Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

नासिककरांच्या विस्मृतीत गेलेला 'दिल्ली दरवाजावरील शिलालेख'

प्राचीन काळापासून नासिक हे अत्यंत महत्वाचे शहर आहे. विविध कालखंडामध्ये नासिक शहराची नावे आपल्याला नासिक, जनस्थान, पद्मनगर, त्रिकंटक अशी देखील आढळून येतात. औरंगजेबाने नासिक शहराचे नाव बदलून 'गुलशनाबाद' असे केले होते. या नासिक शहराला ज्या वेशी होत्या त्यांच्या दरवाज्यांची नावे ही अनुक्रमे भगूर दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, आसराची वेस, दिल्ली दरवाजा, मल्हार दरवाजा अशी होती. यातील दिल्ली दरवाज्यावर एक शिलालेख होता. जेव्हा नासिक शहरामध्ये १९२४-२५ या कालावधीमध्ये रस्ता रुंदीकरण करण्यात आले तेव्हा हा दिल्ली दरवाजा पाडण्यात आला त्याबरोबर त्याच्यावर असलेला शिलालेख देखील नासिककरांच्या विस्मृतीत गेला.


जेव्हा हा दिल्ली दरवाजा पाडला गेला तेव्हा हा शिलालेख काही तिथेच वाईट अवस्थेत पडून होता काही काळानंतर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजेच सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय, मुंबई इथे हलवला गेला. नासिक गॅझेटियर मध्ये दिल्ली दरवाजावर एक शिलालेख होता एवढीच नोंद आहे. पाडलेल्या दिल्ली दरवाजाचे अवशेष हे १९२९ सालापर्यंत शिल्लक होते नंतर हा दरवाजा आणि त्याचे अवशेष विस्मृतीत गेले. 


नासिक जिल्ह्याचा नकाशा.

दिल्ली दरवाजावरील हा शिलालेख १ फूट ५ इंच असून चौरसकृती आहे. हा लेख फारसी मध्ये असून देवनागरी मध्ये त्याच्यावर तारीख देखील नोंदवलेली आहे असे श्री. ग्यानी यांचे म्हणणे आहे. याबद्दल ते आपले म्हणणे एपिग्रफिया इंडो मोसलेमिका या ग्रंथामध्ये मांडतात. तसेच श्री. ग्यानी असे देखील तळटिपेमध्ये देतात कि सध्या या शिलालेखाचा जो दगड आहे त्याची अवस्था आजिबात चांगली राहिली नाही. या शिलालेखाचे मराठी लिप्यंतर हे श्री. सत्येन वेलणकर यांनी केले असून त्याचा अर्थ देखील श्री. सत्येन वेलणकर यांनी दिला तो पुढीलप्रमाणे:-


नासिकच्या दिल्ली दरवाज्यावरील फारसी शिलालेख.

शिलालेख वाचन पुढीलप्रमाणे:-


बअहद हजरत औरंगजेब शाह झमान 

शूद इन हिसार मुरत्तब बामुहर लोदी खान

अगर सवाल निमाले बस ज़ तारीख

ज़ यक  हजार फजू़न नूह दह व दो बदान


शिलालेखाचा अर्थ:-


हजरत औरंगजेब यांच्या कारकिर्दीत लोदी खानाच्या आदेशानुसार या किल्ल्याचे/ शहराचे काम झाले. हे काम नक्की कधी झाले असा प्रश्न विचारला तर त्याची तारीख एक हजार नव्वद आणि दोन (१०९२) म्हणजे १६८१ अशी येईल.


औरंगजेबाच्या कारकिर्दीत बांधलेला दिल्ली दरवाजावरील शिलालेख हा नासिक शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठेवा आहे नासिक शहरामधील आज दिल्ली दरवाजा जरी नष्ट झाला तरी या दरवाजावरील शिलालेख मात्र दिल्ली दरवाजाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. सध्या हा दिल्ली दरवाजावरील शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय, मुंबई इथे जतन करून ठेवला आहे हे फार महत्वाचे आहे. म्हणूनच हा नासिक शहरातील दिल्ली दरवाजा येथील शिलालेख महत्वाचा ठरतो. एके काळी नासिक शहरामध्ये ज्या ठिकाणी दिल्ली दरवाजा होता त्याठिकाणी आता फक्त 'दिल्ली दरवाजा चौक' अस्तित्वात आहे. 


दिल्ली दरवाजावरील इ.स. १६८१ सालचा शिलालेख नासिककरांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.


काळाच्या ओघामध्ये हा ऐतिहासिक 'दिल्ली दरवाजा' रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने नष्ट केला गेला असून आता तेथे या दिल्ली दरवाज्याचे कोणतेही अवशेष मात्र शिल्लक नाही. म्हणूनच या दिल्ली दरवाजाची अस्तित्वाची खुण असलेला हा दिल्ली दरवाजावरील इ.स. १६८१ सालचा शिलालेख नाशिककरांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Epigraphia Indo-Moslemica:- R.G. Gyani, 1929-1930. 
२) नासिक जिल्ह्याचे वर्णन:- दामोदर गणेश भालेराव, मंगलदास आणि सन्स, १९२४. 
३) Gazetteer Of The Bombay Presidency Vol. XVI Nvelnkrasik:- The Govt. Central Press, Bombay, १८८३.
४) विशेष आभार श्री. सत्येन वेलणकर यांनी केलेले शिलालेखाचे मराठी भाषांतर आणि त्याचा अर्थ.  
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा      



Share the post

नासिककरांच्या विस्मृतीत गेलेला 'दिल्ली दरवाजावरील शिलालेख'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×