Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अलिबाग जवळील 'जेरुसलेम गेट'

आपल्या महाराष्ट्रात अशी बरीच ठिकाणे आहेत जी बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात परंतु अश्या ठिकाणांची माहिती जाणून घेणे ते ठिकाण प्रत्यक्ष जाऊन बघणे आणि माहिती मिळविणे हे देखील आपल्याला फार महत्वाचे ठरते. अश्या ठिकाणांंच्यापैकी एक महत्वाचे ठिकाण अलिबाग येथील 'नवगाव' येथे आहे ते म्हणजे भारतामधील 'ज्यू' धर्मीय लोकांसाठी अत्यंत महत्वाचे असलेले स्थळ म्हणजे 'जेरुसलेम गेट'. 


'अलिबाग' येथील समुद्रकिनारा सर्वदूर प्रसिद्ध आहे परंतु 'अलिबाग' पासून अगदी १० किलोमीटर अंतरावर असलेल्या 'नवगाव' येथे 'ज्यू' धर्मियांसाठी महत्वाचे असलेले ऐतिहासिक 'जेरुसलेम गेट' फारसे परिचित नाही. तसे इतिहासामध्ये बघायला गेले तर 'ज्यू' लोकांचा भारताशी प्राचीन काळापासून व्यापाराचा संबंध होता. फिनिशियन लोकांच्या सोबत 'ज्यू' लोकं हे देखील व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये येत असे. हे 'ज्यू' लोकं व्यापाराच्या निमित्ताने प्राचीन सोपारा म्हणजेच आजचे नालासोपारा, चौल, आणि मलबार येथील बाजारपेठांना भेटी देत असत तसेच त्यांनी आणलेला माल देखील भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विकत असत. 'बायबल' किंवा जुन्या करारामध्ये 'राजा हिराम' याने 'जेरुसलेम' येथील साॅलोमनच्या मंदिरासाठी सागाचे लाकूड हे 'शूर्पारक' म्हणजेच नालासोपारा किंवा 'ओफिर' येथून मागवले होते असा एक महत्वाचा संदर्भ मिळतो. 


'ज्यू' धर्मियांसाठी महत्वाचे असलेले ऐतिहासिक 'जेरुसलेम गेट'


इ. स. १ ल्या शतकापासून इ. स. ६ व्या शतकापर्यंत 'ज्यू' लोकांचे भारतामध्ये येणे जाणे होते. या काळामध्ये व्यापाराच्या निमित्ताने काही 'ज्यू' लोकं हे भारतामध्ये केरळ किनारपट्टीवर कोचीन आणि जवळपासच्या भागामध्ये उतरले. त्यांच्या हुशार आणी तीव्र बुद्धीमुळे त्यांना केरळच्या तत्कालीन राजाने आपल्या कारकिर्दीमध्ये काही महत्वाची शासकीय पदे देखील दिली. 'ज्यू' लोकांचे व्यापारामध्ये खूप चांगले लक्ष असल्याने मसाल्यांचा सर्व व्यापार हा 'ज्यू' लोकांच्या हातामध्ये होता. याच कालावधी मध्ये इ. स. ६ व्या शतकामध्ये जेव्हा धार्मिक जाचाला कंटाळून काही 'ज्यू' लोकं दोन जहाजांच्या मधून कोकणाकडे आली आणि दुर्दैवाने अलिबागजवळ 'नवगाव' येथे त्यांची जहाजे खडकावर आपटली यामध्ये बरेच 'ज्यू' लोकं मृत्युमुखी पडले.


या जहाजाच्या झालेल्या घटनेमध्ये सात पुरुष आणि सात स्त्रीया सुदैवाने वाचल्या आणि त्यांनी 'नवगाव' किनारपट्टीचा आसरा घेऊन ही कुटुंब त्याठिकाणी स्थायिक झाली. जहाजामधील ज्या स्त्री आणि पुरुषांना जलसमाधी मिळाली होती त्यांंचे मृतदेह या वाचलेल्या कुटुंबांनी एकत्र केले. या पाण्यात बुडून मेलेल्या 'ज्यू' लोकांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 'नवगाव' येथील स्थानिक लोकांनी लाकडे आणि अग्नीची व्यवस्था केल्यावर मात्र त्या १४ लोकांनी खाणाखुणा करत थांबायला सांगितलं आणि मृतदेह पुरण्याची परवानगी मागितली आणि 'नवगाव' येथे 'ज्यू' कबरी बांधल्या. याच कबरी आपल्याला 'जेरुसलेम गेट' येथे बघायला मिळतात. 


'जेरूसलेम गेट' येथे असलेला स्तंभ आणि त्याच्यावर असलेले मराठी, इंग्रजी आणि हिब्रू भाषेमधील माहिती.  


तसेच या 'ज्यू' लोकांनी तत्कालीन राजाला विनंती करून 'नवगाव' येथे राहण्याची परवानगी मागितली तेव्हा तत्कालीन राजाने या 'ज्यू' लोकांना 'नवगाव' येथे राहण्याची परवानगी देखील दिली. हळूहळू हा 'ज्यू' समाज 'अलिबाग' येथील किनारपट्टी 'ठाणे' आणि 'मुंबई' येथे स्थायिक झाला. महाराष्ट्रातील लोकांच्या सहकार्याच्या भावनेमुळे आणि सहिष्णू वृत्तीमुळे 'ज्यू' लोकं येथील महाराष्ट्राच्या संस्कृतिशी समरस झाले. या सर्व ज्यू लोकांनी नवगाव, अलिबाग, नागाव, किहीम, चौल, कोर्लई, आवास, रोहे, पेण या ठिकाणी वसाहती केल्या. तसेच या गावांच्या नावाप्रमाणे त्यांनी स्वतःची आडनावे घेतेली पेणकर, किहीमकर, चौलकर, कोर्लेकर, रोहेकर, आवासकर, भौगावकर अशी नावे त्यांनी स्वीकारली. तसेच या 'ज्यू' लोकांनी कोकणात आल्यावर आपला तेल गाळण्याचा पूर्वापार व्यवसाय तसाच चालू ठेवला. 'ज्यू' लोकं हे इतर लोकं शनिवारी आपल्या तेल विक्री व्यवसायाला सुट्टी देत असत म्हणून यांना 'शनिवार तेली' असे संबोधण्यात येत असे. कोकणात वसलेले हे 'ज्यू' लोकं उत्तम मराठी भाषा बोलतात. 


अश्या या ऐतिहासिक कारणासाठी 'ज्यू' लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे स्थान असलेले 'जेरुसलेम गेट' खासकरून 'ज्यू' लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. 'नवगाव' किनाऱ्याजवळ जहाजाबरोबर बुडालेल्या 'बेने-इस्राएल' म्हणजेच 'ज्यू' लोकांच्या पूर्वजांची ही दफनभूमी आहे. 'अलिबाग' जवळील 'नवगाव' येथून 'बेने-इस्राएल' लोकं संपूर्ण भारतभर पसरली आहेत. 'जेरुसलेम गेट' येथील दफनभूमी मध्ये  आपल्याला एक  स्तंभ  देखील बघायला मिळतो त्याच्यावर असलेला मजकूर पुढीलप्रमाणे:-


हिब्रू भाषेमध्ये असलेला स्तंभावरील लेख हा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही मध्ये आपल्याला पहायला मिळतो.

Here are buried the ancestors of the Bene-Israel community of India who were shipwrecked on the shores of Nawgaon nearly 2000 years ago. From Nawgaon the Bene-Israel community spread all over India. In the beginning they were engaged in oil pressing and agriculture. Later they took to small scale industry, the armed forces, and government services and attained the highest positions. They have been true citizens of India and have participated in the freedom movement of the country. With the establishment of the state of Israel in 1948 they have emigrated in large numbers to the state of Israel where they are happily settled.


तसेच मराठी मजकूर हा या इंग्रजी शिलेवरून ट्रान्सलेशन केलेला आहे तो पुढीलप्रमाणे:-


दोन हजार वर्षांपूर्वी नवगाव किनाऱ्याजवळ जहाजाबरोबर बुडालेल्या बेने-इस्राएल ज्ञातीतील पूर्वजांची ही दफनभूमी आहे. नवगावहून बेने-इस्राएल जात संपूर्ण भारतभर पसरली. प्रारंभी हे लोक तेल गाळणे व शेती हे व्यवसाय करीत. कालांतराने त्यांनी छोटे उद्योगधंदे, सेनादल, सरकारी नोकरी करून मोठे हुद्दे मिळवले. ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताचे नागरिक असून त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला होता. १९४८ च्या इस्राएल च्या निर्मितीनंतर त्यातील बहुसंख्य लोक इस्राएलला जावून आनंदाने राहत आहेत.


'नवगाव' येथे असलेल्या 'ज्यू' कबरी.

तसेच या स्तंभावर आपल्याला 'हिब्रू' भाषेमध्ये देखील हा मजकूर बघायला मिळतो. असे हे 'ज्यू' लोकांचा महत्वाचा वारसा असणारे 'जेरुसलेम गेट' महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. 'नवगाव' येथील 'जेरुसलेम गेट' हे लवकरच जागतिक पर्यटन स्थळ म्हणून देखील विकसित केले जाणार आहे. 'महाराष्ट्र' आणि 'इस्त्राईल' यांच्या संस्कृतिचे एकत्रित दर्शन घडवणारे महत्वाचे प्रतिक म्हणून 'जेरुसलेम गेट' ओळखले जाते. दोन संस्कृती एकमेकांना किती चांगल्या प्रकारे मदत करतात याचे उत्तम उदाहरण असलेले 'जेरुसलेम गेट' हा महाराष्ट्राचा तसेच भारताचा एक महत्वाचा सांस्कृतिक वारसा आहे. अश्या या 'जेरुसलेम गेटला' नक्कीच एकदा तरी भेेेट दिली पाहिजे.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) Gazeteer of Bombay Presidencey Bombay:-  Government Central Press, 1883.

२) Gazeteer of Bombay Presidencey Kolaba:- The Executive Editor And Secretary, Gazetteers Department, Government Of Maharashtra, Mumbai, 1883.


कसे जाल:-

पुणे - लोणावळा - खोपोली - पेण - पोयनाड - नवगाव.  

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा

 

 

Share the post

अलिबाग जवळील 'जेरुसलेम गेट'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×