Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

तूर्त तरी, भ्रष्टाचाराचा विजय असो!




     अण्णांनी तीन दिवसांऐवजी दोन दिवसातच उपोषण गुंडाळलेले पाहून अनेक स्वंयघोषीत काँग्रेस प्रवक्त्यांनी त्यांची खिल्लि उडवली.युवावस्थेत असताना केलेल्या एखाद-दुसऱ्या आंदोलनाच्या जोरावर स्वत:ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या तथाकथित नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांच्या भाटांना त्यामुळे परमानंद झाल्याचे चित्र काही काळ पहायला मिळाले.महात्मा गांधी उघडे राहत आणि तरिही आंदोलन करित,त्यांनी कधी तब्बेतीचे कारण पुढे केले नाही,असे सांगत काहींनी  अण्णांच्या उपोषण लवकर थांबविण्याची हेटाळणी केली.परंतू ही हेटाळणी करताना ते हे विसरले की,गांधीजींचे उपोषण हे जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगणाऱ्या इंग्रजांविरूध्द असायचे.आणि मला खात्री आहे की,गांधीजींना हल्लीच्या काँग्रेसजनांपुढे किंवा कोणत्याही पक्षाच्या सत्ताधिशांपुढे  उपोषण करावे लागले असते, तर त्यांनी कदाचित ते तासाभरातच सोडले असते.खरे तर अण्णांनी उपोषण सोडताना हे स्पष्ट केले होते की,लोकसभेत जे काही घडत आहे ते पाहून आपण हे उपोषण मागे घेत आहोत.लालूप्रसाद यांच्या सारखा खासदार जेंव्हा लोकपाल सारख्या महत्वाच्या विषयावर गांभिर्याने बोलण्याऐवजी नौटंकी करतो आणि त्या नौटंकीला पंतप्रधान आणि सोनिया गांधी हसून दाद देतात तेंव्हाच अण्णांना लोकपाल विधेयकाचे काय होणार याची कल्पना आली असणार आणि म्हणूनच त्यांनी उपोषण थांबविण्याचा निर्णय घेतला असणार.कारण दान जसं सत्पात्री असावं तसंच उपोषण ही शहाण्यांपुढे करावं असं, जर त्यांना वाटलं असेल तर  त्यामध्ये काही गैर आहे असे वाटत नाही.आणि अण्णांचा तो निर्णय किती योग्य होता ते राज्यसभेत जे काही घडलं त्याने सिध्द केलं.लालूंच्या पक्षाच्या राजनीती नांवाच्या (काय योगायोग आहे पहा!) खासदाराने विधेयकाचे तुकडे तुकडे केले आणि आपल्या गलीच्छ राजनीतीचे दर्शन घडविले.हेतूपुरस्सर निर्माण केलेल्या या गोंधळाचा फायदा घेत सभापतींनी अधिवेशन गुंडाळले.लोकसभेतील लालूंची नौटंकी आणि त्यांच्याच पक्षाच्या खासदाराची राज्यसभेतील मुजोरी या सर्व प्रकरणामागे काँग्रेस असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण लोकपालबाबत काँग्रेस गंभिर आहे असे कधीच दिसले नाही.अशा परिस्थितीत अण्णांनी वेळेवर उपोषण सोडले असेच म्हणावे लागेल.
    वाईट याचेच वाटते की,अण्णांनी लवकर उपोषण सोडल्याचा काही जणांना जो आसूरी आनंद झाला ,तो अतिशय ओंगळवाना होता.कारण,अण्णांनी  वेळेपूर्वी उपोषण सोडणे यामध्ये त्यांना कमीपणा यावा असे काही न्हवते,किंवा त्यांना त्याची लाज वाटावी असे काही नाही.लाज वाटून घ्यायचीच असेल तर त्यांची हेटाळणी करणाऱ्या आणि त्यांची फजिती झाली समजून आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना वाटायला हवी.कारण अण्णांचे आंदोलन स्वत:साठी नाही, तर ते  सर्वसामान्यांसाठी आहे.हे लक्षात घ्यायला हवे.उद्या सशक्त लोकपाल आले आणि त्याची तेवढ्याच प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर ते जनहीताचेच असणार आहे,यात शंका नाही.तेंव्हा अण्णा,आपण उपोषण लवकर सोडले ते बरेच केले!
  उपोषणाला मिळालेला अल्प प्रतिसाद हाही अनेकांना आनंद देऊन गेला.परंतू या अल्प प्रतिसादामागची कारणे शोधली तर त्यामागे काँग्रेसजनांनी मधल्या काळात अण्णाच्य़ा सहकाऱ्यांच्या बदनामीची जी यशस्वी मोहीम राबवली त्याला तसेच न्यायालयाने अण्णांच्या समर्थकांना एमेम आरडीएच्या भाडेप्रकरणी जे खडसावले ते खडसावनेही कारणीभूत ठरले असावे.संसदेमध्ये चर्चा सुरू असताना उपोषणाची गरजच काय?असा न्यायालयाचा प्रश्न होता.आणि तो प्रश्न लोकांना कदाचित पटला असावा.परंतू संसदेमध्ये नंतर जे काही घडले त्याने लोकांचे डोळे नक्किच उघडले असतील आणि त्याचा परिणाम  पुढील आंदोलनावेळी दिसेल,अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.खरे तर लोकपाल मंजूर करून अण्णांना नमविण्याची एक चांगली संधी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना होती,पण ती त्यांनी त्यांच्या उपजत गुणांनी गमावली.कारण भ्रष्टाचार हाच जवळपास सर्वच नेत्यांच्या राजकारणाचा पाया आहे.आणि त्याला तडा जाणे हे या मंडळींना रूचणारे नाही.फक्त त्याचे खापर आपल्या माथी येऊ नये यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालू असतात.त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांनाच जागे होऊन आंदोलन करावे लागणार आहे.आणि ते शक्य नसल्यास किमान अण्णांना भरघोस पाठींबा तरी द्यायला हवा.अगदी टीम अण्णामधील काही दोषांकडे डोळेझाक करून.कारण टीम अण्णा जे काही तथाकथित गैरव्यवहार करेल ते या राजकारण्यांच्या तुलनेत एक लक्षांश असतील.त्यामुळे आता जसा भ्रष्टाचाराचा विजय झाला तसा पुन्हा होऊ नये यासाठी आपण जागरूक असायला हवे.याचा अर्थ टीम अण्णांनी मनमानी करावी असा होत नाही.उलट या मंडळींनी लोकांना त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन आपले वर्तन राखायला हवे  आणि सत्ताधाऱ्यांना आपल्याकडे बोट दाखविण्याची एकही संधी मिळणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.अन्यथा लोकांमध्ये नैराश्य निर्माण होऊन त्यांच्यामध्ये "ठेविले अनंते"अशी नकारात्मक भावना निर्माण होईल.आणि जर अशा नकारात्मक भावनेचा स्फोट अराजकात झाला तर मग या देशाला वाचविणे परमेश्वरालाही शक्य होणार  नाही.


This post first appeared on माझी अभिव्यक्ती, please read the originial post: here

Share the post

तूर्त तरी, भ्रष्टाचाराचा विजय असो!

×

Subscribe to माझी अभिव्यक्ती

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×