Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

चमचा..!

चमचा…

या जगाच्या पाठीवर असा एकही मनुष्य नसेल ज्याचा चमच्याशी संबंध आला नसेल…माणूस जन्माला आल्यापासून ते शेवटचं गंगाजल तोंडात पडेपर्यंत चमच्यांचा प्रवास माणसासोबत संपूर्ण आयुष्यभर सुरू असतो…

आपण जन्माला आलो आणि जरासं वरवरचं खायला, प्यायला लागलो की हा जो चमचा आपल्या मुखाला लागतो तो आपल्या अंतापर्यंत आपली काही साथ सोडत नाही…

या चमच्याचं खरं नाव काय हा खरा संभ्रम…म्हणजे बघा एखाद्या नावात अक्षरे कितीही असूद्यात पण प्रत्येकजण आपापल्या सोयीने त्या नावाचा उच्चार करत असतो…आता चहातला किंवा चहा मधला ‘च’ वापरून उच्चारलेला ‘चमचा’ वेगळा आणि चटक मधला ‘च’ वापरून उच्चारलेला चमचा वेगळा…वस्तू एकच पण उच्चार भिन्न…आपल्या मराठी उच्चारांची एक खासियत आहे…

चहा वरून आठवलं या चमच्याला भरपूर काम करावी लागतात बरं का?…यांच नाव जरी एक असलं तरी त्याच्या वापराचे, उपयोगाचे काम वेगवेगळे… म्हणजे बघा सकाळी चहा करताना चहा-सारखेच्या डब्यातला चमचा हा वेगळा आणि भाजी करताना हळद-मिरची-मसाला टाकायचा चमचा वेगळा…मिठाचा अजूनच वेगळा…नाव जरी एक असली तरी या चमच्याची माप मात्र वेगवेगळी…चहा-सारखेच्या चमच्याने भाजीतलं हळद मीठ मिरची प्रमाण जमणार नाही आणि हळद मिरचीच्या चमच्याने चहा बनवणे शक्य नाही…आणि हीच या चमच्याची खासियत…

औषधाचे सिरप वगैरे घेताना मोजून मापून औषध देणारा हा चमचा भात वाढताना मात्र आडवा तिडवा होत भातवाढीच्या स्वरूपात अगदी भरमसाठ माप टाकत असतो…

साधासा असला तरी हा चमचा भलेभले काम करत असतो…या चमच्याची चुलत, मावस अशी अनेक भावंडाची गोतावळ…त्याची लहान बहीण म्हणजे पळी तर मोठा भाऊ म्हणजे वरणाचा डाव…उलथने, भातवाढी, झाऱ्या इत्यादी अशी अनेक मंडळी याचेच नातेवाईक…लहान मोठा आकार आणि त्यानुसार त्याची काम त्यामुळे हा चमचा बहुगुणी झालाय…

बरं या चमच्यामध्ये पण भेदाभेद असते बरं का…म्हणजे बघा आधी असायचा आणि अजूनही आहे म्हणा तो लाकडाचा चमचा, मग आला लोखंडी चमचा, मग आला चांदीचा चमचा आणि माझ्या सारखे लोकं म्हाळसेच्या हातचं खातात तो शेवटचा अति श्रीमंत सोन्याचा चमचा…

पाश्चिमात्य देशात आणि आताशा आपल्याकडे बऱ्यापैकी रुळलेला त्याचा सावत्र भाऊ म्हणजे काटा…काटा-चमचा ही जोडगोळी आजकाल प्रत्येक टेबलावर अगदी ठाण मांडून बसलेली असते…एकमेकांशिवाय यांच काही पान हलत नाही…क्रिकेटच्या गोलाकार मैदानावर जसे दोन फलंदाज पळापळ करून एकमेकांच्या साथीने आपल्या संघासाठी धावा गोळा करत असतात तसे हे काटा चमचे गोलाकार डिशमधील वेगवेगळ्या प्रकारचे घास गोळा करत पोटातल्या खात्यात जमा करत असतात…कोणत्याही हॉटेलात आजकाल काट्या चमच्याशिवाय जेवण होऊच शकतं नाही…आणि त्यांच्या बरोबर त्यांची सावत्र बहीण सूरी ही असतेच…

चमचा हा खूप भावनिक पण असतो बरं का?…म्हणजे आपल्या घरात आपला स्वतःचा एक विशिष्ट चमचा असतो…आपण कधी बोलून नाही दाखवतं पण कळतं नकळतपणे आपला त्या एका विशिष्ट प्रकारच्या खास चमच्याशी आपोआपच ऋणानुबंध तयार होत असतो…त्या चमच्याला दुसऱ्या कोणी हात लावलेला आपल्याला अजिबात चालतं नाही…नेहमीच आपलं पोहे, शिरा, उपमा असलं काहीही खायचं असेल तर आपली नजर आपसूकचं त्या आपल्या एका विशिष्ट चमच्याला शोधत असते…तो नाही दिसला की मनात किंचित हुरहूर होते पण तो दिसला की त्याच चमच्याने खायची मजाही काही औरच असते…

बरं घरातही अनेक चमचे असतात…वेगवेगळ्या आकाराचे, लांबीचे…त्यांची कामही वेगवेगळी… म्हणजे बघा सूप प्यायला तो लांब खोलगट चमचाचं हवा असतो तर इडली सांबर खाताना इडली कापण्यासाठी एक खास कडेकडेने जराशी धार असलेलाच चमचा हवा असतो…दुधाचे पातेल्यातील साय खरवडून काढायची असेल तर लांब दांडीचा आणि जरासा पसरट चमचा हवा असतो…खाण्यातही हीच गंमत…गुलाबजाम खायला तो फावड्यासारखा आकार असलेला चमचा गुलाबजाम खायची मजा द्विगुणित करतो तर लस्सी किंवा मिल्कशेकचा स्वाद घेताना लांब दांडीचा, आकाराने निमुळता होत जाणारा चमचा त्या लस्सीचा किंवा मिल्कशेकचा शेवटचा तळाचा एक थेंबही मुखाशी घेऊन येतो…ती खरी खाण्याची मजा…पण मला एकाच गोष्टीच वाईट वाटतं की अजून खास आईस्क्रीम खायच्या चमच्याचा नीट शोध लागलेला नाही…डिशमध्ये तळाशी खूप आईस्क्रीम शिल्लक राहून वायाला जातं आणि सालं ते हॉटेलमध्ये अंगठ्याने ओरपता पण येत नाही…असो

शेवटी चमचा म्हणजे काय हो तर फक्त एक डोकं आणि एकच पाय असलेला जीव…शरीर असं विशेष त्याला काही नाहीच…एका पायावर उड्या मारत तो कित्येकांच्या जिभेवर त्याला हवे ते आनंदाने पोहोचवत असतो…रसनेची तृप्ती करत असतो…

आता एवढा कामाचा हा चमचा पण या चमच्याला बदनाम करण्यात आपण जराही कसर सोडलेली नाही…म्हणजे बघा आपण शाळेतल्या मास्तरांचा चमचा ते राजकारणातील एखाद्या मोठ्या पुढाऱ्याचा चमचा पाहिला की चमचेगिरी म्हणजे काय याची प्रचिती येते…ऑफिसमध्ये बॉसकडे हीच चमचेगिरीची मर्दुमकी करणारे, घरातल्या राजकारणात चमचेगिरीला प्रोत्साहन देतात तेंव्हा जरा वाईट वाटतं…याच चमचेगिरीमुळे या चमचा बदनाम होतो आणि लोकं म्हणतात आधी चांदीचे चमचे असायचे आता चमच्यांची चांदी होते…

बाकी माझ्या सारख्या माणसाला म्हाळसा जेंव्हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस म्हणते ना तेंव्हा जाम मजा येते…खाण्याच्या बाबतीत ते अगदी शंभर टक्के खरंय…

कधी कधी विचार येतो की समजा हे सगळे चमचे संपावर गेले तर काय होईल…आपण जरी या चमच्याला नगण्य किंवा कवडीमोल समजतं असलो तरी त्याच्या या संपाने या जगात अक्षरशः हाहाकार माजेल…आपल्या हाताच्या बोटांचा बराचसा भार हलका करणारा चमचा म्हणजे आपल्या हातासाठी एक वरदानच नाही का?…लिंबू शर्यतमध्ये आपल्या डोक्यावर लिंबाला घेऊन धावणारा हा चमचा म्हणजे समस्त मानवजातीला एक तारणहारच आहे…

चमच्याचं काम काय तर ताटातील घास तोंडापर्यंत आणायचा पण असं असलं तरीही आपल्या आई आज्जीने आपल्या हाताने आपल्याला मायेने भरवलेल्या त्या प्रेमाच्या घासाची मजा काही त्या चमच्याने भरवलेल्या घासात येत नाही…



This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

चमचा..!

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×