Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 230 ☆ मातृदिनानिमित्त : आई गेल्यावर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

Tags:

सुश्री प्रभा सोनवणे

कवितेच्या प्रदेशात # 230

☆ मातृदिनानिमित्त : आई गेल्यावर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आई गेल्यानंतर..

तिचं कपाट आवरताना,

किती सहजपणे टाकून दिल्या..

तिने  अनेक वर्षे जपून ठेवलेल्या तिच्या वस्तू,

जुनी पत्रे..लग्नपत्रिका…कागदपत्रे…जुने फोटो..विणकामाच्या सुया ..लोकर आणि बरेच काही सटर फटर…. जे तिला खुप महत्वाचे वाटत  असावे!

तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या,

त्या लाकडी कपाटाला नेहमीच कुलुप असायचे !

होते त्यात काहीतरी खुप जपून जपून ठेवलेले…

कादंब-या, पाकशास्र, भरतकाम विणकामाची दुर्मिळ पुस्तके….

एक सुलट एक उलट करता करता…संपून गेले आयुष्य!

आत्यांनी विचारले,जुन्या आठवणी  काढत…

“वहिनीं ची भावगीतांची पुस्तके आहेत का?,त्या म्हणून दाखवायच्या त्यातली गाणी…”

हाती लागलेल्या, “गोड गोड भावगीते” या पुस्तकांवर तिच्या लग्नाची तारीख… कुणीतरी लग्नात भेट दिलेला भावगीतांचा संच… मुखपृष्ठावर बासरी वाजवणारा कृष्ण…  शेजारी राधा… राधेच्या हातावर स्वर्गीय पक्षी!

आतल्या पानांवर… वाटवे, पोवळे, नावडीकर, शांता आपटे, माणिक वर्मा, मधुबाला जव्हेरी, ज्योत्स्ना भोळे… यांचे तरूण चेहरे आणि गाणी…

एक भला मोठा कालखंड बंदिस्त करून ठेवलेला त्या लाकडी कपाटात !

कपाटातल्या सा-याच भावमधूर स्मृती….किती विसंगत तिच्या वास्तवाशी!

कपाटात कोंडलेले… डाचत होते बहुधा तिला आतल्या आत  !

आईचे कपाट आवरताना…

बरेच काही समजले तिच्या अंतर्मनातले….!

राधेच्या हातावरचा स्वर्गीय पक्षी,

पंख पसरून तसाच स्थिर….गेली कित्येक वर्षे!

आईचा प्राणपक्षी दूर…दिगंतरा….    !

सत्तावन्न वर्षाच्या सासरच्या वास्तव्यातली…फडफड…तडफड….शांत…!

आई गेल्यानंतर पाहिले,

कित्येक वर्षे गोठविलेले कपाटातले बंदिस्त विश्व !

आता मनात एक रूखरुख….

किती सहजपणे टाकून दिले आम्ही, तिला महत्वाचे वाटणारे बरेच काही!

(आई गेली. ….तेव्हा ची कविता)

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 230 ☆ मातृदिनानिमित्त : आई गेल्यावर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 230 ☆ मातृदिनानिमित्त : आई गेल्यावर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

×