Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी भाषा आणि सावरकरांनी केलेली भाषाशुद्धी

जमीन, कागद, तारीख, अस्सल, किल्ला, माफी, दरवाजा, इमारत, दालन, हौद, फवारा, गच्ची, पिंजर, पलंग, खुर्ची, मेज, बाजार, दरबार इत्यादी अनेक शब्द आपण बोलताना अगदी सहज वापरतो. आपल्या ध्यानी मनी सुद्धा नसते की आपण जी मराठी शुद्ध म्हणून बोलतो त्यात खरे तर अनेक भाषांच्या अम्धून आलेले शब्द आहेत. 
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
ज्ञानेश्वर माउली यांनी हे सर्व लिहिले परंतु ते तेव्हाच्या मराठी भाषेसाठी. आत्ताची मराठी भाषा खरेच अमृताला सुद्धा जिंकेल अशी आहे का हे बघायला हवे. संत ज्ञानेश्वर यांच्यानंतर मराठी भाषेचा इतका अपकर्ष का झाला याबद्दल इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ मध्ये उत्तम विवेचन केले आहे. 

ज्ञानेश्वर माऊलींनी साधारणपणे इ.स. १२९० च्या सुमारास ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी ग्रंथातील मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने रसाळ आणि अस्खलित म्हणायला हरकत नाही. त्यातील श्लोक नुसते वाचले असता लक्षात येते की, आपण आताच्या काळात बोलत असलेली मराठी आणि त्या काळातील मराठी यात जमीन आस्मानाचा फरक आहे. इसवी सन १२९० पासून पुढे साधारण १३२८ सालापर्यंत महाराष्ट्रात यादवांचेच राज्य असल्यामुळे तोपर्यंत मराठी आपल्या मूळ स्वरूपातच राहिली. परंतु त्यानंतर मात्र बाहेरून आलेल्या मुस्लिम आक्रमकांच्या शासनकाळात मराठी भाषेत फार्सी शब्दांची सरमिसळ व्हायला सुरुवात झाली. शासनकर्ते मुस्लिम असल्यामुळे त्यांची भाषा फार्सी हीच प्रामुख्याने राजभाषा म्हणून वापरात येऊ लागली. परंतु त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी इथल्या स्थानिक मराठी माणसांचा आधार घ्यावाच लागला. अशा अनेक गोष्टींचर परिणाम होत ही भाषा व्यवहारात वापरली जाऊ लागली. याचा प्रत्यय जुन्या मोडी कागदपत्रांमधून येतो. 

इराण-अफगाणिस्तान इथून आलेल्या मुस्लिम शासकांनी नुसता देशच काबीज नाही केला तर इथल्या संस्कृतीवरही आक्रमण केलं. मात्र या गोष्टीला लगाम घालण्याचे काम एका थोर पुरुषाने केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय असण्याचं हेही एक प्रमुख कारण आहे की, ते एक द्रष्टे राज्यकर्ते होते. त्यांनी ही गोष्ट ओळखली की, स्वराज्य उभारणीच्या कार्याबरोबरच इथल्या संस्कृतीवर झालेलं परकीयांचं आक्रमणही परतवून लावायला हवं. त्यासाठी त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश’ नावाचा एक ग्रंथ रघुनाथ नारायण हणमंते यांच्या देखरेखीखाली विद्वान धुंडिराज लक्ष्मण व्यास यांच्या हस्ते लिहून घेतला. या ग्रंथामध्ये त्यांनी फार्सी शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत शब्द वापरून व्यवहाराचे मराठीकरण केले. अर्थात महाराजांनी बदललेले शब्द फार काळ टिकले नाहीत याचे कारण बोलीभाषेत मराठीवर असलेले फारसीचे आक्रमण हे तसेच राहिले. परंतु पेशवे कालखंडात मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानभर पसरल्यामुळे पुन्हा एकदा विविध मुस्लिम राजवटींशी मराठय़ांचा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संबंध प्रस्थापित झाला. त्यामुळे पुन्हा एकदा फार्सी शब्दांचा वापर होऊ लागला तो आजतागायत चालूच आहे. नंतरच्या काळात इंग्रजी अंमल आल्याने यात इंग्रजी शब्दांचीही भर पडली.

मराठीचे हे असे दिवस बघताना सुरेश भटांची कविता आठवते. सुरेश भट लिहितात,

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी 
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी । 
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी 
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।

छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या थोर मनुष्याला भाषाशुद्धीचे महत्व समजले आणि ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर अर्थात तात्याराव सावरकर. मराठी भाषेवर दुसऱ्या भाषांचे झालेले आक्रमण हे आपल्या संस्कृतीवर झालेले आक्रमण आहे हे समजून त्यानी सन १९२४ पासून केसरीमध्ये लेखमला लिहायला सुरुवात केली. सावरकर म्हणतात, 
'आपण बहुधा हयगय करून कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून आपल्या बोलण्यात-लिहिण्यात परकीय शब्द वापरतो. ते जितके अधिक वापरले जातात , तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात . पुढे पुढे तर त्या शब्दांवाचून तो अर्थ व्यक्‍तच होत नाही , असे वाटू लागते. ते परशब्द आपलेच झाले , असे खुळे ममत्व वाटू लागते आणि पर-शब्द आपल्या भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात'
'स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं , हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे , तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी , फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे , म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का ? 
असा प्रश्न सावरकरानी उपस्थित केला. नुसते प्रश्न उपस्थित करून ते थांबले नाहीत तर त्यानी मराठीत शिरलेल्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द सुचवले आणि आज आपण ते शब्द वापरतो. 

विनायक दामोदर सावरकर
सावरकांराची भाषा वाचायला अवघड जाते असे आपण अनेकदा म्हणले असले तरी आज आपण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे जे काही शब्द वापरतो ते तात्यारावांच्या मुळेच आहेत. तात्यानी मराठी भाषेला अनेक नवीन शब्द दिले. त्यातील काही शब्द खालील प्रमाणे, 

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

सुरुवातीला मराठीवर झालेले फारसी शब्दांचे आक्रमण जे शिवाजी राजानी थोपवायचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात जे इंग्रजी शब्द शिरले ते सावरकरानी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु आत्ताच्या काळात या दोन दृष्ट्या पुरुषांनी घेतलेले प्रयत्न आपण अक्षरशः वाया घालवतो आहे. आता तर इंग्रजी शब्दांचे सुद्धा शोर्ट फोर्म करून आपण ते मराठी असल्यासारखे वापरतो. कुठेतरी भाषाशुद्धीची चळवळ मोठ्या प्रमाणावर हाती घेणे गरजेचे आहे. भाषाशुद्धी म्हणजे नवीन शब्द देणे का तर तसे अजिबात नाही. त्याची आत्ता गरजसुद्धा नाही इतकी आपली मराठी अजूनही समृद्ध आहे. गरज आहे ते आपल्या भाषेत बोलण्याची. शक्य तितके आपले शब्द वापरण्याची तसेच आपल्या भाषेतून लिखाण करण्याची. पुन्हा मराठी भाषा अमृतालाही  पैजेत जिंकल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते. 

© 2019, Shantanu Paranjape


This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

मराठी भाषा आणि सावरकरांनी केलेली भाषाशुद्धी

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×