Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

दळण ,बायको आणि मी


एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे; या कामावरून वाजलं..
चांगली खडाजंगी झाली.
आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव?.
पण शेवटी मी पडलो आपला ‘दीन-अगतिक, गरीब बिचारे नवरे संघटनेचा अध्यक्ष’
गपगुमान जावून दळण आणावे लागले….दळण घेऊन तर गेलो पण तिथे विचार करू लागलो…..मनात म्हंटल अशी हार मानून चालणार नाही…एवढ्या वेगवेगळ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आणि असं कच खावून कसं चालेल….

दळण सुरू असताना जरा आजूबाजूला नजर गेली आणि लगेच डोक्यात भन्नाट आयडिया आली….डोक्यात किडा वळवळायला लागला…अन चेहराच खुलला….प्रसन्न मनानं हसरा चेहरा घेऊन दळण घेऊन घरी गेलो…माझं हास्यवदन पाहून ती जरा गोंधळात पडली…मघाशी तणतणत गेलेलं शिंगरू असं हरणाच्या पाडसासारखं बागडत घरी आल्यावर तिच्या कपाळावर साडेबावीस आठ्या पडल्या….

काही दिवस गेले आणि मी मग स्वतःहून तिला विचारले ‘ अरे पिठं संपलं नाही का अजून दळण कधी आणायचं?’….तिला वाटलं नवरा ताळ्यावर आला….डबा घेऊन मी दळण आणायला गेलो…यावेळी मात्र जरा उत्साहाने गेलो…बायको बुचकळ्यात पडली…

हाच उत्साह मी अजून एक दोन वेळा दाखवला…

पुन्हा काही दिवस गेले ….मी पुन्हा विचारलं..’ दळण कधी आणायचं?’….यावेळी दळणाला जाताना जरा छान ठेवणीतला शर्ट घालून गेलो…आता मात्र बायकोचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता….नवरा खुशीत, उत्साहाने दळण आणतोय म्हणजे काय तरी भानगड असणार ….संशयाचे बी आपोआप पेरलं गेलं होतं…..त्यात आता मला दळण आणायला नेहमी पेक्षा जास्त उशीर होऊ लागला….

आणखी पुढच्या वेळी जाताना मी मस्त छान आवरून, नीटनेटका भांग पाडून, जरा बऱ्यापैकी कपडे घालून, त्यावर स्प्रे वगैरे मारून दळण आणायला निघालो…..माझा हा तामझाम पाहून तिची विकेट पडली….

” काय हो, दळण आणायला कशाला एवढं आवरून जायला पाहिजे…काय एवढं आवरायचं कारण?”

तसं तिला म्हणालो..” अगं असं कसं… त्या दळणाच्या गिरणीपाशी किती किती जण येतात….तिथं दळणाची वाट पहात उभं असताना कोण कोण भेटतं…काही गाठीभेटी होतात…दळण आणायला आलेल्या गेलेल्या; आता सारखं जातोय म्हंटल्यावर ओळखीच्या झाल्यात….बिचाऱ्या दोन शब्द बोलतात… मग असं सगळ्यांसमोर गबाळ जावून कसं चालेल…जरा नीटनेटकं नसावं का माणसाने…”

असं म्ह्णून मी आपला मस्त शीळ वाजवत दळण आणायला गेलो.. यावेळी मुद्दाम जास्त वेळ लावला.. घरी आलो तर रागाच्या थर्मामीटर मधला पारा ग्लास तोडून थयथया नाचत होता.. मी आपलं निरागसपणे दळणाचा डबा जागेवर ठेवला..

पुन्हा काही दिवस गेले.. मी पुन्हा विचारले, ‘काय गं, ते दळण आणायला कधी जावू..?’

तसं फणकाऱ्याने माझे कान तृप्त करणारे शब्द कानी पडले, “काही गरज नाही दळण आणायची, मी माझे बघते काय कसे आणायचे ते.. तुम्ही नका पुन्हा लक्ष घालू त्यात…”

मी आपलं निरागसपणे ” बरं…” म्हणून सटकलो….

पहिला विश्वचषक जिंकल्यावर जो आनंद कपिलला झाला नसेल त्याच्या दुप्पट आनंद झाला… बेडरूममध्ये जाऊन मी मुठी आकाशात झेपावत, चुपचाप आनंद साजरा केला….

आताशा कित्येक वर्षे झाली, दळण काही मागे लागले नाही… असे अनेक सल्ले ह्या संघटनेत दिले जातात; आजच सभासद व्हा

दीन-अगतिक, गरीब बिचारे नवरे संघटना



This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

दळण ,बायको आणि मी

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×