Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

इतिहास आणि आपण

प्रथम हे सांगितले पाहिजे की इतिहासासंबंधी लेखन करू इच्छिणार्‍या लेखकाच्या, शिक्षण, व्यवसाय किंवा तत्सम योग्यतांबद्दल वाचकांच्या मनात असलेल्या सर्वमान्य अपेक्षांची न्यूनतम पातळी सुद्धा माझ्या आवाक्यात नाही याची मला जाणीव आहे. हे खरे आहे की बालवयात आई, आजी यांच्याकडून रामायण, महाभारत किंवा वेद यातील निवडक गोष्टी मी भरपूर ऐकल्या आहेत. त्याचप्रमाणे, आपण सारे मराठी बांधव ज्याच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा सार्थ अभिमान बाळगत त्याची एखाद्या देवाप्रमाणे भक्ती करतो त्या शिवाजीराजाच्या गोष्टीही मी बाल वयात खूप वेळा ऐकल्या आहेत आणि नंतर कुमार वयात त्यांचे वाचनही केले आहे. लहानपणी शिवाजीच्या पराक्रमांविषयी भालजी पेंढारकर यांनी निर्मिती केलेल्या चलचित्रपटांचा आनंद मी मनमुराद लुटलेला आहे. परंतु इतिहास, भूगोल या विषयांशी असलेला माझे नाते, या गोष्टी ऐकण्याच्या पुढे फारसे कधी गेलेच नाही. आठव्या इयत्तेपासून मी तांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम निवडला आणि इतिहास किंवा भूगोलाचे पुस्तक परत कधी उघडलेच नाही. यामुळे इतिहासाच्या क्रमिक पुस्तकांत खंडीभराने दिलेल्या सनावळ्या व वर्षे, जन्म व मृत्यू यांच्या तिथ्या, लढाया, तह, शरणनामे या सर्वांपासून माझी कायमचीच सुटका मी करून घेतली. पुढे मी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम निवडला आणि तेथून पदवी प्राप्त केल्यानंतर प्रथम त्याच विषयात संशोधन व नंतर उत्पादन हेच माझे कार्यक्षेत्र बनले. इतिहास आणि भूगोल हे विषय काळाच्या पडद्याआड कधी गेले ते कळलेच नाही. फक्त एखाद्या रवीवारी सकाळी चहा घेत असताना चाळलेल्या वर्तमानपत्रांत, एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल जर काहीबाही लिहून आलेले असले तर ते वाचताना जो काय इतिहासाचा संदर्भ येत असे तेवढाच इतिहासाशी माझा संबंध उरला.

तीन दशकांपेक्षा जास्त कालखंड गेल्यानंतर अखेरीस कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया व आराखडे, गुणवत्ता, पणन, विक्री यांच्याशी येणारा माझा  रोजचा संबंध संपुष्टात आला व माझ्याजवळ आता खूप रिकामा वेळ आहे याची एक आल्हादकारी जाणीव मला झाली. विविध विषयांसबंधी असलेल्या पुस्तकांचे वाचन मग मी सुरू केले. आण्विक भौतिकी या विषयावरची हॉकिन्ग़ आणि वाइनबर्ग यांची पुस्तके, हिरोडोटस आणि ईब्न बट्टूटा यांची प्रवासवर्णने, ज्ञानेश्वरीमधील तत्वज्ञान विशद करून सांगणारे ग्रंथ (हे मी प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो की हे तत्वज्ञान माझ्यासाठी अत्यंत दुर्बोध ठरले.), मानववंशशास्त्र आणि प्राचीन मानवी देशान्तरे किंवा स्थलान्तरे, हे सर्व विषय कमी जास्त प्रमाणात माझ्या वाचनात आले. या नंतर प्राचीन भारताच्या इतिहासासंबंधी एक पुस्तक माझ्या हातात आले. (दुर्दैवाने या पुस्तकाचे नाव माझ्या स्मृतीतून आता पार पुसले गेले आहे.). हे पुस्तक वाचल्यावर आतापर्यंत अज्ञात असलेला एक खजिनाच आपल्याला अचानक प्राप्त झाला आहे याची मोठी सुखद जाणीव मला झाली. जिथे सोन्याची धूर निघत होता असे म्हणले जाते त्या प्राचीन भारताचे वैभव, तिथले महापराक्रमी महाराजे, सम्राट, आणि वायव्येकडून वावटळीप्रमाणे आलेल्या अत्यंत रानटी किंवा क्रूर जुलूमशहांची भारतावरील खुनशी आक्रमणे या विषयांवरचे वाचन करताना आपण एका नव्याच विश्वात प्रवेश करत असल्याचा अनुभव मला आला.  इतिहास वाचता वाचता त्याचा जुळा भाऊ भूगोल हा माझ्या वाचनात मला कधी भेटू लागला ते मला कळलेच नाही. भूगोल मला भेटल्यावर माझ्या हे चांगलेच लक्षात आले की इतिहासासंबंधीचे कोणतेही लेखन चांगले समजावयाला हवे असले तर प्रथम भूगोल उत्तम रितीने ज्ञात हवा. मी भूगोल कधी शिकलेलोच नसल्याने एक मोठीच अडचण माझ्या समोर उभी राहिली. यातून मला मार्ग दाखवला तो माझ्या संगणकाच्या पडद्यावर असलेल्या ‘गूगल अर्थ’ प्रणालीने! तेथून पुढे माझे इतिहास वाचन ‘गूगल अर्थ’ च्या मदतीने सुलभ आणि रोचक बनले.

असे असले तरी इतिहासासंबंधी वाचन करताना काही निवडक काल किंवा संस्कृती आपल्याला जास्त रोचक वाटत आहेत हे माझ्या लक्षात आले. सिंधू-सरस्वती संस्कृती, या संस्कृतीतील जनसमुदायांनी, गंगेचे खोरे, मध्य भारत व अखेरीस उत्तर महाराष्ट्र येथे केलेली स्थलान्तरे. या ठिकाणी उत्तर व पूर्व दिशांकडून आलेल्या जनसमुदायांशी त्यांच्या झालेल्या अन्योन्यक्रिया, अशा सारख्या विषयांवर कै. संकलेचा, कै. म.के. ढवळीकर यांच्यासारख्या संशोधकांचे लेख माझ्या वाचनात आले.  यानंतरच्या काळातील बुद्ध, बौद्धधर्माचा उगम आणि भारतातील त्याचा विलय यासंबंधी मूळ भारतातील पण पुढच्या इस्लामिक आक्रमणांत नष्ट झालेल्या ग्रंथांच्या चिनी भाषांतरांची केलेली इंग्रजी भाषांतरे व त्यावरील टीकाग्रंथ माझा पाहण्यात आले. हे सर्व मी वाचले असे मला म्हणावयाचे नाही. पण जेथे आवश्यक तेथे त्यांचा संदर्भ पाहणे तरी मला जमू लागले. महाराष्ट्रातील सातवाहन राजांबद्दल मी थोडेफार वाचन केले आणि थोड्या प्रमाणात का होईना, वाकटक, चालुक्य आणि यादव या राजघराण्यांची निदान तोंडओळख तरी मी करून घेतली. मध्य युगीन भारताच्या इतिहासात का कोण जाणे फारसा रस मला कधीच वाटला नाही. नाही म्हणायला विजयनगर साम्राज्याबद्दल मी थोडेफार वाचन केले. यानंतर एक शतक ओलांडल्यानंतरचा मराठ्यांचा व विशेष करून पेशव्यांचा इतिहास मी वाचला व मला खूपच रोचक वाटला. वाचलेल्या या कालखंडामधील काही निवडक घटनांवर मी माझ्या ब्लॉगमधे लेखनही केले. महाराष्ट्र आणि कच्छ-सौराष्ट्र यथील अनेक ठिकाणांना भेटी देण्याचा योगही मला आला.

भारताच्या इतिहासातमधील काही कालखंडांची मी वर दिलेली जंत्री बघून वाचकांना कदाचित अशी सार्थ भीती वाटण्याची शक्यता आहे की मी आता इतिहासकार बनण्याचा दावा वगैरे करणार आहे की काय? पण मला असे काहीही करावयाचे नाही. मला याची पूर्ण जाणीव आहे की थोडीफार पुस्तके वाचून कोणी इतिहासकार बनत नाही. या साठी निदान एखादे दशकभर तरी केलेला अभ्यास, मूलभूत संशोधन, त्यावरील लेख किंवा प्रबंध,  ऐतिहासिक स्थळांना दिलेल्या अभ्यासभेटी यासारख्या अनेक गोष्टी जमेस असाव्या लागतात. मी जे काही थोडेफार वाचन मागच्या काही वर्षात केले आहे त्याची जंत्री वाचकांसमोर ठेवताना, इतिहासाच्या अभ्यासाच्या क्षेत्रात जो एक नवीन  कल (किंवा फॅशनही म्हणता येईल.) भारतात किंवा विशेषेकरून महाराष्ट्रात रूढ होताना दिसतो आहे त्यासंबंधी माझी मते व्यक्त करण्याची आणि एक धोक्याची घंटा वाजवण्यासाठी आवश्यक अशी किमान योग्यता तरी माझ्याजवळ आहे हे फक्त वाचकांना पटावे एवढाच माझा उद्देश आहे. सामाजिक माध्यमांचा सुकाळ आणि प्रचार यामुळे या माध्यमांवर अलीकडे आपल्याला अचानक शेकड्यांनी निर्माण होत असलेल्या इतिहासकारांचे पेंव फुटलेले दिसते आहे. इतिहासाचे कोणतेही अध्ययन न करता या मंडळींना आपण सर्वज्ञ इतिहासकार असल्याचा साक्षात्कार  झाल्याचे, माध्यमांना भेट देताना सह्जपणे लक्षात येते आहे.

तसे बघायला गेले तर ही मंडळी खरे तर निरुपद्रवी असायला हवी. मीपणा जपण्यासाठी त्यांना इतिहासाचा वापर करावा असे वाटत असले तर त्यांनी तो करावा, असे आपण म्हणू शकतो. परंतु ही मंडळी जेंव्हा त्यांचा स्वधर्मविषयक किंवा स्वसमाजविषयक अहंकार फुलवण्यासाठी इतिहासाचा वापर करताना दिसतात तेंव्हा खरा विवाद निर्माण होतो आहे असे वाटते. असे झाले की या मंडळींची इतिहासाकडे बघण्याची दृष्टीच बदलते. सर्व ऐतिहासिक घटना, व्यक्ती आणि स्थळे याकडे ही मंडळी त्यांच्या स्वधर्मविषयक किंवा स्वसमाजविषयक अहंकाराच्या चष्म्यातून बघत असल्याने या गोष्टींकडे बघण्याचा आतापर्यंतचा सर्वमान्य दृष्टीकोन त्यांना त्याज्य वाटू लागतो व त्यांच्या चष्म्यातून दिसणारा इतिहासच हा खरा इतिहास असल्याचा साक्षात्कार त्यांना होऊ लागतो. ते हे विसरूनच जातात की कोणतीही ऐतिहासिक घटना, व्यक्ती आणि स्थळे, जर त्यांच्या मागे काहीतरी जुने कागदपत्र, शिलालेख, ताम्रपत्रकिंवा पुरातत्वशास्त्रीय पुरावा असला तरच त्या सर्वमान्य होऊ शकतात.

गेल्या तीन चार दशकात पुण्यामधे ज्यांचे नाव आवर्जून घेतले जात होते अशा इतिहासकारांमध्ये कै. निनाद बेडेकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 1970 च्या दशकात बेडेकरांचे, पुण्याच्या आसमंतात दिसून येणार्‍या परंतु अपरिचित असलेल्या स्थळांबद्दलचे एक व्याख्यान अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन ऐकल्याचे मला अजून आठवते आहे. मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या विशेष आवडीचा होता.  याच बेडेकरांना इतिहासाच्या अभ्यासाला सध्या पछाडणार्‍या या कर्करोगाच्या प्रथम खुणा एका दशकापूर्वीच प्रथम दिसू लागल्या होत्या व त्यामुळे यापुढे आपण मराठ्यांच्या इतिहासासंबंधी एक अक्षर लिहिणार नाही किंवा एक शब्द बोलणार नाही असे नाईलाजाने सांगावे लागले होते. इतिहासाच्या अभ्यासाला मिळत असणार्‍या या नव्या दिशेपासून स्वतःला दूर करण्यासाठी बहुधा हा निर्णय त्यांनी घेतला होता. सर्वसामान्य व्यक्तीला आज  सामाजिक माध्यमांचे व्यासपीठ सहजतेने उपलब्ध होत असल्याने या नव्या समस्येला आणखी आणखी खतपाणीच मिळत असल्याचे दिसते आहे.

मी वर निर्देश केल्याप्रमाणे बुद्ध आणि बौद्ध धर्माचा इतिहास हा मला नेहमीच रोचक वाटत आलेला आहे. मुळात महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यातील बौद्ध लेण्यामध्ये असलेल्या काही सुंदर मूर्ती व कोरीव शिल्पे, आता मुंबई किंवा दिल्ली येथील संग्रहालयांमध्ये बघायला मिळतात. ही संग्रहालये आणि बौद्ध लेणी यांना  भेट देऊन आल्यानंतर मी यासंबंधी काही लेख लिहिले आहेत किंवा या मूर्तींची मी काढलेली छायाचित्रे काही वेळा मी फेसबूक सारख्या सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध करत असतो. अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकात लिहिली गेलेली काही प्रसिद्ध पुस्तके आणि संग्रहालयात या मूर्तींशेजारी ठेवलेले माहिती फलक यांच्या आधारे अशाच एका कोरीव शिल्पाचे छायाचित्र व त्यासंबंधीचे विवेचन हे मी फेसबूकवर प्रसिद्ध केलेले होते. या माझ्या पोस्टवर फेसबूकवरील माझ्या एका मित्राने मारलेला एक शेरा वाचून मला धक्काच बसला होता. हा माझा फेसबूक मित्र म्हणत होता की माझे विवेचन वाचून त्यांच्या मनात आता संशय निर्माण झाला आहे की मी खराखुरा बौद्धधर्मिय आहे किंवा नाही? म्हणजे मी बौद्धधर्मियच असलो पाहिजे असे या माझ्या मित्राने मनोमनी ठरवूनच टाकले होते. हा ठोकताळा या माझ्या मित्राने कसा काय बांधला होता हे कळावयास मला तरी  काही वावच नव्हता. कदचित त्याने असे ठरवूनच टाकले होते की लेण्यामधील मूर्तींची छायाचित्रे काढणार्‍या व्यक्ती या बौद्धधर्मियच असणार.  त्याचा हा शेरा बघितल्यावर माझ्या विवेचनाच्या पुष्टीनिमित्त Fergusson आणि  Burgess यांनी लिहिलेल्या ‘Cave temple of India’ या पुस्तकातील एक उतारा मी फेसबूकवर टाकला होता. यावर माझ्या या मित्राचे आलेले उत्तर तर या सर्वावर कळस करणारे होते. त्याने लिहिले होते की ही मंडळी परकीय असल्याने त्यांना भारताबद्दल काही माहिती नव्हतीच मुळी. “क्षमस्वः फर्गुसन आणि बर्जेस, तुमचे भारतातील संशोधन एकविसाव्या शतकातील भारतात ग्राह्य धरले जाणार नाही कारण तुम्ही परकीय होता आणि मुळात बौद्ध नव्हता”  अर्थात मी एवढ्यावर हार मानणारा नव्हतो. मी या मूर्ती शेजारी जो फलक संग्रहालयात लावलेला होता त्याचे छायाचित्रच फेसबूकवर पोस्ट केले आणि या फलकावरील मजकूर माझ्या मूळ निवेदनाला पुष्टी देतो आहे हे माझ्या फेसबूकवरील मित्राच्या निदर्शनाला आणले. यावर माझ्या मित्राचे लगेच उत्तर आले की संग्रहालयातील फलकाला तो काडीचीही किंमत देत नाही. तो म्हणतो तेच सत्य आहे. एवढे थारोळे झाल्यावर माझ्यापुढे दुसरा  काही मार्गच उरला नव्हता. मी फेसबूकवर टाकलेले मूळ  छायाचित्र आणि माझ्या या मित्राचे फेसबूकवरील माझ्याशी असलेले मित्रत्व हे दोन्ही मी त्वरेने काढून टाकले.

फेसबूकवरील माझे हे पोस्ट आणि त्यावरील शेरे यांबद्दल एवढ्या बारकाईने मी वर लिहिण्याचे कारण वाचकांच्या लक्षात आले असेलच. इतिहासातील गोष्टींच्याकडे आपल्या स्वधर्माच्या अहंकाराच्या चष्म्यातूनच बघत राहण्याने दृष्टीकोन कसा एकांडा व हास्यास्पद होऊ शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. स्वधर्माचा किंवा स्वसमाजाचा ज्यांना अभिमान वाटत असेल त्यांनी तो जरूर बाळगावा, माझे त्यावर काहीच म्हणणे नाही. परंतु कोणत्याही पुराव्याचा विचार न करता मी म्हणतो तसेच असले पाहिजे असा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवल्यास इतिहासाचे आकलन होणे शक्य होणार नाही एवढेच मला या मंडळींना सांगावेसे वाटते.

जॉर्ज ऑरवेल या लेखकाच्या, ‘1984’ या प्रसिद्ध पुस्तकाची मला या संदर्भात आठवण होते आहे. या पुस्तकातील 1984 चे इंग्लंड हे बिग ब्रदर या नावाच्या हुकुमशहाच्या ताब्यात आहे. हा हुकुमशहा इनर पार्टीच्या मदतीने देश चालवतो. या पार्टीकडून आलेली फर्माने ही या देशात  ब्रह्मवाक्ये असतात.  विन्स्टन स्मिथ हा एक तरूण या कादंबरीतील प्रमुख पात्र आहे. विन्स्टन स्मिथ हा आउटर पार्टीचा सभासद असल्याने त्याला सरकारी नोकरी आहे. तो सत्यमंत्रालयात काम करत असतो. या मंत्रालयाची  प्रचार आणि इतिहासाचे पुनर्लेखन या जबाबदार्‍या असतात. विन्स्टन स्मिथचे मुख्य कार्य हे वर्तमानपत्रातील जुन्या बातमीपत्रांचे पुनर्लेखन हे असते, ज्यायोगे सर्व ऐतिहासिक लिखाण हे पार्टीच्या सध्याच्या धोरणांशी (फर्मानांशी)  सुसंगत असलेले दिसत राहते. हे लेखन करणार्‍यांना ते जुनी चुकीची अवतरणे बरोबर करत असल्याचे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात ते खोटी माहिती त्या लिखाणांत घुसडत असतात. सत्यमंत्रालयाकडे जुने लिखाण नष्ट करण्याचीही जबाबदारी असते.  या पद्धतीने सरकार आपल्या फर्मानाद्वारे इतिहासात फेरफार किंवा ढवळाढवळ करत आहे याचा कोणताच पुरावा शिल्लक राहत नाही.

सध्या सामाजिक माध्यमांवर धुडगुस घालणार्‍या तरुण इतिहासकारांची एकूण वृत्ती व त्यांची पोस्ट्स ही  ‘1984’ मधील इनर पार्टीने काढलेल्या फर्मानांप्रमाणे आहेत की काय अशी भीती मला अलीकडे वाटू लागली आहे. “तुमचा पुरावा खड्यात घाला! आम्ही म्हणतो तोच इतिहास आहे कारण तो आमच्या धर्माच्या किंवा समाजाच्या शिकवणीशी सुसंगत आहे”. असे त्यांचे एकूण म्हणणे दिसते आहे. हा कल वाढत गेला तर सध्या काही अभ्यासू आणि विद्वान अभ्यासकांचे कार्यक्षेत्र असलेले इतिहासाचे अध्ययन हे भविष्यात एक धोकादायक क्षेत्र बनू शकेल. निंदा-नालस्ती करून किंवा दंगे, मोर्चे काढून आपले म्हणणे समाजावर लादणे हीच या क्षेत्रातील नवी व्यवस्था बनेल. मग तालिबान गुंडाच्या कारकिर्दीत इतिहासप्रेमी अफगाणी अभ्यासकांनी संग्रहालयातील मूर्ती जशा तळघरात लपवून ठेवल्या होत्या तशीच वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही.

इतिहासाचे (आणि त्याच्या बरोबर येणारा त्याचा भाऊ भूगोल याचे) अध्ययन हे एक मोठे समाधान देणारे असते असा माझा अनुभव आहे. इतिहास म्हणजे सनावळ्या आणि युद्धे यांची एक लांबलचक यादी नसून प्राचीन कालातील आपल्या देशाला बघण्याची एक नवीन दृष्टी इतिहास आपल्याला देतो असे मला वाटते. सिंधु-सरस्वती संस्कृतीचा  विनाश कोणा आक्रमणामुळे न होता मॉन्सून पावसा

Share the post

इतिहास आणि आपण

×

Subscribe to अक्षरधूळ | माझे मराठी लेखन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×