Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

होय आपला डेटा चोरी होतोय....

साधारण 10-12 दिवसा अगोदर मला  आर्थिक व्यवहार करणाऱ्या एका खाजगी कंपनीतून फोन आला.एक वर्षाअगोदार मी माझी आर्थिक गरज भागविण्याकरिता एका प्रतिष्ठित खाजगी बँकेतून वैयक्तिक कर्ज काढले होते.तेच कर्ज दुसऱ्या एका खाजगी बँकेत अत्यंत कमी व्याजदरात वळते करण्यासंबंधी तो फोन होता...सगळं बोलणं झाल्यावर मी त्या व्यक्तीला सहज विचारलं की,हे सगळं तुम्हाला कसं माहीत....त्यावर त्याची प्रतिक्रिया फारच भन्नाट होती.तो म्हणाला, “ हमारे पास सबकी जाणकारी होती है” त्याला माझ्या कर्जविषयक आणि वैयक्तिक सगळी माहिती होती.....सर्व बोलणं झाल्यावर मी सहज विचार केला की,माझं कर्ज आणि वैयक्तिक माहिती जर याला माहिती आहे, तर जी माहिती आपण हेतुपुरस्सर इकडे तिकडे शेअर करीत असतो त्याचं काय???
         आपण कुठे गेलो,काय जेवलो,कुणाला भेटलो ही इ.इ. माहिती आपण फेसबूकवर न चुकता पोस्ट करत असतो.नुकतीच फेसबुक ही कंपनी याच वादात ओढली गेली आणि संपूर्ण जगात याच चर्चेला उधाण आलं की, खरंच आपण आणि आपलं वैयक्तिक जीवन सुरक्षित आहे काय ??? फेसबुकने आपल्या युजर्सचा डेटा परस्पर एक दुसऱ्या कंपनीला विकला म्हणे....आपली कुठलीच गोष्ट तंत्रज्ञानाच्या या युगात खाजगी नाही आहे..मागे मी याच विषयावर एक ब्लॉग लिहिला होता त्याचा विषय होता “ आपला मेंदू हायजॅक झालाय " त्याची लिंक खाली पुनश्च एकदा देत आहे. शांत डोक्याने विचार केल्यास आपल्यावर सतत एका अनामिक गोष्टीचा भडिमार होतोय.नेमकं जे आपल्याला नको आहे तेच वारंवार आपल्या डोळ्यासमोर येते किंवा दाखविले जाते.आपल्या मित्राचा एखादा बूट अथवा मैत्रिणीची एखादी साडी आपण फेसबुक वर like अथवा शेअर केली रे केली की बघा त्याच गोष्टीची जाहिरात आपली वैयक्तिक फेसबुक वर झळकायला लागते.गुगलवर एखादी महागडी  वस्तू उदा. हिरा किंवा त्याचे दुकान शोधा आणि बघा नंतर आपल्यावर बरोबर नेमक्या त्याच जाहिरातीचा भडिमार सुरू होतो..हे सगळं चक्र कळत नकळत अव्याहत सुरू असते.
           फेसबुक,व्हाट्स अप,ट्विटर असो वा इन्स्टाग्राम यावर आपण शेअर केलेलं अथवा लिहिलेलं कधीच मिटत नाही.हे त्रिकालाबाधित सत्य आहे.इतक्यात एक नवं फिचर आलं आहे “ Delete for me” किंवा “Delete for everyone” ह्या दोन्ही सुविधा तात्पुरत्या आपल्या मनाला समाधान जरी देणाऱ्या असल्या तरी, आपण केलेली पोस्ट ही त्या त्या कंपनीच्या डेटा बँकेत ( सर्वर) अगदी चिरंतन जतन केली जाते.एखादा व्यक्ती सहा महिन्या अगोदर नेमक्या वेळी कुठे होता हे अगदी सहज सांगता येते.याच सोयीचा फायदा घेऊन पोलीस सहज एखाद्या गुन्ह्याचा तपास लावू शकतात..तुम्ही तुमचं अकाउंट बंद करा अथवा लॉग आऊट व्हा तुमची माहिती ही तुमच्या ह्या जगातून निरोप घेतल्यावरसुद्धा जतन करून ठेवली असते.साधं गुगल मॅप जरी उघडलं तरी आपण कुठे कुठे भेट दिली होती याची आपणास माहिती मिळते...
          आता महत्वाचा मुद्दा हा की,फेसबुकने आपली कुठली माहिती विकली अथवा चोरली..माफ करा चोरली असं म्हणता येणार नाही कारण भरपूर माहिती तर आपणच त्यांना दिली आहे...नियम व अटी न वाचता.(Terms & Conditions ). कुठलेही अँप्लिकेशन आपल्या फोन मध्ये घेताना जगातील 90% लोकं नियम व अटी वाचायला सरासरी फक्त 6 सेकंद वेळ देतात.यात माझा पण समावेश आहे.या सहा सेकंदात आपण काय वाचतो आणि सहमती कशी देतो हा संशोधनाचा विषय आहे.समजा भारतात 50 करोड लोक फेसबुक वापरत आहे तर फेसबुकला या सर्व लोकांचा वयोगट आधीच माहिती झालेला असतो.जन्म दिनांक आपणच नमूद केलेला असतो.कुठल्या वयोगट कोणत्या प्रकारच्या बाजारासाठी उपयुक्त ग्राहक बनू शकते याचा अभ्यास करणारी तज्ञ मंडळी तिकडे असतात.गुगल वर search करताना आपल्याला विविध जाहिराती येतात.तो हाच ग्राहक वर्ग तपासून.स्त्री - पुरुष असं वर्गीकरण सहज करता येतं(भारतात काही मुले मुलींच्या नावाने खोटे खाते उघडतात आणि भरपूर मुलांना गंडवितात हेही फेबू. ला माहिती आहे).आपलं लग्न,पत्नी,मुलबाळ,बहीण,भाऊ,याचीही माहिती त्यांना आहेच.आपला धर्म तर आपणच ओरडून सांगत असतो.भलेही मग आपण जाती अंताची लढाई लढणारे लढवय्ये कार्यकर्ते असू देत.तुम्ही कोणत्या राजकीय विचारसरणीचे आहात हेही सहज सांगता येते.(येथे तुम्ही राजकीय पोस्ट करणे अपेक्षित नाही.) तुमच्या आवडी निवडी,तुमचे मित्र मैत्रिणी त्यांचे वाढदिवस त्यांच्या विचारधारा इ.इ.सगळं फेसबुकला माहिती आहे.तुमचं relationship status म्हणजे तेच Married, Unmarried,Single,in a Relationship अथवा काही लोकं in a Complicated relationship मध्ये पण असतात.हा जो शेवटचा प्रकार आपल्या डोक्याच्या बाहेर असला तरी फेबूला हे सगळं समजतं..याचा विविध स्तरावर योग्य अभ्यास केला जातो..
            आता खरा खेळ येथूनच सुरू होतो,तुमचा वयोगट,तुमचा धर्म,लिंग,भाषा,जात,प्रांत,मित्र मैत्रिणी,आवडीनिवडी,तुमचे राजकीय विचार(ज्याला वाटतं की आपल्याला राजकारणात काडीचाही रस नाही,त्याला पण राजकीय मते असतातच.) ही सगळी माहिती फेबु.अथवा सारे  एकत्रित करतात.त्याचं विश्लेषण करून मग एखाद्या कंपनीला ती माहिती पुरविली जाते.कंपनी त्या माहितीचा उपयोग मग चातुर्याने करून घेते...निवडणुका आल्या की,तुमच्या मोबाईलवर त्यांना जसे हवे त्या त्या कौलाच्या बातम्या,फोटो अथवा इतर भडकविणाऱ्या पोस्ट टाकल्या जातात.सततचा भडीमार बघून हळूहळू आपला कौल आणि त्यांचा कौल जुळू लागतात.त्यांचे इप्सित साध्य होते.लिबियातील गद्दाफी शासनाविरुद्ध मागे सफल झालेली  मोहीम हे याचे उत्तम उदाहरण म्हणून देता येईल (आपल्या देशात भरपूर उदाहरणे आहेत पण लिहीत नाही.लोकं आपली सोय बघून गोटे मारतात).हाच सोशल मीडिया एक दिवस भारतात गृहयुद्ध घडवून आणणार हे नक्की.त्याची सुरुवात झालेली आहे.
            शांत चित्ताने विचार केल्यास आपण या सगळ्या प्रकाराला अगदी नकळत बळी पडतच आहोत.तुम्ही आपल्या आप्तेष्टांपासून कुठलीही गोष्ट लपवू शकता पण समाज माध्यमापासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही. तुमचं नाव हरिभाऊ ठक आहे आणि तुमचं फेसबुक खाते Harry या नावाने असेल तुम्ही मा.भालचंद्र नेमाडे लिखीत “कोसला” हे पुस्तक वाचताना सनी बाईंचा dp जरी लावला तरी तरी फेसबुकला माहिती असतेच की “ गंगाधर ही शक्तिमान है ” राहिली गोष्ट आपल्या आचार विचारांची ते तर कुणी आपल्याला डिवचले की लवकरच कळतात...एखाद्या वेळेला सार्वजनिक रस्ता साफ करताना हातात झाडू घेऊन एखादा फोटो फेसबूकवर टाकल्यास Analytics तुम्हाला समाजसेवक समजतील या भ्रमात पण कुणी राहू नये....(समाजसेवक म्हणून प्रतिमा निर्माण करण्याच्या भारतात नियम व शर्ती वेगळ्या आहेत) कारण प्रत्येकाची विचार करण्याची आणि अभ्यास करण्याची पद्धती वेगवेगळी असते...आपण घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरी ही होणारच कारण
मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात.सोशल मीडिया वापरा तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे पण विवेकाने...आणि हो नुसतंच @ आग्रा ताजमहाल,with my hubby किंवा with my love अश्या पोस्ट टाकून मित्रांकडून लाईकचे👍👍👍👍👍मिळविण्यापेक्षा किंवा तशी अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्यासाठी एखादा पेठयाचा तुकडा आणा आणि मग बघा फेबूच्या त्या अंगठयापेक्षा मित्र मैत्रिणीचे सुखद हास्य आपल्या आयुष्यात काय गोडवा आणते ते.....

टीप :-दिवसातून किती वेळा फेसबूकवर स्टेटस  अपडेट करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे व मी त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो.
धन्यवाद.

---गणेश

आपला मेंदू हायजॅक झालाय.... http://mazemanogat1.blogspot.com/2018/02/blog-post.html



This post first appeared on Maze Manogat, please read the originial post: here

Share the post

होय आपला डेटा चोरी होतोय....

×

Subscribe to Maze Manogat

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×