Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प, भाग –५४ – उत्तरार्ध – मत्सराचा अग्नी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

  विविधा 

विचार–पुष्प, भाग –५४ – उत्तरार्ध – मत्सराचा अग्नी डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प’.

हुश्श! स्वामी विवेकानंद यांना स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो शी केलेला व्याख्यानांचा करार आता संपला होता. तरीही त्यांची व्याख्याने सतत होत होती आणि अनेकजण त्यांच्या विचारांकडे आकृष्ट होत होते. ही संख्या वाढतच होती. त्यामुळे यातून आपले खरे अंतरंगशिष्य त्यांना शोधायचे होते. तिथल्या सामाजिक कामाची पाहणी केल्यावर त्यांना आपल्या कामासाठी संघटना किंवा संस्था उभी करावी हे मनोमन पटले होतेच. असे त्यांनी एकदा मिसेस लायन यांना बोलून दाखवले होते. म्हणजेच त्यांच्या मनात अशी संघटना कोणाची करायची? त्याचे उद्दिष्ट्य काय असेल? कार्यपद्धती कशी असेल याचे विचारमंथन सुरू होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, शब्दात आणि मनात देशभक्तीच होती.त्यांचे ध्येय फार मोठे होते. त्यांना भारताचे पुनरुत्थान घडवायचे होते. हे घडवून आणण्यासाठी आत्म्याला जाग आणणे महत्वाचे होते,ती जाग आणण्यासाठी चे अध्यात्म ज्ञान आवश्यक आणि त्यांच्या दृष्टीने हे अध्यात्म ज्ञान फक्त भारतच सार्‍या जगाला देऊ शकत होता.म्हणून ही जाग सर्वांमध्ये निर्माण करणे हेच स्वामीजींचे ध्येय होते.

तिथे अमेरिकेत त्यांच्या व्याख्यानांशिवाय असे काही प्रसंगही घडत होते घटना घडत होत्या.

एकदा घडलेली घटना आहे. अमेरिकेत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्या तुलनेत स्वामीजी कृष्णवर्णीय वाटत असत. एका गावात ते स्थानकावर उतरले आणि त्यावेळी काही समिति सदस्य त्यांना घ्यायला आले होते. हे तिथल्या एका निग्रोने पाहिले. त्याच्या दृष्टीने हा माणूस आपल्यापैकी एक कृष्णवर्णीयच होता.मग आपल्या पैकी एका बांधवाचा गौरवर्णीय लोक एव्हढा आदर करताहेत हे पाहून तो मोहरून गेला. तो खर तर एक हमाल होता. तो स्वामीजींजवळ येऊन म्हणाला, “मला तुमच्याशी हस्तांदोलन करण्याची ईच्छा आहे. मी भारतीय आहे असे काहीही न सांगता स्वामीजींनी त्याचा हात प्रेमभराने हातात घेतला आणि त्याला म्हणाले, “ धन्यवाद माझे बंधो, धन्यवाद! तो निग्रो खूप भारावून गेला होता.  स्वत:चे देशबांधव प्रेम आणि अखिल मानवजातीचे वाटणारे प्रेम एकाच ठिकाणी ? तर या उलट काही ठिकाणी स्वामीजींना निग्रो समजून केशकर्तनालयात बाहेर काढून अपमान केल्याचाही प्रसंग घडला.

अमेरिकेत आता स्वामीजींना न्यूयॉर्क मध्ये जाण्याचे आमंत्रण मिळाले होते. तत्वज्ञानाच्या अभ्यासात गोडी असणार्‍या काही जणांचा हा गट होता, त्यांनी बोलवले होते.त्यात डॉ.एगबर्ट ग्युएर्न्सि,मिसेस स्मिथ,मिस हेलन गौल्ड हे लोक  होते, ग्युएर्न्सि यांच्या कडे स्वामीजी राहायला होते. हेल आणि बॅगले यांच्या प्रमाणेच ग्युएर्न्सि पतिपत्नी यांचे स्वामीजींशी घरगुती संबंध तयार झाले.ग्युएर्न्सि व्यवसायाने डॉक्टर होते. लेखक, नियतकालिकाचे संपादक होते. ब्रुकलीन डेली टाईम्स आणि न्यू यॉर्क मेडिकल न्यूज टाईम्स याचे संस्थापक पण होते. वय एक्काहत्तर ,विवेकानंदां च्याच वयाचा त्यांचा तरुण मुलगा नुकताच स्वर्गवासी झालेला. त्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हतेच,मिस गौल्ड सुद्धा अफाट श्रीमंत होत्या त्यांच्याकडेही स्वामीजी राहण्यास गेले. अशा या न्यूयॉर्कच्या मुक्कामात त्यांचा अनेक मोठमोठ्या लोकांशी सबंध येत होता. बोलवले की जात व्याख्याने देत, भेटत, चर्चा करत. शिवाय तिथल्या महत्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. सहा-सात दिवस भुररर्कन  निघून गेले, आता ते बोस्टनला आले होते. तिथे अठवडाभरात महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समोर विचार व्यक्त केले, त्यावेळी मार्था ब्राऊन फिंके महाविद्यालयात शिकत होती. तिथे पहिल्यांदा विवेकानंद यांना तिने पहिले. विचार समजण्याचे वय नव्हते पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव आपल्यावर पडला असे तिने आठवणीत लिहून ठेवले आहे. एव्हढे श्रेष्ठ असूनही ते आम्हा विद्यार्थ्यात मिळून मिसळून वागले हे तिला विशेष वाटले होते. पुन्हा न्यूयॉर्क, परत बोस्टन व जवळपास फिरणे चालू होते.

प्रा राइट यांच्या निमंत्रणावरून स्वामीजी बोस्टनला पुन्हा आले होते. हार्वर्ड आणि बोस्टन इथे त्यांची व्याख्याने झाली होती. इथे बोस्टनला मिसेस ओली बुल यांची पहिली भेट झाली होती. ज्या पुढील कार्यात सहभागी झाल्या आहेत.तसेच इथे त्यांना कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिनसन्स जे सर्वधर्म परिषदेत पण भेटले होते ते भेटले. विमेन्स क्लब मध्ये मिसेस ज्युलिया वॉर्ड होवे यांनी स्वामीजींचे व्याख्यान ठेवले होते. त्याही भेटल्या. असे दौरे चालू होते स्वामीजी फार थकून गेले. नंतर हेल यांच्या कडे ते विश्रांतीसाठी थांबले.

इझाबेला मॅककिंडले हिने स्वामीजींना भारतातून आलेला सर्व पत्रव्यवहार पाठवला. यात होती भारतात झालेली वृत्तपत्रीय प्रसिद्धीची कात्रणे .काहींमध्ये अमेरिकेतला गौरव होता. ते ठीक होते , पण भारतात आपल्याबद्दल जो विरोधी प्रचार चालला होता त्याचीही कात्रणे त्यात होती.ती वाचून स्वामी विवेकानंद यांना फार फार वाईट वाटले. त्यांनी इझाबेलाला कळवले की, “माझ्याविषयी माझ्याच देशातील लोक काय म्हणतील याची मी फार फिकीर करीत नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की, माझी आई वृद्ध आहे, सार्‍या आयुष्यभर तिने कष्ट उपसले आहेत.असे सारे असूनही जिच्या सार्‍या अशा ज्याच्यावर केन्द्रित झाल्या होत्या असा आपला मुलगा ईश्वराच्या आणि मानवाच्या सेवेसाठी देऊन टाकण्याचा भार तिने सहन केला. पण मजूमदार कलकत्त्यात सर्वत्र सांगत आहेत, त्याप्रमाणे दूर परदेशात कोठेतरी गेलेला हा आपला मुलगा तेथे पशुसारखे जीवन घालवत आहे ,अनीतिमान झाला आहे, हे जर का तिच्या कानावर गेलं,तर त्या धक्क्याने ती प्राण सोडेल, पण परमेश्वर दयाघन आहे. त्याच्या मुलांना कोणीही अपाय करू शकत नाही”. हे प्रतापचंद्र मजूमदार यांचे कलकत्त्यातले प्रताप वाचून स्वामीजी, आईच्या आठवणीने बेचैन झाले. खरे तर ते स्वत:  शांतपणे या सर्वांना अजूनही तोंड देत होते.

प्रतापचंद्र मजुमदार कलकत्त्यात आपल्याबद्दल एव्हढे भयानक सांगत आहेत . या वृत्तपत्राचे संपादक मजुमदारांचा चुलत भाऊ आहे.ज्याने याआधी आपले एव्हढे कौतुक केले ते आता?

याचा पहिला धक्का स्वामीजींना परिषदेच्या वेळी बसला होताच . ज्या प्रतापचंद्र मजुमदारांनी ब्राहमो समाजात उपासना संगीत गाणारा नरेंद्र पाहिला होता ,एव्हढ्या लांबच्या देशात त्यांना नरेंद्र पुन्हा भेटल्यानंतर आपल्याला जणू घरातले वडीलधारी भेटल्याचा आनंद नरेंदला झाला होता पण घडलं होतं उलटच . पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते नरेंद्रशी अगत्याने बोलले होते.पण जेंव्हा सर्व माणसे प्रचंड संख्येने नरेंद्र भोवती गोळा होऊ लागली तसतसे मजुमदार यांना मत्सर वाटू लागला ,परिषदेतल्या मिशनर्‍यांजवळ त्यांनी स्वामीजींची निंदा करणं सुरू केलं. नरेंद्र हा तसा कोणीच नाही तो एक लुच्चा आणि ठक आहे येथे येऊन संन्यासी असल्याचे ढोंग करीत आहे. असे सांगून त्यांची माने कलुषित केली.त्यात ते यशस्वी झाले. या सगळ्यावर मात करून स्वामीजी पुढे निघून गेले होते.

विवेकानंद यांचे विचार, त्यांचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व यामुळे तिथले सगळेजण भारले गेले होते तसे , मत्सराची दुसरी वाईट बाजुही त्याला होती. विरुद्ध प्रचार. आता मात्र विवेकानंद यांनी या वृत्तपत्रांकडे लक्षच द्यायचे नाही असे ठरवले होते.काहीही छापून आल तर ते मनावर घेत नसत. त्यातून आता भारतात सुद्धा हा अपप्रचार चालू आहे आणि हे सर्व प्रतापचंद्र करीत आहेत हे कळल्यापासून तर त्यांना खरे विश्वासच बसत नव्हता. प्रतापचंद्र या पातळीला जातील हे स्वप्नातही वाटले नाही. खेटरीचे राजेसाहेब आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून आपण निश्चिंत पाने इथे आलो. पण आता? आपण दूर्वर्तनी आहोत शिलभ्रष्ट आहोत असे प्रतापचंद्र सर्वत्र सांगत आहेत. हे ऐकून आपल्या आईला काय वाटेल? ही वेदना त्यांना सतावत होती.

मत्सर भावनेतून चक्क चारित्र्य हनन सुरू होते. सुरूवातीला फक्त विरोध मग विरोधाचे तीव्र स्वरूप, मग प्रचार आणि किर्ति जशीजशी वाढली तशी विरोधासाठी पद्धतशीर मोहिमच सुरू झाली होती.मग सुरू झाला छुपा खोटा प्रचार. विवेकानंद यांचे चारित्र्य शुद्ध नाही. ते तरुण सुंदर मुलींना फूस लावून आपल्या जाळ्यात ओढतात वगैरे सांगू लागले. यात मिशनरी, ब्राह्मसमाजी आणि थिओसोफिस्ट आघाडीवर होते. हे अमेरिकेत सुरू होते पण प्रतापचंद्र भारतात काही दिवसांनी परत आल्यावर भारतात सुद्धा ही मोहीम त्यांनी सुरू ठेवली होती. ब्राह्म समजाच्या मुखपत्रात विवेकानंद यांच्या विरोधात लेख येत असत. इतर नियतकालिकात सुद्धा असे लेख येत होते आणि हे सर्व लेख अमेरिकेत पाठवले जात, तिथेही ते प्रसिद्ध करत.अशा प्रकारे मत्सराचा अग्नि पेटला होता. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प, भाग –५४ – उत्तरार्ध – मत्सराचा अग्नी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प, भाग –५४ – उत्तरार्ध – मत्सराचा अग्नी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×