Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

#सरसंघचालक काय म्हणाले? पूर्वार्ध

#समान_नागरी_कायदा    #हिंदू_लोकसंख्या  

अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे #सरसंघचालक #मोहन_भागवत यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की, हिंदूंना लोकसंख्या वाढवण्यापासून कोण रोखलं आहे. असाच काहीतरी अर्थ होता त्यांचा. आता माध्यमांनी त्यांचं संपूर्ण भाषण न दाखवता एवढच ‘खळबळजनक’ म्हणून सर्वत्र हेच वाक्य दाखवलं. माझ्या अंदाज्यानुसार त्यांचं म्हणणं हे ‘समान नागरी कायदा’ ह्या मुद्दयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी असावं. तसं ते असायला काही हरकत नाही. पण त्यांच्या वक्तव्याची टिंगलही झाली अन टोकाचा विरोधही झाला. पण त्यात वस्तुस्थिती आहे याकडे कोण लक्ष दिलं नाही. आरएसएस यांची विचारसरणी काय आहे हे काही लपून नाही. देशाबाद्धल त्यांची स्वतःची काही स्वप्ने आहेत ज्यासाठी ते काही धोरण अवलंबत असतात. आता ती चुकीची की बरोबर हे कोण ठरवणार? पण एक आहे की, त्यांनाही ‘हिंदुस्तान’ हा बलशाली अन प्रगत पाहायचा आहे. अर्थात त्यांच्या वाटा, मार्ग अन पद्धती वेगळ्या असतील. त्यांना केवळ दोष देऊन भागणार नाही.

नुकत्याच झालेल्या जनगणणेत काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या आहेत. त्यात असं दिसून आलं आहे की गेल्या दहा वर्षांत मुस्लिम धर्माची लोकसंख्या ०.८ टक्के वाढली आहे (वाढीचा दर असा आहे) आणि तीच हिंदूंची ०.७ टक्क्यांनी घटली आहे. खरं तर याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे. पण आपल्याकडील स्वतःला secular समजणारी माध्यमे आणि विचारवंत यावर फार भाष्य करत नाहीत. किंबहुना निखिल वागळे यांच्यासारख्या ज्ञानी माणसालाही ही टक्केवारी किरकोळ आहे असं वाटतं. हे म्हणजे अगदी धन्य आहे! सरसंघचालक ह्याच स्थितीकडे अंगुलीनिर्देश करत होते. संघ आणि हिंदुत्ववादी लोकांचं म्हणणं (याला पुरोगामी लोक आवई म्हणतात) असं आहे की, एक काळ येईल जेंव्हा हिंदुस्थानात मुस्लिमांची संख्या हिंदूंच्या बरोबर किंवा अधिक होईल. ही त्यांची भीती आहे. पण त्यात वास्तविकता नाही असं म्हणता येणार नाही. त्यासाठी फार लांब जायची गरज नाही. एकेकाळी #अखंड_हिंदुस्तान वगैरे होता ज्यात आजचा बराच आशिया खंड येतो. म्हणजे अफगाणिस्तान हा प्रदेश आधी पुर्णपणे हिंदूबहुल भाग होता, म्यानमार-ब्रम्हदेश येथेही हिंदू बहुसंख्य होते. पण आज ही मुस्लिम राष्ट्र आहेत. किंवा तेथे मुस्लिम बहुसंख्य आहेत. तेवढं लांब जायचं नसेल तर मुंबईच घ्या. मराठी माणसाचं प्रभुत्व असणार्‍या मुंबईत आज इतर भाषिक बहुसंख्य होऊन बसले आहेत. यासाठी अनेक दशकांचा कालावधी ओलांडावा लागला असला तरी हा इतिहास विसरता येणार नाही. हे सगळे गाफिल राहिले म्हणूनच ह्या गोष्टी घडल्या. जर मुस्लिम लोकसंख्या वाढीवर काही प्रतिबंध लावले नाहीत तर येणार्‍या सात-आठ दशकांत, मुस्लिम एक-एक टक्क्यांनी वाढत जातील अन हिंदू एक-एक टक्क्यांनी कमी होत जातील आणि काहीतरी विपरीत परिस्थिती होईल असा दूरचा विचार काही हिंदुत्ववादी मांडत आहेत, ज्यात तथ्य आहे. कारण सगळ्या सुधारणा हिंदूंमध्ये करायच्या असा आपल्याकडच्या ‘समाजसेवी’ अन ‘पुरोगाम्यांमध्ये’ हट्ट आहे. मुस्लिम धर्मात पुढारलेपण यासाठी फार खटाटोप होत आहेत असं दिसत नाही. कारण जास्तीची अपत्य हे कुटुंबालाच जड होतात अन आर्थिक मागासलेपण वाढत जातं हे आजच्या काळचं सत्य आहे. यासाठी समान नागरी कायदा आणून का होईना ह्या समाजात पुढारलेपण आणावं आणि समतोल राखावा अशी संघाची पहिल्यापासून मागणी आहे.

भारतात अनेक धर्म अतिशय शांतिपूर्वक अन आनंदाने जगत आहेत. पारशी लोक, जे जगातून नाहीसे होत आहेत ते भारतात आनंदाने जगत आहेत आणि भारताच्या प्रगतीत मोलाची कामगिरी बजावत आहेत. भारतीय संस्कृतीने येथे येणार्‍या प्रत्येकाला आपलसं करून घेतलं आणि उपरेपणाची जाणीव न होऊ देता येथील म्हणूनच ते जगत आहेत. आठशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानात दाखल झालेला मुस्लिम समाज, जो अनेक शतके सत्ताधारी राहिला तो समाजही आज इथलाच बनून राहिला, ही भारतीय संस्कृती आहे. म्हणूनच बहुसंख्य भारतीय मुस्लिम हा इतर देशांतील मुस्लिमांपेक्षा वेगळा राहतो, वागतो आणि जगतो. याचा उल्लेख #भालचंद्र_नेमाडे आणि #सदानंद_मोरे यांच्याकडून ऐकल्या-वाचल्याचं आठवतं आहे. आपल्या हिंदू समाजानेही त्यांना इथलाच मानला. पेशवे, हिंदू राजे यांनीही मोगली वंशज गादीवर बसवून राज्य केले पण स्वतः त्या सिंहासनावर बसले नाहीत. अगदी शहाजीराजे यांनीही निजामाच्या कुठल्यातरी आठ-दहा वर्षाच्या पोराला गादीवर बसून राज्य केलं पण स्वतः छत्रपती नाही झाले. याचा अर्थ असा की, ही सर्वांनी मुसलमानांना परका न समजता ह्याच मातीतील म्हणून स्वीकार केला होता. अर्थात, #वसुधैव_कुटुंबकम ह्या संस्कारांचं ते फलित होतं. पण हिंदू संस्कृतीचे पाईक म्हणवून घेणार्‍या आरएसएस ला हे मान्य नसावं कदाचित. कारण हिंदुस्थानात धर्माने हिंदू हेच प्रबळ, सत्ताधीश अन बहुसंख्य असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. इतिहासातील अंनुभावातून हे शहाणपण आलं आहे. कारण आशिया खंडाच्याही बाहेर पसरलेला हिंदू कमी-कमी होत आकुंचन पावला आहे.

आरएसएस ही संघटना काय राजकारण करते यावर वाद असतील, पण आपले राष्ट्र याबद्धल त्यांच्याही काही संकल्पना आहेत. भारत प्रबळ व्हावा ही तर सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे आरएसएस किंवा सरसंघचालक यांच्या वक्तव्याचा केवळ एका बाजूने अर्थ न काढता वास्तविक मंथन केलं पाहिजे. एरवी secular वादावर कोणीही भाषण करून समाजसेवी बनत आहे.

to be continue…

© 2016, Late Night Edition. All rights reserved.This post first appeared on Late Night Edition, please read the originial post: here

Share the post

#सरसंघचालक काय म्हणाले? पूर्वार्ध

×

Subscribe to Late Night Edition

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×