षे झाली,परंतू आजही तो आपल्यातच आहे असे वाटते.त्याचे हे असे आपल्यात असल्यासारखे वाटणेचं आपल्याला त्याच्या जवळ घेऊन जाते. आणि म्हणूनचं अगदी ठरवूनही त्याचा उल्लेख "ते" किंवा "त्यांना" अशा परकेपणाची भावना जागवणाऱ्या शब्दात करण्यास मन तयार होत नाही.किशोरचा आवाज ऐकत-ऐकत आमची आणि आमच्या अगोदरची एक पिढी लहानाची मोठी झाली.त्याच्या आवाजात पडद्यावर ओठांची हालचाल करणारी राकेश रोशन,नविन निश्चल,विनोद मेहरा,रणधीर कपूर अशी सुमार वकूबाची नटमंडळीही भाव खाऊन गेली.राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या अव्वल अभिनेत्यांनी त्याच्या आवाजाला आपल्या अभिनयातून अजरामर केले.राजेशने तर त्याच्या आवाजाला आपल्यामध्ये एवढे सामावून घेतले की,जीवनसे भरी तेरी आखे(सफर),मेरे नैना सावन भादो(मेहबूबा),मैं शायर बदनाम(नमक हराम),कुछ तो लोग कहेंगे(अमरप्रेम),जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम(आपकी कसम) अशी एक से बढकर एक गाणी कानावर आली की डोळ्यांपुढे प्रथम राजेश आणि पाठोपाठ किशोरकुमार उभा राहतो.अमिताभनेही तेरे मेरे मिलन की ये रैना (अभिमान),छू कर मेरे मन को (याराना),अशा गाण्यांवर सुरेख अभिनय करीत किशोरच्या आवाजाला संपूर्ण न्याय दिला.
 सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील प्रत्येक हिरोने गाणे गायले ते किशोरच्याच आवाजात.आणि किशोरनेही त्या-त्या हिरोला साजेशा आवाजात गाणे गात धमाल उडवून दिली. आंधी या चित्रपटात किशोरचा आवाज संजीकुमारला एवढा तंतोतंत जुळला की या चित्रपटातील सर्व गाणी (तुम आ गये नूर आ गया,इस मोड से जाते हैं.तेरे बिना जिंदगीसे)संजीवने गायली आहेत असाच भास होतो.किशोरच्या आवाजाचं हे वेगळेपण होतं.
 किशोरने एस.डी.बर्मन,कल्याणजी आनंदजी,राजेश रोशन,लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सारख्या जवळपास सर्वच संगीतकारांकडे गाणी गायली.परंतू आर.डी.बर्मनशी जुळलेले त्याचे सूर काही अफलातूनच होते.(जोडीला गुलजार यांची गीतं.)या जोडीने कित्येक चित्रपट सुपरहिट केले.किशोरच्या गुणवत्तेमुळे अगदी टुकार शब्दही गाणे म्हणुन गुणगुणले गेले.
 किशोरविषयी लिहावे तेवढे थोडेच आहे.परंतू किशोरवर लिहायचे आणि देवआनंदला विसरायचे म्हणजे देवपूजेला जाताना हार-फुले विसरणे होईल.राजेश किंवा अमिताभपूर्वी किशोरने देवला आपला आवाज दिला आणि एक वेगळाच देव पडद्यावर पाहायला मिळाला.देवआनंदच्या उपजत प्रसन्नतेला किशोरच्या आवाजाने खेळकरपना प्राप्त करून दिला.त्यामुळे जानी मेरा नाम,तेरे मेरे सपने,हरे राम हरे कृष्ण  या चित्रपटातील देववरील गाणी आपल्याला अतिशय प्रसन्न वातावरणात घेऊन जातात.किशोरचा हा टवटवीतपणा आजही टीकून आहे आणि तेच त्याचं मोठेपण आहे.
 किशोरचे मोठेपण केवळ गायकीवर थांबत नाही,तर त्याच्यातील अभिनेताही तेवढाच हरहुन्नरी आहे.पडोसन,चलती का नाम गाडी,हाफ टीकट,दूर गगन की छाव में,इत्यादी चित्रपटातील अभिनय त्याच्या गाण्याएवढाच दर्जेदार आहे,हे निश्चित.त्यामुळे आणखी पंचवीस वर्षानंतरही किशोरच्या आठवणी आजच्या एवढ्याच ताज्या आणि टवटवीत असतील.



This post first appeared on माझी अभिव्यक्ती, please read the originial post: here

Share the post

किशोरकुमार-अवीट आणि अविस्मरणीय

×

Subscribe to माझी अभिव्यक्ती

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×