Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

नरवीर चिमाजी आपा

वसई किल्ल्यातील चिमाजी आपा यांचा पुतळा

चिमाजी आपा हा बाळाजी विश्वनाथ यांचा धाकटा मुलगा. याचा जन्म कधी झाला याबद्दल फारसे तपशील मिळत नाहीत. सन १७१५ च्या आसपास दामाजी थोराताच्या कैदेत बाळाजी विश्वनाथ यांच्या सोबत हा होता. बाजीराव पेशव्यांना पेशवाई मिळाल्यानंतर चिमाजी आपा यांना सरदारी मिळाली. पेशव्यांचे खाजगी व्यवहार सांभाळणे व पुण्यातील कुटुंबाकडे लक्ष देणे ही दोन मुख्य कामे चिमाजी आपा यांच्याकडे होती तसेच काही वेळा मोहिमांवर सुद्धा जावे लागे. चिमाजी आपा यांची पहिली मोहीम ही माळवा प्रांतात सन १७२८ मध्ये झाली. या मोहिमेत आमझरा येथे झालेल्या लढाईमध्ये त्यांनी गिरीबहाद्दर या मुघल सरदाराला संपवले.

त्यानंतर सन १७२९ मध्ये पावसाळा संपल्यानंतर गुजराथ प्रांतात चौथाई वसूल करण्यासाठी म्हणून चिमाजी आपा यांची स्वारी झाली. चिमाजी आपा यांच्या पराक्रमामुळे तेथील मुघल सरदार सरबुलंदखानाने शरणागती पत्करून मराठ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीचे हक्क काबुल केले. त्यानंतर पुढे शाहू राजांच्या आदेशानुसार जंजिरा किल्ला घेण्यासाठी तसेच सिद्दी सात याचा बंदोबस्त करण्यासाठी सन १७३६ मध्ये याने कोकणात स्वारी केली. या स्वारीत सिद्दी सात मारला गेला. पुढे चिमाजी यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची लढाई घडली ती म्हणजे वसई येथे पोर्तुगीज सत्तेविरुद्ध झालेले युद्ध. वसई प्रांतातील पोर्तुगीजांच्या धार्मिक छळाला कंटाळून तेथील जनतेने पेशव्यांच्याकडे रक्षण करण्याची विनंती केली. पेशव्यानी आपले बंधू चिमाजी आपा यांना या मोहिमेवर पाठवले. 

सन १७३७ मध्ये झालेल्या या मोहिमेत मराठ्यांनी सुरुवातीला ठाणे, घोडबंदर, मनोर, पारसिक, अर्नाळा इत्यादी ठाणी जिंकून घेत पोर्तुगीजांना शह दिला. या मोहिमेची जबाबदारी प्रामुख्याने अणजूरकर बंधूंवर होती. काही दिवसांनी चिमाजी आपा यांना भोपाळ च्या लढाईत निजामाविरुद्ध जावे लागले त्यामुळे वसईचे मोहीम ही अर्धवट राहिली. पुढे पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर १७३७ मध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले. माहीमचे ठाणे घेतल्यानंतर चिमाजी आपा पुन्हा एकदा आपल्या फौजेसह वसई प्रांतात दाखल झाले. काही दिवस मुक्काम केल्यानंतर चिमाजी हे पुण्यास परतले. त्यानंतर सन १७३८ चा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा थोरले बाजीराव पुण्यात आले तेव्हा पुन्हा एकदा वसईवर हल्ला करण्याचे ठरवले. यानंतर प्रचंड फौज घेऊन चिमाजी आपा हे वसई प्रांती उतरले. यावेळी त्यांच्या सोबत मल्हारराव होळकर वगैरे सरदार सुद्धा सामील झाले होते. 

डिसेंबर महिन्यात पोर्तुगीजांचा सेनापती पद्रेमेलो हा मारला गेला. यांनतर मराठ्यांनी तारापूरचे ठाणे जिंकून घेतले. जानेवारी सन १७३९ मध्ये मराठ्यांनी बाजी रेठेकर सारखा योद्ध गमावला. यानंतर केवळ वसईचे ठाणे घ्यायचे बाजी राहिले होते. ती काही हातात येईना त्यामुळे चिमाजी आपा यांनी सर्व सरदाराना एकत्र बोलावले व सांगितले की, “वसई ताब्यात येत नाही. माझा हेतू वसई घ्यावी असा आहे. तरी तोफ डागून माझे मेलेले शरीर तरी वसई किल्ल्यात पडेल असे करा.” हे वीरश्रीयुक्त बोलणे सर्व सरदारांनी ऐकले आणि वसईवर निकराचा लढा केला आणि वसईवर मराठ्यांचे निशाण फडकले.

या लढाईमुळे चिमाजी आपा यांचे व मराठ्यांचे नाव अजरामर झाले. उत्तर कोकण प्रांतातून पोतुगीजांची सत्ता संपूर्णपणे उखडून टाकण्यात आली. मराठ्यांना फिरंग्यांच्या ताब्यात असलेला ३४० गावांचा प्रदेश, २० किल्ले, २५ लाखांचा दारूगोळा वगैरे साहित्य मिळाले. तितक्यात बाजीराव साहेब वारल्याची खबर चिमाजी आपा यांना मिळाली त्यामुळे ते लगेच पुण्यात परतले. पुढे सातारा येथे जाऊन शाहू राजांच्या करवी नानासाहेब पेशव्यांना पेशवाई पदाची वस्त्रे देवविली. यावेळी वसई येथे केलेय पराक्रमामुळे चिमाजी आपा यांचा सन्मान करण्यात आला.

शिंगणापूर येथील पोर्तुगीज घंटा.. अशा घंटा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळून येतात. वसई युद्धाचे प्रतिक म्हणून या घंटा अनेक मराठा सरदारांनी आपल्या आपल्या देवताना अर्पण केल्या..

पुढे सन १७४० मध्ये चिमाजी यांनी दीव दमण प्रांतावर हल्ला करून तेथील उरलेल्या पोर्तुगीज सत्तेचा पराभव केला. त्यामुळे पोर्तुगीज आता फक्त गोव्या पुरतेच मर्यादित राहिले. चिमाजी आपा यांना क्षयाचा त्रास होता, त्यात या सर्व दगदगीमुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावली. या मोहिमेनंतर लगेचच १७ डिसेंबर १७४० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

चिमाजी आपा याची पहिली बायको रखमाबाई, तिच्यापासून याला सदाशिव नावाचा मुलगा झाला ३ ऑगस्ट १७३० रोजी झाला. मुलगा झाल्या झाल्याच रखमाबाईचे निधन झाले. यांनतर पुढील वर्षात चिमाजी आपा यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या बायकोचे नाव होते अन्नपूर्णाबाई. तिच्यापासून यांना बयाबाई नावाची मुलगी झाली. तिचा विवाह गंगाधर नाईक ओंकार यांच्याशी झाला. चिमाजी आपा यांची समाधी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात आहे.

चिमाजी आपा हा काही बाबतीत थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पेक्षा श्रेष्ठ होता. हा शूर, धोरणी व मनमिळाऊ होता. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार याने अत्यंत कौशल्याने सांभाळला. वसईच्या किल्ल्यात सापडलेल्या एका फिरंग्याच्या मुलीला याने सन्मानाने पाठविल्याची हकीकत तर प्रसिद्ध आहेच. शाहू महाराजांच्याकडील खासगी कामे सुद्धा याने अनेक वेळा केली आहेत.     

पुण्यातील ओंकारेश्वर येथील चिमाजी आपा यांची समाधी

संदर्भ – 
  • डॉ. आर.एच. कांबळे - मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी आप्पांचे योगदान (प्रबंध आणि ग्रंथ). पुणे. २०१६ 
  • गो. स. सरदेसाई – मराठी रियासत मध्यविभाग – १ (सन १७०७ ते १७४०) मुंबई. १९२५
  • चिमाजी आपा - कै. कृ. वा. पुरंदरे


(फिरस्ती महाराष्ट्राची आयोजित भिगवण पक्षी निरीक्षण सहल १९ जानेवारी रोजी आयोजित केली आहे. इच्छुकांनी ७०२०४०२४४६ या क्रमांकावर संपर्क साधावा)




© 2019, Shantanu Paranjape


This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

नरवीर चिमाजी आपा

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×