Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

लोकशाही की, लबाडशाही ?



    लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य ही लोकशाहीची  व्याख्या आता  बदलायला हवी.त्याऐवजी "लबाडांनी लबाडांसाठी पळविलेले "जन्तेचे" राज्य म्हणजे लोकशाही",अशी ती करायला हवी.किंबहूना या अशा लोकशाहीला लोकशाही न म्हणता ’लबाडशाही’किंवा’लोभशाही’असे म्हणायला हरकत नाही. निवडणूका आल्या की, या लबाडांना देशाच्या विकासाचे प्रश्न सतावू लागतात."आम जनतेला" दोन वेळेचे अन्नही मिळत नाही,याचा साक्षात्कार यांना होतो आणि मग हे लबाड तथाकथित विकासाची कास धरणाऱ्या पक्षांकडे आपला मोर्चा वळवतात.किंवा आपल्या पक्षातच सवता सुभा निर्माण करतात. ही अशी आम जनतेच्या नांवाने टाहो फोडणारी ’विकासरत्ने’ पाहीली की,मन कसे गदगदायला होते.आणि मग आपणही एकदा हा "आम आदमी"पाहायलाच हवा असं वाटू लागतं.खरचं कसा असेल हा आम आदमी?
    पंचवीस एक वर्षापूर्वी म्हणे हा आम आदमी झोपडपट्ट्यांमध्ये राहत असे.निवडणूकीच्या काळात या आम आदमीच्या तोंडावर  शे-पाचशे रुपये फेकले की, तो निमूटपणे आपल्या अन्नदात्याला मत देत असे.पण हळूहळू त्याच्यातही बदल होत गेले.पैसे फेकणाऱ्यांची संख्या वाढल्याने तो निमकहरामी करू लागला.आणि जो जास्त पैसे देई, त्याला आपले बहूमोल मत विकू लागला.साहजिकच आहे, विकासरत्नांनी ’आकडेरूपी’ ज्ञानाची गंगा त्याच्या झोपडीपर्यंत आणली असल्याने त्याला त्याच्या मताचे मोल समजू लागले.त्यामुळे विकासरत्नेही जागे झाली.  पैसे वाटतानाच मतदाराच्या हातावर मीठ ठेऊन आणि खंडोबा किंवा कुलस्वामिनीला साक्षी ठेऊन आणा-भाका देऊ लागले.पण हळूहळू भावनेचे हे ब्लॅक मेलींगही कुचकामी ठरू लागले. आम आदमीची भूक वाढली.महागाईच्या प्रमाणात तीचे वाढणेही स्वाभाविक होते.
    दरम्यान, लबाडांनी फ्लॅटवाल्यांकडे आपला मोर्चा वळविला. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या सोसायट्यात कोठे फरशा टाकून दे,कोठे ज्येष्ठ नागरिकांना बसायला बाकडी टाकून दे असे मार्ग हाताळू लागले.पण थोड्याच दिवसात या लबाडांमध्येही स्पर्धा सुरू झाली.मग त्यापैकी काहींनी तीर्थयात्रांचे आयोजन सुरू केले.कोणी साईबाबाला जवळ केले तर,कोणी थेट बालाजीची वारी काढू लागला.आणि आता तर घरोघरी पुस्तकगंगा अवतरू लागली आहे.ज्यांनी शाळेत कधी पुस्तकाला हात लावला नसेल ती मंडळी आता तथाकथित सुशिक्षित मतदारांना घरपोच पुस्तके देऊ लागली आहेत.थोडक्यात आता पांढरी कॉलरवाल्यांनी आपल्या सोसायट्याही झोपडपट्ट्याहून वेगळ्या नसल्याचे दाखवत हम सब भाई-भाई चा धडा गिरवण्यास सुरूवात केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर हे लबाड लोक जेंव्हा अण्णा हजारे यांच्या सारख्यांना निवडणूकीला उभे राहण्याचे आव्हान देतात,तेंव्हा त्यांची कीव करावी की,त्यांच्यापुढे लोटांगण घालावे ते समजत नाही.गल्लीबोळात टगेगिरी करणारे जेंव्हा संसदेच्या प्रतिष्ठेच्या गप्पा मारतात,तेंव्हा हसावे की रडावे ते समजत नाही.आणि  सर्व सामान्य लोक जेंव्हा अशा प्रचाराला बळी पडून आपल्या मताचा बाजार मांडतात तेंव्हा ’जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असलेला देश’ही बिरूदावली मिरवण्यास आपण पात्र आहोत का,याचा विचार कोणासही का करावा वाटत नाही?,हे मनात येऊन गरगरायला होते.आणि शेवटी एवढेच म्हणावे वाटते की,यथा प्रजा तथा राजा,हेच  अंतिम सत्य होय!


This post first appeared on माझी अभिव्यक्ती, please read the originial post: here

Share the post

लोकशाही की, लबाडशाही ?

×

Subscribe to माझी अभिव्यक्ती

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×