Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

कारगिल : विश्वासघातावर शौर्याचा विजय..!!

        २२ दिवस चाललेल्या लढाईनंतर १८ ग्रेनेडियर्स ने १२ जून १९९९ ला तोलोलिंगवर विजय प्राप्त केला.ह्यांत एक असाही सैनिक लढला होता ज्याचे लग्न होउन १५  वा दिवस उजाडण्याआधीच, तोलोलिंगसाठी झुंजत होता.पुढे ह्याच बटालियनला, टायगर हिल भारताच्या ताब्यात आणण्याची कामगिरी सोपविण्यात आली. कमांडिंग ऑफिसर के.ठाकुर ह्यांनी तरुण सैनिकांची ‘घातक तुकड़ीे’तयार करुन; चमत्कारापेक्षा किंचितहि कमी नसलेली कामगिरी सोपवली.टायगर हिलवर चढ़ाई करायची असलेल्या बाजुने कोणी  कधीही गेले नव्हते. पाकिस्तानी तर स्वप्नातही विचार करु शकत नव्हते कारण पादाक्रांत करायची होती एक १००० फुटांची उभी भिंत;जी चढ़ल्यावर समोरच बंकर बनवुन स्वागतासाठी आतुर झालेला शत्रु असणार होता.

         “२ जुलै १९९९  ला सुर्यास्त होताच आम्ही टायगर हिल टॉपवर चढ़णे सुरु केले.दोरीच्या सहाय्याने व साथीदारांच्या मदतीने ३ दिवस २ रात्र,एक-एक पाउल जपुन पुढे टाकत,भल्यापहाटे लक्ष्याजवळ पोहचलो.बंकरमध्ये सुरक्षित बसलेल्या शत्रुला फायदेशीर ठरणारा वादळी बर्फाळ वारा,दाट धुके तसेच हवेतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे; प्रत्यक्ष शत्रुची गाठ पडण्याआधीच निसर्गासोबत,प्रत्येक श्वासासाठी आमचा संघर्ष चालु होता.

          पुढे पाऊल टाकणार तोच आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला.पुढे सरकणार्या मार्गाच्या दुतर्फा असणारे शत्रुचे बंकर,काळोख व दाट धुके ह्यांच्या एकत्रीकरणाने आम्हाला दिसु शकले नव्हते. आमचा सर्वनाश करायला,जवळपास ५ तास हा गोळ्यांचा पाऊस पाकिस्तान पाडत होता. १०:३० झाले तरीही संख्याबळाचा  पत्ता मात्र शत्रुला लागत नव्हता. ११ वाजता रेकी करायला दहा बंदुकधारी आले.ते फायरिंग रेंजमध्ये येण्याची वाट बघत बसलेल्या आम्ही, त्यातील आठ उडवले.दोन जख्मी होउन निसटले व आमची जागा, संख्या, हत्यारे ई. माहिती वरिष्ठांना सांगून;नवीन रणनितिसह फक्त सात भारतीय जवानांवर मात करण्यासाठी सत्तर पाकिस्तानी सैनिक चाल करुन आले.

       उंचीचा फायदा घेत,गोटे ढकलत,अधुनमधुन गोळीबार करत; जवळ येत होते.खालून ताज्या तुकडिची कुमक व गरजु साहित्याचा पुरवठा शक्य नसल्याने; दारुगोळ्याची कमतरता जाणवत होती.तरीही आमच्या बंदुका उत्तरे देण्यासाठी सज्ज होत्या.त्यांनी धावा बोलताच, आम्हीही तुटुन पडलो.घमासान गोळीबारी,हाथा-पायीनंतर पस्तीस गनिम संपले पण दुर्दैवाने आमचे सर्व सोबती मारले गेले.

       गंभीर जखमी होउन खाली कोसळलो;तरीही त्यांच्या हालचाली समजत होत्या,गोष्टी ऐकु येत होत्या. हे घूसखोर एकत्र जमावेत म्हणजे एकाच धमाक्यात जास्तीत जास्त खलास होतील.समोर पाशवी मानसिकतेचे विरोधक शहीद भारतीय सैनिकांना लाथा घालत होते.गोळ्या मारल्यावर त्यांना घाणेरड्या शिव्या  हासडतांना बघुन,मनातल्या मनात रडतही होतो आणि रणनितिपाई आहे तसाच पडुनही राहिलो. ५०० मीटरवर असलेल्या MMG चे लोकेशन हे त्यांच्या मष्को घाटीतील त्याच्या  सहकार्यांना सांगून,एका पकिस्तान्याने आमची पोस्ट उध्वस्त करायला सांगितली. शिखरावर आधीच त्यांचे बंकर होते आता घाटीतुनही जर हल्ला झाला तर मधल्या भागातील भारतीय सैनिक नक्कीच मरणार.हल्ल्याची बातमी घेऊन MMGपोस्टला काहीही करून मला पोहचवण्यासाठी, परमेश्वराचा धावा सुरु होता.एक जण बंदुका हिसकायचा तर दूसरा गोळ्या घालायचा. आजुबाजुच्या दोघानंतर मलाही खांद्यात,पायात,जांघेत गोळ्या मारल्या.सार अंग थरारुन गेलं तरी मी आपला पडुनच.

       जखमांत भर पडुनही आत्मविश्वास मात्र कायम होता.डोक्यात व छातीत सोडुन कुठेही गोळी चालवली,अगदी माझा पाय जरी कापुन नेला तरीही चालेल.पुढ़च्याच क्षणी एक गोळी नेमकी छातीवर आदळली;पण लागली मात्र खिशातल्या पाकिटावर, जिथे ५ – ५ ची गोळा झालेली नाणी होती. कुठलीच नवी इजा न करणारा  जोरदार झटका बसल्यावर जाणवले की यातुनही मी वाचल्यामुळे आता मला कोणताही शत्रु मारु शकणार नाही.

       दुसरयाच क्षणी एक पाठमोर्या सैनिकावर ग्रेनेड फेकला,जो नेमका मागच्या बाजुने असणाऱ्या ओवरकोटच्या टोपीत अडकला.हे समजून ग्रेनेड काढ़ेपर्यंत;बॉम्ब ने आपले काम जबरदस्त धमाक्याने पूर्ण केलेही होते.एकच गोंधळ माजला.कोणी म्हणे ‘ह्यांतील एखादा अजूनही जिवंत आहे’, तर कोणी ओरडले ‘हयांची फौजच आली’.माझ्या दिशेने येणाऱ्या एकाची रायफल हिसकुन,एका हातानेच केलेल्या अंधाधुंद गोळीबारात,चौघांना मसणवाट्यात धाडले.

         त्याच हाताच्या मदतिने घासत-सरपटत,एक दगडामागे लपलो.गोळ्यांची एक फ़ैर झाडुन लगेच शेजारच्या दगडामागे पोहचलो आणि पुन्हा फायरिंग.आता मात्र सैन्य आल्याची पक्की खात्री पटल्याने शत्रुचे धाबे दणाणले.घूसखोर पाकिस्तानी सैन्याने एवढाच पराक्रम  दाखवला की लगेच पळत सुटले;एकदाही मागे वळून पाहिले नाही की हे करणारा तर केवळ एक भारतीय सैनिक आहे.

         पण MMG वर होणाऱ्या हल्याचा निरोप नेणे अजूनही बाकी होते.आजु-बाजूला जर कोणी होते तर ते माझे धारातिर्थि पडलेले साथी.कोणाच्या डोक्यातुन गोळी आरपार झालेली तर कोणाच्या शरीराची हालात चाळणीसारखी झालेली. भावापेक्षाही प्रिय मित्रांचि ही अवस्था पाहुन मनाचे बांध फुटले. वाहणारे डोळे पुसुन उठलो ते ह्यांचे बलिदान वाया जाउ देणार नाही,हा इरादा घेउनच.

        तुटलेला हात सोबत घेऊन कशाला फिरायचा,म्हणुन हाताला झटका मारला.मात्र तो कातडयासोबत अजूनही जोडलेला असल्याने,निघाला नाही.त्याला मानेजवळ बांधला. घायाळ होउन प्रचंड झालेल्या; रक्तस्रावामुळे निट शुद्धही नव्हती.धड़ चालणही होत नव्हतं.घसरत-घसरत जरा पुढे सरकलो.नाल्याच्या उतारावरुन एकदम घरंगळत खाली गेलो;कुठे चाल्लो ते मात्र समजतं नव्हतं.MMG कड़े जाणारे आमचे अधिकारी कॅ.सचिन निम्बाळकर व ले.बलवान सिंह दिसले.त्यांना हाका मारल्या. नाल्यातुन उपसुन मला वर काढ़ल्यावर,होणाऱ्या हल्याची माहिती एकदाची सांगूनच टाकली.ते सावध झाले.माझी कामगिरी बजावुन झाली होती.जबाबदारीचे ओझे उतरल्याने मनाला हायसे वाटतं होते.

          स्ट्रेचर ने मला खाली न्यायला पाच तास लागले.जिथे कमांडिंग ऑफिसर ठाकुर साहेबांना स्पष्ट सांगितले की मी तुम्हाला ओळखु शकत नाहिये;तरी सुद्धा माहिती व आपबीती मात्र जशीच्या तशीच सांगितली.त्यांनी लगेच राखीव असलेल्या ब्राव्हो तुकडीला रवाना केले आणि भारताने,शत्रुकडुन हिसकावुन घेतलेल्या टायगर हिलवर पुन्हा एकदा तिरंगा डौलाने फडकला.”हे शब्द आहेत सुभेदार जोगिन्दर सिंह यादव यांचे.

           लष्करात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला स्वप्नवत असणारी ही कामगिरी. सुबत्तता,खुर्ची,वलय ह्या पिढ़िजात गोष्टिंचे अप्रूप वाटणार्या आपल्या देशात ह्या विराला मात्र अलौकिक शौर्य,असीम त्याग व देशभक्ति हा वारसा वडीलांकडून मिळाला आहे;जे १९६५  व १९७१ च्या लढाईत कुमाऊँ रेजिमेंटकडुन पाकिस्थानविरुद्ध लढले होते.

            पहिल्या हल्ल्यातच तीन गोळ्यांनी जायबंदि झालेले यादव,नंतरही ६० फुट चढुन गेले. सरपटत पहिल्या बंकरमध्ये ग्रेनेड फेकून ४ सैनिकांना मृत्युमुखी धाडल्याने गोळीबार थांबला म्हणुन त्यांचे साथी वर येउ शकले.आपल्या दोंन साथीदारांसह दुसऱ्या बंकरकड़े मोर्चा वळवलेल्या जोगिन्दर सिंहांनी, हाथापायी करुन चार सैनिकांना मारले;ज्या संघर्शाची सांगता टायगर हिलवर कब्जा मिळवुनच झाली.

              अवघ्या साड़ेसोळाव्या वर्षी आर्मीत भरती होउन राष्ट्ररक्षणाची शपथ घेणाऱ्या सुभेदार जोगिंदरसिंह यादव ह्यांना,वयाच्या १९ व्या वर्षीच परमवीर चक्र मिळाले.पराक्रमाचा शिखरसन्मान,सर्वात कमी वयात मिळवणारे यादव म्हणतात,”मी जखमी होतो,जागोजागी रक्त वाहत होते,भोवळ येत होती तरीही मला ते दुख़णे जाणवत नव्हते कारण जेव्हा  एखाद्या गोष्टिचा जुनून डोक्यावर चढ़तो,तेंव्हा ईतर कुठल्याही गोष्टी केवळ निरर्थकअसतात.माझ्या डोक्यात भारतमाता होती आणि टायगर हिल जिंकून त्यावर रोवायचा तिरंगा होता.बस्स…”
          मरणोपरांत परमवीर चक्र जाहिर झाल्यानंतर,चमत्कार होउन हळूहळू प्रकृतीही सुधारु लागली. १५ गोळ्या, तुटुन लोम्बकळणारा हात,ग्रेनेडच्या जखमा व सबंध शरीर रक्तात न्हाऊन निघालेले असतांना; साक्षात काळालाही हरवलेल्या ह्या मृत्युंजयाने लवकरच सैन्यात रुजु होउन देशसेवा सुरु केली.

               २६ जुलै-‘कारगिल विजय दिनानिमित्त’-ज्यांच्या त्याग,शौर्य व बलिदानाने आपण सुरक्षित वातावरणात मोकळा श्वास घेऊ शकतो अश्या आपल्या रक्षकांप्रती, असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा केला गेलेला एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख.

        सैनिकांचे आयुष्य म्हणजे काय?हे वर्णन करणारे वाक्य,एका शहीद स्मारकावर कोरलेले आहे, “when you go home, tell other people about us. We gave our today for your tomorrow….!”


जय हिन्द..!!
एक आशावादी
केदार गोगरकर
अमरावती.
[email protected]


Filed under: प्रेरणादायी Tagged: कारगिल, परमवीर चक्र, पराक्रम, प्रेरणा, भारत, भारतीय, युद्ध, शौर्य, सेना, सैनिक


This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

कारगिल : विश्वासघातावर शौर्याचा विजय..!!

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×