Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मन मोहाचे घर — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

 जीवनरंग 

☆ मन मोहाचे घर — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(माझीच दोन मुलं पण किती वेगळी निघावी?दैव तुझं, दुसरं काय !  बघायचं आता काय होईल ते. आपल्या हातात तरी दुसरं काय आहे.”) इथून पुढे —

त्यादिवशी सहज म्हणून शशांक प्राजक्ताच्या  क्लिनिक मध्ये गेला. या सगळ्या भानगडीत तिच्या क्लिनिकचं काय झालं असेल हे तो विसरूनच गेला होता.

सहज कुतूहलाने आत गेला तर डॉ राही तिथे पूर्वीसारखीच काम करताना दिसली .शशांकला बघून ती गोंधळूनच गेली. “ ये ना शशांक,” तिने स्वतःला सावरून त्याचे स्वागत केले. दवाखान्यात पूर्वीसारखीच गर्दी होती आणि राही अगदी समर्थपणे सगळं संभाळत होती.  ”.दोन मिनिटं हं शशांक.एवढं संपलं की मग मी फ्री होईन “ राही म्हणाली. हातातले काम संपवून राही म्हणाली,”आज इकडे कुठे येणं केलंस?” 

“ राही,तुला वेळ असला तर आपण कुठेतरी कॉफी प्यायला जाऊया का? दवाखान्यात नको बोलायला.”

“हो चालेल की “ म्हणून राही तयार झाली.

एका चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यावर शशांक म्हणाला, “राही, हे सगळं इतकं अनपेक्षित घडलंय की मी अजूनही त्यातून वर आलो नाही. मला एकच सांग,हे तुला माहीत होतं का?” राहीने हातांची अस्वस्थ हालचाल केली. “काय सांगू मी शशांक? प्राजक्ता काही दिवस खूप अस्वस्थ होती,.पण तिने मलाही हे काहीच सांगितलं नाही.  पण अगदी जायच्या आधी म्हणाली ‘ राही,हा दवाखाना आता तूच संभाळ.मी इथे परत येणार नाही.’ खूप रडली ती आणि मग मला सगळं सांगितलं. म्हणाली, ‘ शशांक फार सज्जन आणि चांगलाच आहे. पण मला सलील जास्त कॉम्पीटंट वाटतो. कसं ग सांगू राही,पण माझं मन सलीलकडे जास्त ओढ घेतंय. हे चूक आहे हे समजतंय मला पण मी मनाला फसवून शशांकशी संसार नाही करू शकणार.’ .खूप रडली प्राजक्ता आणि म्हणाली ‘ मी सगळी माणसं दुखावली. सासर माहेरही तोडलं.  पण माझा इलाज नाही.’ प्राजक्ता मग गेलीच घर सोडून आणि ती usa ला पोचल्याचा मेसेज आला मला. मलाही फार वाईट वाटलं शशांक. माझी इतकी जवळची मैत्रीण मला हे सगळं जायच्या आधी एक दिवस सांगते..“

शशांक स्तब्ध बसून हे ऐकत होता. ” राही, सोडून दे. नको वाईट वाटून घेऊ. हे विधिलिखित होतं असं समजूया आपण.” शशांक मग राहीला पोचवून घरी निघून गेला.

सलीलचे शशांकला मेसेज येत होते. ‘आम्ही छान आहोत, प्राजक्ता तिकडच्या परीक्षा देतेय, त्याशिवाय तिला इकडे जॉब मिळणार नाही’ असं  लिहायचा तो.  शशांकने कधी त्याला उत्तर नाही दिलं. हे म्हणजे जखमेवर आणखी मीठच नव्हतं का सलीलचं? शशांक आणखी आणखी शांत होत गेला आणि त्याने या गोष्टीकडे दुर्लक्षच करायचं ठरवलं.  आयुष्य पुढे चाललं होतं आणि शशांकला मुली बघण्यात आता काहीही रस उरला नाही. आई कळवळून म्हणायची, “ अरे त्या नालायक भावासाठी तू का आयुष्य बरबाद करतोस शशांक?तू पुन्हा लग्न कर बाळा. झालं ते होऊन गेलं. ते दोघे तिकडे मजेत आहेत आणि तू का  संन्याशाचं आयुष्य जगतोस ? कर छान मुलगी बघून लग्न आणि तूही हो सुखी ! “

त्या दिवशी ऑफिसमधून येताना त्याला राही दिसली. एका नव्या कोऱ्या कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसत होती ती. कुतूहलाने शशांक तिथेच थांबला आणि लांबून बघायला लागला पुढे काय  होते ते. राही सीटवर बसली आणि सफाईदारपणे तिने कार सुरू केली आणि ती भुर्रर्रकन गेली सुद्धा. शशांकला अतिशय कौतुक वाटले राहीचे. ती पायाने थोडी अधू आहे आणि तिचा डावा पाय अशक्त आहे हे माहीत होते त्याला. मनोमन तिच्या जिद्दीचं कौतुक करत शशांक घरी आला. मुद्दाम, पण राहीला सहजच वाटेल असा तो तिच्या  क्लिनिक वर गेला. ” वॉव राही,तुझी कार?कित्ती मस्त  आहे ग! मला आण ना राईड मारून.” कौतुकाने शशांक म्हणाला. “ओह शुअर. थांब माझे  पेशंट संपेपर्यंत.” राहीने मग काम संपल्यावर  क्लिनिक बंद केलं आणि शशांकला म्हणाली “चला, बसा.” 

ती ड्रायव्हिंग सीटवर बसली.  शशांकने बघितलं की ही कार फुल्ली ऑटोमॅटिक आहे. तिला डाव्या पायाने  ऑपरेट करण्याची गरजच नाहीये. मार्केटमध्ये अगदी नुकतीच आलेली ब्रँड न्यू नवीन टेक्नॉलॉजीची ही उत्कृष्ट कार घेतली होती राहीने.  जणू काही ही आपल्या टू व्हीलर ऑटोमॅटिक ऍक्टिव्हा सारखीच झाली की नाही? शशांकने तिला गाडी एका रेस्टोरॉपाशी थांबवायला सांगितलं. राही हसत खाली उतरली.

” ओह,मी ट्रीट देऊ का तुला?डन,” असं  म्हणत ती खाली उतरली. शशांक आणि राही हॉटेलात शिरले. एक छान जरा कोपऱ्यातले टेबल त्यांनी निवडले. ” राही,आता सांग. तुला अवघड वाटत नसेल तरच सांग हं. तुझ्या पायाला काय झालं होतं ग?रागावली नाहीस ना? “ “ नाही रे. त्यात काय रागवायचे?अरे मी लहान तीन वर्षाची असताना मला  एक अपघात झाला. माझ्या  डॅडींची नेहमी बदली होत असे.  त्या खेड्यात माझ्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर नीट उपचार झाले नाहीत. आणि मग ती कोवळी हाडे  वेडीवाकडी कशीतरीच जुळली. मग मला डॅडी मुंबईला घेऊन आले, पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. तिथेही निष्णात सर्जनने माझी आणखी दोन ऑपरेशन्स केली म्हणून इतका तरी चांगला झाला पाय.पण मला तो वाकवता येत नाही आणि कमजोर राहिला तो.म्हणून मला थोडे लिम्पिंग आले. पण माझं काहीच अडू दिलं नाही मी त्यामुळे. पण मी त्यावर  सहज प्रेशर देऊ शकत नाही. मग डॅडीनी मला ही  स्पेशल , नवीन टेक्नॉलॉजीची नुकतीच लॉन्च झालेली जरा महागडी कार माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून दिली.मी एकुलती एक लाडाची लेक आहे त्यांची.” राहीने हे अगदी हसत सहज  सांगितलं. शशांकच्या डोळ्यात पाणी आलं. आत्ता हसत सांगतेय ही पण त्या लहान मुलीने हे कसं सोसलं असेल याची कल्पना येऊन त्याचे डोळे पाणावले.  अपार प्रेम वाटलं त्याला तिच्याबद्दल. किती सुंदर.. सुशील आणि हुशार डेंटिस्ट होती राही.  आपल्या कमीपणाचं भांडवल न करता किती पॉझिटिव्हली या मुलीनं आपलं करिअर घडवलं. 

त्या दिवशी राहीने त्याला घरी सोडले.आणि सफाईदार वळण घेऊन ती घरी गेली सुद्धा. शशांक तिच्या घरी गेला. तिचे आई बाबा, राही सगळे घरात होते. शशांक म्हणाला,”काका काकू, तुम्हाला सगळं माहीत आहेच. माझा कोणताही दोष नसताना प्राजक्ता मला सोडून निघून गेली. आमचा रीतसर  डिव्होर्स झाला आहे. मी अजून राहीलाही हे विचारलं नाहीये. तुमच्या समोरच विचारतो, ‘ राही, मी तुला पसंत असलो तर आणि तरच माझ्याशी लग्न करशील? मला फार आवडलीस तू. आणि तुझा पाय  असा आहे म्हणून मी तुला विचारतो आहे असं समजू नकोस. या घटनेनंतरच मी तुला जास्त नीट ओळखायला लागलो राही. होतं ते बऱ्यासाठीच. कदाचित प्राजक्तापेक्षा उजवी मुलगी मला मिळावी असं देवाने ठरवलं असेल पण तुला हा असा लग्नाचा डाग लागलेला नवरा चालेल का?  तुला माझं कोणतंही  कम्पलशन नाही. विचार करून सांग सावकाश.’ “

काका काकू थक्क झाले. राही शशांकच्या जवळ येऊन बसली. “ अरे वेड्या,असं काय म्हणतोस? मी तुला काही आज ओळखत नाही. प्राजक्ता अशी वागली म्हणून मलाच जास्त दुःख झालं तुझ्यासाठी. तुला चालणार असेल तर करू आपण लग्न.. “ आणि पुढच्याच महिन्यात राही आणि शशांक विवाहबद्ध झाले. 

शशांकच्या आईबाबांना तर अस्मान ठेंगणे झाले ही गुणी मुलगी बघून. राही  शशांकचा संसार दृष्ट लागण्यासारखा चाललाय. छोट्या  इराने  त्यांच्या सुखात भरच घातली आहे.दोन्हीकडच्या आजीआजोबांना इराला संभाळताना आणि तिचे कौतुक करताना दिवस पुरत नाही. त्यांच्या घरात सलील प्राजक्ताचा विषयही कोणी काढत नाही. मध्यंतरी राहीला प्राजक्ताचे मेल येऊन गेले,पण राहीने तिला उत्तर द्यायचे नाही असेच ठरवले. त्या विषयावर शशांक, राही, आणि सगळ्यांनी कायमचा पडदा टाकला आहे..

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मन मोहाचे घर — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मन मोहाचे घर — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×