Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सदाशिव अमरापूरकर / Sadashiv Amarapurkar

अस्सल नगरी: सदाशिव अमरापूरकर
लेखक- श्रीपाद मिरीकर,
नगरच्या मातीत जन्मलेले व वाढलेले कीर्तिवंत रंगकर्मी सदाशिव अमरापूरकरांचे निधन नगरकरांना दुःखदायक व क्लेशकारी वाटते. आपल्यातील एक मोहरा गमावला आहे याची खंत नाट्य व सिनेप्रेमी नगरकरांतून व्यक्त होत आहे.
सदाशिव अमरापूरकर यांच्याशी आमची वडिलोपार्जित मैत्री असल्याने त्यांना मी बालपणापासून ओळखतो. लहानपणी पाहत असलेला बंडू स्वतःच्या गुणांनी पुढे जात मुंबईत एक मोठा कलाकार, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रतिष्ठीत झाला, याचा सार्थ अभिमान नगरकरांना वाटे.
कौटुंबिक पातळीवर सर्वांशी स्नेह जपणारा सदाशिव सर्वांना आपला वाटे. माझे व्याही अनिल क्षीरसागर हे सदाशिव चे जिवलग मित्र. त्यामुळे माझ्या मुलाच्या लग्न समारंभात मांडव उभारणीपासून ते शेवटपर्यंत सदाशिवने स्वतः घेतलेले परिश्रम पाहून सर्वच थक्क झाले. अकरा वर्षांपूर्वी नगरला झालेल्या ८३ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनासाठी त्याने जीवाचे रान केले होते. त्यांच्या आजारपण व निधनाच्या वृत्ताने नगरकरांच्या मनात काळजीची छाया पसरली. तिला दुःखद बातमीने विराम दिला. समस्त नगरकर रसिक अमरापूरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत.

व्यावसायिक मराठी रंगभूमी बरोबरच मराठी हिंदी सिनेसृष्टीत गेली तीस वर्षे अभिनय व दिग्दर्शनात सतत अग्रेसर राहून नगरचे नाव उंचावणारे सदाशिव अमरापूरकर हे सामाजिक बांधिलकी मानून सेवाकार्य करणारे कार्यकर्ते होते. चंदेरी दुनियेच्या झगमगाटात अनेक वर्षे राहूनही त्यांचे नगरच्या मातीवरील व लोकांवरील प्रेम अखेरपर्यंत अबाधितच राहिले.
अमरापूरकर कुटुंबीय हे मुळचे शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावचे. त्यांचे वडील (कै.) दत्तोपंत अमरापूरकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नगरला येउन व्यवसायात यश मिळविले. ते सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकही होते. वडिलांचा रोखठोकपणा, परखडपणा, परिस्थितीवर मात करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष वगेरे गुणांचा वारसा घेऊन जन्मलेल्या सदाशिवला शालेय जीवनात क्रिकेटचे मोठे वेद होते. १९५७ मध्ये नगरच्या नवीन मराठी शेलेत संमेलनासाठी बसविण्यात आलेल्या ‘पत्तेनगरीत’ या नाटकात केलेली छोटीसी भूमिका सदाशिवला रंगभूमीचा परिचय करून देणारी ठरली.
तेव्हापासून नाटके पाहण्याची आवड त्यांना निर्माण झाली. नगरला अहमदनगर एज्यु. सोसायटीच्या हायस्कूलमध्ये शिकताना त्यांचे क्रिकेटचे वेद वाढत गेले. मुख्याध्यापक द. धो. नगरकर हे स्वतः क्रिकेट, संगीत व नाटकांचे शौकीन होते. त्याकाळात शाळेत मधुकर मालशे व रासोटे हे शिक्षक संमेलनाची नाटके बसवीत. ती पाहण्याची त्यांना आवड होती. त्याच काळात अहमदनगर कॉलेजमध्ये प्रा. मधुकर तोरडमल यांच्या ‘भोवरा’, ‘सैनिक नावाचा माणूस’, ‘काळे बेट लाल बत्ती’, या नाटकांचा दबदबा निर्माण झाला होता. शाळांत परीक्षा उत्तीर्ण होऊन अमरापूरकर हे अहमदनगर कॉलेजमध्ये जाण्यापूर्वीच प्रा. तोरडमल कोलेजची नोकरी सोडून मुंबईला व्यावसायिक रंगभूमीत दाखल झाले.
नगरच्या तरुण रंगकर्मीपुढे स्वाभाविकच त्यांचा आदर्श उभा राहिला. कॉलेजच्या प्री. डिग्रीच्या पहिल्या वर्षात अमरापूरकर यांनी ‘एक रात्र अमावस्येची’ या नाटकात काम करून ‘उत्तेजनार्थ’ बक्षीस मिळवले. पुढे नाटकांचा प्रवास वेगाने सुरु झाला. क्रिकेटच्या वेडाची जागा नाटकांनी घेतली. नाट्यस्पर्धा, युवक महोत्सव यामध्ये कॉलेजच्या चार-पाच वर्षात अमरापूरकर व त्यांच्या मित्रमंडळाने २०-२५ बक्षिसे मिळविली. त्यांच्या आग्रहाखातर प्राचार्य थोमस बार्नबस यांनी पुणे विद्यापीठाचा युवक महोत्सव साजरा केला.
पुढे नगरला छबिलदास रंगमंचाच्या धरतीने सोसायटी हायस्कूलमध्ये प्रायोगिक नाटकांसाठी ‘इंटीमेट ग्रुप’ स्थापन झाला. कॉलेजच्या पाच वर्षात व पुढील सात-आठ वर्षात अमरापूरकर व सहकाऱ्यांनी २२ नाटके व १५० एकांकिका सादर केल्या. राज्य नाट्य स्पर्धेत नगरचा दबदबा निर्माण झाला. ‘छिन्न’, ‘मसीहा’, ‘काही स्वप्ने विकायची’, ही त्यांची गाजलेली नाटके.
एकलव्याप्रमाणे अभिनय व दिग्दर्शनाची साधना करीत सदाशिव अमरापूरकर यांनी वडिलांचा विरोध पत्करून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांच्या पत्नी सुनंदा (करमरकर) याही त्यांच्या ग्रुपमधील नाटकात कामे करीत. व्यावसायिक नाटके व पुढे सिनेमात पदार्पण करताना त्यांची समाज प्रगल्भ झाली होती. विजय तेंडूलकर, डॉ. लागू यांच्यासारख्या स्नेह्यांमुळे त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीच्या कार्यात सहभाग घेतला. १९८२ मधील एका नाटकाची त्यांची भूमिका तेंडुलकरांनी गोविंद निहलानी यांना दाखविली. निहलानी यांनी अमरापूरकर यांना त्याच वर्षी ‘अर्ध्यसत्य’ सिनेमात रामा शेट्टीची भूमिका दिली. या संधीचे अमरापूरकर यांनी सोने केले. तेव्हापासून हिंदी चित्रपटातील खलनायकांच्या भूमिकांची त्यांच्याकडे रीघ लागली.
पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. ते इंग्रजी चित्रपटातही भूमिका करत असत. मराठी-हिंदी चित्रपटातील अभिनय, दूरदर्शन मालिकांमधील अभिअनय व दिग्दर्शन, तसेच संत तुकारामांच्या जीवनावरील प्रायोगिक नाटक, नाट्याभिनयावरील ग्रंथलेखन, वृत्तपत्रीय लेखन, नगरच्या नाट्यसंमेलनात कार्याध्यक्ष या नात्याने केलेलेमार्गदर्शन , सामाजिक संस्थांना मदत करणे, अशी अनेक व्यवधाने ते अगदी सहजपणे सांभाळत. अधूनमधून त्यांचे परदेश दौरेही चालू असत.
नगरच्या मातीवर व माणसांवरील अतीव प्रेमामुळे ते सवड मिळताच नगरला येत व मित्रमंडळींच्या गोतावळ्यात सामील होत. पुढे उतारवयात नगरलाच येउन स्थायिक होणे त्यांना अपरिहार्य वाटे. नगरच्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाला एकेकाळी आर्थिक आधार देणारे अमरापूरकर आता आपल्यात नाहीत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
history of maharashtra(56) maharashtra (54) संत(15) समाजसुधारक/ Social Activist(15) साहित्यिक (15) महाराष्ट्रातील संत / maharashtratil sant (13) लढवय्ये / warriors (11) marathi (8) राजकारण / Political Peaoples (7) अभिनेते / Marathi Actors (6) maharashtra politics (5) sant muktabai (3) Ahmednagar (2) mahatma fule(2) nevasa (2) महाराष्ट्रातील संत /maharashtratil sant (2) Anna Bhau Sathe (1)Anna Hajare (1) Dr. babasaheb ambedkar (1)Krantisinh Nana Patil (1) Medha Patkar (1)Udayanraje Bhosale (1) ahilyabai holkar (1) baba aamte (1) bahinabai (1) bajirav peshave (1)balasaheb thakre (1) bhagvan baba (1) cricket (1)indian cricket team (1) kusumagraj (1) ramdas swami (1) sachin tendulkar (1) saibaba shirdi ke sai baba (1) sant dnyaneshwar (1) sant namdev (1)sant tukaram (1) savata maharaj (1) savitribai fule(1) shivsena (1) tatya tope (1) खेळाडू (1) छत्रपती शिवाजी महाराज / Shivaji Maharaj (1) झाशीची राणी लक्ष्मीबाई / Zashichi Rani Lakshmibai (1) तानाजी मालुसरे / Tanaji Malusare (1) दादा कोंडके/ Dada Kondake (1) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज/ sambhaji maharaj (1) महर्षी धोंडो केशव कर्वे / Maharshi Dhondo Keshav Karve (1)

Share the post

सदाशिव अमरापूरकर / Sadashiv Amarapurkar

×

Subscribe to महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History Of Maharashtra.....

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×