Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

भारतीय लोकशाही आणि जनतेची कर्तव्ये....

    आपल्या भारत देशात एखाद्या विषयावर लिहायचे म्हटले तर आपल्या लेखाच्या खाली अथवा वर एक टिप लिहावी लागते की,“बाबा रे याचा या या गोष्टीशी, या या विषयाशी अथवा तुमच्या आमच्या महापुरुषांशी काहीही संबंध नाही.असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा”…….इ.इ.एका धर्मनिरपेक्ष देशात सदर टिप ही लिहावीच लागते,नाहीतर तुम्हाला सगळीकडून सोयीस्कर शाब्दिक टीका झेलावी लागते..इतकी मानसिक गुलामगिरी आपण आज पत्करली आहे.त्यावर कडी  अशी की,सगळेच आपआपल्या संकुचित बिळात स्वतःला सुरक्षित समजत आहेत आणि इतरांवर टीका टिप्पणी करण्यात व्यस्त आहेत. खरंच आपण आपण एका सार्वभौम,लोकशाही गणराज्य व्यवस्थेत जगत आहोत काय ??? आपण जगतो ते आपल्या सोयीनुसार.....मला जे सोयीस्कर ते मला मान्य आणि इतरांना जे सोयीस्कर पण माझ्या अस्तित्वासाठी जे घातक ते मला अमान्य.इतकं उथळ टोक आपण आज गाठलेलं आहे.
              स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाला एका सार्वभौम लोकशाही गणराज्य देशाचा दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा आपण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचे नेमकं भान आपण सोडलेले आहे.हे सांगायला आपल्याला कुण्या तत्ववेत्याची गरज नाही.खरंच आपल्याला आपली लोकशाही पूर्ण कळलेली आहे काय ? युरोप अथवा अमेरिकेशी तुलना करताना नक्कीच आपल्याला अंतर्मुख होणे आवश्यक आहे. आजच्या आपल्या लोकशाहीतील वास्तव हे कल्पनेपेक्षा जरा निराळेच आहे.थोडा बारकाईने विचार केल्यास आपल्याला कळून येईल की,आपण आपला देश चालवत आहोत हीच भावना लोकांमधून लोप पावत आहे.सरकारवर टीका करण्यातच आपण स्वतःला धन्य मानत आहोत.मग सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो.आजच्या घडीला सरकार आणि जनता यांच्यातील दरी तीव्रतेने वाढत आहे.दर पाच वर्षांनी मतदान केले म्हणजे आपले कर्तव्य संपले अशी एक भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.सरकारकडून काम करवून घेणे व त्यासाठी रेटा वाढविणे,विविध लोकशाही मार्गाने सरकारवर दबाव वाढविणे इ.गोष्टीचा जनतेला विसर पडलेला दिसत आहे..
         उठसूट व्यवस्थेवर टीका करणे व देशाला नावे ठेवणे खूप सोपे असते.व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा व्यवस्था बदलण्याचा निग्रह करणे महत्वाचं आहे.कुणा एकट्या दुकट्याच्या बदलल्याने व्यवस्था बदलत नसते.पण तसे केल्यामुळे व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला इतरांना बोलण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होत असतो.आपला वैचारिक व सामाजिक दुबळेपणा गैर व्यवहाराला बळ देत असतो.हाच गैर व्यवहार देशाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो.ज्या देशातील जनतेला साधं बाटलीबंद पाणी देखील विदेशी कंपनीचे लागते,तेच लोक मग कधीकधी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर घोळका करून वृत्तवाहिन्यासमोर “परिवर्तनाची नांदी आली आहे” असे म्हणून आपल्या देशसेवेची हौस भागवून घेतात.याचाच फायदा सरकार व त्यांचे हस्तक घेत असतात.जनतेला नेमक्या आपल्या समस्येची जाण झाली की,जनता रस्त्यावर उतरणार हे सरकारी यंत्रणांना आधीच ठाऊक असते.त्यामुळे त्यांना अशी जाणीव होऊच नये यासाठी मुद्दाम प्रयत्न केले जातात.मग कुठलातरी भावनिक विषय हाताळून जनतेला व्यस्त ठेवल्या जाते.
          लोकशाहीचा मान,सन्मान,लोकशाहीची महत्ता ही त्या देशातील जनतेवर अवलंबून असते.कुणीतरी मसिहा येईल व आमचा उद्धार करेल हीच घातक भावना आपल्याला विनाशाकडे घेऊन जात आहे.बहुतांश लोकांना आरामदायक जीवन जगायचे आहे पण त्यासाठी मात्र श्रम करण्याची तयारी नाही.कष्ट पण नको आणि कुठलीही जबाबदारी नको.सरकरकडूनच सर्व मोफत हवं आहे.त्यामुळे हळूहळू श्रममूल्य कमी होत आहे.आपले वर्तन आणि विचार  लोकशाहीला कमजोर करत आहेत.जगात प्रत्येक गोष्टीला अंत आहे मग आपल्या वर्तणुकीला का अंत असू नये.? देशातील कार्यरत श्रममूल्य हाच त्या देशाचा कणा असतो.नेमकं आपण आशावादी असावं तरी किती? बदल सगळ्यांनाच हवा आहे पण आपला वेळ एकमेकांकडे बोटे दाखविण्यातच जात आहे..
           दैनंदिन वृत्तपत्र चाळले तरी आपणास मोठमोठ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या दिसतात.“चलता है" “Everything is fair in love & war" या तद्दन भंपक विधानावर विश्वास ठेवणारी आपली कृतीशून्यता देशाला भ्रष्टाचाराच्या खोल दरीत ढकलत आहे.ह्या भ्रष्टाचाराची सुरुवात होते ती आपल्या घरून..शालेय अभ्यासक्रम जड झाला म्हणून मुलांना आपण शिकवणी लावून देतो आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराची शिकवणी आपल्या घरी अहोरात्र सुरू असते..“ बेटा homework किजिये, फिर आपको चॉकलेट मिलेंगे" हे वाक्य आपण घरोघरी ऐकत असतो.सुरुवात होते ती इथूनच.आता हे लोण सर्वत्र पोहचले आहे.चॉकलेट दिलं की आपलं कोणतही काम होऊ शकतं हा समज आता दृढ झाला आहे.आपला समज आता सर्वसामान्य सर्वमान्य असा व्यवहार झाला आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही आता बेशिस्त झाली आहे.तेवढीच सोयीस्कर संवेदनशील व संवेदनाहीन पण झालेली आहे.समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्रचंड विरोधाभास दिसून येतो.एखाद्या घटनेवर जनतेच्या प्रतिक्रिया ह्या सोयीस्कर असतात.घडणाऱ्या गोष्टीत आपला स्वार्थ नुकसान यांचा हिशोब लावूनच मग आपल्या प्रतिक्रिया उमटतात.सरकारला जनतेचा धाक वाटला पाहिजे तरच आपल्याला लोकशाही म्हणविण्याचा अधिकार आहे.
      भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रचंड विरोधात असलेले विन्स्टंन चर्चिल यांनी त्यावेळी भारताचे भविष्य वर्तविले होते.ते याप्रमाणे India is not a nation, it is huge population.
(“Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water would be taxed in India”. वरील वाक्यातील आक्षेपार्ह शब्द सोडल्यास त्यातील अर्थ समजून त्यावर आत्मचिंतन करणे महत्वाचे आहे.सदर वाक्य हे त्या काळातील परिस्थितीचे आकलन करून केले गेलेले होते.जे आजही आपल्या वास्तव जीवनाची कथा सांगत आहे.लोकहीत व समाजहित ही भावना मागे पडून त्याची जागा आता वैयक्तिक स्वार्थाने घेतलेली आहे.आपल्या जीवनाच्या केंद्रबिंदूची जागा वैयक्तिक स्वार्थाने व्यापलेली आहे.हा वैयक्तिक स्वार्थच देशातील लोकशाहीला मारक ठरू पाहत आहे.पण आजूबाजूला नजर टाकल्यास अजूनही असे काही सत्पुरुष आहेत जे स्वार्थ बाजूला सोडून फक्त देशभावना डोळ्यासमोर ठेऊन आपले सत्कार्य करत आहेत व देशाला एक नवीन ऊर्जा देत आहे.लोकनियुक्त सरकारे ही कधीच वाईट नसतात,कमी पडते ती जनतेची दबावशक्ती व एकी.व्यवस्थेतील ज्या गोष्टी वाईट म्हणून आपण हक्काने त्यावर टीका करत; त्याच गोष्टींमध्ये सुधारणा करणे ही आपली जबाबदारी आहे.त्यासाठी आपल्या प्रत्येकालाच खारीचा वाटा उचलावा लागेल तरच आपल्या स्वप्नातील भारत निर्माण होईल.
            सरकारी ध्येय धोरणे आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात.( हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे) पण आखलेल्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करवून घेणे ही आपली जबाबदारी आहे.बाबा राहिमच्या गुफेच्या चर्चा करण्यापेक्षा वंचितांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यावरही आज मंथन होणे गरजेचे आहे.यावर देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका पार पाडणे महत्वाचे आहे.द्रुक श्राव्य वृत्तवाहिन्यांवर विश्वास ठेवावा असे वातावरण आजतरी आपल्या देशात नाही.हा विश्वास त्यांनी केव्हाच गमावला आहे.आपला समृद्ध आणि वैभवशाली इतिहास सामान्य माणसापर्यंत पोहचला पाहिजे.मग शेवटी जबादारी वाचते ती आपली.सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना सत्यात आणायची असेल तर,बदल हा आपल्यापासून सुरू करावाच लागेल.ही जबाबदारी जर आपण घेणार नसू तर उगाच पान ठेल्यावर बसून तोंडात मूठभर मावा भरून सर्वत्र पिक मारत सरकारवर टिका करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.आपल्याला चर्चिलचे ते वरील विधान खोटे ठरवायचे आहे.अन्यथा इतिहास आपल्याला कधीही क्षमा करणार नाही.त्याच चर्चिलने एक सत्यवचन सांगून ठेवले आहे.“ जो देश आपला इतिहास विसरतो त्याचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही."

-गणेश



This post first appeared on Maze Manogat, please read the originial post: here

Share the post

भारतीय लोकशाही आणि जनतेची कर्तव्ये....

×

Subscribe to Maze Manogat

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×