Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

वार्षिक राशिभविष्य २०२३ : तुळ

तुळ राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – तुळ’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे तुळ राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,

या राशीच्या व्यक्ती व्यापारी वृत्तीच्या असल्याने मधुरभाषी आणि हजरजबाबी असतात. त्यामुळे आपले म्हणणे पटवून हातोटी असते. झटकन काम हातावेगळे करतात. जबाबदारी घेण्यास कचरत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधतात.

राशीच्या पंचमस्थानी शनी नेप. सारखे ग्रह स्थानापन्न आहेत. वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळे उठतील. अशावेळी जास्त ताणून न धरता सामंजस्याचे धोरण स्वीकारावे लागेल. कोणत्याही गोष्टीचा लाभ होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आर्थिक बाजू सुधारेल. कोणत्याही परिस्थितीत संयमाने वागाल. अनेक गोष्टी बौद्धीक निकषावर पासून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्वतःबरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. शिवाय स्वतःकडचा अधिकार सहजासहजी सोडणार नाही.

राशीच्या षष्ठ व सप्तमस्थानातून गुरूचे भ्रमण होणार आहे. पावले व स्नायूंची दखणी त्रास देतील. सप्तमस्थानातील गुरूबरोबर राहू व हर्षलचे भ्रमण वैवाहीक जीवनात वादळ निर्माण करू शकतात. धंद्यातील पार्टनरशिपही धोक्यात येऊ शकते. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. पैसे मिळाले तरी खर्चही तसेच वाढणार आहेत. अंतरंगात हळवेपणा असला तरी तुम्ही कमकुवत नाही हे दाखवून देणार आहात. स्वतःबरोबर दुसऱ्याचाही फायदा करण्यामध्ये तुम्ही आनंद मानाल, कोणाला पाठीशी घालणे तुम्हाला जमणार नाही तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेकही तुम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे जवळच्या लोकांचा रोष ओढवून घ्याल.

अशा या आनंदी राशीचे वर्षभविष्य काय आहे ते पाहू या.

जानेवारी २०२३घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल, जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही, आनंदी वातावरण निर्माण होईल. हाती आलेल्या कामाचा फडशा पाडाल. घरामध्ये महिन्याच्या उत्तरार्धात दुरुस्तीची कामे निघाल्यामुळे घरात जरा जास्तच वेळ जाईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. आवश्यक त्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
फेब्रुवारी २०२३कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. तुमच्याशिवाय त्यांचे पान हालणार नाही. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. परंतु यशाचं माप लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक घडी राहील. थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल.
मार्च २०२३तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. जोडीदाराबरोबर मतभेद झाले तरी कोणतीही टोकाची भूमिका न घेतलेलीच बरी. तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोचावी याचा आटोकाट प्रयत्न कराल. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही.
एप्रिल २०२३तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. तरुणांना स्वतःचा जोडीदार स्वतः शोधण्यात जास्त आनंद वाटेल आणि त्यात त्यांना यशही मिळेल. कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. अशा चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. घरात, कुठेही गेलात तरी आपल्या बोलण्याने सर्वांना आपलेसे कराल आणि माणसे जोडाल.
मे २०२३या महिन्यात आपल्या व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करावी असे सारखे वाटत राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. त्यासाठी प्रवास करणे फायद्याचे ठरेल. रसिकतेबरोबरच सुसंस्कृत आणि दिलदार व्यक्तिमत्वामुळे या महिन्यात तुम्हाला बराच मानमरातब मिळेल. बेकार तरुणांना नोकऱ्या लागण्याचा काळ आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मधुमेह असणारांनी पथ्यपाणी सांभाळावे. बाकी प्रकृतीमान चांगले
जून २०२३विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशासंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. पासपोर्ट, व्हिसा संबंधातील कामे उरकून घ्या. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. फोटोग्राफी, सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. दैव देत नी कर्म नेतं हा अनुभव या महिन्यात घेणार आहात. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. नोकरीत कष्ट पडले तरी तेथील आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा फडशा पाडाल.
जुलै २०२३कामानिमित्ताने इतरांशी संपर्क ठेवण्यासाठी हा महिना उत्तम आहे. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वतःच करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. इंपोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय असणारांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही.
ऑगस्ट २०२३घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र बसून तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल होतील, विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. वडिलोपार्जित ‘इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. रक्तदाबाचे विकार असणारांनी सावधानता बाळगावी. या महिन्यात तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. संततीशी तुमचे सूत चांगले जमेल त्यामुळे तुम्हाला त्यांनी जसे वागावे तसे तुम्हाला वाटते. त्याबाबतीत स्पष्ट विचार मांडून घ्यावेत.
सप्टेंबर २०२३आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. रात्रीचे जागरण टाळा. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणारांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. आनंदात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ नाही. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. जवळचे नातेवाईक भेटतील. विद्यार्थ्यांना कलेत प्राविण्य मिळेल. दुसऱ्यांना मदतीचा हात द्याल.
ऑक्टोबर २०२३अतिकर्तव्यनिष्ठतेमुळे एखादेवेळी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थोडी संघर्षात्मक, विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. कोर्टकचेरीमध्ये समाधानकारक यश मिळणार नाही. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरी व्यवसायात योग्य संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल. परंतु शेवटी शेवटी ग्रहांची प्रतिकुलता संपुष्टात आल्यामुळे थोडा सुटकेचा निःश्वास टाकाल.
नोव्हेंबर २०२३तसा एकंदरीत महिना चांगला जाणार आहे. येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तर्कशुद्ध विचारांचा मागोवा घ्यावा लागेल. घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. त्यामध्ये तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन नोकरीच्या शोधात हातचे सोडून पळत्याच्या मागे धावत नाही ना याचा अवश्य विचार करा. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. पित्तप्रकृती असणारांनी विशेष पथ्य पाळावे.
डिसेंबर २०२३परिस्थितीप्रमाणे नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. नोकरी व्यवसायात आपल्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. गोड बोलण्यावर भर ठेवाल. तुम्ही स्वतः ज्या गोष्टींचे चिंतन कराल त्यातून भरीव काहीतरी निर्माण करून फायदे मिळवाल. सूचक स्वप्ने पडतील. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता. एकटे रहाण्यापेक्षा जास्तीत जास्त माणसांच्या गोतावळ्यात राहिलात तर चिंता कमी होतील.
टीम स्पंदन


This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

वार्षिक राशिभविष्य २०२३ : तुळ

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×