Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पुण्याच्या कसबा पेठेतील १५ व्या शतकातील 'गुंडाचा गणपती'


पुण्याची कसबा पेठ हे नाव उच्चारले की आपल्याडोळ्यासमोर पहिले नाव उभे राहते ते पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या 'कसबा गणपतीचे' आणि त्याच्या जवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या लाल महालाचे. अशी ही पुण्यातील सगळ्यात जुनी 'कसबा पेठ' आजही पुण्याचे ऐतिहासिक महत्व आणि अवशेष जपून आहे. याच प्राचीन आणि ऐतिहासिक कसबा पेठेमध्ये पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या 'कसबा गणपती' मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे तो १५ व्या शतकातील 'गुंडाचा गणपती'.



पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या जवळून आणि शितोळे वाड्याशेजारून थोडे पुढे गेले की उताराचा रस्ता आपल्याला लागतो तेथून उजवीकडे वळाले असता सरळ जाऊन डावीकडे वळाले की सरळ आपण पोहोचतो ते थेट १५ व्या शतकातील 'गुंडाचा गणपती' या मंदिराच्या प्रांगणात. पेशवाईतील मुत्सद्दी 'नाना फडणीस' यांचा 'नागोजी गुंड' नावाचा सहकारी होता. ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती‘ म्हणून प्रसिद्ध आहे.किंवा आळीला 'गुंडांची आळी' असे म्हटले जाऊ लागले. म्हणून या गुंडाच्या आळी मधला जो गणपती आहे त्याला 'गुंडाचा गणपती' असे नाव पुढे संपूर्ण परिसरात रूढ झालेले आपल्याला दिसते.  


कसबा पेठेमध्ये असलेला 'गुंडाचा गणपती' हा पूर्वी पारावर वसलेला होता. पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आढळून येतो. तसेच नागोजी गुंड याच्या घराजवळील गणपती’ असा उल्लेख दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये आपल्याला आढळून येतो. साधारण १८५० सालच्या दरम्यान श्री. गोपाळराव जोशी यांनी येथे एक मंदिर उभारले तसेच १९ व्या शतकाच्या शेवटी या मंदिराचा जीर्णोद्धार हा श्री. आप्पाराव गणेश वैद्य यांनी केला.



१९६१ साली जेव्हा पुण्यात पानशेत धरण फुटून पूर आला होता तेव्हा हे 'गुंडाचा गणपती' हे मंदिर तब्बल ८ तास पाण्याखाली होते. एवढ्यावेळ मंदिर पाण्याखाली असून देखील मूर्तीचे आणि मंदिराचे नुकसान झाले नाही. १३ फेब्रुवारी १९७४ रोजी 'गुंडाच्या गणपती' वरील शेंदूरकवच निखळून पडत असल्याचे काही लोकांना दिसून आले जेव्हा हे कवच निखळले त्यानंतर शेंदूर आणि सनला याने बनलेल्या तीन मूर्ती लोकांना आढळून आल्या जेव्हा संपूर्ण कवच दूर केले गेले तेव्हा आतमध्ये जवळपास अर्धा मिटर उंचीची दगडी रेखीव आणि सुरेख मूर्ती आढळून आली. ही सुंदर मूर्ती जवळपास बऱ्याच ठिकाणी दुभंगलेली होती. या मूर्तीला पूर्ववत करण्यासाठी प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉ.शांं.भ.देव यांची मदत घेतली गेली. डॉ.शांं.भ.देव यांच्या सल्ल्ल्याने या संपूर्ण मूर्तीला पूर्वरूप प्राप्त झाले. 



प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉ.शांं.भ.देव यांच्या मते या  'गुंडाच्या  गणपतीची' बसण्याची पद्धत तसेच त्याच्या खांद्यावर असणारे सर्पाचे यज्ञोपवीत हे सगळे शिलाहार काळातील असावते. पेशव्यांच्या काळामध्ये या गणपतीचे महत्व खूप होते हे दिसून येते. पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तसेच दुसरे बाजीराव पेशवे यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या गणपतीपुढे दक्षिणा ठेवण्यात आळी होती. या देवस्थानची वहिवाट सन १८५२ ते १९१० पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. तसेच लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत ते अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मातोश्रींनी एक लाख प्रदक्षिणा इथे घालण्याचा संकल्प सुरू केला. 


आत्ताची मंदिरात बसवलेली मूर्ती ही नवीन मूर्ती आहे जुनी मूर्ती ही सभामंडपात असलेल्या लाकडी पेटीच्या डाव्या हाताला छोट्याशा फडताळात ठेवलेली आहे. नवीन मूर्ती ही तब्बल ३ टन वजनाची असून ३.५० फुट लांब आणि ३.७५ उंच असून तिची रुंदी ही १.५० फुट रुंद आहे. सध्याच्या मूर्तीची अखंड शिळा ही वारजेच्या 'गणपती माथा' टेकडीवरील खाणीतून मिळवली होती. ही मूर्ती केशवराव रघुनाथ देशपांडे यांनी घडवली तसेच या मूर्तीचा साचा हा श्री. बी.आर. खेडेकर यांनी बनवला होता सध्या हा साचा केळकर संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे. 



नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही ४ फेब्रुवारी १९७६ रोजी केली गेली. ही गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची असून या गणेशाचा उजवा खालचा हात अभयहस्त मुद्रेत असून वरच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ दिसून येते. तसेच वरच्या डाव्या हातामध्ये अंकुश दिसून येतो तसेच खालच्या डाव्या हातामध्ये लाडू आणि पोटावर नागाचे यज्ञोपवीत अत्यंत सुबक आहे. सभामंडप २५ बाय २५ फुटांचा असून गर्भगृहासभोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या आवरात आपल्याला हनुमान आणि म्हसोबाचे देखील मंदिर पहायला मिळते. मंदिराचा कळस हा पेशवेकाळातील असून सभामंडपाचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला असून मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागू दिलेला दिसून येत नाही.  



असे हे पुण्याच्या कसबा पेठेतील आजही फारसे प्रसिद्धी झोतात नसलेले तसेच  फारशी वर्दळ नसलेले 'गुंडाचा गणपती' मंदिर आजही मनाला नक्कीच भावते. 


______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) दुसरे बाजीराव पेशवे यांची रोजनिशी:- संपादक जोशी, बी पी १९०८. 
२) पुणे नगर संशोधन वृत्त:-  भारत इतिहास संशोधक मंडळ.
______________________________________________________________________________________________

कसे जाल:- 
१) पुणे स्टेशन - कसबा गणपती - गुंडाचा गणपती. 
२) शिवाजी नगर - कसबा गणपती - गुंडाचा गणपती.
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

लिखाण आणि छायाचित्र  © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा

Share the post

पुण्याच्या कसबा पेठेतील १५ व्या शतकातील 'गुंडाचा गणपती'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×