Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर

आधुनिक म्हणजे नेमके काय?

जुन्या चालीरीतींना डावलणे, परंपरा मोडणे, जे वर्षानुवर्षे चालत आले आहे त्याला विरोध  दर्शविणे…काहीतरी वेगळं नवीन करणं म्हणजे अधुनिकता का?

खरं म्हणजे आधुनिकता याचा अर्थ कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणं…त्यातली भूमिका, कारणं, आणि काळ याचा अभ्यास करुन बदलत्या काळाशी, वातावरणाशी, जीवनपद्धतीशी  त्याची सांगड घालून

प्रथेचं उचित नूतनीकरण करणं म्हणजे आधुनिकीकरण…. हा अर्थ मला अधिक पटतो…आधुनिकीकरण म्हणजे उच्चाटन नव्हे– तर पुनर्बांधणी.

वटपौर्णिमा ह्या मुख्यत्वे स्रियांच्या सणाविषयी काही भाष्य करताना हा विचार महत्वाचा वाटला…

पारंपारिक पद्धतीची वटपौर्णिमा म्हणजे ,पत्नीने पतीला दीर्घायुष्य मिळावे,आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून केलेले व्रत !! मग उपास, वडाची पूजा ,वडाभोवती दोरा गुंडाळत मारलेल्या फेर्‍या..वगैरे वगैरे.. मग त्याच्याशी जोडलेली सत्यवान सावित्रीची कथा…

वास्तविक हिंदू संस्कृतीत कुठल्याही सणाशी , व्रताशी कुठलीतरी  कथा ही असतेच…मात्र या कथांच्या माध्यमातून एक शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन असतो. तो समजून घेणं म्हणजे आधुनिकता..

आणि आजची स्त्री हा विचार करते. कारण ती शिक्षित आहे. विचारक्षम आहे. परंपरेतला अंधश्रद्धेचा ,फोलपणाचा भाग ती डावलू शकते…आजची स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी भले उपास करणार नाही, विधीपूर्वक वडाची पूजा करणार नाही, सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करणार नाही ,पण या मागचं सौंदर्य आणि महत्व नक्की जपेल. तेही डोळसपणे…

वटवृक्षाच्या नैसर्गिक सुंदरतेचे , उपयुक्ततेचं या सणाशी , व्रताशी घनिष्ठ नातं आहे.पर्यावरणाचा महान संदेश यातून दिला आहे…हा वड सावली देतो, भरपूर प्राणवायू पुरवतो, पक्षी पांखरं पांथस्थ यांचा आधारवड आहे. याची मुळं मातीची धूप होऊ देत नाहीत .आणि हे झाड दीर्घायुषी असतं..त्याची पूजा ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते..त्याचं जतन करण्याची शपथ घेणं असतं..आणि ही जागरुकता असणं ही काळाची गरज आहे…आजची स्त्री हे जाणते…वृक्षसंवर्धन ही हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाची मूळ संकल्पना आहे. आणि ती पाळणं म्हणजेच नवा विचार रुजवणं … मग बाकीच्या बाबी या केवळ मौज, हौस, गंमत  करमणुक — ‘साजरीकरण’ या सदरात कुठल्याही अंधश्रद्धेविना जाऊ शकतात…

आजही एखादी व्यक्ती जीवघेण्या आजारातून बरी झाली की आपण त्याच्या पत्नीविषयी चटकन् म्हणतो, “..खरंच सावित्री आहे ती..म्हणूनच तो मरणाशी झुंज जिंकला….”

… इथे सावित्री ही प्रतिकात्मक असते. ती शक्ती असते. सकारात्मकता असते.

आजच शेजारचा अमोल म्हणाला.,” गेले दहा दिवस सीमा आजारी आहे. तिला विश्रांतीची गरज आहे. .मी घर सांभाळू शकलो नसेल तिच्याइतकं..पण मनापासून केलं. आज साबुदाण्याची खिचडी तिचा वटपौर्णिमेचा उपास म्हणून बनवलीही… आणि काकू आज मीही उपास केला..का विचारा..

तमाम सावित्र्यांना मी आज मानवंदना दिली…स्त्रीमधे नैसर्गिक त्याग, सहनशक्ती ,संयम हे गुण असतात. म्हणून व्रते ही स्त्रियांची मक्तेदारी..पण आज मी तिच्या वतीने हे व्रत करुन स्त्रीत्व काय असतं याचा यत्किंचित अनुभव घेतला…”

— अमोलचं हे वक्तव्य ऐकून वाटलं,हे आधुनिकत्व.. नव्या विचारधारेची  अर्थपूर्ण रुजवण ..

हे संस्कृतीला दिलेलं डोळस वळण… एक  सुसंस्कार…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×