Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

बाणेर गावातील 'बाणेश्वरची लेणी'


पुणे शहर आणि परिसर फार झपाट्याने दिवसेंदिवस विकसित होत आहे. आता तर पुणे या विद्येच्या शहरामध्ये मेट्रो देखील दाखल झाली आहे. एवढ्या झपाट्याने शहराचा विकास चालू असताना देखील पुणे शहराच्या परिसरात प्राचीन वारसा आपले अस्तित्व आजही दाखवत आहे. पुणे शहर हे चारही बाजूने टेकड्यांनी वेढलेले आहे. या टेकड्यांनी वेढलेल्या पुणे शहरामध्ये काही लेण्या खोदल्या गेल्या या लेण्यांमध्ये 'पाताळेश्वर' ची लेणी सर्वश्रुत आहेच. तसेच पुणेकरांच्या लाडक्या 'पर्वती' येथील टेकडीवर देखील काही लेण्या खोदल्या गेल्या या लेण्यांसारखीच एक लेणी हि खोदली गेली ती पुण्याच्या सध्या झपाट्याने विकसित होणाऱ्या 'बाणेर' या गावी.

बाणेर गावातील तुकाई देवी मंदिर या मंदिराच्या थोड्याश्या खालच्या बाजूला 'बाणेश्वरची लेणी' आहेत.

पुणे आणि परीसरामध्ये इतिहासाच्या बऱ्याच पाउलखुणा लपलेल्या आहेत. या पाउलखुणांचा मागोवा घेताना आपल्याला खूप गोष्टी पाहायला मिळतात. बऱ्याचदा असेही होते कि या इतिहासाच्या  पाउलखुणा आपल्याजवळ असून देखील त्या माहिती नसतात किंवा आपले त्या ठिकाणी जाणे होत नाही त्यापैकीच बाणेर येथील 'बाणेश्वरचे गुंफा मंदिर' किंवा 'बाणेश्वरची लेणी' हे ठिकाण होय.

बाणेश्वर लेणीच्या आवारात असलेली दगडी दीपमाळ आणि समाधीशिळा व वीरगळ.

लेणीच्या आवारात असलेली हि मूर्ती कोणाची आहे हे समजत नाही.

आता काही जणांना हा देखील प्रश्न पडेल कि आम्ही बाणेर ला कितीवेळा जातो किंवा बाणेर पासून जवळ राहतो पण कोणती लेणी वगैरे तेथे आम्ही पाहिली नाही. बाणेर ची हि लेणी वसलेली आहे खुद्द 'बाणेर' या मूळ गावठाणात. बाणेर गावामध्ये आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एक टेकडी दिसते या टेकडीवर जिथे सध्या नव्याने बांधलेल्या 'तुकाईदेवी' मंदिराच्या टेकडीच्या मधल्या भागात काही लेण्या खोदलेल्या आहेत. हेच ते बाणेर येथील. 'बाणेश्वरचे लेणे'.

बाणेश्वर लेणीच्या खोदलेल्या पायऱ्या आणि लेणीची रचना.

हे छोटेखानी लेणे पाहायचे असेल तर पुणे येथून बाणेर गाव गाठावे. हे बाणेर गाव या टेकडीच्या पायथ्याशी वसलेले असून या बाणेर गावामध्ये ग्रामदैवत 'भैरवनाथाचे' सुंदर देऊळ देखील पाहायला मिळते. या भैरवनाथ मंदिराच्या येथे आपल्याला गाडी लावता येते. येथून एक चिंचोळा रस्ता आपल्याला 'बाणेश्वर लेण्यांकडे' घेऊन जातो. तसेच भैरवनाथ मंदिराच्या येथे एक फलक देखील लावला आहे त्याच्यावर एक व्यवस्थित प्रसिद्ध लोकवाक्य आपल्याला लिहिलेले पाहायला मिळते ते म्हणजे 'पांडवकालीन बाणेश्वर लेणी' या फलकाच्या डावीकडून दोन नवीन बांधण्यात आलेल्या बिल्डिंग च्या मधल्या चिंचोळ्या वाटेने आपण वरती जातो. येथे सर्व पायऱ्या या सिमेंटने बांधलेल्या आहेत अगदी सहज पाच एक मिनिटात आपण थेट उभे राहतो ते 'बाणेश्वर गुंफा' मंदिरासमोर.    

'बाणेश्वरची लेणी' 

या मंदिराच्या आवारात एक समाधी शिळा आणि एक वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात तसेच तेथे एक दगडी रचलेली दीपमाळ देखील आहे. त्याच्यावर एक समाधीशिळा कोरून ठेवलेली आहे. या 'बाणेश्वर' लेणी ला तीन ठिकाणी लोखंडी गेट (ग्रिल) बसवलेले असून दुपारच्या वेळेस तो बंद असतो जर तुम्ही तिथे उजव्याबाजूस एक गुरव राहतात त्यांच्या कडे चावी मागितली आणि सांगितले कि मंदिर पाहायचे आहे तर ते किल्ली आपल्याला देतात.

 झरा असलेली पहिली खोली.

यातील मधले लोखंडी गेट (ग्रिल)  उघडे असते. हे लोखंडी गेट (ग्रिल) मधून आपण तीन खोदलेल्या पायऱ्यांनी खाली उतरावे येथून खाली उतरले असता आपण 'बाणेश्वर लेण्यांमध्ये' प्रवेश करतो. या 'बाणेश्वर लेण्यांमध्ये' तीन खोल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी मधल्या खोलीमध्ये भगवान शंकराची पिंड आहे. डाव्या बाजूच्या खोलीमध्ये मोठा पाण्याचा झरा असून त्याच्यामध्ये सध्या लोकांनी काही पैसे वाहिलेले आपल्याला बघायला मिळतात. तिसरी गुहा मात्र बंद अवस्थेत पाहायला मिळते. हे लेणे साधारणपणे पाताळेश्वर आणि पर्वतीच्या लेण्यांच्या काळात खोदली असावी असे वाटते.

विष्णू आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती.

या बाणेश्वराच्या लेणी मध्ये डाव्या बाजूच्या कोनाड्यात जवळपास ५ फुट उंच असलेल्या वीरगळ देखील काच लावून बंदिस्त केलेल्या बघायला मिळतात. तसेच एका खांबावर गणपती कोरायचा प्रयत्न केलेला दिसतो. सध्या या गणपतीला शेंदूर फासण्यात आलेला आहे. या मंदिरात नंदी, गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या ग्रॅनाईट मध्ये घडविलेल्या सुबक मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. या लेण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे खडक संपूर्ण खोदुन केलेली वाट मात्र थक्क करते. लेण्यांमधील खांब व्यवस्थित घडवलेले आपल्याला बघायला मिळतात.

खांबावर कोरलेला गणपती.

प्राचीन पांडव लेणे असे लिहिलेली लेणी मधील पाटी.

हे सगळे पाहून आपले मन मात्र आश्चर्यचकित होते हे सुंदर आणि छोटेखानी 'बाणेश्वर लेणे' देखणे आहे. खूप काही कलाकुसर जरी या लेण्यात नसली तरी त्याचे खांब आणि खडक संपूर्ण खोदुन केलेली वाट मात्र आपल्याला थक्क करतात. असे हे पुण्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारे 'बाणेश्वर लेणे' अगदी पुणे शहरामध्ये आहे याची माहिती मात्र खूप कमी जणांना असते. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा हे छोटेखानी 'बाणेश्वर लेणे' बघायला एकदा तरी जरूर या बाणेर येथील 'बाणेश्वर लेण्याची' वाट नक्की पकडावी.         

मधल्या खोली मधील 'बाणेश्वरची लेणी' मधले बाणेश्वर शिवलिंग.
_________________________________________________________________________________

कसे जाल:-

पुणे (शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन) – बाणेर 
_________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. लिखाण आणि छायाचित्रे  © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा


This post first appeared on महाराष्ट्राची शोधयात्रा, please read the originial post: here

Share the post

बाणेर गावातील 'बाणेश्वरची लेणी'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×