Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

दुर्गाव येथील 'दुर्योधन मंदिर'


महाराष्ट्रामध्ये भटकंती करताना आपल्याला गावा गावात इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात मग त्या कधी लेण्यांच्या रुपामध्ये असो किंवा एखाद्या जुन्या मंदिरांच्या रुपात किंवा एखाद्या गावाच्या मंदिराच्या बाहेर वीरगळ आणि सतीशिळेच्या रुपात इतिहासाच्या पाउलखुणा सांभाळत अनेक वर्षे महाराष्ट्रातील वेगवेगळी अनेक छोटी मोठी गावे हि आपला प्राचीन इतिहास सांभाळून आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 'दुर्गाव' आपले आगळे वेगळे महत्व आजही वर्षानुवर्षे जपून आहे ते म्हणजे महाभारतातील  एका वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे. आता महाभारतातील कोणते वैशिष्ट्य हे गाव सांभाळून आहे असा प्रश्न नक्की पडला असणार तर या गावात चक्क आपल्याला महाभारतातील 'दुर्योधनाचे मंदिर' बघायला मिळते.

आतमधून पोकळ असलेला कळस.

भारतामध्ये डेहरादून येथे जसे कौरवांची मंदिरे आहेत तसेच एक मंदिर महाराष्ट्रामध्ये 'दुर्गाव' या गावामध्ये आपल्याला बघायला मिळते. दुर्योधनाचे हे मंदिर गावाच्या अगदी सीमेला खेटून आहे. तसेच गावातल्या लोकांची दुर्योधनाच्या या मंदिरावर श्रद्धा देखील आहे. दुर्योधनाच्या मंदिराआधी मुख्य मंदिर हे शंकराचे आहे. हे मंदिर दगडी बांधकामात बांधलेले आपल्याला बघायला मिळते. शंकराचे हे मंदिर एका दगडी चौथऱ्यावर बांधलेले आपल्याला बघावयास मिळते.

मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला असता आपल्याला गाभाऱ्याच्या भागात पोकळ कळस बघायला मिळतो आणि याच कळसाच्या आतमध्ये एक पूर्वेच्या बाजूस कोनाडा बांधलेला आपल्याला बघावयास मिळतो या कोनाड्यामध्ये आपल्याला दुर्योधनाची बसलेली मूर्ती बघायला मिळते. दुर्योधनाच्या मूळ मूर्तीला आता चुन्याचा गिलावा करून दुर्योधनाच्या मूर्तीला रंगवले आहे. दुर्योधनाची हि बसलेली मूर्ती पाहून आपल्याला मात्र प्रश्न पडतो कि दुर्योधन येथे कशाला आला असेल ?
मंदिराचे खांब सगळे हे हेमाडपंथी धाटणीचे असावेत.

तर या दुर्योधनाच्या मूर्तीबाबतीत गावातले लोकं आख्यायिका सांगतात ती अशी महाभारतातील भीषण युद्धानंतर भीमाच्या भीतीने दुर्योधन एका सरोवरामध्ये जाऊन लपून बसला. जेव्हा भीमाने दुर्योधनाला युद्धासाठी आव्हान दिले तेव्हा त्या सरोवरातील जलदेवतेने दुर्योधनाला बाहेर जायला लावले आणि मग भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये घनघोर युद्ध होऊन यामध्ये दुर्योधन मारला गेला. तेव्हापासून असे समजले जाते कि पाण्याचे थेंब, पाण्याने भरलेले ढग, आणि विस्तृत जलसाठे यांच्यावर दुर्योधनाने राग धरलेला आहे. या रागीट आणि तापसी वृत्तीच्या दुर्योधनाची दृष्टी जर ढगांवर पडली तर पाऊस पडणार नाही आणि पाऊस पडला नाही तर गावावर दुष्काळ येईल म्हणून या दुर्योधन मूर्तीचे दार बंद करून ठेवतात हि गावाची पद्धत फार पूर्वीपासून आहे हे दिसते असे गावातील गावकरी सांगतात.

दुर्योधनाची हि बसलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते.

भिमाशी झालेल्या युद्धानंतर दुर्योधनाने अंत्यसमयी महेश्वराची म्हणजेच शंकराची प्रार्थना केली म्हणून येथे महेश्वर महादेव आणि वरच्या बाजूला शिखरा मध्ये दुर्योधन असे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर उभारले गेले आहे. मंदिराचे खांब जास्त कलाकुसरीचे नसले तरी १२ व्या शतकातले आहेत असे जाणवतात. स्थानिक लोकांमध्ये अधिक महिन्यात दुर्योधनाचा येथे उत्सव देखील साजरे करतात. असे एक आगळे वेगळे दुर्गाव चे दुर्योधनाचे मंदिर नक्कीच लक्षवेधक ठरते आणि आपल्या महाराष्ट्राचे वेगळेपण सिद्ध करते.

महादेव मंदिरात दोन शिवलिंग बघावयास मिळतात त्यातील चौकोनी शिवलिंग पुरातन आहे.

(टीप:- सर्व फोटो हे साधारणपणे मे २००४ च्या दरम्यान काढले असल्याने नोकिया N70 हा मोबाईल वापरला होता म्हणून फोटो जास्त क्लियर नाहीयेत.)

_________________________________________________________________________________

कसे जाल:-

पुणे – हडपसर – यवत – पाटस – दौंड – श्रीगोंदा – हिरडगाव – दुर्गाव
_________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 


लिखाण आणि छायाचित्रे  © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा

Share the post

दुर्गाव येथील 'दुर्योधन मंदिर'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×