Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

स्वयंप्रकाशित, शाश्वत सावली





सर्वप्रथम, 'हिमालयाची सावली' च्या नव्या टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. त्यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा धोका पत्करून या नाटकाचे घडवून आणलेले पुनरागमन लाख मोलाचे आहे. भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या हिमायला एवढ्या उतुंग समाजकार्याची, पदमश्री वसंत कानेटकरांच्या अभिजात, अलौकिक, प्रयोगशील लेखनाची तसेच डॉ. लागू- शांता जोग-अशोक सराफ या अवीट गोडीच्या ओरिजिनल कास्टची (आम्हाला त्यांचा नाट्याविष्काराची जादू अनुभवण्याचे भाग्य लाभले नसले तरी त्यांच्या गरुडझेपेची कल्पना आहे) जनमानसाला निव्वळ स्मरण करून देणे हीच मुळात कौतुकास्पद कामगिरी आहे. या धाडसी गिर्यारोहणाचा धडा इतर नाट्य निर्मात्यांनी गिरवण्याजोगा आहे.



कानेटकरांनी नाटकाच्या आशयसंपन्न निवेदनात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या संधीकाळातील डोंगराएवढी माणसे, त्यांच्या जीवनप्रेरणा आणि त्यांच्या पुढील आव्हानांचा सखोल अभ्यास करून वास्तव आणि काल्पनिक यांची सांगड घालून हिमालयाची सावली लिहिल्याचे म्हटले आहे तरी गुंडो गोविंद उर्फ नानासाहेब भानू या हिमालयासमान उत्तुंग पात्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने महर्षी कर्वेच दिसतात. म्हणून वि. स. खांडेकर पुस्तकाच्या मलपृष्ठावरील ब्लॅर्ब् मध्ये असे सुचवतात की मूळ चरित्राचा आत्मा कायम ठेवून बाकीचे सारे चरित्रापासून दूर नेणे इष्ट ठरेल, कारण केवळ नावे, नाती, व्यवसाय इत्यादी गोष्टी बदलून फार मोठा बदल घडून येत नाही. पण हे अनुषंगाने झालेले विचार मंथन होय. खांडेकरांनी या नाटकाचा आत्मा अचूक ओळखला आहे. ड्रिंकवॉटर आणि शेरवूड यांच्या अब्रॅहम लिंकनवरल्या नाटकांचा दाखला देत वृद्ध नायक-नायिका यांच्या भोवती गुंफलेल्या कथानकांचा नवीन पायंडा घालणारे तसेच वाईट आणि चांगले यांच्या संघर्षा पेक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष रंगविणारे नाटक म्हणून 'हिमालयाची सावली' चा यथायोग्य गुणगौरव केला आहे.

त्याग, सचोटी, कर्मठपणासारखे गुण ज्यांना उपजत लाभले आहेत असे नानासाहेब आणि सतत व्यवहाराचे महत्व सांगण्याऱ्या पण नेमक्या वेळी तितकाच करारीपणा अंगी बाळगण्याऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीची म्हणजेच बयोची महती सांगणारे तीन अंकी नाटक बसवणे आजच्या काळात तारेवरची कसरत नव्हे तर आत्मघातकी प्रयोग मानला जाईल. सुदैवाने निर्माता आणि दिग्दर्शक यांनी नानासाहेब म्हणून नटवर्य शरद पोंक्षे यांची अचूक निवड केली आहे. वैयक्तिक जीवनातील आघातांवर यशस्वीपणे मात करणाऱ्या पोंक्षेंनी आपल्या वैचारिक प्रगल्भतेच्या जोरावर प्रत्येक हालचालीतून आणि संवादातून नानासाहेब समर्थपणे उभे केले आहेत. सावरकर भक्त असलेले अगदी सहजपणे १९२० च्या काळात जाऊन पोहोचतात, त्याला आपलंस करतात.

कानेटकरांच्या नानासाहेब हे एक अत्यंत दुर्मिळ रसायन आहे: त्यांच्या प्रत्येक हालचालीला कारुण्याची झालर प्राप्त झाली आहे, पण तिथे सहानुभूतीची अपेक्षा ठेवणारी याचना नाही, त्यांच्या मतमांडणीत ठायी ठायी युगपुरुषाचा बाणा दिसतो पण अहंकाराचा लवलेश नाही, त्यांच्या हट्टीपणाला अतिरेकाचा श्राप असेल पण त्याची तर्कशुध्द्ता निर्विवाद आहे. पोंक्षे हे सर्व कंगोरे आपल्या बावनकशी अभिनयाने जिवंत करतात. त्यांचा स्टेज वरील वावर तपस्वी नायकाला शोभून दिसेल इतका नाट्यमय आहे, पण नाटकी नाही. बयोची वाजंत्री सुरु होताच किंवा आपल्या विरुद्ध घर पेटून उठले आहे हे कळताच त्यांचे "अंतरीचा ज्ञानदिवा माळवी नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको रे" गुणगुणत शून्य नजरेने भिंतीकडे बघणे दीर्घ काळ स्मरणात राहील. कौन्सिल च्या मेम्बरांनी संस्थापकालाच, म्हणजे त्यांनाच, बाजूला सारल्यानंतर एकीकडे काळाची गरज म्हणत आश्रम सोडण्याची तयारी तर दुसरीकडे टप्प्या टप्याने खचत चाललेला धीर, आणि या विषमंथनात शेवटी ओढवलेला अर्धांगवायूचा झटका - पोंक्षे नानासाहेबांचा निर्धार, द्रष्टेपणा, अगतिकता आणि आपणच उभ्या केलेल्या संस्थतेत, ज्याला ते खरे घर मानीत आले, पोरके झाल्याची जाणीव एकाचवेळी उलगडत रंगमंचाला धन्य करून सोडतात.

हिमालयाची 'सावली' हीच नाटकाचा खरा आधारस्तंभ. फटकळ, शिवराळ भाषा, नारळासमान स्वभाववैशिष्ट्ये, आणि समाज आपल्या नवऱ्याला गृहीत धरत आहे असे जाणवताच त्याच्या वतीने रौद्र रूप धारण करणारी बयो श्रुजा प्रभुदेसाई यांनी अतिशय प्रामाणिकपणे उभी केली आहे. अनेक प्रसांगातुन सहज सुंदर अभिनयाचा कळस देखील गाठला आहे, पण त्या काय किंवा तातो ची भूमिका साकारणारे गुणी कलावंत विग्नेश जोशी काय - अनेक अशा प्रसंगातून लाऊड होण्याचा मोह टाळताना दिसत नाही जिथे प्रेक्षकात आपसूक हंशा पिकतो, दाद मिळते. त्याचे खरे श्रेय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याच्या कानेटकरांच्या सामर्थ्याला, प्रसंगोचित संवाद लिहिण्याच्या त्यांच्या हातोटीला जाते - पाठीवर धपाटे मारताना, खाणाखुणा करताना, आदळआपट करताना थोडा संयम बाळगला तरीही संहितेला अपेक्षित इफेक्ट साध्य होऊ शकेल, त्यांचा व्यक्तिरेखांना अंडरप्लेची जशी गरज नाही तसेच प्रत्येक वेळी हाव भाव, इशारे किंवा संवाद अंडरलाईन करण्याचीही गरज नाही.आणि प्रेक्षकांच्या या हलक्या, क्षणिक प्रतिसादाला अनन्यसाधारण महत्व देऊ नये, निदान त्याला यशाची पावती मानू नये. कारण तुमच्या याच रसिकांपैकी अनेक महाभाग एकीकडे तुम्हाला दाद देत असतात तर दुसरीकडे प्रत्येक घासाचा बीभत्स आवाज करीत वडा पाव, वेफर आणि सँडविच रिचवत असतात, आणि त्याहुन अधिक वाईट म्हणजे सर्रास पणे मोबाइल फोन च्या अनेकविध रिंगटोन्स ची सभागृहात स्वतंत्र मैफल गाजवत असतात. त्यांचा पायी लेखकाने आखून दिलेल्या आपल्या पात्रांच्या चाकोरीबाहेर उगीच पसरू नये, सांडू नये.

नाटकाच्या इतर पात्रांनी आपले काम चोख निभावले नाही असे म्हणणे अन्यायकारक ठरेल. त्यांचे प्रयत्न नक्कीच प्रामाणिक वाटतात पण काही प्रवास अजून घडायचा राहून गेलेला दिसतो. आपले संवाद न अडखळता एका दमात म्हणणे या पलीकडे जे जे म्हणून असते ते अभिनयाला बावनकशी करण्याच्या मार्ग दाखवते. स्टेज वर आपला संवाद नसताना स्तब्ध उभे राहताना, एन्ट्री एक्सिट करताना नकळत जो यांत्रिकपणा येतो, आणि अशा वेळी कोणते पात्र चुकून प्रेक्षकांकडे बघत आहे किंवा प्रसंगाला अनुरूप नसलेले हावभाव करतंय ते सर्व चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून कधीच सुटत नाही हे ध्यानात ठेवावे.

व्यावसायिक चौकटीतला अशा धाटणी चा प्रयोग म्हटला कि टोकाच्या प्रतिक्रिया आपसूकच येतात. एकीकडॆ ‘लाईक करा आणि शेयर करा’ तत्वावर आधारित प्रेमाचा फेसबुक छाप वर्षाव होतो (मस्तच, सॉलिड, पॉवरफुल, फुल्ल टू या नसा तडकावणाऱ्या विशेषणांसकट) तर दुसरीकडे गौतम गंभीर चेहऱ्याचे, आणि जाड भिंगाच्या वरचष्मा मिरवणाऱ्या समीक्षक प्रजातीच्या नमुन्यांच्या तिखट नोंदी असतात ज्यांना 'व्यावसायिक' असा नुसता शब्द कानी पडताच पोटात कलमलल्यासारखे होते आणि त्या शापित शब्दाला कसाब शैलीत गोळ्या झाडण्यात ते आपले कसब मोजतात व मानतात. या दोन्ही परस्परविरुद्ध परमाणू हल्ल्यांची झळ या नाटकाला बसू नये असे मनापासून वाटते. दोन्ही आघात वेगवेगळ्या अर्थाने बेजार करून सोडतात आणि पुढची प्रगती थांबवतात, नुसताच प्रवास घडत राहतो. ‘हिमालयाची सावलीचे’ असे होऊ नये, या नाटकाचे अगणित प्रयोग होवोत आणि त्यांत उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा.



This post first appeared on The Lost Accountant, please read the originial post: here

Share the post

स्वयंप्रकाशित, शाश्वत सावली

×

Subscribe to The Lost Accountant

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×