Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण गावातील 'विष्णूमूर्ती'

पुणे आणि परिसराला फार मोठा प्राचीन वारसा लाभलेला आहे. पुणे शहरामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन मंदिरे आहेतच तर पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्ये देखील प्राचीन मंदिरे आणि शिल्पे ही मोठ्या प्रमाणात सापडतात. अश्याच काही प्राचीन 'विष्णू' मूर्ती आपल्याला सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या कल्याण गावामध्ये आपल्याला पहायला मिळतात. 

  

या प्राचीन विष्णू मूर्ती पहायच्या असतील तर 'सिंहगड' किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या 'कल्याण' गावाशेजारी 'पेठ-भिलारवाडी' नावाचे गाव आहे याठिकाणी आपल्याला पोहोचणे गरजेचे आहे. कल्याण गावात जाण्यासाठी नसरापूरमार्गे रांझे आणि कल्याण असे आरामात आपल्या गाडीने पोहोचता येते तसेच बसने देखील आपल्याला पोहोचता येते. कल्याण या गावापासुनच अगदी जवळ 'पेठ भिलारवाडी' असून येथे आपल्याला नव्याने जीर्णोद्धार केलेले 'काळूबाई' मंदिर बघावयास मिळते.


काळूबाई मंदिराच्या आवारामध्ये असणाऱ्या विष्णूमूर्ती


'पेठ भिलारवाडी' येथील काळूबाई मंदिराचा जीर्णोद्धार चालू असताना येथील गावकऱ्यांना मंदिराचा पाया खणताना काही भग्न झालेली शिल्पे आणि काही चांगल्या स्वरुपात असलेल्या मूर्ती सापडल्या. यातील भग्न झालेल्या मूर्ती आपल्याला या काळूबाई मंदिराच्या बाहेर ठेवलेल्या बघायला मिळतात. आज या भग्न झालेल्या मूर्तींना देखील गावकऱ्यांनी शेंदूर फासलेला आपल्याला बघायला मिळतो. यातील ज्या दोन मूर्ती गावकऱ्यांना अत्यंत चांगल्या स्थिती मध्ये मिळाल्या त्या मूर्ती या 'विष्णू' मूर्ती होत्या. या मूर्तींना गावकऱ्यांनी काळा रंग देऊन त्या विष्णूमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना देखील एका छोट्या मंदिरामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते.


पेठ भिलारवाडी येथे गावकऱ्यांनी काळूबाई मंदिराशेजारी बांधलेल्या छोट्या मंदिरामधील या प्राचीन 'विष्णू' मूर्ती अगदी देखण्या आहेत. शेजारी शेजारी असलेल्या या दोन विष्णू मूर्तींपैकी डावीकडील 'विष्णू' मूर्ती ही 'श्रीधर' विष्णूची असून उजवीकडची विष्णू मूर्ती ही 'पद्मनाभ' विष्णूची आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला ज्या विष्णू मूर्ती आढळून येतात त्या आपल्याला केशव, नारायण, माधव या रूपांमध्ये असल्याच्या दिसून येतात परंतु 'श्रीधर' रूपातील विष्णूमूर्ती तसेच 'पद्मनाभ' रूपातील विष्णूमूर्ती या फार क्वचित घडवलेल्या आढळून येतात.


'श्रीधरआणि 'पद्मनाभरूपातील विष्णूमूर्ती.

तसे पहायला गेले तर 'विष्णू' या देवतेच्या हातामध्ये असलेल्या शंख, चक्र, गदा, पद्म या आयुधांच्या अनुक्रमानुसार चोवीस प्रकार मूर्तीमध्ये आपल्याला पहायला मिळतात. म्हणजे जर या आयुधांचा हातामधील क्रम जर बदलला तर विष्णूच्या मूर्तीचे नाव बदलते. यातील 'श्रीधर' रूपातील विष्णूमूर्तीच्या हातामध्ये आपल्याला पद्म, चक्र, गदा, शंख असा आयुधक्रम नीट पाहिला कि लक्षात येतो. तसेच 'पद्मनाभ' रुपामधील मूर्तीच्या हातामध्ये शंख, पद्म, चक्र, गदा असा आयुधक्रम आपल्याला दिसून येतो. या दोन्ही मूर्तींंवर आपल्याला करंडक मुकुट पहावयास मिळतो तसेच मूर्तींवरील कर्णपत्रे अथवा पत्रकुंडले, खांद्यावरची स्कंदपत्रे, गळ्यातील माळा, छातीवर असलेले पादचिन्हे, तसेच कमरेवरील वस्त्रे अत्यंत रेखीवपणे कोरलेले आपल्याला दिसून येतात. 

'पेठ भिलारेवाडी' येथे असलेल्या या दोन्ही विष्णूमूर्तींच्या उजव्या पायापाशी आपल्याला गरुड आणि डाव्या पायापाशी श्रीदेवी हिची प्रतिमा चामरधारिणीसारखी कोरलेली आपल्याला पहायला मिळते. या विष्णूमूर्तींच्या शिल्परचनेवरून या दोन्ही विष्णूमूर्ती या उत्तर यादवकालीन असाव्यात हे समजण्यास मदत होते. काही अभ्यासकांच्या मते येथे प्राचीन विष्णूचे मंदिर असावे असे येथील शिल्पांच्यावरून वाटते. या 'काळूबाई' मंदिर परिसरात आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट आढळून येते ती म्हणजे येथे आपल्याला एक गद्धेगाळ देखील पहावयास मिळतो. या गद्धेगाळावर आपल्याला चंद्र आणि सूर्य हे पहायला मिळतात तसेच बाई आणि गाढवाचा संकर देखील पहायला मिळतो. परंतु या गद्धेगाळावर शेंदूर लावल्यामुळे तसेच त्याचा अर्धा भाग हा जमिनीत असल्यामुळे त्याच्यावर एखादा शिलालेख आहे कि नाही हे मात्र समजत नाही. परंतु या गद्धेगाळावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते कि या मंदिराला कोणतेतरी दानपत्र नक्की मिळाले असावे म्हणून हा गद्धेगाळ आपल्याला या मंदिराच्या परिसरात दिसून येतो.


काळूबाई मंदिराच्या आवरात असलेला गद्धेगाळ.


अश्या या 'पेठ भिलारवाडी' येथे वसलेल्या उत्तर यादव कालीन विष्णूमूर्ती नक्कीच त्यांच्या देखणेपणामुळे वैशिष्ट्य ठरतात. सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आणि पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या उपेक्षित विष्णूमूर्ती पाहण्यासाठी नक्कीच वाट वाकडी करून पहायला गेलेच पाहिजे.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) Iconography of the Hindus, Buddhists and Jains, R. S. Gupte, D. B. Taraporevala Sons & Co. Private Ltd., Mumbai, 1980.

कसे जाल:-

पुणे - रांझे - कल्याण - पेठ भिलारवाडी.  


______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्र © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा   



Share the post

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण गावातील 'विष्णूमूर्ती'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×