Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

` भारत कधीकधी माझा देश आहे ! `

            कामाच्या व्यापातून बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाला होता. भटकंतीचा किडा वळवळायला लागला होता. एका दिवसाचा ट्रेकचा विचार होता. पण भटकायचे कुठे ?? मागच्याच आठवड्यात मल्हारगडाची मुसाफिरी करून आलो होतो. मेंदूवर जास्त दबाव न देता प्रतापगडावर जायचे पक्के केले. आकाश निरभ्र निळे होते. शनिवार होता त्या दिवशी. सकाळीच घरून निघालो. कात्रजवरून महाबळेश्वरला जाणारी एस.टी पकडली. कंडक्टरणे शंभराचे तिकीट फाडले थेट महाबळेश्वर. कालच पर्फोमन्स अप्रैजल भरून  साहेबाला एकदाचे देऊन टाकले होते त्यामुळे आज बराच रिलीफ वाटत होता. गाडीत मोकळी जागा अजिबात न्हवती. तसाच उभा राहून शिरवळ पर्यंत आलो. दरम्यान दोन माणसे माझ्या समोरील शीटवर मोठमोठ्याने बोलत होती. त्यांच्या चर्चेचा विषय होता नुकतीच मिरजेत झ्हालेली दंगल. राजकारणात मुरलेल्या एखाद्या नेत्याप्रमाणे त्यांची सविस्तर विवंचनात्मक चर्चेत मीही सहभागी झ्हालो काही काळ. शिरवळला बसायला जागा झ्हाली. मस्त तासाभराची डुलकी घेतली. जाग आली त्यावेळी गाडीने वाई ओलांडली होती.

          त्या दोन माणसांचे संभाषण अजून चालूच होते पण विषय बदलला होता. मुंबई हल्ल्याला जबाबदार कोण ? मी वेगळ्याच विचारात होतो. साधारण साडे नऊच्या दरम्यान गाडी महाबळेश्वरला धडकली. गाडीतून पाय खाली ठेवता क्षणीच एकच धांदल उडाली, ती म्हणजे तिथल्या लोकल गाईडची. सर्वजण एकदम अंगावर धाऊन आल्यासारखे जाहिरात करत होते. त्यांना हुलकावणी देऊन मी लगेचच कोकणात महाडला जाणारी एस.टी धरली. आंबनेळी घाटातून वीस मिनिटातच प्रतापगड पायथ्याला असलेल्या वाडा-कुंभरोशी नावाच्या छोट्याश्या गावात येऊन थांबली. आंबनेळी घाटातला रस्ता फारच वळणावळणाचा. वाडा हे छोटेसे गाव अगदी डोंगराच्या कुशीत लपलेले, झाडातून छुप्लेले. मी उतरलो. चहा घेतला. रस्त्यावर वाहतूक बरीच होती. गड महाबळेश्वरपासून जवळच असल्याने कदाचित.
           वाड्यातून रस्त्याला दोन फाटे फुटतात एक थेट गडावर जातो आणि दुसरा कोकणात. गडावर जाणारा रस्ता पकडून मी भराभर चालायला लागलो. पहिल्याच वळणावर पोलिसांची चौकी वजा तंबू दिसला. काही पोलीस दुचाकी आणि चारचाकी तपासत होते. मला काही समजले नाही, अश्या ठिकाणी तपासणी म्हणजे काहीतरी नक्कीच वावगे झ्हाले आहे असा प्रार्थमिक अंदाज बांधत मी पुढे निघालो. तीन वळणानंतर खालून मनोहारी प्रतापगडदर्शन झ्हाले. अफ़झल खानाला नेस्तनाबुत करणारया महाराजांच्या प्रतापाची साक्ष देणारा हा प्रतापगड. शिवरायांनी पूर्णपणे नवीन बांधलेला प्रतापगड हा पहिला किल्ला. गर्द झाडीतून जाणारा रस्ता, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या आणि दऱ्याखोऱ्यांचे अनोखे रूप हीच तर गडाची शोभा. क्यामेरयात ते क्षण कैद करून पुढे सरकलो. गडावर जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू होते. गडाच्या पायथ्याशीच एक छोटसे संग्रहालय आहे. तिथेच शिवसृष्टीतील शिल्पांसारख्या काही मूर्ती होत्या. थोडा वेळ तिथेच फोटोगिरी केली. दुपारचे बारा वाजून गेले होते. उन्हे डोक्यावर चढली होती.  
        पोटातली कावळी ओरडत होती. जरा पुढे गेल्यावर आणखी एक तम्बू कम चौकी आली.
मी आत डोकावून पाहतो न पाहतो तोच मागुन एक भारदस्त आवाज कानावर पडला. काय रे काय पाहिजे ? मी मागे बघितले तर साध्या वेशातले पोलिस काका त्यांच्या दुचाकीवर होते. मी काही बोलायच्या आतच त्यानी दुचाकीवर मागे बसण्याचा इशारा दिला. गडावर जायला मला चमत्काराने लिफ्ट तर मिलाली होती पण पोलिस काकांचा मुड औरच होता. त्यांचा भरमसाठ प्रश्नाचा मारा मला सहन करावा लागला. पासपोर्ट काढताना पण इतके प्रश्न विचारले न्ह्व्ते मला ! शेवटी मीच त्याना विचारले इतका बदोबस्त आज गडावर ? कोणी येणार आहे का ?
            त्याना मी महाराष्ट्रियन न्हवे भारतीय असल्याचे पटले असावे ! काही दिवसापूर्वी ज्हालेल्या मिरज दंगलीमूळ पूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्याच्याच पार्श्वभूमीवर घातपाताची अफवा गडाच्या परिसरात पसरली होती. त्यातच दोन दिवसांवर शिवप्रतापदिन येउन ठेपला होता. हे सर्व विचारात घेउनच गडाची सुरक्षा वाढवली होती. पोलिसकाका सांगत होते मी ऐकत होतो. मुम्बइ वर ज्हालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रसंग पुढे येऊ नये यासाठी सर्व. त्यांच्या प्रत्तेक प्रश्नाला काही वेळापूर्वी मला चिड आली होती. पण आता मला त्यांचा उगीचच अभिमान वाटत होता आणि स्व्ताहाचाही ! का कुणास ठाउक ? मी महाराष्ट्रियन न्हवे भारतीय आहे याचा मला अभिमान वाटत होता.
          आम्ही पुढच्या चौकिजवळ पोहोचलो होतो. अफ्जल खानाच्या शामियानाशेजारी. तिथे जायला परवानगी न्हवती. कारण तेच- मिरज दंगल प्रकरण. मी तिथेच उतरलो. पोलिसकाकाना धन्यवाद देऊन गडाकड़े कुच केली. पूर्वीच्या शामियान्याच्या इथे आता खानाची कब्र आहे.  गडाचा दरवाजा इथून दहां मिनिट. समोर अफजल बुरुज, उजवीकड़े रेडका बुरुज, डावीकडे सूर्य बुरुज, मागे जावळीचे जंगल - अहाहा डोळ्याचे पारणे फेडणारे ते दृश्य क्यामेरयात साठवत पुढे निघालो !!!



                          फिक्र ना कर ये शिवा का आखाडा है !
                     जिसने एक ही दम मे अफझल को उखाडा है !
                       जय भवानी ! जय श्रीराम ! जय शिवाजी !

 

           महादरवाज्यातून आत आल्यावर लगेच उजवीकडे लांबच लांब अफझल बुरुज आहे. खानाच्या वधानंतर त्याचे शीर या बुरुजावर ठेवण्यात आले होते म्हणून हे नाव. या बुरुजावरून समोर महाबळेश्वर आणि विस्तृत जावळीचे जंगल दृष्टीस पडते. खाली शामियाना म्हणजे आताची खानाची कबर इथून दिसते. बऱ्याच शाळांच्या शैक्षणिक सहली त्या दिवशी गडावर दिसल्या. मुले कौतुकाने त्यांच्या शिक्षकांकडून इतिहास समजावून घेत होती, बरे वाटले ! मधेच डोंगरयात्रा हातात घेऊन फिरणारी एक भटकी टोळीही भेटली मला, मुंबईहून आली होती. गडावर पर्यटक बरेच येत असल्याकारणाने खाण्यापिण्याची सोय आहे. वर कांही पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडे भवानीमातेचे मंदिर लागले. शेजारीच काही पुरातन तोफा, दारुगोळे, हत्यारे इ. ठेवलेल्या होत्या. मंदिरात भवानीमातेचे दर्शन घेऊन मी बालेकील्याजवळ निघालो.
            


        या शिवाजीराजांचे शौर्य आणि कर्तुत्व इतके मोठे आहे की,
       त्याची तुलना जगज्जेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल - गवर्नर गोवा १६६६

 

            दोन वाजले होते, पर्यटकांची गर्दी वाढतच होती. त्यात शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने गडावर रंग-रंगोटीच्या कामाला वेग आला होता. साफ सफाइ देखील चालू होती. उद्यापासून तीन दिवस म्हणजे शिवप्रतापदिन होईस्तोवर पर्यटनासाठी गड बंद राहणार होता. नशिबाने मी उद्या आलो नाही. बालेकिल्ला म्हणजे पूर्वी वाडा होता तिथे आता महाराजांचा अश्वारूढ देखणा पुतळा आहे. बाजूला छोटीशी बाग आहे. १९५७ साली भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या स्मारकाच्या उदघाटनाचा उल्लेख होता. 

     

  माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय  या भूमीवर आक्रमण करणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झ्हाला नाही  - शिव छत्रपतींचे मोगल अधिकाऱ्यास पत्र

         
          
त्यावेळी एक पारशी कुटुंब तिथे आले होते. हिंदीमध्ये महाराजांना एकेरी नावाने पुकारत त्यांच्या लहान मुलाला ते पुतळ्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगत होते. फोटो काढण्याचा हट्ट तो लहान मुलगा करीत होता. महारांजाचा पुतळा ज्या चौथर्यावर आहे तिथे स्पष्ट मराठीत लिहिले होते चौथर्यावर बसू नये. तरी देखील तो लहान मुलगा तिथे बसला आणि चक्क बसू नये यावर स्वताचा हात ठेऊन फोटो काढायचा दुरूनच इशारा त्याच्या बाबांना करू लागला. आता मात्र माझ्या सय्यमाचा  बांध फुटला. मी सरळ जाऊन त्या मुलाला पहिल्यांदा खाली उतरवले. तो मुलगा ओरडू लागला. आसपासचे लोक बघू लागले. मी सरळ त्यांना सांगितले इथे बसू नये लिहिले असताना तुम्ही बसून फोटो काढताय ? ते प्रकरण तिथेच संपले. कारण वाचता येत नसल्याने त्यांनी माफी मागून विषय मिटवला.  

           कडेलोट-दक्षिण-केदार-रेडका बुरुज पाहून मी जेवणासाठी एका हॉटेलात थांबलो. गडावर बरीच होटले आहेत. रेस्ट हौसही आहे. झुणका भाकर आणि थंडगार ताक घेऊन तृप्त झ्हालो. उतरतानाच समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीरायाला नमस्कार केला. डावीकडे छोटेसे नासके तळे दिसते. रेडक्या बुरुजावरून खाली कोकण दूरवर नजरेत भरतो. दुपारचे चार वाजले होते. परतीचे वेध लागले होते. शिवस्मरण करून गड उतरलो. वाड्यातून महाबळेश्वर गाठले. सहा वाजले होते. थंडी जाणवायला लागली होती. एस.टी ला वेळ होता, शेजारीच असलेल्या बाजारपेठेत रपेट मारली थोडा वेळ. साडेसहाला एस.टी धरून पुणे गाठले.
           नऊच्या आसपास घरी पोहोचलो त्यावेळी डोक जड झ्हाल्यासारखे वाटत होत. सकाळची एस.टी तली दोन माणस, वाड्यात भेटलेले पोलिसकाका, गडावर भेटलेल पारशी कुटुंब सारखी राहून राहून आठवतच होती !!!



This post first appeared on अनाकलनीय, please read the originial post: here

Share the post

` भारत कधीकधी माझा देश आहे ! `

×

Subscribe to अनाकलनीय

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×