Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

‘मुस्लीम’ आणि ‘ज्यू’ यांच्या भांडणांचे मूळ काय आहे?

मध्यपूर्वेतील सद्यस्थिती काय आहे ती आपण पाहत आहोत. कोणी कोणाचे किती मारले? का मारले? केले ते बरोबर केले का? या बाबतींत खोलात जाणार नाही. या उत्तरात मी ज्यू आणि मुसलमान यांच्या भांडणाच्या मुळात जाण्याचा प्रयत्न करणार आहे.

वरील चित्रातील हा हातात सुरा धरलेला दाढीवाला बाबा कोण आहे? हा बाबा म्हणजे सर्व अब्राहमी धर्मांचा मूळपुरुष प्रेषित अब्राहम/इब्राहिम. मग तो लहान मुलगा कोण आहे? वादाचे मूळ हेच.

ज्यू आणि इस्लामिक धार्मिक मान्यतांनुसार अंदाजे चार-एक हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. अब्राहम (Abraham) आणि त्याची पत्नी सारा (Sarah) हे इराकमधील ऊर या शहरात राहत. त्यांना मूल नव्हते. एके दिवशी अब्राहमला दृष्टांत झाला. त्यात परमेश्वराने (इथे याह्वेह्, एलोहीम्, आदोनाय्, अल्लाह् हा गोंधळ होऊ नये म्हणून आपण त्याला सरळ परमेश्वर म्हणू) त्याला त्याच्या पत्नीसह कनान (Canaan) नामक देशाला जायला सांगितले. त्यानुसार ते कनान देशी गेले. हा कनान म्हणजेच आताचा इस्राइल-पॅलेस्टाइन. नंतर एका दृष्टांतात परमेश्वराने अब्राहमला त्याचे वंशज या कनान देशाचे वारसदार होतील असे म्हटले. पण अब्राहम आणि सारा हे तब्बल ७०-८० वर्षाचे होते, आणि तरी त्यांना अपत्य नव्हते. साराची इजिप्शिअन दासी हगार (Hagar) हिला अब्राहममुळे एक पुत्र झाला. त्याचे नाव इश्माएल/इस्माइल (Ishmael). अरबांच्या मान्यतांनुसार इस्माइला हा त्यांचा पूर्वज. त्याच्या तेरा वर्षांनंतर अब्राहमला पुन्हा परमेश्वराचा दृष्टांत झाला. त्यात परमेश्वराने पुन्हा अब्राहमच्या वंशजांना कनानचे वारसदार असल्याचे घोषित केले आणि त्याच्या बदल्यात अब्राहमने स्वतःची आणि आपल्या सर्व पुरुष वंशजांची सुंता करावी असा आदेश दिला. याला पवित्र करार (Covenant) असे म्हणतात. त्यानंतर एका वर्षाने म्हणजे अब्राह्म ९९ वर्षाचा असताना त्याची धर्मपत्नी सारा हिला एक पुत्र झाला. त्याचे नाव आयझॅक/इसाक (Isaac). ज्यू लोकांच्या मते इसाक हा त्यांचा पूर्वज. आणखीन काही वर्षे गेली. अब्राह्ममला पुन्हा दृष्टांत झाला. त्यात परमेश्वराने अब्राहमला त्याची सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे त्याच्या पहिल्या पुत्राचा बळी द्यायचा आदेश दिला. त्यानुसार अब्राहम त्याच्या मुलाला घेऊन एका निहित ठिकाणी गेला. त्याचा आज्ञाधारक मुलगाही त्याच्यासोबत गेला. तिथे त्याने एक वेदी तयार केली आणि त्यावर आपल्या मुलाला ठेवले. सुरा उगारला आणि तो खुपसणार तितक्यात एका देवदूताने त्याला थांबवले आणि म्हणाला की परमेश्वर तुझी परीक्षा घेत होता, आणि तुझ्या मुला ऐवजी या मेंढ्याचा बळी दे. आता हा मुलगा कोण? इसाक की इस्माइल? ज्यू धर्माच्या मते इसाक. इस्माइल हा मोठा भाऊ असला तरी तो दासीपुत्र असल्यामुळे त्याला पहिल्या पुत्राचा दर्जा नव्हता, आणि म्हणून परमेश्वराने कनान देश हा इसाकला दिला असून, इस्माइलचे वंशज स्वतःचे वेगळे शस्त्रोपजीवी राष्ट्र (अरब टोळ्या) निर्माण करतील अशी भविष्यवाणी केली. याउलट इस्लामच्या मते हा बळी द्यायला घेतलेला मुलगा म्हणजे इस्माइल. ईद अल्-अधा, म्हणजे बकरी ईदला दिल्या जाणाऱ्या कुर्बानीचे मूळ म्हणजे ही गोष्ट. आणि इस्माइलचे वंशज म्हणजे अरब आणि अध्यात्मिक वंशज या अर्थाने मुसलमान हे कनानचे खरे वारसदार आहेत. मुस्लिम मान्यतांमुसार मक्क्याच्या काब्याची स्थापना सुद्धा प्रेषित अब्राहमनेच केली होती.

पुढे इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबस्तानात प्रेषित मुहम्मदाला देवदूत जिब्राइलने दृष्टांत देवून परमेश्वराचे संदेश/आदेश द्यायला सुरुवात केली. वास्तविक मुसलमान प्रेषित मुहम्मदाला अब्राहम आणि त्यानंतर येणाऱ्या ज्यू प्रेषितांच्याच परंपरेतील शेवटचा प्रेषित मानतात. परंतु ज्यू धर्मात मात्र मुहम्मदाला प्रेषित मानत नाहीत. इ.स. ७० मध्ये रोमन सम्राट वेस्पेशिअन आणि त्याचा पुत्र टाइटस यांनी युदेआ मध्ये झालेल्या ज्यू लोकांच्या विद्रोहाचे दमन केले आणि ज्यू धर्माच्या उपासनेचे केंद्रस्थान असलेले जेरुसलेम मधील मंदीर उध्वस्त केले. आजही ज्यू लोक त्या उध्वस्त मंदिराच्या अवशेषांना पवित्र मानतात. काहींच्या मते इस्राइलमध्ये ज्यू लोकांचा देश निर्माण करून उद्धस्त झालेल्या मंदिराचे पुनर्निर्माण झाल्यावर पृथ्वीवर मशिआह अवतरेल. मुस्लिम मान्यतांनुसार या अवशेषाच्या वरच बुर्राक नामक एक उडणारा घोडा प्रेषित मुहम्मदाला स्वर्गात घेऊन गेला होता. तेंव्हा या घटनेच्या स्मरणार्थ मुसलमानांनी जेरूसलेम जिंकून घेतल्यावर आठव्या शतकात उमय्यद खलीफा अब्द-अल्-मलिक आणि अल्-वलीद यांच्या काळात त्या अवशेषांच्या चौथऱ्यावरच अल्-अक्सा मशीद बांधली.

स्रोत: https://www.catholicsforisrael.com/component/jdownloads/send/7-resources/227-evolution-of-the-middle-east

पुढे जेरूसलेम आणि मध्येपूर्वेचा बराचसा भाग ओस्मानी तुर्की साम्राज्याचा (Ottoman empire) भाग बनला. या काळात इस्राइल-पॅलेस्टाइनमध्ये बहुतांश लोक अरब मुसलमान असून, ख्रिस्ती आणि ज्यू अल्पसंख्यांक होते. रोमन काळातील आणि नंतर क्रूसेड काळातील विस्थापनामुळे बहुतेक ज्यू लोक या काळात युरोपात होते. पहिल्या महायुद्धानंतर मित्रराष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याचे तुकडे केले. ओस्मानी साम्राज्याविरुद्ध लढण्यात अरबांनी ब्रिटिशांना मदत केली होती. तेंव्हा, तुर्क गेल्यावर अरबांसाठी एक स्वतंत्र देश निर्माण होईल अशी त्यांची अपेक्षा होती. ओस्मानी साम्राज्याच्या विभागणीत आजचा इस्राइल-पॅलेस्टाइन (Mandate of Palestine) हा भाग इंग्रजांच्या अधिकाराखाली आला. आधीपासूनच युरोपातील ज्यू लोकाना पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात जाण्याची ओढ होती. काहींच्या मते इस्राइलमध्ये ज्यू लोकांचा देश निर्माण करून उद्धस्त झालेल्या मंदिराचे पुनर्निर्माण झाल्यावर पृथ्वीवर मशिआह अवतरेल. तर काही लोकांना ज्यू लोकांचा स्वतःचा एक देश असावा असे वाटत होते. यालाच जायनिजम (Zionism) असे म्हणतात. या मागणीला राजकीय पाठबळ मिळू लागले आणि शेवटी १९१७ मध्ये बेल्फर डेक्लरेशनमध्ये ब्रिटिश सरकारने ज्यू लोकांसाठी एक देश निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मात्र युरोपातून मोठ्या संख्येने ज्यू लोकांनी इस्राइल-पॅलेस्टाइनला स्थलांतर करणे सुरु केले. हिट्लरच्या काळात आणि दुसऱ्या महायुद्धानंतर तर लाखोंच्या संख्येने ज्यू शरणार्थी इस्राइल-पॅलेस्टाइनमध्ये येऊ लागले. यामुळे स्थानिक अरब मुसलमान लोक स्वतः अल्पसंख्याक होऊ लागले. शेवटी १९४८ मध्ये इस्राइल या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली आणि ताबडतोब त्याच्या शेजारील अरब देशांनी इस्राइलवर आक्रमण केले. इस्राइलने युद्ध जिंकले, पण या युद्धामुळे बरेच स्थानिक मुसलमान विस्थापित होऊन शेजारील अरब देशात गेले. युद्ध संपल्यानंतर मात्र ते परत जाऊ शकले नाहीत. त्यानंतर सुद्धा पॅलेस्टिनिअन आणि इस्राइली सैन्यांत अनेक युद्धे आणि झटापटी झाल्या. अनेकदा पॅलेस्टिनिअन नेत्यांपुढे फाळणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. जे मिळत होते ते घ्यायला हवे होते. पण पॅलेस्टिनिअन नेत्यांना ते मंजूर नव्हते. आणि लाखो इस्राइली ज्यू आता तो देश सोडून परत युरोपात जाणे अर्थातच शक्य नाही. तेंव्हा वाटाघाटी फिसकटल्यावर मग शेवटी बळी तो कान पिळी. परिणामतः प्रत्येक युद्धासोबत अरब मुसलमानांच्या अधिकारातील जमीन अजून-अजून कमी होत गेली. आता अवस्था अशी आहे की केवळ गाजा पट्टी (Gaza strip) आणि यार्देन नदीच्या पश्चिम किनाऱ्याजवळील काही ठिकाणी (West bank) पॅलेस्टिनिअन प्रशासनाखालील जमिनी आहेत, आणि उरलेली सर्व जमीन इस्राइली प्रशासनखाली आहे. त्यामुळे जगभरातील बहुतेक मुस्लिम देशांचे इस्राइलशी वाकडे आहे.



This post first appeared on Garja Maharashtra, please read the originial post: here

Share the post

‘मुस्लीम’ आणि ‘ज्यू’ यांच्या भांडणांचे मूळ काय आहे?

×

Subscribe to Garja Maharashtra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×