Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

चार माणसं, चार वृत्ती, चार भावना

      सत्यसाईबाबा अनंतात विलीन झाले.ओसामा बिन लादेन समुद्राच्या तळाशी दफन(?) झाला.सुरेश कलमाडी  सदेह तिहारवासी झाले. आणि जगदीश खेबूडकर शब्दांवर स्वार होऊन परमेश्वराच्या सेवेत रुजू झाले.एक अंधश्रध्देचं,पर्यायाने परिस्थितीला शरण गेल्याचं प्रतिक.एक दहशतवादाचं, पर्यायाने माणसातील क्रुरतेचं प्रतिक.एक निर्लज्ज भ्रष्टाचाराचं,पर्यायाने माणसातील विकृत भूकेचं प्रतिक आणि एक कलेचं, पर्यायाने माणसातील आनंदमयी निर्मितीक्षमतेचं  प्रतिक.चार माणसं,चार वृत्ती.
      सत्यसाईबाबा गेले तेंव्हा सचिन तेंडूलकर ढसाढसा रडला. घरातील कोणी जावं असा रडला. एवढा रडला की,पत्नी अंजलीने काहीशा आश्चर्यानेच आपल्या पर्स मधील रूमाल काढून त्याच्या हातात दिला.सत्यसाईंना त्याक्षणी काय वाटले असेल ते समजायला मार्ग नाही. पण तेंडूलकरला आदर्श मानणा-या तमाम नवोदीत खेळाडूंना तेंडूलकरच्या यशाचे रहस्य साईंच्या ऊदीत किंवा त्यांच्या अंगरख्यातून अलगद पडणा-या सुवर्णमालेच्या प्रसादात असल्याचा सक्षात्कार  झाला असणार. आणि त्यांनी लगेचच एखाद्या बुवाचा किंवा बाबाचा शोध घेण्यास सुरुवात केली असणार.
      साई गेले तेंव्हा केवळ सचिनच नाही,तर अनेक नेते घळाघळा अश्रू ढाळताना दिसले. या तथाकथित नेत्यांना साई गेले तेंव्हा हसन अलिला अटक झाल्यानंतर जे वाटले असेल ते वाटले असण्याची शक्यता आहे .एकाने ४० हजार कोटींचा कर चुकवला. दुस-याने ४० हजार कोटींच्या संपत्तीला वारस न नेमताच स्वर्गाचा (!) रस्ता धरला.दोन्ही कडे पैसेच पैसे आणि दोन्हीकडे सेलिब्रेटीच सेलिब्रेटी.हा चमत्कार म्हणायचा की,योगायोग.
      लादेन गेला तेंव्हा सारं पाकीस्तान मनातल्या मनात हळहळलं .तेथील वकीलांनी तर लादेनच्या "रूह"ला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. हेही एक वेळ समजण्यासारखं आहे.घरातील कर्त्या पुरूषाच्या अकाली जाण्यानं संसार उघड्यावर यावा,तसा लादेन जाण्यानं पाकिस्तानचं झालं आहे.त्यामुळे पकिस्तानचा आक्रोश समजण्य़ासारखा आहे.  पण अलिकडे कॉंग्रेसचे मोकाट सुटलेले सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनीही लादेनचे इतमामात दफन न केल्याबद्दल दु:खाश्रू ढाळले.आणि कॉंग्रेसच्या धर्मनिरपेक्षततेचा झेंडा भारतभूमीत रोवला.पाकीस्तानला, विशेष करून त्यांच्या सैन्याला आणि राजकारण्यांना जगण्याचा आधार गेल्यासारखं वाटलं असणारं. लादेनच्या जाण्यानं त्यांचा अमेरिकेची स्वाक्षरी असलेला कोरा धनादेश  कोणीतरी फाडून फेकल्यासारखा वाटलं असणारं. मात्र दिग्विजयसिंगांचं नेमकं काय नुकसान झालं ते समजण्यासाठी लागणारं कोमल काळीज असायला हवं,जे फक्त त्यांच्याकडेच आहे.
     कलमाडी तिहारची हवा खायला गेले तेंव्हा पुण्यनगरीतील त्यांच्या तालमीत तयार झालेल्या  कार्यकर्त्यांच्या मनातही पोरकेपणाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. लॅन्ड माफीया म्हणून नावजलेल्या एखाद्या महापुरूषाच्या वाढदिवसाच्या अभिनंदनाचे बॅनर जेथे तेजाने तळपतात ,तेथे विकासाची आघाडी असलेले कलमाडी खडी फोडण्याच्या दिशेने पाऊल टाकतात तेंव्हा त्यांच्या पादुका सांभाळणा-यांना दु:ख होणं साहजिकच आहे.निष्ठावान कार्यकर्ता यालाच तर म्हणतात.
     खेबूडकरांच जाणं मात्र चटका लावणारं आहे."धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना,"सत्यम शिवम सुंदरा","नका सोडून जाऊ रंगमहाल","एक लाजरा न साजरा मुखडा,चंद्रावानी फुलला गं","देहाची तिजोरी" अशी काळीजघेणी गाणी लिहणारा कवि जातो तेंव्हा ऊर भरून येतो.आणि लिहणारे हात थांबतात.अशा वेळी वाटतं परमेश्वर भले दहा सत्यसाईबाबा,शंभर लादेन आणि हजार कलमाडी निर्माण करो,त्याने या सर्वांमागे किमान एक खेबूडकर निर्माण करायला हवेत.शेवटी सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा आधार असे कलावंत तर असतात.



This post first appeared on माझी अभिव्यक्ती, please read the originial post: here

Share the post

चार माणसं, चार वृत्ती, चार भावना

×

Subscribe to माझी अभिव्यक्ती

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×