Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – विविधा ☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

25 सप्टेंबर…बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस निमित्त :

 विविधा 

☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान

‘पाहू चला रे हिरवे डोंगर, हिरवी झाडी,

कोकणात आली बघा ही रेल गाडी.’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1996 साली सर्वप्रथम कोकण रेल्वे अवतरली. तिच्या स्वागतासाठी लिहिलेली ही कविता! कोकण रेल्वेच्या रूपाने एक नवा अध्याय कोकणवासियांच्या आयुष्यात सुरू झाला. हा अध्याय बॅ. नाथ पै यांच्याच स्वप्नाचा एक भाग होता.  बॅ. नाथ पै यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सत्यात उतरवले. असे म्हणतात ‘जर स्वप्न द्रष्ट्या माणसाने पाहिले तर स्वप्न सत्य बनून जाते’ असा द्रष्टा नेता म्हणजेच बॅ. नाथ पै! तत्कालीन रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण असलेल्या जिल्ह्यातील चमकता हिरा!

बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म 25 सप्टेंबर 1922 रोजी वेंगुर्ले या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ल्यातच झाले. उर्वरित शिक्षण बेळगाव आणि पुणे या ठिकाणी झाले आणि उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी कायद्याचा व संसदीय लोकशाहीचा अभ्यास केला.

बॅरिस्टर नाथ पै यांचे बालपण कोकणात गेल्यामुळे त्यांनी येथील जीवन अनुभवले होते. परशुरामाच्या या भूमीला निसर्ग सौंदर्याचे भरभरून दान लाभले असले तरी दारिद्र्याचे चटके तितकेच सोसावे लागतात, हे नाथांनी पाहिले होते. कोकणचा समृद्ध निसर्ग डोळ्यात साठवत ते लहानाचे मोठे झाले. या भूमीने त्यांना संस्काराची शिदोरी दिली. येथील समुद्रकिनाऱ्यांनी त्यांच्या विचारांना सखोलता आणि भव्यता दिली. समुद्राच्या गाजेचे गांभीर्य आणि माधुर्य त्यांच्या वाणीत होते. उंच उंच माड फोपळी त्यांच्या कर्तुत्वाला साद घालीत. त्यांनी त्यांच्या व्यक्तीमत्वाला ताठ कणा दिला, त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षेचे बीज रोवले. रानावनातील फुलांनी कलासक्तपणा दिला. एकीकडे निसर्गाचे श्रीमंतरूप आणि दुसरीकडे कमालीचे दारिद्र्य असा विरोधाभास त्यांनी लहानपणीच अनुभवला. ‘येथील लोकांचे दारिद्र्य दूर करण्याचा मी प्रयत्न करीन’ अशी त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली. बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणचे पालकत्व स्वखुशीने स्वीकारले व निभावलेही!

बॅरिस्टर पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मायदेशात परत आल्यावर नाथ पै राजकारणात उतरले. राजापूर मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. निवडून आल्यावर त्यांनी केवळ मतदारसंघाचेच नेतृत्व केले नाही तर देशाचेही नेतृत्व केले. लोकशाहीच्या या पुजाऱ्याचे, समाजवादाच्या वारकऱ्याचे कोकणवर फार मोठे ऋण आहे. समाजवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या या कोकणपुत्राने समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविली. कोकणविषयक प्रश्नांची जाण आणि अमोघ वाणीने त्यांनी साऱ्या मतदारांची मने जिंकून घेतली. ‘नाथ येती घरा तोची दिवाळी दसरा’ अशी कोकणवासियांची अवस्था होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सत्ताधारी पक्षाचे मोरोपंत जोशी होते. त्यांच्याशी टक्कर देणे ही सामान्य बाब नव्हती. जाणकार असे म्हणतात की, कुणकेश्वरच्या जत्रेतील जाहीर सभेने निवडणुकीच्या निकालाचे पारडे नाथांच्या बाजूने झुकविले.

सन 1957 पासून बॅ. नाथ पै सलग चौदा वर्षे राजापूर मतदार संघाचे अनभिषिक्त सम्राट होते.’ सौंदर्य उपासना म्हणजेच राजकारण’ ही त्यांची राजकारणाची व्याख्या होती. म्हणूनच ते अन्यायाविरुद्ध पेटून उठत. लोकसभेच्या त्यांच्या पहिल्या अधिवेशनात ‘तो आला, तो बोलला आणि जिंकून घेतले सारे’ अशी सभागृहाची स्थिती होती. मतदारसंघातील प्रश्नांबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर ते तुटून पडत असत. त्यांच्या समतोल, सडेतोड व अभ्यासपूर्ण भाषणांमुळे त्यांना तत्कालीन प्रधानमंत्री पं. नेहरूंनी ‘असामान्य संसदपटू’ हा किताब बहाल केला.

अमोघ वक्तृत्वाबरोबरच विवेक, प्रखर देशभक्ती आणि समाजवादावर ठाम निष्ठा असणारे नाथ दीनदलित जनतेवर अपार प्रेम करत. ‘कठीण वज्रास भेदू ऐसी’ संसदेतील विरोधी पक्षावर हल्ला करताना असलेली बॅरिस्टर नाथ पै यांची भाषा सामान्य लोकांशी बोलताना ‘मऊ मेणाहूनी मुलायम’ असे. त्यामुळे त्यांनी कोकणी माणसाच्या हृदयात राज्य केले.

संसदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी मतदार संघाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या खासदारकीच्या काळात कोकणात तीनदा वादळे  झाली. संपर्काची त्यावेळी कोणतीही साधने उपलब्ध नसताना मिळेल त्या साधनाने ते कोकणात पोहोचले. सरकारी मदत पोहोचण्यापूर्वी लोकांच्या मदतीने वादळग्रस्त भागात काम केले. वाड्यावस्त्यांवर पोचून नुकसानीची पाहणी करून राज्य शासन व केंद्र शासनाची अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. 1961 साली झालेल्या वादळात रस्ते मोकळे नसल्यामुळे नाथ पै डोक्यावर सायकल घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले. सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता ग्रामस्थांच्या सहाय्याने रस्ते मोकळे केले. पंतप्रधानांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागांना भरपाई मिळवून दिली.

दशावतार ही कोकणची लोककला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची खास ओळख. मंदिरांच्या परिसरात मध्यरात्रीनंतर लोकरंजनातून सुसंस्कारासाठी ही दशावतारी नाटके साजरी केली जातात. पौराणिक कथांवर उस्फूर्तपणे संवाद सादर केले जातात. पण त्याकाळी या दशावतारी कलाकारांची स्थिती ‘रात्रीचा राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा’ अशी हलाकीची होती. दशावतार ही कोकणची लोककला असूनही त्याला शासनमान्यता नव्हती याची नाथ पैना खंत वाटत होती. नाटककलेविषयी त्यांना जिव्हाळा होता, कलाकारांविषयी त्यांच्या मनात अआत्यंतिक प्रेम होते. दशावतारी नाटकांना व कलाकारांना शासन मदत व प्रोत्साहन देणार नसेल तर आपण द्यायला हवे, या भूमिकेतून त्यांनी दशावतारी नाटकांच्या स्पर्धा आयोजित केल्या. अजूनही या स्पर्धा घेतल्या जातात.

वेंगुर्ले ते शिरोडा या मार्गावरील मोचेमाडच्या खाडीत होडी उलटून वधू-वरांसह लग्नाचे वराड बुडाले. काही व्यक्तींचा अंत झाला. ही बातमी नाथांना दिल्लीत समजली. त्यांनी तात्काळ वेंगुर्ले गाठून मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केलेच, पण मुंबईला जाऊन बांधकाम सचिवांची भेट घेतली.” आणखी किती लोकांचे बळी गेल्यावर सरकार मोजेवाडच्या खाडीवर पूल बांधणार?” असा खडा सवाल विचारला. पंधरा दिवसात जागेची पाहणी करून फुलाचा आराखडा तयार करण्यात आला. पण जमीन संपादनासाठी अनावश्यक विलंब झाल्यामुळे नाथ यांच्या हयातीत पूल पूर्ण होऊ शकला नाही.

गणेश चतुर्थी हा कोकणवासीयांचा मुख्य सण. वाडीवस्त्यांमधून या काळात भजनांना उधाण येते. भजन हा उपासनेचाच एक मार्ग मानला जातो. कोकणात ठिकठिकाणी भजन डबलबारीच्या स्पर्धा होतात. भजनाला जात असताना कणकवली गडनदीनजीक भजनी मंडळाच्या ट्रकचा अपघात होऊन मृत्युमुखी 20 जण मृत्यूमुखी पडले. नाथांना ही बातमी समजताच त्यांनी दिल्लीहून कणकवली गाठली व अपघातग्रस्तांना मदत केली.

कोयनानगर परिसरात 11 डिसेंबर 1967 ला भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपात मोठ्या प्रमाणात हानी झाली. भूकंपाचा काही भाग देशावर तर काही भाग कोकणात होता. तरीही सरकारी मदत फारशी कोकणच्या दिशेने वळताना दिसली नाही. ही तफावत दूर करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी आवाज उठवला. स्वयंस्फूर्तीने घेतलेले कोकणचे पालकत्व त्यांनी जबाबदारीने निभावले.

कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश! पण निसर्गाची श्रीमंती अनुभवणारा कोकणी माणूस मात्र अर्धपोटी! बुद्धिमंतालाही कोकणाबाहेर पडल्याशिवाय धन सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे घरातील पुरुषमंडळी रोजगारासाठी मुंबईकडे धावत.’ मनीऑर्डर वर जगणारा जिल्हा’ अशी जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकण विकास परिषदेची स्थापना केली.

मुंबईला जोडणारा महामार्ग त्यावेळी नव्हता. त्यामुळे कोल्हापूर मार्गे प्रवास करावा लागे. त्यामुळे बोटीची वाहतूक परवडणारी होती. रहदारीच्यामानाने बंदरे अविकसित होती. बंदराची देखभाल व सुधारणा आवश्यक होती.त्यांनी कोकण किनाऱ्यावर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आगबोट कंपन्यांना भाग पाडले. बारमाही बंदरांचा शोध घेऊन बारमाही करण्यासाठी कोकण विकास परिषदेमार्फत काम केले.  बंदरांना जोडणारे रस्ते, मुंबई गोवा महामार्ग, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी नदीवर पूल व साकव यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोकण विकास परिषदेमार्फत त्यांनी समविचारी लोकांना एकत्र करून शासनावर दबाव टाकला.

बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणच्या विकासाचा ध्यास घेतला होता.  कोकणची उपेक्षा थांबवण्यासाठी ते सतत झटत असत. कोकणच्या डोक्यावरून जाणाऱ्या कोयनेच्या विजेचा कोकणवासियांना लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. काजू धंद्याच्या विकासाला चालना दिली. कोकणातील शेतीनंतरचा दुसरा प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. मासेमारी व इतर छोटे उद्योग संघटित व सहकारी क्षेत्रात सुरू करण्यास प्रोत्साहित केले. पोस्ट व तार ऑफिसे अधिकाधिक असावीत यासाठी ते प्रयत्न करत होते. ते एक सुजाण लोकप्रतिनिधी होते. त्यांनी लोकांच्या गरजांच्या प्राथमिकता निश्चित करून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची योजना केली. आदर्श लोकप्रतिनिधीचा ते एक मापदंडच बनले.

बॅरिस्टर नाथ पै यांना ‘कोकण रेल्वेचा शिल्पकार’ असे म्हटले जाते. लोकसभेत नाथ पै यांनी कोकण रेल्वेचा प्रश्न मांडला. त्यासाठी 1969 साली एक रुपयाची कपात सूचना मांडली. संसदीय लोकशाहीत एक रुपयाच्या कपातीला खूप महत्त्व आहे, पण तांत्रिक कारणाने ती फेटाळली गेली. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाथ पै यांच्याशी चर्चा करून कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाचे आश्वासन दिले. कोकणात रेल्वे धावली की विकासाची गंगाच अवतीर्ण होईल असे नाथांना वाटे. डोंगरद-यातून रेल्वे धावणे हे स्वप्नरंजनच होते. कोकण रेल्वे प्रकल्पाचा पाया घालण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या हयातीत कोकण रेल्वे कोकणात धावू शकली नाही तरी जॉर्ज फर्नांडिस व मधू दंडवते या त्यांच्या सहकाऱ्यांनी समयबद्ध कालावधीत कोकण रेल्वेचे काम पूर्ण केले.

सरकारी पडजमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करावे यासाठी नाथांनी सत्याग्रहाचे आयोजन केले. माणगाव खोऱ्यातील शेकडो एकर जमीन कसवटधारकांना वाटावी असा ठराव घेतला.

बॅरिस्टर नाथ पै आपल्या भाषणात सांगत ‘देवाने  जर मला पुनर्जन्म दिला तर त्याला मी सांगेन कोकण भूमीतच जन्म दे’. नाथ पैचं कोकणप्रेम असं बावनकशी होतं. एक माजी खासदार एवढी मर्यादित नाथ पै यांची ओळख असूच शकत नाही.  एक राजा माणूस, कोकण रेल्वेचा शिल्पकार, देशातील एक नंबरच्या मतदार संघाचा एक नंबर खासदार अशी त्यांची ओळख आहे.

शूर सैनिकाची अखेर रणांगणात, नटसम्राटाची अखेर रंगमंचावर, तशीच या तेजस्वी वक्त्याची अखेर व्यासपीठावर झाली. बेळगाव येथील भाषणानंतर ते झोपी गेले ते उठलेच नाही. कोकणी जनतेच्या काळजाचा तुकडा विधात्याने हिरावून घेतला. त्यांचे स्मरणही आपल्याला बळ देईल. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना सार्थक करील.    

तव स्मरणाने जागृत होई आज पुन्हा अभिमान

 लोकशाहीच्या नम्रसेवका तुझेच मंगलगान…

© सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – विविधा ☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – विविधा ☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×