Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

ताम्हिणी गावाची 'विंझाई देवी'


आठवडा संपत आला कि प्रत्येकजण कुठे ना कुठे जायचा प्लॅन ठरवत असतो. भटक्यांना तर सांगावे लागतच नाही कारण त्यांचा एखादा आडवाटेवर असलेला किल्ला किंवा एखादी अनवट लेणी भटकण्याचे ठरलेले असतेच. परंतु तुम्हाला स्वतःच्या कुटुंबासोबत निवांत क्षण घालवायचे असल्यास पुण्यापासून अगदीच जवळ असलेले ताम्हिणी गावातील 'विंझाई देवीचे’ सुंदर मंदिर नक्कीच पाहण्यासारखे आहे. 'ताम्हिणी' गावातील 'विंझाई देवीचे' सुंदर मंदिर हे पश्चिम घाटातील संवेदनशील अधिवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आहे.

बऱ्याचदा पावसाळ्यात मनसोक्त भिजण्यासाठी पर्यटक या 'ताम्हिणी' घाटाच्या दिशेने गाड्या वळवतात परंतु या सुंदर आणि शांत असलेल्या 'विंझाई देवीच्या' मंदिरात फारसे लोक कधीही फिरकत नाहीत. अश्या या सुंदर मंदिरात जायचे असल्यास स्वतःची गाडी कधीहि असलेली उत्तम पुणे मार्गे चांदणी चौकातून ताम्हिणी गाव हे अगदी ४५ मिनिटाच्या अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसले आहे. पुण्यामधून मुळशी आणि आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी एस.टी बस या स्वारगेट स्थानकातून सुटतात हा देखील एक पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. ताम्हिणी घाटामुळे पुण्यामधून कोकणात जायला उत्तम सोय झाली हे मात्र नक्की याच वाटेवर शांत आणि निवांत असलेल्या ताम्हिणी गावामध्ये हे 'विंझाई देवीचे मंदिर' डोंगराच्या पायथ्याला आहे. 

ताम्हिणी गावामध्ये हे 'विंझाई देवीचे मंदिर' डोंगराच्या पायथ्याला आहे. 

गावाच्या समोरच्या बाजूला पसरलेला मुळशी धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि ताम्हिणी गावाच्या मागच्या बाजूला सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगा आणि यांच्या मध्ये वसलेले सुंदर आणि छोटेसे 'ताम्हिणी' गाव हे मुळातच सुंदर आहे. या 'ताम्हिणी' गावात आल्यावर आपल्याला पहिले दर्शन होते ते गावातल्या ग्रामदेवतेचे म्हणजे ‘विंझाई देवीचे’ अत्यंत सुंदर असलेल्या ह्या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे. 'ताम्हिणी' गावाचे ग्रामदैवत असलेली 'विंझाई देवी' हि 'चांद्रसेनीय कायस्थ प्रभू' या समाजातील अनेक लोकांची कुलदेवता  आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास ४३८ मीटर उंचीवर असलेले हे सुंदर मंदिर नक्कीच मनाला भुरळ पाडते. मंदिराच्या जवळूनच स्वच्छ आणि निर्मळ पाण्याचा ओढा हा जवळपास बारमाही आहे. हा डोंगरातून वाहत येणारा ओढा आपल्याला नक्कीच आकर्षित करतो.   

श्री विंझाई देवस्थान मंडळाची १९७३ मध्ये स्थापना झाली. 'विंझाई देवीच्या' मंदिराचा जीर्णोद्धार हा दिनांक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर करण्यात आला. देवीसाठी मंडळ आणि भक्तांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला आणि २०००मध्ये सुंदर मंदिर साकारले. मंदिराला पाच कळस असून, आतील भिंती, गाभारा संगमरवरी आहे. ह्या सुंदर मंदिराच्या आत जावून ताम्हिणीच्या या 'विंझाई देवीच्या' तेजस्वी रूपाचे दर्शन घेऊन निवांत मंदिराच्या गाभाऱ्यात बसून एकांत अनुभवणे म्हणजे पर्वणीच असते. 

विंझाई देवी मंदिराचा नव्याने बांधलेला सभामंडप. 

ताम्हिणी गावाची हि 'विंझाई देवीची' मूर्ती अत्यंत देखणी आहे. 'विंझाई देवीची' हि मूर्ती महिषासूर मर्दिनी रुपामध्ये असून मूर्तीची उंची हि जवळपास अडीच फुट उंच आहे. 'विंझाई देवीच्या' वरच्या उजव्या हातामध्ये खड्ग, वरच्या डाव्या हातामध्ये ढाल आपल्याला पाहायला मिळते तर खालच्या उजव्या हाताने महिषासूराच्या पाठीत तलवार खुपसलेली आपल्याला बघायला मिळते तसेच खालच्या डाव्या हाताने महिषासुराचे तोंड दाबलेले आपल्याला बघायला मिळते. देवीचा उजवा पाय महिषासुराच्या पाठीवर असून आणि  डावा पाय जमिनीवर घट्ट रोवलेला आहे तसेच पदर खोचलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो, मस्तकावर मुकूट असून, मोकळे सोडलेले केस आपल्याला पाहायला मिळतात. अशी प्रसन्न मूर्ती आपल्याला गाभार्‍यात पाहायला मिळते.

 'विंझाई देवीची' हि मूर्ती महिषासूर मर्दिनी रुपामध्ये आहे. पूजा होण्यापूर्वी हे छायाचित्र घेतलेले आहे.

देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूने आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला ताम्हिणी गावातील एक सुंदरशी देवराई देखील खुणावते. मंदिराच्या मागून एका छोट्या ओढ्याच्या शेजारून या सुंदर निसर्गरम्य 'देवराई' मध्ये जायचा रस्ता आहे. या वाटेने फेरफटका मारताना आजूबाजूला उडणारे असंख्य फुलपाखरांच्या जाती आपल्याला खुणावतात तसेच ज्यांना कोणाला ताम्हिणी येथील अधिवासाचा अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम असलेली जागा म्हणजे ‘ताम्हिणीची देवराई’ होय. इथला उत्तम निसर्ग बघायचा असेल तर पावसाळा संपल्यावर ताम्हिणीच्या 'विंझाई देवीच्या' दर्शनाला नक्की यावे आणि येथील निसर्गाचा नितळपणा आणि येथील झाडांच्या हिरवाईचा मनोसोक्त आनंद लुटावा. तसेच हाताशी जर बराच वेळ असेल तर ताम्हिणी घाटातून तुम्ही ‘प्लस व्हॅली’ पॉईंट येथे नक्की जाऊ शकता आणि निसर्गाचे एक सुंदर रूप न्याहाळू शकता आणि नव्या दमाने आपल्या घरी परतू शकता.

'ताम्हीणीची देवराई' आणि देवराईमधील 'विंझाई देवीचे' मूळ ठाणे. 
______________________________________________________________________________________________
कसे जाल:-
स्वारगेट - म्हात्रे पूल - कर्वे रोड - कोथरूड - चांदणी चौक - पिरंगुट - पौड - मुळशी - ताम्हिणी.     
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.


______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा 



Share the post

ताम्हिणी गावाची 'विंझाई देवी'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×