Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अंधेरी येथील भौगोलिक आश्चर्य 'गिल्बर्ट हिल'


आपला महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या देखील अतिशय संपन्न आहे. जसा महाराष्ट्राला इतिहासाचा वारसा आहे तसाच भौगोलिक वारसा देखील महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. असाच एक महत्वाचा भौगोलिक वारसा आपल्याला पाहायला मिळतो तो संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी 'मुंबई' मध्ये. मुंबई मधील 'अंधेरी' हे इतिहास कालीन गाव. या गावाचा उल्लेख हा आपल्याला 'महिकावतीची बखर' यामध्ये देखील आढळून येतो याच मुंबईमधल्या आजच्या महत्वाच्या भागामध्ये 'गिल्बर्ट हिल' नावाचे एक भौगोलिक आश्चर्य आपल्याला पाहायला मिळते. मुंबई मधील 'अंधेरी' मधील भूशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले 'गिल्बर्ट हिल' हा भाग याच भौगोलिक आश्चर्यामुळे प्रसिद्ध आहे.


'अंधेरी' मधील भूशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले 'गिल्बर्ट हिल'.

'मुंबई' शहरामध्ये जश्या प्राचीन लेणी, मंदिरे, आणि किल्ले आहेत तसेच 'मुंबई' या मायानगरी मध्ये भौगोलिक आश्चर्यदेखील मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यातील जी काही भौगोलिक आश्चर्य हि विकास काम आणि मोठ्या प्रमाणात शहरीकरण यामध्ये  शिल्लक राहिलेली आहेत त्यापैकी एक महत्वाचे भूशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले 'गिल्बर्ट हिल' हे मुंबईच्या जडणघडणीतला अत्यंत महत्वाचा पुरावा ठरतो. मुंबईच्या गर्दीत हरवून गेलेले हे आश्चर्य पाहायचे असेल तर आपल्याला अंधेरी मधील भवन्स कॉलेज गाठावे लागते त्याच्यामागे जी पाषाणस्तंभीय टेकडी आपल्याला पाहायला मिळते तेच हे मुंबईमधील भौगोलिक आश्चर्य असलेले 'गिल्बर्ट हिल'.

'गिल्बर्ट हिल' हि पाषाणस्तंभीय टेकडी साधारणपणे २०० फुट (६१ मीटर) उंच असून या पाषाणस्तंभीय टेकडीवर जाण्यासाठी आता पायऱ्या देखील बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 'अंधेरी' मध्ये असलेली 'गिल्बर्ट हिल' येथे 'स्तंभित बसाल्ट म्हणजेच कॉलमनर बसाल्ट' हा भूशास्त्रातील दुर्मिळ असलेला एक महत्वाचा नमुना येथे पाहायला मिळतो. 'गिल्बर्ट हिल' येथील हि टेकडी कशी तयार झाली हे देखील आपल्याला पाहणे याठिकाणी महत्वाचे ठरते.

'गिल्बर्ट हिल' वरील मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. 

साधारणपणे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी मेसोझोइक कालखंडात पृथ्वीवर जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा त्यामधून 'मोल्टेेन' नावाचा लाव्हारस बाहेर पडला आणि तो जवळपास ५० हजार किलोमीटर अंतरावर पसरत गेला. जसजसा हा पसरलेला 'मोल्टेेन' नावाचा लाव्हारस थंड होत गेला तसातसा ऊन, वारा, आणि पाऊस यांचा आणि वातावरण बदल याचा परिणाम या 'मोल्टेेन' लाव्हारसावर होत गेला यामुळे येथील 'गिल्बर्ट हिल' येथील दगडावर षटकोनी उभे स्तंभ तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 'गिल्बर्ट हिल' हि टेकडी याच कालखंडाचे खूप उत्तम उदाहरण आहे. 

'गिल्बर्ट हिल' या टेकडीचे मूळ नाव 'पदन टेकडी' असे आहे असे काही ठिकाणी उल्लेख मिळतात परंतु या टेकडीचे सर्वमान्य नाव हे 'गिल्बर्ट हिल'  असेच आहे. या संपूर्ण टेकडीचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य असे देखील आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे या टेकडीच्या स्तंभाच्या बाजूला छोटा सुरुंग देखील लावला तरी संपूर्ण स्तंभ हा खाली कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो. 'गिल्बर्ट हिल' येथील टेकडीशी संबंधित असलेल्या 'स्तंभीय बसाल्ट' याचा अभ्यास हा अमेरिकेतील प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ 'ग्रूव्ह कार्ल गिल्बर्ट' यांनी केला परंतु याबद्दल काही ठोस पुरावे मात्र मिळत नाहीत कि या टेकडीला 'गिल्बर्ट हिल' हे नाव कधी दिले. तसेच १९५२ साली 'जीओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया' यांनी 'गिल्बर्ट हिल' या टेकडीला जीओलॉजी वारसा स्थळ म्हणून देखील घोषित केलेले आहे. तसेच २००७ साली 'गिल्बर्ट हिल' या टेकडीला मुंबई महानगरपालिकेचा द्वितीय श्रेणीचा जागतिक वारश्याचा दर्जा देखील दिला आहे.

गिल्बर्ट हिल टेकडीवरील 'गावदेवी दुर्गामाता मंदिर'

सध्या मुंबईच्या शहरीकरणामुळे भौगोलिक वारसास्थळ असलेले 'गिल्बर्ट हिल' देखील वाचलेले नाही साधारण २०१५ साली येथील एका बांधकाम व्यावसायिकाने 'गिल्बर्ट हिल' या टेकडीला पाडायचा देखील प्रयत्न केला होता. परंतु स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध देखील केला तसेच या टेकडीच्या माथ्यावर स्थानिक लोकांचे लोकदैवत असलेले 'गावदेवी दुर्गामाता मंदिर' देखील असल्यामुळे हे भौगोलिक आश्चर्य जपण्यास नक्कीच स्थानिकांची खूप मोठी मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. 

अमेरिकेतील प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ 'ग्रूव्ह कार्ल गिल्बर्ट' यांचे नाव या टेकडीला दिले गेले.
छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.

असे हे अत्यंत महत्वपूर्ण भौगोलिक आश्चर्य वारसा स्थळ असलेली 'गिल्बर्ट हिल' हि टेकडी नक्कीच मुंबईत असलेले एक महत्वाचे वारसास्थळ असून आपण या भौगोलिक वारसा स्थळाला आपल्या मुलांसह भेट देऊन तेथील भूगोल समजून घ्यावा आणि आपल्या मुलांमध्ये भूगोलाची आवड नक्की निर्माण करावी म्हणून अश्या या भौगोलिक आश्चर्य स्थळ असलेल्या 'गिल्बर्ट हिल' या टेकडीला नक्की भेट द्या.

'गिल्बर्ट हिल' येथे 'स्तंभित बसाल्ट म्हणजेच कॉलमनर बसाल्ट' हा भूशास्त्रातील दुर्मिळ असलेला एक महत्वाचा नमुना येथे पाहायला मिळतो.

_________________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) Gazeteers of Bombay Prsidency Bomabay City and Island Vol 1, 1909.

कसे जाल:-

छत्रपती शिवाजी टर्मिनस  – दादर  – अंधेरी – भवन्स कॉलेज.  

_________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

एक  छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.
  लिखाण आणि चार छायाचित्र  © २०१९ महाराष्ट्राची शोधयात्रा         

Share the post

अंधेरी येथील भौगोलिक आश्चर्य 'गिल्बर्ट हिल'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×