Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पंखावरचा विश्वास..

चिणीचा हंगाम आल्याचं चिमणीच्या लक्षात आलं. तिनं ओलंसुकं गवत गोळा केलं. सुतळीचे तोडेबिडे आणले. घरटं विणलं. कुठूनतरी थोडाफार कापूससुद्धा आणला. घरट्यात मऊशार गादी घातली. चिमणा मदतीला होताच. घरटं पूर्ण झालं. दोघे दमूनभागून घरट्यात विसाव्याला बसले. चोचीला चोच लागली. पंखात पंख अडकले. काही दिवसांत चिमणीने अंडी घातली. अहोरात्र अंड्यांची काळजी घेतली. पंखाखाली घेऊन उब दिली आणि अंड्याचं कवच फोडून पिलं बाहेर आली. चोच उघडून चिवचवाट करत अन्नाची याचना करू लागली.

चिमणीची एकच धांदल उडाली. अन्नासाठी आक्रोशणाऱ्या पिलांना घरट्यात तशीच सोडून ती किड्या मुंग्यांच्या शोधात बाहेर पडली. शिधा चोचीत घेऊन घरट्यात आली. चिवचिवाट करण्यासाठी पिलांची एकच झुंबड उडाली. त्यांचा आपला एकच आक्रोश, “मला दे, मला दे.’ चिमणीने प्रत्येकाच्या चोचीत घास भरवला. पिलं शांत झाली. चिमणीच्या पंखाखाली आली. गाढ झोपी गेली. चिमणी मात्र विचार करत राहिली. पिलांच्या पंखात बळ आल्याचा विश्‍वास येत नाही तोवर त्यांच्यासाठी रोज चारा आणायलाच हवा. वेळप्रसंगी आपल्या पोटाला कमी पडले तरी चालेल. पण पिलांची भूक भागवायला हवी.

पिलं मोठी होत होती. त्यांच्या अंगावर पिसांची लव दिसू लागली. बघता बघता अंग पिसांनी भरून गेलं. पिलं तुरुतुरु चालत घरट्याच्या तोंडाशी येऊ लागली. विस्तीर्ण निळं आभाळ पाहून एकमेकांकडे पाहून आनंदाने चिऊचिऊ लागली. एका पिलाची नजर खाली जमिनीवर गेली. बापरे केवढं उंचावर आहे आपलं घर. इथून खाली कसं जायचं. खाली बघून त्याला गरगरायला लागलं. अंग आक्रसून घेत ते घरट्यात गेलं. बाकीची पिलंही त्याच्या सोबत आत गेली. चिमणा चिमणी परत आली. चिमणा घरट्याच्या बाहेर एका फांदीवर बसून पहारा देऊ लागला.

चिमणी आणलेला चारा पिल्लांना भरवू लागली. एक पिलू जरा घाबरल्यासारखं दिसत होतं. तिने त्याला जवळ घेतलं म्हणाली, काय झालं माझ्या बाळाला? ते पिलू काहीच बोलेना. मलूल होऊन गेलं होतं. आणि आईला सांगितलं तर आणि रागावेल सुद्धा कदाचित म्हणून त्याने गप्प बसायचं ठरवलं. चिमणीने खूप चिवचिवाट केला. काय झालं म्हणून बाकीच्या पिलांना विचारलं. तेव्हा त्यातील एक जरा बारीक अंगकाठीचं पिलू पुढे येत म्हणालं, आई आई आज किनई दादा घरट्याच्या दारात गेला होता. मी पण गेले त्याच्यामागे. चिनूसुद्धा आला होता, पण दादा सर्वात पुढे होता. आम्ही आभाळ पाहिलं. खूप मस्त वाटलं. पण तेवढ्यात दादाचं लक्ष खाली गेलं आणि त्याला गरगरायला लागलं.

चिमणीला मनातून आनंद झाला. तिला लक्षात आलं. आता घाबरलं असेल तरी आपलं हेच पिलू सर्वात आधी आभाळात झेप घेणार. दिवस उलटत होते. पिलांच्या पिसातून डाव्या उजव्या बाजूला पंखाने आकार घेतला. चिमणी चारा आणायला निघाली की पिलंही तिच्या पाठोपाठ घरट्याच्या दाराशी यायची. भुर्रकन पंख फडकावत उडणाऱ्या चिमणीला, बाय बाय करायची. पण चिमणी लगेच परत यायची. घरट्याच्या बाहेर फांदीवर बसून राहायची. तिच्या ओढीने पिलं तिच्याकडे झेपावू पाहायची. जागच्या जागेवर पंख फडकवायची. पिलांना उडता येत नसायचं. पण पंख फडकावणाऱ्या पिलांना पाहून चिमणीला समाधान वाटायचं. चला लवकरच भरारी घेतील माझी पिलं. म्हणत पिलांसाठी ती जास्त खाऊ आणायची.

एक दिवस चिमणी चारा घेऊन आली. पाहिलं तर एक पिलू बाहेर जवळच्या फांदीवर जाऊन बसलं होतं. चिमणी चारा घेऊन घरट्यात येताच चिमणीच्या पाठोपाठ तेही पंख फडकावत घरट्यात आलं. चिमणीने चारा बाजूला ठेवला. त्या पिलाच्या जवळ जात त्याच्या पिसातून चोच फिरवून त्याला कुरवाळलं आणि म्हणाली, छान, तुला उडता येऊ लागलं आहे, पण मी बाहेर गेल्यावर असं नाही करायचं. खाली पडला असतास तर? आणि हो, फार लांबसुद्धा नाही जायचं. दमून जाशील. मग आपल्या या उंचावरच्या घरट्यात येण्यासाठी तुझ्या पंखात बळ नाही उरणार. जमिनीवर चालावं लागेल आणि तिथे तुला कोणीही खाऊन टाकेल. आपल्याला कुणीतरी खाऊ शकेल याची पिलाला जाणीवच नव्हती. सहाजिक आता आपल्या पंखात पुरेसं बळ येत नाही तोवर नको ते धाडस नाही करायचं.

रोज जागच्या जागी पंख हलवायचे. फार तर या फांदीवरून त्या फांदीवर जाऊन बसायचं. चिमणी आता घरट्याबाहेर फांदीवर येऊन बसू लागली. तिन्ही पिलं तिच्या पाठोपाठ फांदीवर यायची. या फांदीवरून त्या फांदीवर उडायची. शिवणापाणी खेळ खेळायची. चिमणीला आता पिलांच्या पंखात बळ आलेलं जाणवत होतं. आणखी काही दिवस गेले. पुन्हा विणीचा हंगाम आला. आता पिलांच्या पंखावर चिमणीला पूर्ण विश्‍वास वाटू लागला. एक दिवस चिमणाचिमणी आणि पिले सगळेच चाऱ्याच्या शोधात बाहेर पडले. पिलं परत आली पण चिमणा चिमणी काही परत आले नाहीत. चिमणी नवं घरटं विणत होती.

चिमणीच्या एकामागून एक पिढ्या त्या झाडावर जन्माला येत होत्या. पिलं मोठी झाली आकाशात भरारी घेऊ लागली की आधीचे चिमणाचिमणी निघून जायचे. नवी पिलं त्याच झाडावर नव्यानं घरटं बांधायची. त्या झाडाला लागूनच एक खिडकी होती. चिमणीच्या प्रत्येक पिढीतली पिलं त्या खिडकीतून डोकावून पाहायची. त्या घराच्या गोष्टी पिलांना सांगायची. खिडकीतून एक आई दिसायची. तिचं बाळ दिसायचं. बाळ खेळायचं. भूक लागली की टाहो फोडायचं. मग त्याची आई यायची त्याला पदराखाली घ्यायची. बाळ मोठं होऊ लागलं. कृष्ण होऊन रांगू लागलं. त्या बाळाचे बाबा त्याला बोट धरून चालवायला शिकवायचे. चिवचिव कशी करायची तेही शिकवायचे. घोडा होऊन फिरवायचे.

बाळ आणखी मोठं झालं. शाळेत जाऊ लागलं. मैदानात खेळायला जाऊ लागलं. एक दिवस बाळ पडलं मैदानात. खरचटलं त्याला. तेव्हा त्याची आई केवढी घाबरीघुबरी झाली होती. मग त्याला किती सूचना दिल्या होत्या. बाळ घरी यायचं. पाढे पाठ करायचं. पुढे कसली कसली क्‍लिष्ट आकडेमोड करायचं. बाळ आणखी मोठं झालं. कॉलेजला जाऊ लागलं. मग नोकरीला लागलं. बाळाचं लग्न झालं. घरात नवी नवरी आली. चिमणीच्या पिलांना वाटलं आता. त्या बाळाचे आई-बाबाही दूर कुठेतरी निघून जातील. पण वर्षामागून वर्षे गेली. त्या बाळाचे आई-बाबा, ते बाळ ती नवी नवरी एकाच घरट्यात सुखाने राहात होते.

चिमणीच्या एका पिलाने दुसऱ्या पिलाला विचारलं. आपण मोठे झालो की आपले आई-बाबा आपल्याला सोडून जातात. मग या बाळाचे आई-बाबा का नाही त्याला सोडून गेले. त्यावर दुसरं पिलू म्हणालं, माणसांना आपल्यासारखं वागून नाही चालत रे. मुलांच्या पंखात विश्‍वास निर्माण करण्यासाठी आई-बाबा खूप कष्ट करतात. मग आई- बाबांच्या पंखातलं बळ कमी झाल्यास त्या बाळांनीच आई-बाबांच्या पंखांत विश्‍वास भरायला हवा ना.

विजय शेंडगे.

संकलन/संपादन: टीम स्पंदन



This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

पंखावरचा विश्वास..

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×