Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

कथा ब्राम्ही लिपीची...!!!


महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याचदा डोंगर भटकंती दरम्यान इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत असतो या पाऊल खुणा शोधत असताना आपल्या नजरेला बऱ्याच गोष्टी येत असतात जसे कि वीरगळ, गद्धेगाळ, कोरीव लेण्यांमध्ये असलेले महत्वाचे शिलालेख तसेच किल्यांवर आढळणारे शिलालेख हा सर्व ऐतिहासिक ठेवा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. 

अश्याच एक ऐतिहासिक ठेवा म्हणजे 'ब्राम्ही लिपी' मधले शिलालेख हे शिलालेख आपल्याला बऱ्याचदा लेण्यांच्या भिंतीवर, लेण्याच्या टाक्यावर, लेण्याच्या विहारात किंवा खाबांवर कोरलेले आपल्याला मिळतात अश्या या ब्राम्ही लिपीच्या शिलालेखांमधून आपल्याला दोन हजार वर्षापूर्वीची संस्कृती समजण्यास मदत होते किंवा त्या काळातील एखाद्या व्यक्तीचे नाव समजायला आपल्याला मदत होते अश्या या ब्राम्ही लिपीचा इतिहास देखील मजेशीर आहे. ही ब्राम्ही लिपी वाचण्याचा  शोध कसा लागला  हे समजणे देखील खूप महत्वाचे आहे.
एखाद्या लेण्यामध्ये तसेच जे कोणतेही आजच्या काळामध्ये ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले लेख सापडतात ते वाचायचे कसे किंवा त्याचा अर्थ काय या गोष्टीचा शोध हा इ.स. १८३४ साली ईस्ट इंडिया कंपनी मध्ये धातू तपासनीस म्हणून काम करणाऱ्या 'जेम्स प्रिन्सेप' या इंग्लिश माणसाने सांगितले आहे. या ब्राम्ही लिपीचा इतिहास हा फार मजेशीर आहे. 

इ.स.पू. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या प्रदेशावर ग्रीक राजे राज्य करीत होते या ग्रीक राजांनी स्वतःची स्वतंत्र नाणी पाडली होती. या ग्रीक कोरीव नाण्यांवर या ग्रीक राजांनी आपली नावे ही ग्रीक लिपी आणि ब्राम्ही लिपी मध्ये लिहिली होती 'बॅॅसिलीऑस पॅॅन्टॅॅलिआॅॅन' या नावाबरोबर या राजाने आपले नाव 'रजने पतलवष' असे नाव ब्राम्ही लिपी मध्ये लिहिले होते हे नाण्यावरून आढळून आले आणि ब्राम्ही लिपी वाचता यायला लागली. 

या ब्राम्ही लिपीच्या वाचनाची उदाहरणे द्यायची झाली तर शाहबाज गढी येथील पियदसिच्या लेखामध्ये 'अंतियोक' म्हणजे सिरीयाचा 'दुसरा अँँन्टिओकस' आहे असे आढळून येते तसेच तुरमाय म्हणजे इजिप्त या देशाचा राजा 'टॉलेमी' हा असून 'अलीकसुंदर' हा इपिटरचा 'अॅॅलेक्झांडर' होय हे जेम्स प्रिन्सेप याने सांगितले आहे हे सर्व दुसऱ्या देशातील राजे भारतामधील महान 'सम्राट अशोक' याचे समकालीन होते. 

या ऐतिहासिक ब्राम्ही लिपीमधून एका अरेबिक लिपिशिवाय भारतामधील सगळ्या लिपी विकसित झाल्या आहेत म्हणूनच ब्राम्ही लिपी ही संपूर्ण लिपींंची जननी आहे असे आपल्याला दिसून येते. ब्राम्ही लिपीचा महत्वाचा जुना पुरावा म्हणजे 'सम्राट अशोकाचे' प्रस्तर लेख मानले जातात. यातला एक महत्वाचा प्रस्तरलेख हा महाराष्ट्रातील मुंबई जवळील सोपारा म्हणजेच आजचे 'नाला सोपारा' येथे आढळून आला हा महत्वाचा पुरावा मुंबई मध्ये राजा शिवछत्रपती संग्रहालय येथे ठेवलेला आहे. 
अशोकाने हा लेख सोपारा येथे कोरण्याचे कारण म्हणजे सोपारा हे अशोकाच्या काळापासून महत्वाचे बंदर होते हे दिसून येते. तसेच नाणेघाटाच्या गुहेमध्ये जे नागणिकेचे शिलालेख आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासातले ब्राम्ही लिपीच्या प्राचिनतेचा पुरावा देणारे पहिले शिलालेख मानले जातात. अशी ही ब्राम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संस्कृतीची महती करून देणारी जननी आहे. असा हा ब्राम्ही लिपीचा रंजक इतिहास आपल्याला ही महत्वपूर्ण ब्राम्ही लिपी समजून घेतल्यावर आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्राचीन इतिहासाशी नाळ जोडायला मदत होते.                     

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा.

Share the post

कथा ब्राम्ही लिपीची...!!!

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×