Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

बारामतीचा वाघ

वाघ म्हणजे निर्भयतेचे प्रतिक ! तो कुणाच्या मर्जी संपादनासाठी जंगलात भटकत नाही, त्याचा वावर असतो स्वत:च्या मर्जीनुसार ! त्याचा हा बेदरकारपणा अहंकार नसतो , तो त्याचा रूबाब आणि आत्मविश्वास असतो. शिकार करायची असली तरी तो सिंहासारखे सहकारी घेऊन करत नाही. ती हिम्मत त्याच्या एकट्यात असते. तो पुढे चालत राहतो आणि सहकारी आपणहून सोबत येतात. सहकाऱ्यांनी कधी साथ सोडली तरी वाघ आपले चालणे, पुढे जात राहणे सोडत नाहीत. ‘थांबणे’ हा शब्द त्याच्या शब्दकोशात नाही. पराभवाने खचून जाणे, गलितात्र होणे त्याला माहिती नाही. एकटं असण्यानं त्याचा दबदबा कमी होत नाही. पाऊल पडेल तिथे त्याचा ऑरा तयार होतो. हे वलय भिती निर्माण करणारं असतं तसं ते खेचून घेणारं देखील असतं. जंगलाचा हा राजा इतका निर्विकार की त्याच्या मनातलं काही कळत नाही. वाघाची डरकाळी नाही तर हा निर्विकारपणा उरात धडकी भरवणारा असतो.

असा जंगलात ऑन माय टर्म्स चालणारा , वागणारा मनस्वी वाघ माणसाच्या जंगलात मी पाहिला आहे. त्याचं नाव ‘ श्री. शरद पवार !’

शरद पवार नावाच्या वाघाला हे बिरूद चिकटलं ते त्यांच्या महाविद्यालयीन जीवनकाळात. १९५८ साली बारामतीच्या एम.ई.एस. मधून बोर्डाची परिक्षा पास झाल्यावर शरद पवार पुण्यातील नावाजलेल्या बि.एम.सी.सी.मध्ये वाणिज्य शाखेचे विद्यार्थी झाले. बारामतीमधले मित्र सुरेश व्होरा असतील, नाशिकमधील शिवदास डागा असतील अथवा पुण्यातील विठ्ठल मणीयार वा सायरस पुनावाला असतील हे सगळे सहकारी त्यांना पुण्यात जोडले गेले. साहेबांचे व्यक्तीमत्वच असे की,
“ मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल
मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया ! ”

फर्ग्यूसन कॉलेज आणि बि.एम.सी.सी. च्या कोपऱ्यावरला भाग हे ह्या वाघाचं संचारकेंद्र. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या ह्या वाघाचा अंमल महाविद्यालयीन निवडणूकांमध्ये एका महाविद्यालया पुरता न राहता पुण्यातील सगळ्या महाविद्यालयात सुरू झाला. एस.पी. कॉलेजमधील श्रीनिवास पाटील असेच ह्या वाघाकडे आकर्षले गेले. शहरात शिक्षणासाठी आलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांकरीता हा वाघ आधार झाला. महावीर जैन होस्टेलच्या एका खोलीत बारामतीचे मित्र सुरेश व्होरा नाथा शिंदे नावाच्या पट्टीच्या पहिलवानासोबत राही. पहाटे पाचलाच त्याच्या जोर-बैठकांचा आवाज खोलीत घुमायचा आणि सुरेश व्होरांची झोपमोड होई. पण पहिलवानासमोर किरकोळ व्होरांचे काय चालणार? त्यांनी साहेबांच्या कानावर ही कागाळी पोचवली. शिंदे पैलवानाला पाहिजे तो निरोप सुप्तपणे पोचला. त्यानंतर पुन्हा कधी पैलवानाने बारामतीवाल्यांची झोप मोडण्याची आगळीक केली नाही.सगळ्या सवंगड्यांनी त्यांना बारामतीचा वाघ म्हणून पदवी दिली. पण ह्या वाघाने शहरातील तरूणाई देखील जिंकून घेतली. ग्रामीण-शहरी असा भेद त्याने कधी केला नाही. जो जवळ आला तो आपला झाला. जात-पात, धर्म, प्रांत काही पाहिलं नाही.

वाघाचा संचार दिवसापेक्षा दिवस मावळल्यावर अधिक ! कॉलेज जवळ असणाऱ्या मर्ढेकर निवासातून हा वाघ दररोज संध्याकाळी बाहेर पडे. आणि सहकाऱ्यांच्या गप्पांचा फड रंगायचा फर्ग्यूसन महाविद्यालाया समोर रस्तापल्याड असलेल्या मद्रास कॅफेमध्ये ! ( आपल्या पिढी त्याला रूपाली रेस्टॉरंट म्हणते.) कधी ही मंडळी भांडारकर रस्त्याच्या कॉर्नरवर असलेल्या कॅफे गुडलकमध्ये जमत कारण साहेबांना तिथली बैदा करी ( अंडा करी) फार आवडे. कॅफेमध्ये गिन्नीच्या चहावर फुरके मारत, मस्का बन-पावावर ताव मारत हे सहकारी भविष्यातले बेत शिजवत. इतरांसाठी भले त्या लष्कराच्या भाकरी असतील पण त्या गप्पांमधून भारताच्या लष्कराचा मंत्री घडत होता.

ह्या वाघाला झोप ही मुळातच कमी ! महाविद्यालयीन जीवनात तीन-चार तासांची झोप पुरे असणारा बहुदा हा एकमेव विद्यार्थी असावा. श्रीनिवास पाटील आणि साहेब एकदा पहाटे चार वाजेपर्यंत गप्पा मारत बसले , दोन तास झोपले आणि पुन्हा जोमाने साहेब कामासाठी उंबरठ्याबाहेर पडले. महाविद्यालयीन कार्यक्रम, निवडणूका व राजकारणाकडे वळल्यावर संघटनेच्या कामासाठी हा तरूण वाघ झपाटून काम करत असे. बरे, साहेबांना ही थोडकी झोप ही कुठे ही येत असे. काँग्रेसचे युवक अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या मुंबईला चकरा वाढल्या. एकदा श्रीनिवास पाटील आणि साहेब मध्यरात्र उलटून गेल्यावर टिळक भवनावर पोचले. पण सगळे दरवाजे बंद, दिवे मालवलेले, आवाज देऊनही प्रतिसाद मिळेना. तेवढ्यात साहेबांना अंधूकशा उजेडात टिळक भवनातल्या भिंतीवर बांधलेली कापडी कनात दिसली. दोघांनी तिच खाली ओढली आणि त्यात शांतपणे झोपले. साहेबांची धडाडी, कामाचा आवाका आणि संघटन कौशल्य पाहून महाविद्यालयीन काळापासूनच त्यांना सगळे सहकारी सी.एम. म्हणून हाक मारू लागले होते. त्यावेळी काहींनी ते गांभिर्याने घेतले नसेल. पण साहेब पुढे जाऊन राज्याचे चार वेळा सी.एम. झाले.

आईच्या संस्कारात वाढलेल्या आणि यशवंतरावांच्या सानिध्यात घडलेल्या तरूण नेत्यात सुसंकृतपणा हा मात्र अंगभूत गुण होता. बारामतीचे दिवंगत एम.आर.शाह नेहमी म्हणायचे की फक्त दोन माणसांच्या तोंडी कधी शिव्या आल्या नाही – बारामतीचे शरद पवार आणि ढाकळ्याचे जगताप ! हा सुसंस्कृत तरूण कामात ‘वाघ’ आहे हे यशवंतरावांच्या पारखी नजरेत आल्याशिवाय राहिले नाही. १९६७ साली त्यांनी धाडसाने ह्या वाघाला आमदार साहेब करण्याचे ठरवले. वयाच्या २७ व्या वर्षी ह्या वाघाने विधीमंडळात आश्वासक पाऊल ठेवले आणि रोवले. तेव्हापासून हा वाघ मागे हटला नाही, निग्रहापासून ढळला नाही. बहात्तरच्या दुष्काळात, जांभूळपाड्याच्या पूरात आणि सातारच्या मुसळधार पावसात सुद्धा डगमगला नाही. शाब्दिक बाणांनी घायाळला नाही की, जीवघेण्या आजाराला भिला नाही. हा वाघ सतत झेपावत राहिला, आव्हानांना भिडत राहिला, लढत राहिला आणि शेवट पर्यंत लढत राहिल. बारामतीच्या ढाण्या वाघ आज ८१ वर्षांचा होत आहे. जंगलातील वाघ दुर्मिळ होत चाललेत. माणसातला हा वाघ एकमेवाद्वितीय आहे. तो स्वयंभू आहे तरीही आपण शुभचिंतन करून त्याला जपायला हवं. कारण त्याचं अस्तित्व आपली अस्मिता आहे.

© सतीश ज्ञानदेव राऊत
१२.१२.२०२१
( आभार – श्री. श्रीनिवास पाटील, श्री. सुरेश व्होरा, श्री. शिवदास डागा )



This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

बारामतीचा वाघ

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×