Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

ठाणेकरांचा आवडता 'मासुंदा तलाव'


तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे 'ठाणे शहर' हे स्वतःची एक वेगळीच ओळख आपल्याला दाखवते. या शहरामध्ये कामानिमित्त असो वा पर्यटनाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे ठाणे शहर नक्कीच जिवाभावाचे वाटते कारण ठाणे शहराची संकृती त्या येणाऱ्या माणसाला किंवा पर्यटकाला आपलीशी करते. असे हे 'ठाणे शहर' नक्की केव्हा वसले याचा निश्चित पुरावा नसला तरी ठाणे शहराचा आजूबाजूचा परिसर आणि इतिहास पाहता 'ठाणे शहर' हे नक्कीच प्राचीन आहे. अश्या या प्राचीन ठाणे शहरामध्ये आजही त्याच्या प्राचीनत्वाच्या खुणा दर्शवणारी ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात त्यापैकी एक महत्वाची प्राचीनत्वाची साक्ष देत असलेले ठिकाण म्हणजे ठाणेकरांना प्रिय असलेला आणि शहराची वेगळी ओळख करून देणारा 'मासुंदा तलाव'.

ठाणे स्थानकावर आपण कोणत्याही मार्गावरून आलो तरी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तलावाचे दर्शन घडते. असे हे तलावांचे असलेले प्राचीन काळातील 'श्रीस्थानक' किंवा आत्ताचे 'ठाणे शहर' किती सुंदर असेल याची कल्पना या तलावांच्या बांधणीवरून नक्की येते. ठाण्यामध्ये असलेले सर्व तलाव हे शिलाहार आणि बिंबकाळात बंधेलेले असावेत असे या तलावांच्या परिसरात सापडलेल्या विविध मूर्तींच्या अवशेषांवरून आपल्याला समजते. या ठाण्यातील तलावांच्या बाबतीत 'बिंबाख्यानात' असे म्हटलेले आपल्याला आढळते कि जयदेव राजाच्या कारकीर्दीत 'ठाणीयांसी एक एकाने तळे बांधो आरंभिले व एक एक शिवालय बांधो आरंभिले' असे आपल्याला या तलावांच्या बाबतीत माहिती मिळते. या महत्वाच्या प्राचीन तलावांपैकी एक असलेला तलाव म्हणजे ठाणेकरांचा आवडता 'मासुंदा तलाव'.

ठाणेकरांचा आवडता 'मासुंदा तलाव'

मासुंदा तलाव हा ठाण्याचे जणू हृद्यच आहे. हा सुंदर तलाव ठाणेकरांना कायमच आकर्षित करत आला आहे. आज हा मासुंदा तलाव ठाणे शहराची शान आहे. ठाणेकरांचे जीवन फुलवणाऱ्या या मासुंदा तलावाने ठाण्यामध्ये एक वेगळीच निसर्गसंपन्नता बहाल केलेली आपल्याला बघायला मिळते. ह्या सर्व गोष्टींमुळे मासुंदा तलाव हा ठाणे शहराचे एक वेगळेपण नक्कीच दर्शवतो. या ऐतिहासिक मासुंदा तलावावर वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजिले जातात. दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी रात्रीचे निवांत क्षण अनुभवायला सहकुटुंब येथे अनेक लोकांची वर्दळ असते या तलावाच्या काठावर घोड्यांच्या बग्गी  मधील चक्कर फेरफटका अनुभवायला ठाणे शहरातील लोकं मनमोकळेपणाने निवांत क्षण या ऐतिहासिक आणि प्राचीन 'मासुंदा तलवावर' अनुभवतात.

मासुंदा तलावाचे मूळ नाव आहे 'मासवदा'. 'मासवदा' या नावाचा अपभ्रंश होऊन 'मासुंदा' असे नाव झाले. सुमारे ८०० वर्षांपूर्वी चंपावती म्हणजेच प्राचीन काळचे 'चेऊल' किंवा 'चौल' येथील 'भोजराजाने' 'श्रीस्थानक' म्हणजे 'ठाणे शहरावर' स्वारी केली होती. 'भोजराजा' कळव्याला येत असताना 'महिबिंबाने' ८००० सैनिकांसह त्याला गाठले आणि त्यांचे मोठे युद्ध झाले या मोठ्या युद्धामध्ये  'चेऊल' किंवा 'चौल' येथील 'भोजराजा' मारला गेला त्यानंतर 'भोजराजा' याचा प्रधान महिबिंबावर चाल करून आला. या प्रधानाचा वध 'शेषवंशी केशवराय' याने केला. तसेच 'भोजराजा' याचा पालकपुत्र याला मरोल (मरोळ) येथील हंबीरराव याने मारले. या मोठ्या लोकांच्या जीवितहानीमुळे उरलेले 'भोजराजाचे' सैन्य भयभीत होऊन पळून गेले. हा विजय 'महिबिंबाने' ठाण्यातील 'मासवदा' म्हणजेच आजचा 'मासुंदा' तलावाकाठी मोठ्या प्रमाणात साजरा केला असा महिकावितीच्या बखरीमध्ये हा प्रसंग तिथी आणि वार यांच्यासहित लिहिलेला आहे. या प्रसंगाचे वर्णन महिकावतीच्या बखरीमध्ये पुढीलप्रमाणे आढळून येते:-

||संवत १२४५||
|| मग राजा मासवदा तळ्यावर आला ||
|| तेथे देसायाला वृत्ती दिधल्या ||
|| तेधवा शेषवंशी केशवराय नावाजिला ||
|| पदक गळ्याचे दिधले आणि पद चोधरी पावला ||
(चौधरी पदास)

हि घटना आपल्याला इ.स. ११८८ साली घडली आहे असे पहायला मिळते. म्हणजेच हा तलाव शिलाहार काळामध्ये बांधला असून त्याचे नाव 'मासवदा' आहे असे आपल्याला समजते. तसेच या मासुंदा तलावाभोवती बारा मंदिरे होती असा उल्लेख आपल्याला सापडतो. 


मासुंदा तलावाचे मूळ नाव आहे 'मासवदा'. 

'मासवदा' उर्फ मासुंदा तलाव याला महादेवाचा तलाव, शंकर तलाव, कौपिनेश्वर तलाव, शिवाजी तलाव, आणि ठाण्याची चौपाटी असे देखील संबोधतात. जिवंत झरे असलेल्या या सुंदर मासुंदा तलावाच्या तीनही बाजूस छोट्या टेकड्या आणि पूर्वेला प्राचीन कौपिनेश्वर मंदिर समूह असून या प्राचीन 'मासवदा उर्फ मासुंदा' तलावाचे पाणी या कौपिनेश्वर मंदिर समूहाला स्पर्श करत असे. अलीकडे जेव्हा हा ठाणेकरांचा आवडता प्राचीन 'मासुंदा तलाव' स्वच्छ करण्यात आला तेव्हा या तलावामध्ये काही कोरीव दगड सापडले आणि त्याचबरोबर एक सुबक गणेशाची सुंदर मूर्ती देखील सापडली. 


मासुंदा तलाव सध्या सुशोभित करण्यात आला आहे.

असा हा प्राचीन मासुंदा तलाव सध्या सुशोभित करण्यात आला असून तलावाच्या मधोमध एक कारंजे उभारण्यात आळे असून तेथे मारुतीची सुरेख मूर्ती स्थापन केली आहे. ठाणेकरांच्या प्राचीन मासुंदा तलावाच्या मधोमध उभारलेले कारंजे डोळ्यांचे नक्कीच पारणे फेडते. हे सुंदर कारंजे प्राचीन 'मासुंदा तलावासोबत' ठाण्याची देखील शोभा वाढवते. साधारण पणे १८३४ साली जेव्हा ठाणे नगरपालिका स्थापन झाली तेव्हा या मासुंदा तलावाकडे लक्ष द्यायचे काम मोठ्या प्रमाणात नगरपालिकेने केलेले आपल्याला बघायला मिळते.

अश्या या सुंदर आणि प्राचीन मासुंदा तलावाने ठाणेकरांनाच नव्हे तर इतर प्राचीन राज्सात्तांना देखील आकर्षित केलेले आपल्याला पहायला मिळते. आता हा प्राचीन 'मासुंदा तलाव' ठाण्याचे मुख्य केंद्रबिंदू बनून ठाणेकरांच्या जीवनातला एक अविभाज्य भाग नक्कीच बनला आहे. मासुंदा तलावाच्या आजूबाजूला असलेली दुकानांची रांग, बाग व तलावातल्या कारंज्यावरील दिवे यामुळे रात्रीच्या काळोखातही या तलावाचं 'मासुंदा तलावाचे' सौंदर्य खुलतं. असा हा ठाणे शहराच्या मध्यभागी वसलेला प्राचीन 'मासवदा उर्फ मासुंदा तलाव' प्रत्येक ठाणेकराला आणि पर्यटकांना नक्कीच भुरळ पाडतो आणि ठाण्याची शान वाढवतो. अश्या या ठाणे शहराचा मुकुटमणी असलेल्या 'मासवदा उर्फ मासुंदा तलावाला' नक्की भेट द्यावी.      
  
मासुंदा तलाव येथील नयनरम्य संध्याकाळ.


_________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) तुमचे आमचे ठाणे – श्री. सदाशिव टेटविलकर.
२) महिकावतीची बखर – श्री.वि.का.राजवाडे.
३) ठाणे जिल्हा गॅझेटीअर – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ. 

कसे जाल:-

ठाणे(खोपट, वंदना, रेल्वे स्थानक) – मासुंदा तलाव
_________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा.    

Share the post

ठाणेकरांचा आवडता 'मासुंदा तलाव'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×