Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

कुंजपुरा येथील लढाई- पानिपतची सुरुवात??

      
       पानिपत प्रकरणाबद्दल वाचायला लागल्यानंतर हे लक्षात आले की नुसते युद्ध अभ्यासून चालणार नाही कारण पानिपतचे युद्ध होण्याची कारणे ही अनेक आहेत. पानिपत हे अटळ होते फक्त ते लांबवर ढकलेले इतकेच. पानिपतचे युद्ध होण्यास एक महत्वाची घटना कारणीभूत ठरली ती सदाशिवराव भाऊं यांनी केलेला कुंजपुरावरील हल्ला!! मागच्या ब्लॉग मध्ये “भाऊका घोडा” या वाक्प्रचारात कुंजपुराचा उल्लेख आला होता तर त्याबद्दल माहिती देण्यासाठीच या लेखाचा प्रपंच!

    भाऊंनी दिल्ली काबीज केली आणि दिल्ली ते कुंजपुरा हा पट्टा आपल्या ताब्यात राखण्याचे प्रयत्न चालू केले. भाऊंचा इरादा असा होता की पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडून अब्दालीस घेरून त्याला मध्ये चेपायचे. अब्दालीच्या दक्षिणेस असणाऱ्या यमुना नदीने त्याचा दक्षिणेकडे येणारा मार्ग अडवला होता. त्यामुळे भाऊ यांना इकडे हालचाली करायला वाव मिळत होता. त्यामुळे जर आग्रापासून कुंजपुरा हे गाव जर ताब्यात घेतले तर अब्दाली यमुना नदी ओलांडूच शकणार नाही अशी परिस्थिती. पूर्वेकडे असणाऱ्या गोविंदपंताना मदत पाठवून पूर्वेकडून अब्दालीवर दबाव टाकणे हा एक पर्याय भाऊंच्याकडे होता पण यमुना नदीमुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे कुंजपुरा जिंकून मग पुढे सहारणपुऱ्यावरून अब्दालीस गाठणे आणि मागे चेचणे हा मार्ग भाऊना योग्य वाटला असावा. अर्थात ही खेळी त्यांनी सर्वांच्या मतेच घेतली असावी पण यमुनेचे उतार राखण्यास थोडी ढिलाई झाल्याने बागपतला अब्दालीला खाली उतरायला वाव मिळाला हे मात्र खरे!! असो, त्याबद्दल पुढे येईलच!  

कुंजपुरा लढाईच्या आधी कुंजपुरा आणि दिल्ली येथील अंतरे पाहणे हे महत्वाचे ठरेल. दिल्लीपासून कुंजपुरा हे अंतर साधारण ७८ मैल होते तसेच दिल्ली ते आग्रा हे अंतर १२० मैल. अगोदरच मराठे दिल्ली ते आग्रा हे अंतर राखण्यात शर्थीचे प्रयत्न करत होते आणि त्यात आता दिल्ली ते कुंजपुरा या ७८ मैलांची भर पडली होती. तुमच्या लक्षात येईल की बागपत हे ठिकाण दिल्ली आणि कुंजपुरा यांच्या मधेच आहे. दिल्लीपासून बागपत हे ठिकाण साधारण २० मैल आहे आणि पुढे बागपत पासून पानिपत ३४ मैल आणि पुढे कुंजपुरा अजून २४ मैल. नेटवर शोधशोध करत असताना एक उत्तम फोटो सापडला ज्यावरून तुम्हाला नेमक्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येईल की कोणते ठिकाण कसे होते ते!! 

              

   कुंजपुराला निघण्याआधी, सदाशिवराव भाऊंनी गोविंदपंतांना एक पत्र लिहिले होते ज्यातून ते त्यांची योजना काय आहे आहे याचे वर्णन करतात. हे पत्र मराठी भाषेत सरदेसाई यांनी ‘मराठी रियासत- मध्य विभाग-३’ यात छापले आहे. भाऊ लिहितात की, 


     “तुम्हास तिकडे मोठ्या कामास जावयाविषयी वारंवार लिहिले, परंतु अद्याप गोपाळराव गणेश व तुम्ही गेला नाहीत. (कदाचित अब्दालीवर छोटे मोठे छापे घालण्याचे काम असावे कारण गोविंदपंतांच्याकडे थोडीफार फौज होती) कोठे किरकोळ जमीदारांचे गढागाव घेत बसला, हे ठीक नाही. या उपरी लौकर तिकडे जाऊन पेशजी लिहिल्याप्रमाणे गडबड करून धुंद उडवणे. या गोष्टीस हयगय एकंदर न करणे. यमुनेचे पाणी फार याकरिता आम्ही दिल्लीस बसणे योग्य नाही. यास्तव कुंजपुऱ्यास अब्दुसमदखानाचे पारिपत्य करावयास जात आहो. (यापुढील काही मजकूर हा दिल्लीविषयक आहे त्यामुळे तो इथे देत नाही) आम्ही कुंजपुऱ्याकडे गेलो. अब्दाली इकडे कूच करून आलीया उत्तमच झाले. दिल्लीकडून मागे मुलुख मोकळा राहील, लढाई इकडेच पडेल. कदाचित इकडे न येता तिकडे तुमचे रोख जाहले तरी बरेच आहे. आम्ही पाठीवरी यमुना उतरून अंतर्वेदीतून येऊन त्याचे पारिपत्य करू. कुंजपुरेवाला ठरत नाही. डावा डौल होऊन दमवायच्या मुद्द्यावरी आहे. ठरला तरी मोर्चे लाऊन यथास्थितच पारिपत्य करू. तुम्ही तिकडे सत्वर जाऊन पोहोचणे. (कुठे ते नेमके काळात नाही), केवळ छोट्या मोठ्या कामात गुंतोनी न राहणे. गनिमी मेहनत करून, रोहिले व सुजा यांचे प्रांतात धामधूम होईल असे करणे. अब्दाली आम्हाकडेच येईल. तिकडे आला तरी पाणी आहे, तो आहे. चार रोजात कुंजपुऱ्याचे पारिपत्य करून सारंगपुराकडे उतरून नजीबखानाचे विल्हे लावून पुढे अब्दालीचे पाठीवर येउ. ऐवज लवकर येऊन पावेसा करणे. अलीगोहारचा शिक्का दिल्लीत पडला त्याची चिठ्ठी पाठवली आहे. त्याप्रमाणे लिहून पातशहाची जरब मोडून याचे नावे करणे. लवकर जाऊन सर्व कामे यथास्थित करणे. ग्वाल्हेर आग्रा मथुरेवरून ऐवज दिल्लीस येई ते करणे. जाठ वल्लभगडास आहेत, तिकडून रसदेचा वगैरे पेच पडावयाचा नाही. त्याची फौज पुत्र हुजूर येणार. ते तेथे राहून पलीकडे पायबंद द्यावा. तिकडून तुम्ही फौज सुद्धा जाऊन शहावरी असावे. इकडे यमुनेचे पाणी हलके होताच अब्दालीचे पारिपत्य करावे असा डौल आहे. त्याजकडून तहाचे राजकारण अद्याप आहे परंतु मळमळीत आहे, ठीक नाही. येथील मर्जीनुरूप झाल्याशिवाय तह होणार नाही. प्रस्तुत आम्ही दिलीहून दोन मजली कुंजपुऱ्यास आलो. पुढे जाऊ. आलीगौहरचे पुत्र बाहेर काढून वलीहदी शुक्रवारचे मुहूर्ते केली. आपले तालुक्यातही शहाआलमचा गजशिक्का चालविणे. महिनाभर फौज उतरण्याजोगे पाणी होत नाही. कुंजपुऱ्यास समदखानाचे पारिपत्य करू, अब्दाली तिकडे आला तर उत्तम, न आलीया फिरोन घेऊ. लिहिल्याप्रमाणे तुम्ही शह देणे. जाठ आपलाच आहे. वसवास नाही.”



पत्र बरेच मोठे आहे परंतु यातून बऱ्याच गोष्टी निदर्शनास येतात त्या अशा की, -
  • ·         अब्दालीसोबत लढण्यासाठी भाऊंच्याकडे एक योजना होती. पानिपत झाले हा केवळ नशीबाचा भाग. नाहीतर कुंजपुरा जिंकून वरून अब्दालीवर हल्ला करायचा भाऊंचा स्पष्ट डाव दिसून येतो.
  • ·         भाऊ अविचारी नव्हते हे सुद्धा निदर्शनास येते कारण, कुंजपुरा सारखा धाडसी हल्ला करताना त्यानी अब्दाली गोविंदपंत यांच्याकडे न जाता आपल्याकडेसुद्धा येऊ शकतो आणि इकडे युद्ध होऊ शकते याचे त्यांना पूर्ण भान होते.
  • ·         भाऊ गनिमी काव्याच्या विरोधात होते असे अनेक जणांचे म्हणणे असते आणि ते पानिपतच्या पराभवातून येणे हे साहजिक आहे परंतु इथे स्वतःच भाऊ गोविंदपंताना, “गनिमी मेहनत करून” असा सल्ला देतात यावरून ते कमीतकमी गनिमी काव्याच्या विरोधात नसावे हे कळून येते.  
  • ·        जाठ आपलाच आहे, वसवास नाही यावरून जाठ हे मराठ्यांच्या बाजूने असावे किंवा मराठ्यांना ते मदत करत असावेत असे वाटते त्यामुळे "काबिले ग्वालेरीस ठेवले नाही, मीर शाहबुदिन यांस वजिरी दिली नाही, सभागृहातील छत काढून त्याची नाणी पाडली आणि दिल्लीचा बंदोबस्त जाठांकडे दिला नाही" यावरून जाठ रुसून बसला या पानिपत बखरकार काशीरायाच्या विधानांवर पुनश्च विचार करावा लागतो. कदाचित ‘रसद पोचण्यास जाठ तुम्हास त्रास देणार नाही’ या इशारावजा वाक्यावरून तत्कालीन लोकांमध्ये जाठ रुसला आहे अशी भावना निर्माण झाली असावी."     


       सप्टेंबर मध्ये कुंजपुरा मोहीम करायची असे ठरल्यानंतर, काहींनी पुढे जाऊन सोनपत आणि बागपत अशी ठाणी हस्तगत केली. पानिपत जिंकल्यानंतर बळवंतराव मेहेंदळे भाऊ यांना लिहितो की, 

     "कुंजपुऱ्यास जाण्यास पानिपतपावेतो येऊन पोचले, व लोकांस तफावत आहे. नदीस पाणी आठ चार दिवस उतरावयास पाहिजेत. गिलच्यांची फौज दिल्लीजवळ पलीकडे ये काठीच आहे. कूच करून पलीकडे तीराने येणार होते. प्रस्तुत लष्करात खर्चाची निकड फारच आहे. आम्हासारख्यांनी वस्त्या मोडून खादल्या. सर्वही पेच श्रीमंतांचे प्रतापे वारतील. एक भाऊसाहेबांची हिंम्मत व लोकांवर उत्तम दृष्टी आहे, येणेकरून फत्त्तेच आहे."

तसे बघायला गेले तर कुंजपुरा काबीज करण्यामागे मराठ्यांचे दोन हेतू होते. एक म्हणजे सध्या ज्या ठिकाणी अब्दाली आहे त्या ठिकाणी अब्दाली वर मागून हल्ला करणे शक्य होणार होते आणि दुसरे म्हणजे अब्दालीच्या स्वगृही जाण्याच्या मार्गावर अडथळे येणार होते. तसेच स्वदेशातून जी मदत त्यास रसद स्वरूपात मिळत होती त्यावर बंधने येणार होती. त्यामुळे कुंजपुरा येथील मोहीम ही अनाठयी होती असे म्हणता येणार नाही .
अब्दालीला जेव्हा ही माहिती कळली तेव्हा मात्र त्याच धाबे दणाणले आणि त्याने कुंजपुरा येथील अधिकारी असेलेल्या खानास पत्र पाठवले की फौज मदतीसाठी पाठवत आहोत तर मदत येईपर्यंत टिकाव धरा. मात्र मराठ्यांच्या हाती ते पत्र लागले आणि लगेचच दोन-तीन दिवसात इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याकडून जोराचा मारा झाला आणि किल्ल्याला भगदाड पडले. शिंदे तर दत्ताजीच्या मरणाचा बदला घेण्यासाठी त्वेषाने लढत होते. दामाजींनी किल्ल्याला पडलेल्या भगदाडातून घोडे आत घातले. त्या हर हर महादेवाच्या घोषणांतून किल्ला आणि शहर लगेचच ताब्यात आले.
कुत्बशहा आणि अब्दूस्समदखान हे मराठ्यांच्या हाती सापडले आणि दामाजीने त्यांना हत्तीवर बसवून सदाशिवरावांकडे पाठवले. अब्दालीने केलेल्या दत्ताजीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाऊने दोघांचे मुंडके छाटण्याचा आदेश दिला. नजाबतखानाने अब्दाली साठी ठेवलेली मोठी रसद मराठ्यांच्या हाती लागली. पूर्वी लुटलेला जव्हेरगज नावाचा शिंद्यांचा हत्ती सुद्धा मराठ्यांच्या हाती लागला आणि दत्ताजीच्या वधाचा बदला घेतल्याचे समाधान शिंदेना मिळाले आणि मराठी सैनिकांमध्ये मोठे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
पानिपत समर प्रसंग  

शरण आलेल्या किंवा युद्धात कैदी सापडलेल्या सैनिकांना मारण्याचा मराठ्यांचा रिवाज नव्हता. त्यामुळे शिंदे, होळकर इत्यादी सरदार भाऊंना असे करू नका असे सांगत होते परंतु भाऊंनी कुणाचेही न ऐकता या दोघांची हत्या केली. कदाचित यामुळेच चिडून अब्दालीने जेव्हा मराठ्यांचे सैन्य त्याच्या हाती लागले तेव्हा त्यांना जिवंत नाही सोडले. त्यावेळी कसेही असले तरी ते कृत्य हे वाईटच होते आणि कदाचित त्याच क्षणाला पानिपतची खरी ठिणगी पडली असावी.
१७ ऑक्टोबर रोजी कुंजपुऱ्याचे युद्ध झाले, आणि २३ ऑक्टोबर रोजी नाना पुरंदरे याने पुण्यास पत्र लिहून कळवले की, "दिल्लीचा बंदोबस्त करून श्रीमंत कुंजपुऱ्यास आले. अब्दालीकडील दहा हजार फौज, समदखान, कुत्बखान होते, त्यांजवर हल्ला करून झुंज झाले. मोडले, गोठ लुटला. तसेच हल्ला करून गाव घेतला. लोकांस लूट पुरती घोडा, उंट विगेरे मिळाले. दाणादुणा लष्करास मिळाला. आपल्याकडील सर्व ब्राह्मण मराठे मंडळी खुश आहेत. तुम्ही झुंजाच्या खबरी भलत्या ऐकाल. घाबरे व्हाल, मातुश्री चिंता करतील यास्तव लिहित आहे."
कुंजपुऱ्यास जाऊ नये असे जाठ सदाशिवरावांना सांगत होता परंतु त्यानी ते मानले नाही. कदाचित कुंजपुऱ्यावर आक्रमण न करता जर दिल्लीस राहिले असते किंवा कुंजपुऱ्यावर जाऊन परत लगेच माघारी आले असते तर कदाचित युद्धाचा प्रसंग टाळता आला असता. पण इतिहासात जर तर ला अर्थ काहीच नसतो त्यामुळे जे झाले ते आपल्याला स्वीकारावेच लागते.
पानिपत होण्याची कारणे अनेक असली तरी कुंजपुऱ्याचे युद्ध मात्र प्रमुख कारण होते हे विसरून चालणार नाही.






This post first appeared on History, Nature And Me, please read the originial post: here

Share the post

कुंजपुरा येथील लढाई- पानिपतची सुरुवात??

×

Subscribe to History, Nature And Me

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×