Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

"सुपर हीट" आत्मचरित्र !



 खूप दिवसांपूर्वी यु ट्यूब वर मराठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्या अभिनय कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाल्या बद्दलचा सोहळा बघितला. नुसते मराठीतीलच नव्हे तर हिंदी मधील अनेक दिग्गज सोहळ्याला उपस्थित होते. याच कार्यक्रमा दरम्यान सचिन पिळगावकर यांनी आपले आत्मचरित्र " हाच माझा मार्ग " दस्तुरखुद्द "सचिन तेंडूलकर" याच्या हस्ते प्रकाशित केले. मराठीतील एवढ्या दिग्गज अभिनेत्याचे आत्मचरित्र वाचण्याचा योग मला नुकताच आला. सचिन यांचा पहिला चित्रपट "हा माझा मार्ग एकला " यावरूनच त्यांनी या आत्मचरित्राचे नाव "हाच माझा मार्ग" ठेवले आहे. पुस्तकाच्या सुरवातीलाच सचिन सांगू इच्छितात, की हे पुस्तक त्यांना कोणाला अर्पण करायचे आहे ते climax लाच कळेल. त्यामुळे पहिल्या प्रकरणा पासून ते शेवटच्या प्रकरण पर्यंत वाचकाची उत्सुकता वाढत जाते.


                                               

वयाच्या सुरवातीला आलेला अभिनयाचा प्रसंग , स्वतः लहान वयात दिग्दर्शित केलेला स्वतः चा पहिलावहिला फोटो , अभिनयाची सुरवात असे विविध पैलू उलगडत जातात. मनात कायम असलेली "दिग्दर्शक" बनायची स्वप्ने याच दरम्यान सुरु होतात. मास्टर सचिन ते अभिनेता सचिन असा प्रवासाला प्रारंभ होतो. अगदी लहान वयात मराठीमधील दिग्गज अभिनेते तसेच हिंदीमधील देव आनद संजीव कुमार यांच्या सारख्या दिग्गजांसोबत अभिनयाची संधी मिळाल्यावर मनाची स्थिती कशी होते याबद्दल चे वर्णन ऐकून खूप उत्सुकता वाढत जाते. लहान वयात हिंदीत काम मिळू लागल्यावर त्या वेळेसचे मित्र, बालकलाकार, इत्यादींचा उल्लेख सचिन आवर्जून करतात.पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार, पंडित नेहरूंनी स्वतः  मांडीवर बसवून केलेले कौतुक व बक्षीस म्हणून स्वतःच्या कोट वर लावलेले त्यांचे आवडते गुलाब भेट दिलेला प्रसंग, मीना कुमारीमुळे उर्दू ची लागलेली गोडी, आचार्य अत्रे  सोबतचा सहवास, रंगभूमी वरील कारकीर्द,  एवढेच नव्हे तर अगदी लहान वयात उर्दूवर मिळवलेले अफलातून प्रभुत्व यामुळे चक्क कादर खान यांनी केलेली प्रशंसा अश्या गोष्टी वाचून आश्चर्य वाटते.

            


मास्टर सचिन चा आता हळू हळू अभिनेता सचिन व्हायला सुरवात होते, राजश्री कडून तशी ऑफर येते , चित्रपट सुपर हीट  होतो.  तसेच सचिन यांनी "शोले" सारख्या चित्रपट बद्दल आवर्जून लेखन केले आहे, तसेच "शोले" मधला ट्रेन चा प्रसंग सचिन यांच्या युनिटच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शित झाला आहे या गोष्टी अगदी पहिल्यांदा कळतात. अभिनेता म्हणून कमावलेले नाव , दिग्दर्शनाची चाहूल, मराठी मध्ये पदार्पण अश्या अनेक गोष्टी या दरम्यान घडतात, संजीव कुमारच्या आकस्मिक जाण्याने त्यांना धक्का बसतो. हिंदी मध्ये जम बसल्या नंतर मराठीमध्ये सुद्धा सचिन यांचा खेळ सुरु असतो, याच दरम्यान ज्येठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सोबत सुरु केली फिल्मी कारकीर्द, "अशी ही बनवा बनवी" ची संपूर्ण कथा , या मराठी चित्रपटाचा २५ आठवडे चालल्याचा सोहळा, दिलीप कुमार यांची उपस्थिती, पुढे अनेक सुपर हीट चित्रपटांची रांग, इत्यादी गोष्टी यात नमूद केल्या आहेत. याच दरम्यान राजेश खन्ना, शमी कपूर यांसारख्या " खवय्या" लोकां सोबत केलेली मेजवानीचे देखील किस्से आहेत. राजेश खन्ना सोबत "अवतार" या चित्रपट केलेल्या भूमीकेबद्दल सचिन खुलून लिहितात. राजेश खन्ना नाव आले म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांचे देखील अनेक किस्से आहेत, सचिन एकदा रागावलेले असताना अमिताब बच्चन यांनी स्वतः काढलेला सचिन यांचा फोटो देखील त्यांनी दिला आहे. सत्ते पे सत्ता यात सचिन अभिताभच्या सर्वात लाडक्या भावाची भूमिका करत होते , खऱ्या आयुष्यात पण याची पुनरावृत्ती होते

                        

                         
१९९५ नंतर हळू हळू सचिन आपला रोख मोठ्या पडद्या वरून छोट्या पडद्या कडे वळवतात, "तू तू मै मै" सुपर हीट होते, त्या जमान्यात स्टार प्लस ही इंग्रजी वाहिनी होती त्यावर फक्त " तू तू मै मै" हीच हिंदी मालिका दाखवली जायची याबद्दल सचिन आजदेखील आठवण काढतात. छोट्या पडद्या वर एक यशस्वी दिग्दर्शक बनल्यावर सचिन मराठीत पुरागमन करतात. एका वाहिनी सोबत वाईट वर्तणूक दिल्यामुळे  "माझा चित्रपट टी वी वर प्रसारित करण्याचे हक्क  तुम्हाला ३० लाखांना विकेन ते पण फक्त ५ वर्षासाठी "  असा निश्चय करून चित्रपटनिर्मिती साठी पुन्हा सुरवात करतात, चित्रपट ठरतो " नवरा माझा नवसाचा". कोल्हापूर पुणे येथे चित्रपट सुपर हीट होतो व मुंबई तो चित्रपटगृहात लावण्या साठी वितरकांची गर्दी होते, व सचिन नंतर या चित्रपटाचे  टी वी वर प्रसारित करण्याचे हक्क खरेच "३० लाखांना व फक्त ५ वर्षासाठी त्याच वाहिनीला विकतात". त्या नंतरच्या प्रकरणात १ नाट्यमय मोड येतो " नच बलिये " च्या रूपाने. या वयात देखील स्वतःपेक्षा तरुण असेलेल्या जोड्यांना हरवून ते या पहिल्या पर्वाचे विजेते बनतात, नुसत्या महाराष्ट्रातून नाही तर अख्या देशभरातून त्यांना ७० % पेक्षा अभिक मते मिळतात, याच नच बलिये दरम्यानचे किस्से सचिन यांनी खूप चांगले रंगवले आहे.

                              

                            


नंतर त्यांनी मराठी मध्ये नृत्य संदर्भात " एका पेक्षा एक" कार्यक्रम सुरु केला, यात "महागुरू" ही  संकल्पना आपली नाही लेखकाची आहे हे ते प्रांजळपणे कबूल करतात. वेळप्रसंगी गुणी कलावंताना स्वतः मार्गदर्शन केले. मित्र जुनिअर मेहमूद साठी देखील मैत्री खातर एका चित्रपटात विनामूल्य काम केले . त्या नंतर आलेले चित्रपट, आयुष्यातले बाकी किस्से याने लिखाण सुरु राहते. अनेक कलावंताना त्यांनी पहिली संधी दिली मग ती अभिनयाची असो किवा इतर. त्यांनी संधी दिलेल्या लोकांमध्ये आज अनेक सुप्रसिद्ध लोकांचा समावेश आहे.

                                                            

यातच सचिन आपल्या परिवाराबद्दल विस्ताराने लिहितात, सुप्रिया यांच्याशी झालेली ओळख, लग्न, मुली बद्दल असलेली काळजी , जीवापाड प्रेम या सर्व गोष्टी वाचून मन थक्क होते! "क्युंकी सास भी कभी बहु थी"  या मालिकेचे टायटल सचिन पिळगावकर यांच्या नावावर रजिस्टर होते, जितेंद्र यांच्या मैत्री साठी त्यांनी ते विनामूल्य दिले कोणतीही अट न घालता, असेच "यमला पगला दिवाना" या टायटल चे हक्क देखील  सचिन पिळगावकर यांच्या नावावर रजिस्टर होते ते देखील त्यांनी धर्मेंद्र यांना दिले.

                                 


एकूणच इतके प्रामाणिक आत्मचरित्र माझ्या वाचण्यात तरी अजून आले नाही. सचिन प्रत्येक प्रकरणात विस्ताराने आणि खऱ्या मनाने बोलतात. त्यांचे आत्मचरित्र आवर्जून  वाचण्या सारखे झाले आहे. आपल्याला कोणत्याच प्रकरणात कंटाळा येत नाही किवा अतिशयोक्ती वाटत नाही. त्यांचे हे आत्मचरित्र त्यांच्या चित्रपटा  प्रमाणेच सुपर हीट आहे!

                                      

Share the post

"सुपर हीट" आत्मचरित्र !

×

Subscribe to निनाद गायकवाड ब्लॉ

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×