Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

फुलगाव येथील 'पेशवेकालीन घाट'

विविध ठिकाणे ज्यांना भटकण्याची आवड असते ते सतत काही ना काही जागा कायम शोधत असतात. पुण्यापासून अशी जवळ बरीच ठिकाणे आहेत जिथे आजही फारशी दरवळ नसते. अश्या आडवाटेवर असणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण 'तुळापूर' पासून अगदी जवळ आहे. तसेच पुण्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावर असल्यामुळे थोडा जरी वेळ आपल्या हातात असला तरी आपण 'फुलगाव' या गावाला जाऊन नक्की भेट द्यावी. 'तुळापूर' पासून अगदी शेजारी असणाऱ्या 'फुलगाव' या गावामध्ये नदीच्या काठावर एक सुंदर 'पेशवेकालीन घाट' आहे. 


पुण्यापासून जवळपास ३० कि.मी. अंतरावर 'भीमा' नदीच्या काठावर हे निसर्गरम्य 'फुलगाव' वसलेले आहे. 'फुलगाव' येथे पोहोचण्यास स्वत:चे वाहन कधीही उत्तम. गावामधून 'भीमा' नदीच्या काठापर्यंत आपण सहज पोहचू शकतो. मुळातच भीमा नदीचे इथे पात्र फार मोठे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात देखील 'भीमा नदीला' भरपूर पाणी असते. जेव्हा आपण नदीच्या काठावर पोहोचतो तेव्हा आपल्याला एक उत्तम दगडी तटबंदी असलेला सुंदर 'पेशवेकालीन घाट' बघायला मिळतो. 


'फुलगाव' येथील 'पेशवेकालीन घाट'.


'फुलगाव' येथील 'पेशवेकालीन घाटाचा' परिसर आपण नीट बघितला तर आपल्याला असे दिसते कि 'फुलगाव' येथे 'भीमा नदीने' अर्धचंद्राकृती वळण घेतलेले आहे. हे अर्धचंद्राकृती वळण पाहून इथे हा सुंदर घाट उभारण्यात आलेला आपल्याला पहायला मिळतो. या 'भीमा' नदीवर पेशवेकाळात जो घाट बांधला आहे त्याच्या शेजारी पूर्वी पेशव्यांचा वाडा होता.असे स्थानिक लोकं सांगतात. मुख्यत्वे करून हे 'भीमा' नदीचे वळण पाहून या निसर्गरम्य ठिकाणी हा सुंदर दगडी घाट उभारलेला आपल्याला पहायला मिळतो. 


'फुलगाव' येथील 'भीमा' नदीवर बांधलेल्या पेशवेकालीन घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या दगडी घाटाचे भक्कम असलेले बुरुज हे पाहण्यासारखे आहेत. तसेच या घाटावर रेखीव कोनाडे देखील आपल्याला बघायला मिळतात. 'भीमा' नदीवर बांधलेल्या या पेशवेकालीन घाटाच्या आजही खणखणीत असलेल्या पायऱ्या आणि दगडी रचना हे पाहून पेशवेकाळामध्ये या घाटाचे वैभव कसे असावे याचा आपल्याला अंदाज येतो. 


'भीमा' नदीवरील 'पेशवेकालीन घाट' येथून दिसणारे 'भीमा' नदीचे पात्र.

या पेशवेकालीन घाटाच्या दरवाजाची कमान आजही सुस्थितीमध्ये आहे. तसेच या दरवाज्याला आपल्याला देवड्या देखील बघायला मिळतात. या घाटाच्या समोर असलेले विशाल 'भीमा' नदीचे पात्र आणि आजूबाजूच्या झाडीमधून येणारे पक्ष्यांचे आवाज आपल्याला मंत्रमुग्ध करतात. 'फुलगाव' संदर्भात एक छोटीशी नोंद अशीही आढळते कि 'फुलगाव' येथे 'त्रिंबकजी डेंगळे' यांनी 'दुसऱ्या बाजीराव पेशवे' यांची इथे गुप्त रुपाने भेट घेतली होती असे म्हटले जाते. 


'फुलगाव' येथील 'भीमा' नदीवरील 'पेशवेकालीन घाट' आपल्याला 'मेणवली' येथील घाटाची आठवण नक्कीच करून देतो. याचे कारण म्हणजे दोन्ही ठिकाणी असलेली रचना ही बऱ्यापैकी सारखीच आढळून येते. असा हा 'फुलगाव' येथील 'पेशवेकालीन घाट' आजही आपले वैभव बऱ्यापैकी टिकवून आहे. अश्या आडवाटेवर असलेल्या निसर्गरम्य फुलगाव येथील 'पेशवेकालीन घाटाला' भेट देऊन एखाद्या संध्याकाळी येथील निरव शांतता अनुभवून इथला सूर्यास्त पाहून झाल्यावर आपण एक सुंदर आठवण आपल्या सोबत घेऊन आपल्या घरी परतू शकतो.

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे - विमाननगर - लोणीकंद - फुलगाव.   
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा


Share the post

फुलगाव येथील 'पेशवेकालीन घाट'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×