Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 2 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 2 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(मी नकळत गप्प झालो. मग राजारामच बोलायला लागला…) इथून पुढे —–

‘‘ मनोहर, आत्ता मी जिची लग्नपत्रिका द्यायला आलोय् ना, ती माझी तीन नंबरची मुलगी… सुधा… म्हणजे माझी शेवटची जबाबदारी…” 

‘‘ अरे पण तुला तर चार मुली आहेत ना?” 

‘‘ हो. पण चौथ्या मुलीचं लग्न दोन वर्षांपूर्वीच झालं. मी आमंत्रण पाठवलं होतं की तुला. अर्थात् तुला ते मिळालं की नाही कोण जाणे. असो.  काय आहे… सुधाचा डावा हात लहान आणि कमजोर आहे. या अपंगत्वामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. त्यामुळे धाकटीचं लग्न आधी करून टाकलं. मुलाने तर पाच वर्षांपूर्वीच प्रेम विवाह केलाय्… स्वास्थ्य केंद्रातल्या एका नर्सशी… आणि तेव्हापासून तो वेगळाच रहातोय्. या सुधासाठी स्थळ शोधणं फारच अवघड झालं होतं रे…”

‘‘ तिचा हा होणारा नवरा काय करतो?”

‘‘ मी टायपिस्ट म्हणून मँगेनीजच्या खाणीत काम करायचो ना, तिथे विष्णू नावाचा एक चपराशी होता. मी रिटायर होण्याच्या सहा महिने आधी एका दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागी अनुकंपा-तत्त्वावर त्याच्या या मुलाला नोकरी मिळाली. त्याचाही डावा पाय पोलिओमुळे निरूपयोगी झालाय्… डाव्या पायाने लंगडाच झालाय् म्हण ना. दहावी पास आहे.” 

‘‘ थोडा भात घे ना अजून…” काय बोलावं हे खरंच सुचत नव्हतं मला. 

श्री भगवान वैद्य प्रखर

‘‘ नको नको… खूप जेवलो आज… किती दिवसांनी इतकं चांगलं जेवण झालंय् ते काय सांगू तुला?… या लग्नात हुंडा म्हणून साठ हजार रूपये द्यायचे ठरलेत. इकडून-तिकडून चाळीस हजारांची सोय झालीये. तरी अजून वीस हजारांची सोय करायला हवी. त्यासाठी ठोठावता येईल असं एकही दार उरलेलं नाहीये आता. लग्न अठ्ठावीस तारखेला आहे… आणि आज अठरा तारीख… असो… तू आता रिटायर झाला आहेस ना… आत्तापर्यंत एकाही लग्नाला आला नाहीस… पण या लग्नाला नक्कीच येऊ शकतोस. रेणुका… माझी बायको… म्हणत होती की, ‘‘ तुमचा हा मित्र म्हणजे मोठी आसामी आहे… स्वत: जाऊन निमंत्रण दिलंत तरच येतील ते. म्हणून आलो आहे…” ‘अन्न दाता सुखी भव’… असं म्हणत राजाराम हात धुवायला गेला. 

तो उठून गेल्यावर मला खरंच जरा हायसं वाटलं. माझ्या मनातल्या मनात विचाराचा जणू एक दिवा लागला, ज्याच्या प्रकाशात, राजारामने स्वत: मला निमंत्रण पत्रिका द्यायला येण्यामागचं ‘रहस्य’ मला उलगडल्यासारखं मला वाटलं… आणि माझ्या मनातल्या आमच्या मित्रत्वाच्या सरोवरात आजपर्यंत ज्या निर्मळ मैत्रीचे तरंग सतत उठत होते, त्या जागी आता जणू वाळूच्या लाटा उमटू लागल्या आहेत असं मला वाटून गेलं. मी डायनिंग टेबल आवरलं. राजाराम हात पुसत परत माझ्या जवळ येऊन उभा राहिला… 

‘‘ साडेपाचच्या बसचं रिझर्वेशन आहे बरं का रे माझं… पाच वाजता तरी निघावं लागेल मला…” राजाराम मोकळेपणाने म्हणाला… मनावरचं कुठलं तरी ओझं उतरल्यावर जाणवतो तो मोकळेपणा मला त्याच्या बोलण्यात जाणवला. 

‘‘अरे आजच्या दिवस थांब की. उद्या सकाळी जा. साडे-सहा सात वाजेपर्यंत रत्ना येईलच ऑफिसमधून… मग मस्त गप्पा मारू तिघं जण. अजून पुरेशा गप्पा तरी कुठे मारल्यात आपण…” असं म्हणतांना मला मनापासून सारखं जाणवत होतं हे की ते सगळं मी अगदी वरवरचं… औपचारिकपणे बोलत होतो… माझ्या मनातले मैत्रीचे धागे कमकुवत झाल्याचं माझं मलाच जाणवत होतं. 

‘‘ नको रे… आणि रत्नावहिनींशी सकाळीच चांगल्या दोन तास गप्पा मारल्या आहेत मी. त्यांनी हे ही मला सांगितलंय् की त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्नही नेमकं २८ तारखेलाच आहे. त्यामुळे सुधाच्या लग्नाला तुम्ही दोघं येऊ शकणार नाही, हे समजलंय् मला. आणि अरे मलाही तर खूप गप्पा मारायच्या आहेत की तुझ्याशी… आता हे लग्न एकदा पार पडलं की खास तेवढ्यासाठीच येईन तुझ्याकडे आणि चांगला आठवडाभर राहीन बघ… त्यावेळी मग मला जे जे माहिती नाहीये ते तू मला सांग… आणि तुला जे माहिती नाही, ते सगळं मी तुला सांगेन… काय?”

‘‘ पण आता थोडावेळ तरी आराम कर बाबा. मी तुला स्टँडवर पोहोचवायला येईन.”… आणि राजाराम जरासा म्हणून आडवा झाला आणि घोरायलाही लागला. मीही आडवा झालो. 

पण काही केल्या मला झोप लागेना… माझं मन तर माझ्याही  नकळत थेट रामटेकात पोहोचलं होतं… राजाराम हा तिथला माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. म्हणजे तसा तीन वर्षं पुढे होता तो माझ्या… मॅट्रिक झाल्यावर त्याने टायपिंगच्या परिक्षा दिल्या. आणि त्यानंतर रामटेकपासून दहा कि.मी. लांब असलेल्या मँगेनीजच्या खाणीत नोकरीला लागला… आधी रोजंदारीवर टाइम-कीपर म्हणून लागला होता, आणि सहा महिन्यांनी तिथेच टायपिस्ट म्हणून काम करायला लागला. मी मॅट्रिक झाल्यावर जेव्हा नोकरी शोधायला लागलो, तेव्हा राजाराम हा त्याबाबतीतला एकमेव मार्गदर्शक होता माझा … तोच माझ्या सगळ्या सर्टिफिकेटसच्या टाइप करून कॉपीज् काढायचा… खाणीतल्याच सरकारी लेबर ऑफिसरकडून वेळोवेळी त्या प्रमाणित करून घेऊन मला द्यायचा… त्या सगळ्या कामाची जबाबदारी त्याचीच आहे, असं मानणारा राजाराम… ‘With due respect and humble submission, I beg to state’’… अशासारखी सुरूवात करत मोठे मोठे अर्ज माझ्यासाठी स्वत: लिहूनही काढणारा…. पाठवायची घाई असेल तर स्वत:चे पैसे खर्च करून, पोस्टाची तिकिटं आणून लावून, अर्जांची ती पाकिटं कितीतरी ठिकाणी स्वत: पाठवणारा राजाराम… मला पहिली नोकरी मिळाल्याचं कळताच आनंदाने वेडा झालेला… स्वत:च्या खर्चाने पेढे वाटणारा राजाराम…. आई-वडील… बहिण…भाऊ… यांच्या प्रेमाखातर, गावाच्या जवळच असणा-या त्या खाणीत, तसली ती साधारण नोकरी करतच आयुष्य घालवलेला राजाराम… साहजिकच… कुठल्याही प्रगती विना, जसा होता तसाच राहिला. मी मात्र नोक-या बदलत राहिलो… त्या अनुषंगाने गावं बदलत राहिलो… राज्यही बदलत राहिलो. पण माझा हा बालमित्र राजाराम… त्याला मात्र मी कधीच विसरू शकलो नाही. त्यामुळेच त्याच्याबरोबर लहानपणी काढलेले, आणि माझ्या मॅट्रिकच्या सर्टिफिकेटसोबत कपाटात अगदी जपून ठेवलेले आमच्या दोघांचे फोटो, म्हणजे माझ्या मुलांसाठी मोठाच कुतूहलाचा विषय असायचा . त्याच्याबद्दल मी सतत इतका बोलायचो ना… त्या ‘टेपस्’… मी रत्नाला कितीवेळा ऐकवल्या असतील कोण जाणे ! आता तर जेव्हा जेव्हा राजारामचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा… ‘अख्ख्या गावात हा एकच मित्र होता का तुम्हाला… राजाराम नावाचा?’ असा टोमणा मारल्याशिवाय रहात नाही ती आणि मला कळत नाही आता कसा सांगू तिला की ‘अगं… आयुष्याच्या सुरूवातीपासूनच्या ते आत्तापर्यंतच्या या प्रवासात, वादळवा-याच्या तडाख्याने मातीच्या किती छोट्या-मोठ्या टेकड्या-डोंगर आपलं अस्तित्वच गमावून बसतात ते… त्यातला एखादाच डोंगर असा असतो की जो स्वत:च्या उंचीमुळे, या वादळांमध्येही आपली ओळख टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो…’ 

– क्रमशः भाग दुसरा. 

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 2 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 2 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×