Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

विभाकरची बेबी

परवा अचानक काही कामासाठी अंधेरीच्या बाजूला जात असताना, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काहीतरी काम चालू असल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्याने माझ्या ड्रायव्हरने गाडी एकदम पार्ल्यामधे वळवली. खरे तर या भागात मी अनेक वर्षांनी आलो होतो तरीही तो भाग अजूनही मला चांगलाच परिचित वाटत होता. पार्ले स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या सिग्नलला ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि सहजच माझे लक्ष डावीकडे गेले आणि रस्त्याला लागूनच असलेली गिरिधरलाल कनोडिया हॉस्पिटलची भव्य इमारत माझ्या नजरेत भरली. हॉस्पिटलची ती बिल्डिंग बघितल्याबरोबर पन्नास किंवा पंचावन्न वर्षांपूर्वी घडून गेलेली ती घटना परत एकदा माझ्या नजरेसमोर तरळून गेली आणि काही क्षण का होईना मी सैरभैर झालो.

त्या घटनाक्रमाला सुरूवात झाली होती ती विभाकरच्या त्या फोनपासून. विभाकर माझा बालमित्र! गिरगावांतल्या सेंट्रल सिनेमाच्या बरोबर समोर असलेल्या महाडकरांच्या चाळीत तेंव्हा माझ्या वडिलांचे बिर्‍हाड होते. दोन बिर्‍हाडे सोडून पलीकडे विभाकर रहात असे. त्याचे वडील कस्टम्स खात्यात अधिकारी होते. अजूनही कडक इस्त्रीचा पांढरा शुभ्र गणवेश घातलेले विभाकरचे वडील मला चांगलेच आठवतात. समवयस्क असल्याने अगदी लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलेलो होतो. आमची शाळा, वर्ग सुद्धा एकच होते. आम्ही आठवीत असताना विभाकरचे वडील अचानकपणे गेले आणि त्यांच्या कुटुंबावर आभाळच कोसळले. मग सहा महिने किंवा वर्षभरात विभाकरची आई मुलांना घेऊन मालाडला रहायला गेली आणि आम्ही दोघे एकमेकाला दुरावलो. पुढे व्हीजेटीआयला जाऊन मी अभियंता झालो तर विभाकर मॅट्रिक पास झाल्याबरोबर वडिलांच्या जागी म्हणजे कस्टम्स खात्यात नोकरीला लागला. मला नंतर एका प्रथितयश बहुराष्ट्रीय कंपनीत चांगला जॉब मिळाला. आम्ही दादरला हिंदू कॉलनीत शिफ्ट झालो. विभाकर नंतर मला एकदा सांताक्रूझ विमानतळावर अचानक भेटला आणि आमची खंडित झालेली जुनी मैत्री परत एकदा जी जुळली ती आजतागायत तशीच आहे. विभाकर प्रथमपासूनच अतिशय कष्टाळू होता. नोकरी करत असताना त्याने बी कॉमची पदवी पदरात पाडून घेतली आणि नंतर त्यांच्या खात्याच्या सर्व परिक्षांत तो यशस्वीपणे उत्तीर्ण झाला व कस्टम्स अधिकारी म्हणून त्याने स्वत:ची पदोन्नती करून घेण्यात यश मिळवले. एक अत्यंत कडक व सचोटीने वागणारा निस्पृह अधिकारी म्हणून रमेजिंग बिभागात त्याने चांगलेच नाव कमावले.

विभाकरच्या पत्नी म्हणजे सुगंधावहिनी त्याला साजेशाच होत्या. अत्यंत मनमिळाऊ आणि लोकसंग्रहाची आवड असलेले हे जोडपे मला नेहमी एक आधार वाटत होते आणि अजूनही आहे. त्या दोघांच्या बरोबर केलेल्या अनेक सहली आणि सुट्ट्यांमधली गप्पांची सप्तके हे माझ्या आयुष्यातील मोठे सुखद क्षण आहेत यात शंकाच नाही. विभाकरचा तो फोन आला होता तेंव्हा त्याला महिन्याभरापूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. त्यामुळे बहुधा बारशाचे बोलावणे असेल असे वाटून मी त्याच्याशी बोलायला सुरूवात केली. पण फोनवर त्याचा आवाज गंभीर आणि काळजीने ग्रासलेला वाटत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या नवजात बाळाची तब्येत काल अचानक बिघडली होती व बाळाला पार्ल्याच्या गिरिधरलाल कनोडिया हॉस्पिटलमधे हलवले होते. मग मी व माझी पत्नी दोघेही लगेचच पार्ल्याला गेलो. सुगंधावहिनी अगदीच हतबल झाल्यासारख्या वाटत होत्या व ते साहजिकच होते. तिथल्या डॉक्टरांशी बोलल्यावर रोगाचे निदान अजूनतरी झाले नसल्याचे मला कळले. सध्या करण्यासारखे काहीच नसल्याने काहीही मदत हवी असली तरी कळव असे सांगून आम्ही परत आलो.

त्याच दिवशी अचानकपणे मला ओफ़िसमधून सहा सात दिवसांनंतर जर्मनीला जावयाचे आहे असा आदेश मिळाला आणि मी त्या तयारीत गढून गेलो. विभाकरकडून पुढे काहीच न कळल्याने बेबीची तब्येत आता बहुधा ठीक असावी असा अंदाज मी बांधला. येत्या शनिवारी रात्री नऊ वाजता जर्मनीला जाणार्‍या अलिटालिया विमान कंपनीच्या फ्लाइटचे तिकिट कंपनीने माझ्यासाठी काढले आहे व संध्याकाळी सहाच्या सुमारास सांताक्रूझ विमानतळावर मी पोचावे असे मला सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे शनिवारी संध्याकाळी मी विमानतळावर पोहोचलो.

त्या वेळचा सांताक्रूझ विमानतळ म्हणजे सध्याच्या मानाने एक छोटेखानी प्रकरण होते. मध्यभागी गोलाकार आकाराचा एक वेटिंग कक्ष व दोन्ही बाजूंना असलेल्या दोन्ही विंग्समध्ये विमान कंपन्यांची ऑफिसेस व कस्टम्स, पोलिस या सारखे इतर विभाग होते. डाव्या बाजूला अंतर्देशीय उड्डाणांचे इंडियन एअरलाइन्सचे ओफ़िस होते तर उजव्या बाजूस परदेशी नेणार्‍या विमान कंपन्यांची ऑफिसे होती. माझे सामान चेक इन वगैरे केल्यावर साधारण साडेसात वाजण्याच्या सुमारास मला समजले की जर्मनीला जाणारे माझे विमान प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाहून मुंबईला येते व येथे प्रवासी घेऊन पुढे जाते व आज काही कारणाने येणारे विमान तीन तास तरी उशिराने येणार आहे व साहजिकच तेवढ्याच उशिराने सुटणार आहे. आत काय करावे या संभ्रमात मी असताना मला एकदम विभाकरच्या बेबीची आठवण झाली. गेल्या पाच सहा दिवसात मला साधी चोकशी करायला सुद्धा वेळ झाला नव्हता हे लक्षात आल्यावर मला उगीचच अपराधी वाटू लागले व आता वेळ मिळालाच आहे तर हॉस्पिटलमधे चक्कर मारावी असे मी ठरवले. विमानतळाच्या बाहेर येऊन मी टॅक्सी पकडली व पार्ल्याला हॉस्पिटलपाशी पोचलो तेंव्हा रात्रीचे साधारण साडेआठ तरी वाजलेले असावेत.

व्हिजिटर्सनी आत येण्याची वेळ अजून तरी संपलेली नाही हे बघून मला हायसे वाटले व मी बाजूच्या लिफ्टमधून सातव्या मजल्यावर असलेल्या बाल विभागाच्या इंटेन्सिव्ह केअर विभागात पोचलो. रिसेप्शन काउंटरवर चौकशी केल्यावर विभाकरची बेबी अजूनही हॉस्पिटलमधेच आहे आणि बाल विभागाचे सर्वात सिनियर डॉक्टर सक्सेना यांच्या देखरेखीखाली बेबी आहे हे तर मला समजले पण विभाकर किंवा सुगंधावहिनी मला कोठेच दिसेनात. इकडे तिकडे चोकशी केल्यावर एका नर्सकडून मला समजले की बेबीची आई काहीतरी अर्जंट काम असल्याने घरी गेली आहे व दहा साडेदहा पर्यंत परत येते असे सांगून गेली आहे. इंटेन्सिव्ह केअर वॉर्डाचे दार हळूच मी उघडून बघितले. विभाकरच्या बेबीला एक नर्सने उचलून हातात घेतले होते व एक जेष्ठ डॉक्टर ( बहुधा डॉक्टर सक्सेना असावेत!) त्या नर्सला काहीतरी सूचना देत होते. मला सुगंधावहिनी परत येईपर्यंत थांबणे शक्यच नव्हते व त्यामुळे मी येऊन गेल्याचे वहिनींना सांगा, एवढा निरोप देऊन मी परत विमानतळावर आलो.

माझे जर्मनीमधले काम चांगलेच यशस्वी झाले व मला तेथून आधी ठरवले होते त्याच्यापेक्षा चार दिवस आधीच भारतात येणारे विमान पकडता आले आणि यामुळे दिवाळीच्या आदल्या दिवशीच मी मुंबईला पोहोचलो. दुसर्‍या दिवशी सकाळी दिवाळीचा फराळ करून जरा रिलॅक्स मूडमधे असतानाच फोन वाजला. विभाकरचा फोनवरचा नेहमीसारखा उत्साही आवाज ऐकूनच त्याची बेबी आता ठीक असल्याचे माझ्या लक्षात आले व मी मनोमन सुखावलो. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही भेटण्याचे ठरवले व मी आणि माझी पत्नी त्याच्या घरी संध्याकाळी पोहोचलो. विभाकर व सुगंधावहिनी यांच्याकडे बघितल्यावर मला जरा धक्काच बसला. दोघेही प्रचंड आजारपणातून उठल्यासारखे दिसत आणि वागत होते.

गप्पांच्या ओघात बेबीच्या आजारपणाचा विषय निघणे साहजिकच होते. त्या दिवशी रात्री तू येऊन गेलास ना हॉस्पिटलमधे? विभाकराने मला विचारले. मी होकार दिला. काहीतरी खुलासा करावयाचा असल्याचे दडपण त्याच्या चेहर्‍यावर आलेले मला स्पष्ट दिसत होते. अरे त्या दिवशी मला अचानक ऑर्डर आली की रात्री एक मोठी रेड टाकायची आहे म्हणून! सगळा स्टाफ इनव्हॉल्व्ह्ड होता. काय करणार, मला जावेच लागले. ही घरी जेवायला आली आणि आनंद ( त्याचा मोठा मुलगा) तिला सोडेनाच. रात्री त्याला झोपवावे आणि मग हॉस्पिटलमधे जावे असे ठरवून ती अंथरुणावर आडवी झाली. गेल्या दोन आठवड्यांच्या अखंड ताणामुळे म्हणा किंवा आणखी काही कारणांनी तिला त्या रात्री जी गाढ झोप लागली ती दुसर्‍या दिवशीच्या सकाळ्पर्यंत! विभाकर म्हणाला. सकाळी मी घरी आलो आणि सुगंधाला. उठवले. मग आम्ही तसेच हॉस्पिटलमधे गेलो. समोर काय ताट वाढून ठेवले आहे त्याची काहीच कल्पना नव्हती. पण तुला सांगतो काय आशचर्य? आमची राजकन्या गाढ झोपली होती. आम्ही गेल्यावर तिने डोळे उघडले आणि ती चक्क हसली. इतक्या दिवसांचा आमचा शीण त्या एका हास्याने दूर झाला.

खरे सांगायचे तर विभाकरचा हा खुलासा मला काही मनापासून पटला नाही. सुगंधावहिनींसारखी मुलांवर निस्सीम प्रेम करणारी स्त्री आपल्या नवजात अर्भकाच्या आजाराने एवढे गंभीर स्वरूप धारण केलेले असताना त्याला हॉस्पिटलमधे सोडून देऊन घरी येऊन रात्रभर झोपेल हे मला खरेच वाटले नाही. पण मी काहीच बोललो नाही आणि ही दुर्घटना आमच्या स्मृतीमधून हळूहळू सीमापार झाली.

त्यानंतर चार पाच वर्षांनंतर त्या नवजात अर्भकाला जे डॉक्टर औषधोपचार करत होते त्या डॉक्टर सक्सेनांशी माझी अवचित गाठ पडली. दिल्लीला जाणार्‍या विमानात आम्हाला शेजारी शेजारी सीट्स मिळाल्या होत्या. आपल्या शेजारची व्यक्ती गिरिधरलाल कनोडिया हॉस्पिटलच्या बालविभागाचे प्रमुख असलेले डॉक्टर सक्सेना ही आहे हे कळल्यावर मला राहवले नाही. गप्पांच्या ओघात मी त्यांना सहज विचारल्याप्रमाणे सांगितले की डॉक्टर तुम्हाला मी पाच एक वर्षांपूर्वी हॉस्पिटल मधे बघितले आहे. साहजिकच ते कसे काय? असे त्यांनी मला विचारले. मी मग जर्मनीला जाताना विमानतळावर आपल्या फ्लाइटला उशिर झाल्याने आपण हॉस्पिटलमधे कसे आलो व त्यांना कसे बघितले हे सर्व सांगितले.

माझे कथन ऐकल्यावर अर्धा एक मिनिट डॉक्टर सक्सेना गप्पच राहिले. मग एक सुस्कारा सोडून त्यांनी मला सांगायला सुरूवात केली. एवढ्या वर्षांच्या माझ्या वैद्यकीय अनुभवातली, एच सिक्स एन सेव्हन व्हायरल आजाराची पहिलीच पेशंट असल्याने ती बेबी माझ्या चांगलीच लक्षात राहिली आहे. आधी कधीच या व्हायरसचा आजार आम्ही अनुभवला नव्हता. तो संसर्गजन्य आहे किंवा नाही हेही आम्हाला माहीत नव्हते. पहिले काही दिवस आमच्या कोणत्याच उपायाला ती दादच देत नव्हती. तुम्ही म्हणता त्या दिवशी तिचा प्लेटलेट्स काउंट काही हजारापर्यंत खाली आला होता. हॉस्पिटलच्या स्टाफने तर तिची आशाच सोडली होती. पण काय सांगू, इट्स ए वन्डर! त्या रात्री तिचा ताप उतरला आणि जादूची कांडी फिरावी तशी पुढच्या काही तासात एक अशक्तपणा सोडला तर ती बेबी पूर्ण रिकव्हर झाली. आम्हा डॉक्टरांचे प्रयत्न किती वरवरचे असतात त्याची जाणीव प्रकर्षाने त्या दिवशी मला झाली.

हे सगळे ऐकल्यावर न राहवून मी डॉक्टर सक्सेनांना विचारले की तुम्ही त्य बेबीच्या पेरेंट्सना तिची परिस्थिती किती नाजूक आहे याची कल्पना दिली होतीत का? डॉक्टर माझ्याकडे बघत राहिले पण नंतर म्हणाले की ऑफ कोर्स! अशा परिस्थितीतील पेशंट्सच्या पेरेंट्सना आम्ही कधीच अंधारात ठेवत नाही. नाऊ आय रिमेंबर! तुम्ही म्हणता त्या दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास मी त्या बेबीच्या पेरेंट्सना बोलावून परिस्थिती किती नाजूक आणि धोकादायक आहे आणि हा रोग संसर्गजन्य असू शकत असल्याने, पर्टिक्यूलरली बेबीच्या सिबलिंगबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल व्यवस्थित ब्रीफिंग केले होते. आमचे बोलणे चालू असतानाच एअर होस्टेसने आमचे जेवण आणल्याने या नंतर आमचे या विषयावर पुढे काहीच बोलणे झाले नव्हते.

डॉक्टर सक्सेनांनी सांगितलेली माहिती माझ्या मनात कोठेतरी खोल पण अचूक जाऊन बसली होती यात शंकाच नव्हती. त्यांच्या सांगण्यावरून स्पष्ट दिसत होते की मी हॉस्पिटलमधे गेलो होतो त्या वेळेस विभाकर आणि सुगंधावहिनी या दोघांनाही बेबीची तब्येत किती सिरियस आहे आणि कदाचित ती काही तासांची सोबतीण सुद्धा असू शकते याची पूर्ण कल्पना होती तर! हे सर्व माहिती असूनही हे दोघे रात्रभर हॉस्पिटलकडे फिरकले सुद्धा नव्हते. मला माहीत असलेला त्या दोघांचा स्वभाव, स्वत:ला कितीही त्रास पडणार असला तरी दुसर्‍याला मदत करण्याची त्यांची वृत्ती, या सगळ्याशी त्यांचे हे वागणे मोठे विसंगत वाटत होते? कदाचित विभाकर तो म्हणतो तसा नाईट रेड्ला गेला असेल सुद्धा! पण सुगंधावहिनी अशा कशा वागू शकल्या? या प्रश्नाचे उत्तर मला काही सापड्त नव्हते.

या नंतर काही दिवसांनी असाच स्वस्थ बसलेलो असताना, हातात पोर असलेल्या व पाण्याच्या हौदात ठेवलेल्या माकडिणीची, कधीतरी वाचलेली, एक गोष्ट मला आठवली. या हौदात पाणी सोडल्यानंतर माकडिणीने प्रथम मुलाला कडेवर घेतले होते. पाणी वाढू लागले तेंव्हा तिने त्याला डोक्यावर उचलून घेतले होते पण अखेरीस पाणी स्वत:च्या नाकातोंडाशी गेल्यावर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ती माकडीण मुलाला हौदात खाली टाकून त्याच्या अंगावर खुशाल उभी राहिली होती. अर्थात हा जीवघेणा प्रयोग खरेच कोणी केला होता? की कोणाच्या कल्पनेतून तो साकार झाला होता हे सांगणे मोठे कठीण होते.

गोष्टीचा मतितार्थ काही असो! सुगंधावहिनींचे त्या रात्रीचे वागणे असेच काहीतरी होते असे मला वाटू लागले. आपल्या नवजात अर्भकाला वाचवण्याचे सर्व मानवी उपाय खुंटले आहेत आणि त्याचा रोग आपल्या मोठ्या मुलासाठी संसर्गजन्य किंवा धोकादायक असू शकतो हे कळल्यावर सुगंधावहिनींच्या मनामधल्या आई म्हणून असलेल्या प्रायॉरिटीज तर बदलल्या नव्हत्या? एका अपत्याला वाचवता येत नाही हे दिसल्यावर निदान दुसरे तरी सुखरूप रहावे अशी भावना त्यांच्या मनात प्रबळ झाली नसती तरच नवल! काही वेळा माणसे तî

Share the post

विभाकरची बेबी

×

Subscribe to अक्षरधूळ | माझे मराठी लेखन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×