Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

नितळ

सात-आठ रस्ते एकत्र येणारा भलामोठा सिग्नल …
तब्बल साडेचार मिनिटांचा ..
सिग्नलच्या खाली एक महिला गजरे तयार करत बसली होती ..
सोबत लहान मुलगी मदत करत होती ..
शेजारी तिचा अगदी लहान भाऊ , खेळत बसलेला …
कुठेतरी मिळालेल्या तुटक्या फुटक्या खेळण्यांबरोबर ….
त्यांच्या बाजूचा सिग्नल लाल झाला , गाड्या थांबायला सुरवात झाली…
लगबगीने ती आई गजऱ्यांची टोपली घेऊन पहिल्या गाडी जवळ आली ..
मागे मागे ती “५-६ वर्षांची” लहान मुलगी सुद्धा आली..
सुंदर गजरे दिसताच गाडीत मागे बसलेल्या महिलेनी खिडकीची काच खाली केली ..
तिच्या बाजूला तिचं साधारण “एखाद-दीड” वर्षांचं गोंडस बाळ ..
गाडीच्या सीटला धरून जेमतेम उभं राहिलेलं..
आधारासाठी आईनी एका हातानी धरलेलं …
त्या दोघींची गजऱ्याची चर्चा सुरू होती ..
लहान मुलीचं लक्ष त्या गोबऱ्या बाळाकडे ..
ते बाळ सुद्धा त्या ताईकडे बघत , मध्येच हसत काहीतरी बडबड करत होतं ..
“आआ आआsss बो .. भुओ sssss बॉ ब्वो भो बॉ ss !!”
“हो बेटा .. दोनच मिनिटं .. झालंच हां ss !!” … बाळाच्या आईच्या विनवण्या ..
बाळ आपलं जोरजोरात सुरूच होतं ..
“हंममम् .. उऊ .. भुओ sssss भुओ sssss बॉsss ब्वो ss बॉssssss !!”
“ओ ss ले माझ्या राजा .. भूक लागली ना शोनूला माझ्या .. थांब हा .. हे छान छान फुलांचे पैसे देते की शंपलं मम्माचं काम !!”..
तो गोडूला त्या गजरे विकणाऱ्या छोट्या ताईकडे बघून बॉsss बॉsss म्हणत ,..
इवला इवला हात दुमडून नाजुक बोट दाखवत होता ..
ती ताई सुद्धा त्याच्या बाललीला बघण्यात दंग होती . ..
इतक्यात तिच्या काहीतरी लक्षात आलं ..
ती पटकन धावत गेली ..
बाजूलाच सिग्नलपाशी खेळणाऱ्या आपल्या भावाजवळ..
त्याच्या खेळण्यांत पडलेला पिवळा रंगाचा मळका बॉल उचलला ..
घाईघाईत आपल्याजवळच्या फडक्यानी पुसला ..
बॉल घेऊन त्या बाळाजवळ गेली ..
ते बाळ आनंदानी अक्षरशः किंचाळायलाच लागलं ..
जे हवं होतं ते बरोब्बर मिळाल्याची पावतीच ..
मगाचपासून त्या बाळाचं लक्ष त्या बॉलकडेच होतं …
तेच दाखवायचा तो प्रयत्न करत होता , त्याच्या एक-अक्षरी बोलातून. ..
बाळाला इतकं खुश बघून त्या ताईच्या चेहऱ्यावर सुद्धा निखळ हसू …
गजरे घेऊन झाले होते .. इतक्यात सिग्नलही सुटला ..
त्या छोट्या ताईनी पटकन तो बॉल गाडीच्या खिडकीतून आत टाकला ..
ते बाळ मागच्या काचेतून हसत त्या ताईकडे बघत राहिलं ..
ती ताई सुद्धा त्याच्या गोंडस आनंदी चेहऱ्याकडे बघत ….
गाडी दिसेनाशी होईपर्यंत त्याला टाटा करत राहिली …
“आभाळभर समाधान” .. दोघांच्याही चेहऱ्यावर ..
त्या मुलीनी सढळहस्ते बॉल देऊन टाकताना कुठला विचार केला होता का ??
“त्याची मम्मा असे पन्नास बॉल त्याच्यासाठी विकत घेऊ शकते.?”…. हा विचार??? ..
छे ss !!.. नक्कीच नाही !! …
“आपण किती अस्वच्छ आहोत .. या “उच्चभ्रू” परिवाराला आपण असा बॉल देणं आवडेल का” .. हा विचार??? .. ……अजिबातच नाही !!
“आपण गरीब असून असा बॉल देऊन जरा मोठेपणा मिरवावा”…. हा विचार ???..
खचितच नाही !! ..
ते होते निसर्गाने निर्माण केलेल्या दोन निरागस जीवांमधले ऋणानुबंध …
कारण हे असले सगळे विचार आपण मोठी माणसं करतो !!
भरीला गरीब-श्रीमंत , मुलगा-मुलगी , धर्म-जात असे अनेक निकष लावतो ..
त्या बाळाला आपल्याकडे असलेला बॉल हवा होता , तो तिनी दिला ..
बस्स एवढंच नातं होतं ते !!
कुठल्याच बंधनात न अडकणारं …
दोन मनांना जोडणाऱ्या वाटेवर कुठलेच गतिरोधक नसणारं ….
दोघांच्या परिस्थितीत सगळ्याच बाबतीत असलेला कमालीचा फरक ..
त्याचं या दोन्ही निष्पाप मनांना काहीही सोयरसुतक नव्हतं ..

एका “नितळ” मनानी दुसऱ्या अशाच एका “नितळ” मनाशी संवाद साधला ..
त्याला अनुसरून केलेली ती तितकीच “नितळ” प्रतिक्षिप्त क्रिया ..
समोरून दिलेला तितकाच “नितळ” प्रतिसाद ..
इतकं साधं आणि सोपं आयुष्याचं गणित होतं ते !..
प्रत्येक जण जन्म घेतो तेव्हा इतक्याच “नितळ” मनाचे असतो ..
जसे मोठे होत जातो तशी “भेसळ” होत जाते ..
त्या “नितळ” मनाचं “कातळ” मन कधी होतं तेच कळत नाही ..
आपल्या सगळ्यांनाच आपलं मन कायम असं “नितळ” ठेवायला जमलं तर ..
बरेच प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतील ..
सारं काही “नितळ” !!!

©️ क्षितिज दाते , ठाणे



This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

नितळ

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×