Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

देवखोलचा 'कुसुमेश्वर'

महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणे आजही लपलेली आहेत ज्यांचा इतिहास शोधणे आणि अभ्यासणे गरजेचे आहे. अश्या ठिकाणांंच्यापैकी काही ठिकाणे निसर्गरम्य कोकणामध्ये देखील आहेत. असेच एक ठिकाण हे 'बोर्ली-श्रीवर्धन' रस्त्यावर असणाऱ्या 'देवखोल' या गावामध्ये गर्द झाडीमध्ये लपलेले 'कुसुमेश्वर' मंदिर  नक्कीच बघण्यासारखे आहे. 'देवखोल' या गावाला नक्कीच प्राचीन इतिहास असणार हे येथील 'कुसुमेश्वर' मंदिरामुळे समजते. 


'कुसुमेश्वर' मंदिर गर्द झाडीमध्ये लपलेले आहे.


'देवखोल' येथील 'कुसुमेश्वर' मंदिर येथे जायचे असल्यास आपली स्वतःची गाडी असलेली कधी देखील उत्तम तसेच 'देवखोल' याठिकाणी येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस देखील उपलब्ध आहेत. 'बोर्ली-श्रीवर्धन' रस्त्यावरून आपल्याला १० कि.मी. अंतरावर उजवीकडे आपल्याला देवखोल फाटा लागतो येथून आतमध्ये २ किलोमीटर अंतरावर आपल्याला एक चढण लागते तेथून पुढे १ किलोमीटर अंतरावर उतरणीचा रस्ता आपल्याला थेट 'कुसुमेश्वर' मंदिरापर्यंत घेऊन जातो आणि या रस्त्याने पुढे गेल्यावर गर्द झाडीमध्ये लपलेले 'कुसुमेश्वर' मंदिर आपल्याला दर्शन देते. 


याच गावकऱ्यांनी स्वच्छ केलेल्या पुष्करणी मध्ये काही प्राचीन मूर्ती सापडल्या.

या 'कुसुमेश्वर' मंदिराच्या समोरच्या बाजूलाच एक पुष्करणी आपल्याला पहायला मिळते. 'कुसुमेश्वर' मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे. 'कुसुमेश्वर' मंदिराच्या परिसरात आपल्याला एक छोटासा झरा देखील पहावयास मिळतो. एकंदरीतच 'कुसुमेश्वर' मंदिराचा परिसर जर आपण नीट पहिला तर आपल्याला हे 'कुसुमेश्वर' मंदिर 'शिलाहार' काळातील असावे असे वाटते. याला अजून एक महत्वाची गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे या 'कुसुमेश्वर' मंदिराच्या आवारामध्ये असलेल्या प्राचीन विष्णू मूर्ती. शिलाहार काळामध्ये येथे मोठा मंदिर समूह असावा असे येथील शिल्पांवरून आणि गद्धेगाळावरून वाटते.


साधारणपणे १० ते १५ वर्षांपूर्वी या प्राचीन 'कुसुमेश्वर' मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला तेव्हा या मंदिराच्या आवारातील पुष्करणी देखील स्वच्छ केली गेली तेव्हा त्यामध्ये काही प्राचीन मूर्ती सापडल्या. त्यामध्ये विष्णूमूर्ती, गणपती, वीरगळ, सतीशिळा, गद्धेगाळ अशी बरीचच शिल्पे मिळाली. सध्या  देवस्थानाने पत्र्याची शेड बनवून या सगळ्या शिल्पांचे चांगल्या रीतीने संवर्धन केलेले आहे.


मंदिराच्या पुष्करणीमध्ये सापडलेल्या प्राचीन मूर्ती, वीरगळ आणि गद्धेगाळ. यामध्ये दिसणाऱ्या गद्धेगाळावर कोणताही शिलालेख दिसून येत नाही.

'कुसुमेश्वर' मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण विष्णू मूर्ती पहायला मिळते त्या विष्णूमूर्तीला मागे प्रभावळ असून डोक्याच्या बाजूने नाग कोरलेला दिसतो परंतु मूर्तीची झीज झाल्यामुळे मूर्ती कोणत्या रुपात आहे हे लवकर समजत नाही. परंतु एकंदरीत ही मूर्ती पाहता ही विष्णू मूर्ती शिलाहार कालीन असावी असे दिसते. तसेच अजून एक विष्णूमूर्ती आपल्याला पहायला मिळते त्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला 'भूमाता' आणि 'श्रीलक्ष्मी' कोरलेल्या देखील पहायला मिळतात तसेच मूर्तीच्या हातामध्ये असलेले चक्र देखील पहायला मिळते बाकी मूर्ती ही झिजलेली असून तिला सिमेंट लावून बसवलेली आहे. 


कुसुमेश्वर मंदिराच्या परिसरातील गद्धेगाळ. 
 

त्यामुळे मूर्तीची अवस्था थोडी खराब झालेली आहे. तसेच मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला 'शिव-पार्वती' यांची देखील मूर्ती पहायला मिळते. बहुधा ही शिव-पार्वतीची मूर्ती ही मंदिराच्या देवकोष्ठामध्ये बसवलेली असावी असे वाटते. मंदिराच्या परीसरामध्ये जिथे वीरगळ सतीशिळा आणि इतर मूर्ती ठेवलेल्या आहेत तिथे एक गद्धेगाळ देखील पहायला मिळतो परंतु त्याच्यावर शिलालेख दिसून येत नाही. देवखोल येथील गद्धेगाळ याचा वरचा भाग दिवेआगर येथे सापडलेल्या तिसऱ्या गद्धेगाळ प्रमाणेच आहे. फक्त फरक एवढाच आहे कि देवखोल येथील गद्धेगाळ हा दिवेआगर येथील गद्धेगाळापेक्षा जास्त मोठा आहे. देवखोल येथील गद्धेगाळाचा मधील भाग पूर्ण सपाट असून तेथे कोणतेही शिलालेख आढळून येत नाही. तसेच या गद्धेगाळामध्ये खालच्या भागामध्ये जी स्त्रीची गाढवाशी संकर करताना आकृती कोरलेली आहे ती उजवीकडे कोरलेली असून तीचे तोंड आपल्याला गाढवाकडे आहे असे दिसते. तसेच मंदिर परिसरात आपल्याला नवनाथांच्यामूर्ती देखील बघायला मिळतात.


विष्णूमूर्तीला मागे प्रभावळ असून डोक्याच्या बाजूने नाग कोरलेला दिसतो.


'कुसुमेश्वर' मंदिराची नव्याने रचना करण्याचे काम हे १९८१ साली सुरु झाले होते. नव्याने जीर्णोद्धार झालेले 'कुसुमेश्वर' मंदिर हे साधारणपणे १० ते १५ वर्षापूर्वी पूर्ण झाले. 'कुसुमेश्वर' मंदिराची रचना बघता मंदिराला सभामंडप आणि गर्भगृह पहावयास मिळते. मंदिराच्या द्वारशाखेवर गणपती उत्कृष्ट रीतीने कोरलेला आहे. तसेच सभामंडपामध्ये एका प्राचीन मूर्तीच्या पिठावर नवीन नंदी बसवलेला आपल्याला पहायला मिळतो. मंदिरामध्ये नव्याने बसवलेली 'सूर्यमुर्ती' देखील आपल्याला बघायला मिळते. तसेच सभामंडपामध्ये आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळते. मंदिराच्या गर्भगृहात असलेले मुख्य शिवलिंग आपल्याला बघायला मिळते. महाशिवरात्रीला 'कुसुमेश्वर' येथे खूप मोठा उत्सव असतो. 


शिव-पार्वती यांची मूर्ती आणि विष्णूमूर्ती. 

'कुसुमेश्वर' हे मंदिर नक्कीच शिलाहार काळातील असावे हे तेथील प्राचीन विष्णू मूर्तींंवरून समजते. परंतु नव्याने जीर्णोद्धार झाल्यामुळे ह्या प्राचीन मंदिराचे बाकी अवशेष आपल्याला पहायला मिळत नाही परंतु मंदिर हे नक्कीच १० व्या ते १२ शतकातील असावे हे समजण्यास मदत होते. 'कुसुमेश्वर मंदिराचा उल्लेख हा पुराणामध्ये देखील आलेला आहे. 'हरिहरेश्वर' याचा उल्लेख जिथे आपल्याला पुराणामध्ये येतो तेथेच उत्तरेस 'कुसुमेश्वर' वसलेला आहे असा उल्लेख आढळून येतो. 


असे हे प्राचीन 'कुसुमेश्वर' मंदिर ज्या परिसरात वसलेले आहे त्याचा नक्कीच अभ्यास होणे फार गरजेचे आहे. तसेच या 'देवखोल' गावाला प्राचीन शिलाहार काळात काही देणग्या दिल्या होत्या का किंवा या 'देवखोल' गावाचे अथवा 'कुसुमेश्वर' मंदिराचे प्राचीन नाव कोणते होते किंवा त्याचे अजून काही उल्लेख आपल्याला मिळतात का हे नक्कीच अभ्यासणे फार महत्वाचे आहे जेणेकरून या प्राचीन 'कुसुमेश्वर' मंदिराच्या बाबतीत नवीन इतिहास उजेडात येईल. 


मंदिराची द्वारशाखा तसेच मंदिरातील सूर्यमूर्ती आणि प्राचीन पिठावर स्थापन केलेला नंदी तसेच आवारातील नवनाथांच्या मूर्ती आणि कुसुमेश्वर याचे शिवलिंग.

निसर्गरम्य 'कुसुमेश्वर' मंदिर परिसरातून आपले पाय नक्कीच निघत नाही. या प्राचीन 'कुसुमेश्वर' देवस्थानी  पवित्र शांततेचा अनुभव नक्कीच येतो. तेव्हा गर्द झाडीत लपलेल्या या 'कुसुमेश्वर' मंदिराला नक्की  भेट देऊन येथील शिल्पांचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. तसेच हे 'कुसुमेश्वर' मंदिर हे विष्णूचे होते कि शंकराचे होते हे देखील बघणे गरजेचे आहे. अश्या या निसर्गरम्य 'कुसुमेश्वर' मंदिराला भेट देऊन आपण नक्कीच एका वेगळ्या ठिकाणाची अनुभूती घेऊ शकतो.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Four Gadhegals Discovered in District Raigad, Maharashtra:- Kurush F Dalal, Siddharth Kale, Rajesh Poojari, 2015. (Research Paper Link:- https://www.ancient-asia-journal.com/articles/10.5334/aa.12320/)
      
कसे जाल:-

पुणे - पौड - ताम्हिणी घाट - माणगाव - म्हसळा - देवखोल.  


______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्र © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा   

Share the post

देवखोलचा 'कुसुमेश्वर'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×