Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेघर भाग – 2 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

 जीवनरंग 

☆ बेघर भाग – 2 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील बागात आपण पाहिले – पापांना  खूप काही बोलून सुधीर घरात आत आला. मीही मागोमाग आत आले. आत येऊन रागारागाने सुधीर खूप काही बडबडत राहिला. मला चांगलं वाटलं नाही. तीन वर्षानंतर आज प्रथम आमच्या स्वरात विसंवाद निर्माण झाला होता. माझाही आवाज चढला. `सुधीर माईंड योर लँग्वेज…’ आता इथून पुढे)  

आमच्या दोघांच्यात वाद-विवाद झाला होता. सुधीर उत्तेजित झाला होता. त्याचा हात माझ्या अंगावर पडला नाही, पण वर जरूर उचलला गेला होता. ही गोष्ट त्याला तोडण्याच्या दृष्टीने पुरेशी झाली. सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आणि विवेकीकरण मी खूप नंतर करू शकले. मी बाहेरच्या खोलीत येऊन पापांजवळ बसले. त्यांनी मला बरोबर नीघ, म्हणून सांगितलं. आणि मी माझी बॅग भरली. आज विचार करते, मी तसं का केलं? मी सुधीरजवळ थांबू शकले असते. त्याला पापंची माफी मागायला सांगू शकले असते. सुधीर ज्या पद्धतीने पापांशी बोलला, त्याबद्दल त्याच्याशी भांडू शकले असते. त्याच्यावर रुसले असते, पण मी अशी तडकाफडकी निघून का आले?

 त्यावेळी वाटलं होतं, की एखाद्या दिवसात सुधीर धावत धावत माझ्या मागे येईल. माझी मनधरणी करेल. पण काहीच झालं नाही आणि मी मूर्खासारखी पापांच्या `बिगर देन लाईफ ईगो’ खाली दबून गेले. सुधीरकडून मान दिला जावा, असं काही मनात नव्हतं, फक्त पापांना ओलांडून परतण्याचं धैर्य दाखवू शकले नाही. कदाचित मीनाक्षी खरं बोलतेय. ती म्हणते, `पापांच्या वटवृक्षाखाली तू आणि भैया नीटपणे वाढू शकला नाहीत. पुरेसे विकसित होऊ शकला नाहीत.  एम. ए., पीएच. डी करणं म्हणजे काय विकसीत होणं?’

पापांनी मला विचार करायला वेळच दिला नाही. लगेचच युनिव्हर्सिटीत रिसर्च जॉईन करायला लावलं. रिसर्च पुरी होण्यापूर्वीच सुधीरने पाठवलेले डायव्होर्स पेपर मिळाले. खूप त्रास झाला मनाला. पण मी सही करून दिले. वाटलं, सुधीरला हेच हवय. नंतर सुधीरच्या लग्नाची बातमी कळली. खूप दिवसपर्यंत मी रडले. पण सुधीर माझ्यापासून दूर जाऊ लागला होता. पापा त्यांच्या मताप्रमाणे, इच्छेप्रमाणे माझ्या जीवनाचा आराखडा आखत होते…. एकदम स्मार्ट, समृद्ध, सक्षम जीवन. जीवनात एक पुरुष नसला, म्हणून काय झालं? त्याशिवाय किती तरी गोष्टी जीवनात आहेत. पापांनी मला असंच काही समजावलं होतं. 

त्या काळात पापा कानपुरातएक घर बांधत होते. पुरा एक बिध्याचा प्लॉट होता. तो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्या काळात त्यांना स्वप्नातही ते घरच दिसायचं. `त्या ठिकाणी वसु तुझ्यासाठीही सर्व सोयी-सुविधांनीयुक्त अशी जागेची व्यवस्था करू.’ ते म्हणाले होते.

पापा किती काळजी घेतात, असा विचार मनात आला, आणि मी काहीशी निवांत झाले. याबद्दल मी खूप विचार केला आणि त्यांना नको म्हंटलं. `नको पापा! सगळं जीवन मला लखनौमधेच काढायचय. सुरुवतीपासून इथेच आहे. रिटयर झाल्यावरसुद्धा कानपुरला जाऊन काय करणार? माझे सारे मित्र, परिचित तर इथेच आहेत.’

`दीदी वेगळी का राहील? कानपूरमध्ये राहिली, तर माझ्याबरोबरच राहील ना!’ भैयाने विरोध केला. मी एकदम खूश झाले. हे छोटे छोटे विश्वास खूप दिलासा देतात. एकटं असूनही जीवन निराधार वाटत नाही. भैयापेक्षासुद्धा अधीक काळजी करणरी अंजली. कितीदा तरी असं व्हायचं, की भैयााशी संवाद अंजलीमार्फत व्हायचा. माझी इच्छा, आवश्यकता तीच भैयापर्यंत पोचवायची आणि ती ते सगळं पूर्णही करून घ्यायची.

 तसे घराबाबत पापा न्श्चििंत होते. लखनऊमध्ये अ‍ॅलॉटमेंटचं घर आहेच. मग कसली चिंता? शहराच्या मध्यवस्तीत चार बेडरूमचा फ्लॅट आहे. पापांना दूरदृष्टी आहे. सर्विसमध्ये असताना एकापेक्षा एक चांगले बंगले राहण्यासाठी मिळत होते. पण त्यांनी घर अ‍ॅलॉट करून घेतलं. नंतर ते कधीच सोडलं नाही. म्हणायचे, कधी ना कधी रिटायर व्हायलाच हवं. मग काही राहण्यासाठी सरकारी जागा मिळणार नाही. म्हणूनच लखनौमध्ये राहण्यासाठी एक ठिकाण त्यांनी नक्की करून ठेवलं होतं. अगदी योग्य व्यवस्था झाली होती. भैयासाठी कानपूरमधलं घर आणि माझ्यासाठी लखनौमधलं हे अ‍ॅलाटमेंटचं घर. या व्यवस्थेत मी खूप खूश होते. रिटायरमेंटनंतर मम्मी-पापा कानपूरला निघून गेले. चार बेडरूमच्या या फ्लॅटमध्ये इतक्या वर्षात मम्मी आणि पापांनी किती बदल केले होते आणि मी माझ्या सोयी-सुविधा आणि छंद म्हणून किती बदल केले होते. मॉडर्न बाथरूम, नवं फ्लोरिंग, किचनमध्ये टाईल्स, ग्रेनाईट बघता बघता घराचं रूपच पालटून गेलं. अ‍ॅलॉटमेंटचं घर आपलंच असतं. पिढ्यान पिढ्या. पण मला पिढ्यांबद्दल कुठे विचार करायचय. आपण गेलं, जग बुडालं. पण का? याच गोष्टीवर पापा अडले होते. मध्यवर्ती जागा. ही सरकारला का परत द्यायची? इतकं चांगलं घर. या जागेवर लाखो रुपये आमचे खर्च झालेत… आणि मग ठरलं, जॉईंट अ‍ॅलॉटमेंटमध्ये पापांबरोबर यशचं नाव लावावं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत घर हातातून जाणार नाही. पापांच्यानंतर भैया…. मग दीप… मग…’ आणि भैयाचं नाव घालून पापा निश्चिंत झाले.

मला खूप वाटलं, की मी दुखावली गेलेय, असं मला वाटू देऊ नये, पण मनाला काही तरी टोचलंच. खूप दिवसपर्यंत मी बैचैन राहिले, जसं काही कुणी माझ्याकडून हिरावून घेतलय. किती तरी जाणीवा अशा असतात, की त्यावर आपण विचार करू इच्छित नाही, पण त्या आपल्या मेंदूवर, काळजावर दबाव टाकतात. मी स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न केला, की कागदाच्या तुकड्यांनी काय फरक पडतो? फरक पडलाही नव्हता. सगळं घर माझंच होतं. मीच इथे राहत होते आणि माझ्या इच्छेनेच सगळं काही चालत होतं. हे घर ही माझ्या अभिमानाची गोष्ट आहे. गेटवर गाडी थांबवून जेव्हा मी हॉर्न वाजवते, तेव्हा जुगनीची मुलं पळत पळत येतात, तेव्हा चांगलं वाटतं. लाल बारीक मुरुमाच्या रस्त्यावरून कार सरपटत व्हरांड्याच्या पुढे जाऊन थांबते. आत जाता जाता मी किती जणांना किती प्रकारचे आदेश देत जाते. कधी माळ्याला, कधी राम सिंहला, कधी जुगनीला. दररोज मी या घरातच येत असते… पण प्रत्येक वेळी नव्याने सगळं काही खूप छान वाटत राहतं. आपल्या स्वत:वर निर्भर राहून शानदारपणे जगण्याचा आत्मविश्वासही मी कमावला आहेच. पप्पा-मम्मी सगळं घर जसंच्या तसं सोडून गेलेत. सजलं-सजवलेलं फर्निचर, क्रोकरी, गालिचे… सगळं काही. शिवाय मीही घरात काही ना काही करतच असते. कुठल्या ना कुठल्या तर्‍हेने ते सजवत नटवत राहतेच. माझी मित्रमंडळी मला `हाउस प्राउड’ म्हणतात. `गृहाभिमानी’. इंग्लीश डिपार्टमेंटची मिसेस धर जेव्हा घरी येते, तेव्हा खूश होऊन जाते. `वसुधा तुझ्या घरी आलं, की खूप प्रसन्न वाटतं. आनंद होतो. आम्ही तर विचार करतोय, की जेव्हा मुलीचं लग्न होईल, तेव्हा तिला तुझ्याकडे महिनाभर `हाउस कीपींग’च्या ट्रेनिंगसाठी पाठवायचं. `परफेक्ट होस्टेस आहेस तू!’

मी दर वेळी हसते. मनात काही तरी टोचतं, पण चांगलं वाटतं.

मी बसल्या बसल्या नेहमी माझ्या सुख-दु:खाचा हिशेब मांडत असते. नशिबाने किती तरी गोष्टी माझ्याकडून हिसकावून घेतल्या, पण किती तरी गोष्टी मला दिल्यासुद्धा. युनिव्हर्सितीतली नोकरी… लखनौतलं हे आमचं घर, भैया आणि अंजलीसारखा भाऊ आणि वहिनी आणि दीप. दीप तर माझाच मुलगा आहे. दुसरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत माझ्याच जवळ राहून शिकलाय. अंजली आलेली असली, तरी आपल्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी तो माझ्याच आगे-मागे असायचा आणि माझी दुनिया त्याच्याभोवती फिरत असायची. अंजली आणि भैयाचे माझ्यावर खूप उपकार आहेत. सगळ्यात मोठा उपकार म्हणजे दीपला माझ्याजवळ ठेवून जाणं. आपलं पहिलं मूल असं कुणी दुसर्‍याकडे ठेवतं का? आणि ते थोड्या काळासाठी सोडणं कुठे होतं? ते तर एक प्रकारे देऊन टाकणंच होतं. कोणत्या शाळेत नाव घालायचं, त्याला कुठला कोर्स घेऊ द्यायचा, दीपला कुठे पाठवायचं, किंवा पाठवायचं नाही… सगळे निर्णय मी एकटीच तर घेत होते. भैया केवळ पैसे देऊन जायचा.

 पप्पा-मम्मीच्या निधनानंतर भैया माझी जास्तच काळजी घेऊ लागलाय. प्रत्येक सुट्टी लागण्यापूर्वी मला नेण्यासाठी कानपूरहून गाडी येते. त्यांच्या कुटुंबाचा कुठलाही कार्यक्रम असला, तरी त्यात मला सहभागी करून घेतलं जातं. आपल्या कामासााठी भैया लखनौला येतच असतो. तेव्हा अंजली आपल्या मळयातून खूप सामान पाठवत असते. भाज्या, फळे, धान्य. आपल्या डेअरीतून तूप, पनीर… सगळं काही. माझं घर भरून राहतं. पापा इतके मोठे ऑफीसर होते, पण भैयाच्या राज्यात समृद्धी दिसू लागलीय. कानपुरातही आणि इथे लखनौमध्येही.

लखनौच्या विकास प्राधिकरणाची नोटीस आलीय. त्याच्या अंतर्गत येणरी सगळ्या मालमत्तेचं निस्तारण `ना फायदा, ना तोटा’ या तत्वावर केलं जाईल. सगळे लाभार्थी खूश होते. सूचना मिळताच भैयादेखील आला. एल. डी.ए. साठी धावपळ सुरू झाली. एक करोडची संपत्ती असलेल्या या मालमत्तेचं मूल्यांकन फक्त बारा लाख रुपये  झालं. भैया आणि दीप यात वाद-विवाद सुरू झाले. भैयाचं म्हणणं, इतकी छोटीशी रक्कम आहे, तर एक रकमी देऊन टाकावी. दीपचं म्हणणं असं, की आपण तेवढी तरी रक्कम एक रकमी कशाला द्यायची. आपण लोन घेतलं पाहिजे. मधून मधून अंजलीदेखील आपलं म्हणणं मांडत होती. तो उल्हास, तो वाद-विवाद यात मला कुणीच सामील करून घेतलं नाही. खूप प्रयत्न करूनही मी स्वत:देखील त्यात सामील होऊ शकले नाही.  सगळा वेळ मी गप्पच बसून होते. मी आजपर्यंत हे घर माझंच समजत होते. पापांनी असंच म्हंटलं होतं. पण घर खरेदी करण्याच्या वेळी भैय्याने मला काहीच विचारलं नाही. इतके पैसे देण्याचं माझंही सामर्थ्य होतंच.

कित्येक दिवस मी बेचैन होते. कित्येक रात्री मला झोप आली नाही. कित्येक वेळा जिभेवर आलं होतं, की  भैयाला सांगावं, `हे घर पापांनी मला दिलय’, पण मला भीती होती, की तो नाराज तर होणार नाही ना? आणि जर त्याने आपला कायदेशीर हक्क दाखवला, तर मी काय करू शकणार होते? मी गप्प बसले होते, पण मनाचे जसे काही तुकडे तुकडे झाले होते. भैयाने आपल्या आणि अंजलीच्याच्या जॉईंट नावाने घर खरेदी केलं होतं. मनाला एक काटाही टोचला होता. भैया माझं नावदेखील घालू शकला असता, तसं झालं असतं, तर आपण एकटं पडल्याची मला कमी जाणीव झाली असती. तसंही माझं जे काही आहे, ते मझ्यानंतर भैया आणि दीपकडेच तर जाणार आहे. मग भैया माझं नाव घालायला का घाबरला? कदाचित भैयााने या गोष्टीचा विचारच केला नसेल. 

घर अजूनही पहिल्याप्रमाणे माझ्याच इच्छेनुसार आणि आदेशानुसार चालतं. कोणत्या शेडचा बल्ब कुठे लावायचा, बागेतील वाफे कुठे तयार करायचे, `ड्राइव वे’ लाल मुरुमाचा बनेल, काr काळ्या कॉक्रीटचा, सगळं मीच ठरवत हेते आणि आताही मीच ठरवटे….. तरीही, वाटतय, माझी मूठ रिकामी आहे. वाटतय, जसं काही घराचं ओझं मी खांद्यावरून वाहतेय. कधी कधी कधी असंही वाटतं, की माझा सल्ला विचारण्याचे, माझ्या इच्छेचा विचार करण्याचे उपकार माझ्यावर केले जाताहेत. कधी कधी मनाला विलक्षण वेदना होतात. वाटतं, पापा अशी कशी व्यवस्था माझ्यासाठी करून गेले. माझ्या स्वत:च्याच घरात मला त्यांनी आश्रयार्थी बनवलं. त्या आश्रयासाठी किती उपकारांच्या खाली दबली गेलीय. इच्छा असली, तरी त्यातून मुक्त नाही होऊ शकत मी. या उपकारांचं ओझं वागवता वागवता थकत चाललेय. वाटतं, यातून मुक्त व्हावं. वाटतं अंजलीने म्हणावं, `दीदी हे घर आमचं आहे. हे आमच्या पद्धतीने चालू द्यावं. पण असं कुणीच म्हणत नाही. अगदी सूचकतेनेही नाही. सगळे आपल्या भलेपणाची खाती भरताहेत. भलेपणा नं-एक भैया, भलेपणा नं-दोन अंजली, भलेपणा, नं-तीन दीप, सगळे… आता भलाईचे कॉलम आणखी भरतील. आता दीपची बायको येईल. मग त्याची मुले माझं रजिस्टर एकदम रिकाम. केवळ उपकारांनी भरलेलं. उपकार नं.एक, नं.दोन, नं.तीन, नं.चार मग… मग… सगळं सगळ्यांसाठी करते, तरीही उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली आहे.

   बेघर – क्रमश: भाग २

मूळ कथा – बेघर – मूळ – मूळ लेखिका – सुश्री सुमति सक्सेना लाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेघर भाग – 2 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेघर भाग – 2 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×