Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

रामचंद्रदेव यादव याचा पूर येथील 'गद्धेगाळ'


महाराष्ट्रामध्ये आपल्याला जागोजागी इतिहासाच्या पाउलखुणा या विखुरलेल्या आढळून येतात. यामध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष, वीरगळ, प्राचीन देवी देवतांच्या मूर्ती, तसेच गद्धेगाळ असे विविध काळातील अवशेष हे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावांमध्ये पाहायला मिळतात. असाच एक महत्वाचा गद्धेगाळ हा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या 'पूर' गावामध्ये नारायणेश्वर मंदिराच्या इथे होता. सध्या हे प्राचीन काळातील 'पूर' गाव नारायणपूर म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. सध्या हे 'नारायणपूर' गाव एकमुखी दत्ताचे फार प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनलेले आहे. 

किमान ८०० वर्षे जुने असलेले 'पूर' गावातील 'नारायणेश्वराचे' यादवकालीन मंदिर अत्यंत सुरेख आहे. भूमिज स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे. याच यादवकाळातील 'नारायणेश्वर' मंदिराच्या बाहेर एक गद्धेगाळ होता. नंतरच्या काळामध्ये हा गद्धेगाळ 'भारत इतिहास संशोधक मंडळात' आणला आणि त्याचे जतन केले गेले तसेच त्याच्यावरील शिलालेखाचे वाचन हे थोर संशोधक 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांनी गद्धेगाळाचे वाचन केले आहे. सध्या रामचंद्रदेव यादव याचा 'पूर' येथील 'गद्धेगाळ' हा 'भारत इतिहास संशोधक मंडळ येथे व्यवस्थित रीतीने जतन करून ठेवण्यात आलेला आहे. 

रामचंद्रदेव यादव याचा पूर येथील 'गद्धेगाळ'

ज्या दगडावर हा शिलालेख कोरलेला आहे त्याची उंची हि २ १/२  (अडीच) फुट असून जाडी हि ५ इंच आहे आणि रुंदी हि वरून खालील बाजूस ९, १२ आणि ९ अशी आहे. लेखाच्या वरच्या  डाव्या बाजूस चंद्र आणि उजव्या बाजूस सूर्य काढलेले आपल्याला बघायला मिळतात. तसेच या शिलालेखाच्या पहिल्या नऊ ओळी सलग आहेत असे आपल्याला पाहायला मिळते.  तसेच शेवटच्या दोन ओळींचे गद्धेगाळाच्या गाढवाच्या कानांंनी दोन भाग झालेले आहेत. मुळातच दगड खडबडीत असल्यामुळे गद्धेगाळावरील अक्षरे उठून दिसते नाहीत. तसेच बरीच वर्षे गद्धेगाळ हा उन वारा पाउस यामध्ये पडून होता त्यामुळे ती अक्षरे फिकट झालेली आहेत. 

गद्धेगाळावरील लेखाचे स्वरूप हे १२ व्या १३ व्या शतकातील यादवांच्या इतर देवनागरी लेखांंच्याप्रमाणेच आहे. पहिल्या ४ ते ५ ओळीतील अक्षरांचे वळण जितके रेखीव आहे तितके बाकीच्या ओळींमध्ये आपल्याला ते पाहायला मिळत नाही. या गद्धेगाळाच्या शिलालेखाची भाषा हि मराठी आहे. यामध्ये लेखाचा काळ हा शक् १२०७ पार्थिव संवत्सर अश्विनादौ असा दिलेला आहे. या शिलालेखामध्ये वार दिला नसल्याने मिती समजत नाही. 

गद्धेगाळावर  डाव्या बाजूस चंद्र आणि उजव्या बाजूस सूर्य काढलेले आपल्याला बघायला मिळतात.

उन वारा पाउस ह्या सगळ्याचा मारा बसल्यामुळे लेखाची अक्षरे पुसट झालेली आहेत. जी अक्षरे हि 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांनी वाचली त्यामध्ये श्रीमत्प्रौढप्रतापचक्रवर्ती रामचंद्र देव, दफ्तरखान्यावरील मुख्य हेमाडीपंडित, सेनापति किंवा न्यायाधीश बोईदेव (?) स्रीपत पभुण (?) नायक, आणि रामचंद्रदेव यांचे उल्लेख दिसून येतात. 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुधा रामचंद्र देवाला काहीतरी इनाम करून दिल्याबद्दलचे हे दानपत्र असावे. या शिलालेखाचा ठसा घेता येत नसल्यामुळे प्रत्यक्ष पाहून जेवढी अक्षरे 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांना वाचता आले तसे त्यांनी त्याचे वाचन दिलेले आहे ते पुढीलप्रमाणे:-

१) स्वस्ति स्री सकू १२०७
२) वर्षे प(पा) र्थिव सवछरे 
३) आस्विन (ना) दौ अद्येह स्री
४) मप्रौ (त्प्रौ) ढप्रतापचक्रव
५) र्ती स्रीरामच (चं) द्रदेवविजय
६) राज्योदै तदपादपदुमोपजिवि स
७) कळकर्णा (रणा) धिप...हेमाडि पंडि
८) तो | त बोंंइ -- दंडनायक | स्रिपत प (प्र) मु (भू ?)
९) णेंं नायक | रामचंद्रदेवोंं नाडिती जीवि...
१०) ळक कुळ... ...
११) ... ...सोडि ... ...

शिलालेख आणि गाढव आणि स्त्रीचा संकर असलेले शिल्प. 

रामचंद्रदेव यादव याचा 'पूर' येथील 'गद्धेगाळ' हा नक्कीच महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचा ठरतो. ह्या गद्धेगाळावरील शिलालेख तुम्हाला पहायचा असेल तर भारत इतिहास संशोधक मंडळात हा गद्धेगाळ अत्यंत व्यवस्थित रीतीने जतन केलेला आहे. 

शिलालेखाचा ठसा फोटोद्वारे कॉम्प्युटरवर बनवायचा केलेला हा प्रयत्न यामध्ये शिलालेखातील काही अक्षरे दिसून येत आहेत.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१) दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १ ते ४:- संपादक ग.ह.खरे, पुन: संपादन ब्रम्हानंद देशपांडे, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे. 

______________________________________________________________________________________________
महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________
 लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा                             

Share the post

रामचंद्रदेव यादव याचा पूर येथील 'गद्धेगाळ'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×